Thursday, 28 April 2022

 इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक,

कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता

- इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार.

             मुंबई, दि. 27 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            मंत्री श्री.विजय वडेट्टीवार म्हणाले यामध्ये नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे तो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. तसेच विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यात शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.

            मागासवर्गीय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतुने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी संपूर्ण ६०५ अभ्यासक्रम होते आता एकूण ७३६ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात २०२०-२०२१ सालापासून ४० तर २०२१-२०२२ पासून २४ अभ्यासक्रम नव्याने सुरु केल्याची माहिती यावेळी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

*****



 

 जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात डॉ. मधुकर गायकवाड यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र ’ या कार्यक्रमात मुंबईतील जे. जे. रूग्णालयाचे औषध वैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. मधुकर गायकवाड यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल साळुंखे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

        गुरुवार, दि. 28 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 7.30 वाजता ही मुलाखत महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांवर पाहता येईल. त्यासाठी

यू ट्यूब - https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR


फेसबुक - https://www.facebook.com/MahaDGIPR

ट्विटर - https://twitter.com/MahaDGIPR ही माध्यमे उपलब्ध आहेत.              

            गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील तापमान कमालीचं वाढू लागलं आहे. विशेषतः विदर्भ, खानदेशबरोबरच कोकणचे तापमानही वाढत आहे. वातावरणीय बदलामुळे उन्हाळा अधिक तीव्र होत असताना या काळात आपली काळजी कशी घ्यावी, उष्माघातपासून आपले रक्षण कसे करावे, याविषयीची सविस्तर माहिती डॉ. मधुकर गायकवाड यांनी जय महाराष्ट्र या कार्यक्रमातून दिली आहे.

००००

‘दिलखुलास’ कार्यक्रमात डॉ. हेमंत वसेकर यांची मुलाखत.

            मुंबई, दि. 27 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर गुरूवार दि. 28 एप्रिल व शुक्रवार 29 एप्रिल व शनिवार 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. ज्येष्ठ निवेदक शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे.


            महाराष्ट्राचे नागरिकीकरण खूप वेगात होत असले तरी आजही 55 टक्क्यांहून अधिक लोकसंख्या राज्याच्या ग्रामीण भागात राहते. शेती आणि शेतीशी निगडीत असलेल्या उद्योगांतूनच या लोकसंख्येला प्रामुख्याने रोजगार मिळतो. ग्रामीण महिलांना आर्थिक सक्षम करण्याबरोबरच या लोकसंख्येचे जीवनमान अधिक समृद्ध करण्यासाठी राज्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविले जात आहे. या अभियानाचे कार्य, त्याचा उद्देश आणि त्यातून होत असलेल्या बदलांबाबत सविस्तर माहिती डॉ. हेमंत वसेकर यांनी दिलखुलास या कार्यक्रमातून दिली आहे.


००००



 

 *नुसतं मन समुद्राएवढे असून चालत नाही,*

*खडकावर आदळून शांत परतणाऱ्या*

*अबोल लाटांसारखी,*

*वेदना सहन करण्याची*

*सहनशक्तीही असावी लागते.*

*आणि तेही हसत-हसत...!*

          *शुभ सकाळ*  💐

 इंडो-पॅसिफिक भूभागातील शाश्वत विकासासाठी

एकत्रित काम करणे काळाची गरज

- आदित्य ठाकरे.

            नवी दिल्ली, 27 : इंडो-पॅसिफिक भूभागातील राष्ट्रांसमोरील समस्या सारख्या असून त्यासाठी एकत्रित येऊन काम करणे काळाची गरज असल्याचे मत, राज्याचे पर्यावरण तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज येथे मांडले.

            ऑबजर्वर रिसर्च फॉऊंडेशन आणि केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या वतीने आयोजित ‘रायसीना डायलॉग 2022’ च्या परिचर्चा कार्यक्रमात ‘इंडो-पॅसिफिक क्षेत्रातील मानवी विकास पुनर्स्थापित करणे’ या विषयावर विचार मांडताना श्री.आदित्य ठाकरे बोलत होते. या परिसंवादात एफडी, फ्रांसचे आंतरराष्ट्रीय ऑपरेशन्स कार्यकारी संचालक फिलीपे ऑरलीयांग, स्पेनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे महासंचालक जेवीयर सॅलीडो ऑरटीज. युनायटेड किंगडमच्या कॉमन वेल्थ डेव्लपमेंट कार्यालयाचे संचालक मेलींडा बोहोन्नोन, केनियातील युराय्या ट्रस्टचे कार्यकारी संचालक ऊडूअक अमिमो हे उपस्थित होते. या परिसवांदाचे समन्वयन ऑस्ट्रेलिया आणि न्युजींलँडच्या संचार व्यवस्थापक रायली बॅजर्नी यांनी केले.

