Tuesday, 10 August 2021

 ऑक्सिजन बाबतीत महाराष्ट्र देशातील

पहिले स्वयंपूर्ण राज्य ठरेल

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मीरा-भाईंदर ऑक्स‍िजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण

 

             ठाणे, दि. 10 : दुसऱ्या कोरोना लाटेमध्ये ऑक्सिजनअभावी विविध अडचणींचा सामना रुग्णाला करावा लागला. आता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्स‍िजनबाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम चालू आहे महाराष्ट्र हे देशातील ऑक्स‍िजन बाबतीत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

            मीरा-भाईंदर येथील ऑक्स‍िजन निर्मिती प्रकल्पाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले त्यावेळी मुख्यमंत्री श्री.ठाकरे बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रताप सरनाईक मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक आदी उपस्थित होते.

            मीरा-भाईंदर महानगरपालिकेने विविध लोकोपयोगी विकासकामे केलेली आहेत, यामध्ये जलतरण तलाव तसेच नाट्यगृह यांचे काम प्रगतिपथावर आहे. मीरा-भाईंदर भागांमध्ये कर्तव्यदक्ष लोकप्रतिनिधी आमदार प्रताप सरनाईक यांच्या कामाच्या माध्यमातून लोकोपयोगी कामे करण्यात आली आहेत आणि भविष्यामध्ये केली जाणार आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

            कोरोना काळामध्ये सर्वात प्रथम ठाणे जिल्ह्याने ऑक्स‍िजन प्रकल्प उभारला होता यामुळे ठाणे जिल्ह्याने ऑक्सिजन बाबतीत स्वयंपूर्ण झालेला पहिला जिल्हा होण्याचा मान मिळविला आहे.

            मागील लाटेचा अनुभव पाहता संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्स‍िजनपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

            कोरोनामुक्त गाव ही संकल्पना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्याची आवश्यकता आहे. प्रत्येकाने आपले गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न केले तर महाराष्ट्र नक्कीच कोरोनामुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री श्री.ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला.

००००

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi