नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे
खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय
· आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे
मुंबई, दि. 24 : नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे 7 ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
यासंदर्भात मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.
धार्मिकस्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
००००
महिलांच्या सुरक्षेबाबत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे
केंद्रीय गृहमंत्री व संरक्षण मंत्री यांना निवेदन
पुणे/दिल्ली दि. 23 : महिला सुरक्षिततेसंदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना निवेदन दिले आहे. संपूर्ण देशस्तरावर महिला व मुले यांच्या सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी विशेष सुविधा व कार्यपद्धती (SOP) होणे आवश्यक आहे असे डॉ. गोऱ्हे यांनी म्हटले आहे.
महिला सुरक्षेसाठी कार्य करत असतांना दक्षता, योजना आणि पायाभूत सुविधांच्या कार्यपध्दतीबद्दल चांगली निगराणी आवश्यक आहे. रस्ते वाहतूक व रेल्वे वाहतुकीतील सुरक्षा प्रश्नांविषयी बैठक घेवून यावर विशेषत्वाने काम करणाऱ्या महिला लोकप्रतिनिधींना यावेळी बोलावण्यात यावे, अशी सूचना डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. त्या आधाराने संबंधित विभागांना आणि संबंधित मंत्रालयांना योग्य त्या सूचना देण्यास तसेच विविध स्वरुपाच्या अत्याचाराच्या घटना आणि सार्वजनिक ठिकाणी सुरक्षिततेसाठी राष्ट्रीय मास्टर प्लॅन प्रत्यक्षात कसा आणता येईल याचा देखील विचार करता येऊ शकेल अशी अपेक्षा डॉ. गोऱ्हे यांनी व्यक्त केली आहे.
पोलीस दलात त्याचप्रमाणे तीनही सैन्यदलात महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही अत्यंत स्वागतार्ह गोष्ट आहे. परंतु त्यामध्ये काम करत असणाऱ्या महिलांवरही अत्याचाराच्या घटना समोर येत आहेत. अत्याचारपीडित महिलांना सर्वतोपरी मदत मिळण्यासंदर्भात स्पष्ट माहिती देण्याची विनंती देखील या पत्राच्या माध्यमातून डॉ. गोऱ्हे यांनी संरक्षण मंत्री श्री. सिंह यांना केली आहे.
देशाचे संरक्षण करणाऱ्या महिलांवर सार्वजनिक ठिकाणी झालेले अत्याचार अथवा कौटुंबिक हिंसाचार यासंदर्भात महिलांना मदत करणारी यंत्रणा सरकारने त्यांच्या पाठीशी उभी करणे गरजेचे आहे. या यंत्रणेमध्ये वैद्यकीय, अर्थिक पाठबळ, सामाजिक समुपदेशन, पुनर्वसन याचा देखील सहभाग आवश्यक आहे, असेही डॉ.गोऱ्हे यांनी पत्रात नमूद केले आहे.
No comments:
Post a Comment