पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ग्वाही
सांगली, दि. 02 : महापूराने झालेल्या नुकसानीमुळे कोणीही खचून जावू नका. राज्यसरकार आपल्या पाठीशी असून पूरग्रस्त जनतेला पुन्हा उभे करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पूरग्ररस्तांशी संवाद साधताना दिली.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी कसबे डिग्रज व मौजे.डिग्रज या पूरग्रस्त गावांना भेट देऊन पूरग्रस्तांशी संवाद साधला. यावेळी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार धैर्यशील माने,आमदार मोहनराव कदम. आमदार अनिल बाबर, आमदार सुमन पाटील, आमदार अरूण लाड, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित होते.
पुराचे संकट प्रत्येक वर्षी येते. पुरामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी आता यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाची तयारी आहे, असे मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी ग्रामस्थांशी संवाद साधतांना सांगितले.
मौजे डिग्रज व कसबे डिग्रज येथील पाहणी दौऱ्यात नागरिकांनी मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांना निवेदने सादर केली. ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मदत दिली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी ग्रामस्थांना दिला.
000000
शासन प्रत्येक घटकाच्या पाठीशी ठाम उभे राहणार
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सांगली, दि. 02 : शेतकरी, व्यापारी, छोटे मोठे व्यावसायिक या घटकाचे पुरामुळे नुकसान झाले असले तरी कोणीही खचून जावू नका. राज्यसरकार आपल्या पाठीशी असून आपल्यामध्ये असलेले आपुलकीचे नाते बाळगुया, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारती विद्यापीठ येथे सांगली शहर पूरग्रस्त नागरिक आणि व्यापाऱ्यांशी संवाद साधताना दिला.
यावेळी कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजीत कदम, आमदार मोहनराव कदम, मुख्य सचिव सीताराम कुंटे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांच्यासह शहरातील पूरग्रस्त नागरीक व व्यापारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, सांगली जिल्ह्यात पुरामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी केली. ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. पुरामुळे झालेले नुकसान भरुन न निघणारे आहे, पण कोणी खचू नका, राज्यसरकार आपलेच आहे. आपल्या दु:खाची सरकारला जाण आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीतून सावरण्यासाठी शासन प्रत्येक घटकाला मदत करेल. आता पूर ओरसत आहे, त्यामुळे पंचनामे करण्याचे काम गतीने पूर्ण करुन पूरग्रस्तांना न्याय दिला जाईल. पुरामुळे बाधित झालेला कोणताही घटक मदतीपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घेतली जाईल, असेही श्री.ठाकरे यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, पूरग्रस्तांना एनडीआरएफच्या निकषानुसार मदत करण्याचे काम सुरु आहे. मदतीचे हे निकष 2015 चे आहेत. हे निकष बदलण्यासाठी केंद्र सरकारकडे मागणी केली आहे. राज्य शासनाप्रमाणेच बँका, विमा कंपन्यांनीही पुढे येऊन पूरग्रस्तांना मदत करावी. राज्याच्या महसूल यंत्रणेने केलेले पंचनामे विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावेत, यासाठी संबंधितांची बैठक घेवून तशा सूचना दिल्या आहेत. व्याज दर कमी करण्याबाबतही आवाहन केले आहे. यासाठी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांनी एकत्र येऊन याचा पाठपुरावा करावा. पूर व्यवस्थापनासाठी महापुराचे पाणी दुष्काळी भागाकडे वळविणे, याचा आराखडा बनविणे, नदीपात्रातील अतिक्रमणे काढणे यासारख्या बाबींना आता प्राधान्य देणे महत्वाचे असल्याचेही मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, गेले वर्ष-दोन वर्ष आपण कोरोना आपत्तीशी लढा देत आहोत. जीव वाचविणे महत्वाचे असल्यानेच निर्बंध लागू केले. दुसरी लाट आता कमी होऊ लागली आहे. त्यामुळे निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. केंद्र सरकाराने संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली असून त्या दृष्टिनेही काळजी घेणे आवश्यक आहे.
कृषी व सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी स्वागत करुन प्रास्ताविक केले.
व्यापारी संघटनांच्यावतीने शरद शहा यांनी मनोगत व्यक्त करुन व्यापाऱ्यांच्या समस्या मांडल्या
No comments:
Post a Comment