            मंत्री श्री. ठाकरे पुढे म्हणाले, एकूणच इंडो-पॅसिफिक भूभागाकडे पाहताना त्यांच्यात सांस्कृतिक साम्य अथवा विरोधाभास दिसतो. तथापि, जागतिक पातळीवरील समस्या जवळपास सारख्याच आहेत. यामध्ये कुपोषण, मुख स्वास्थ्य, अस्वच्छता, सध्या त्यात महामारीच्या आधीचे आणि नंतरचे बदल असे प्रश्न सर्वांना कमी अधिक प्रमाणात सारखेच भेडसावत आहेत. मात्र, शाश्वत विकासाच्या दिशेन वाटचाल करताना स्वच्छ पाणी, स्वच्छ ऊर्जा, ग्रीन स्टील, ग्रीन सिमेंट यामध्ये होणा-या गुंतवणूकीबद्दल विचार होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

            विकास महत्वाचाच आहे. विकास होत असताना तो लघु अथवा दिर्घकाळाचा होत आहे का हे पाहणे गरजेचे आहे. शाश्वत विकासासाठी आवश्यक असणारे चिंतन गरजेचे असल्याचे श्री ठाकरे यांनी यावेळी नमूद केले. शाश्वत विकास करायचा असल्यास आज, उद्याचा विचार करून चालणार नाही तर, येणा-या पिढ्यांसाठी हा विचार होणे गरजेचे असल्याचे सांगत आपल्या समोर असणारी वाढती लोकसंख्या, बदलते पर्यावरण, सामाजिक, राजकीय बदल अशा समस्या आहेत. यासाठी ऊर्जा सुरक्षा, खाद्यान्न सुरक्षा, आरोग्याची काळजी वर्तमानात या बाबी फार महत्वाच्या असल्याचे मत श्री ठाकरे यांनी यावेळी मांडले. या समस्या सोडविण्यासाठी विविध वैश्विक मंचांवर चर्चा होणे गरजेची असल्याचे त्यांनी व्यक्त केले. राज्य म्हणून काही योजनांची अंमलबजावणी करता येऊ शकते, परंतु देशपातळीवरील समस्या सोडविण्यासाठी सर्वांनुमते निर्णय होणे देशाच्या आणि राज्याचा विकासाला पुढे घेऊन जाणारे ठरेल असेही ते यावेळी म्हणाले.

सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून राज्यातील महानगरांचा विकास सुरु

            राज्यातील महानगरांच्या विकासात सार्वजनिक खाजगी भागीदारी महत्वाची असून या माध्यामातून या शहरांचा विकास होत असल्याचे मंत्री श्री ठाकरे यांनी या परिसंवादात सांगितले. राज्यातील मुंबई, पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक, औंरगाबाद ही शहरे झपाट्याने वाढत आहेत. यामध्ये लोकसहभागिता महत्वाची असल्याचे त्यांनी व्यक्त केले. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. जगाचे लक्ष या शहराकडे असून राज्य सरकार म्हणून आमची जबाबदारी धोरण बनविण्याची आणि ती राबविण्याची आहे. यासह येथे आर्थिक गुंतवणूक होत असताना येथील सुव्यवस्था राखणे, या शहराचे सौदर्यींकरण करणेही महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी राज्य शासन कटीबद्ध आहे, असेही ते म्हणाले.

            कोरोना नंतरच्या काळात आपण जगत आहोत, वर्तमानात सर्वच बाबतीत संतुलन राखणे गरजेचे असून राज्य सरकार म्हणून शासनाचा प्रयत्न आहे. सार्वजनिक वित्त असो वा खाजगी वित्त असो यामध्ये संतुलन ठेवावेच लागेल तेव्हाच शाश्वत विकास साधला जाऊ शकतो, असे श्री ठाकरे म्हणाले.

            रायसीना डायलॉग या कार्यक्रमात खासदार शशी थरूर यांनी श्री ठाकरे यांची वायुप्रदूषण संकटावर मात कशी करता येऊ शकते, राज्य सरकार यासाठी काय पाऊले उचलली आहेत या विषयावर त्यांच्याशी संवाद साधला. 

            हरित वित्तपुरवठा आणि ऊर्जा परिवर्तन क्षेत्रात महाराष्ट्र आणि जपान यांच्यातील द्विपक्षीय सहाकार्य वाढविण्यासाठी श्री ठाकरे आणि जपान बँकेचे गव्हर्नर तदाशी मैदा यांच्याशी चर्चा केली.

0000









 

 नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळेझालेल्या नुकसानीसाठीचा एकत्रीत प्रस्ताव पाठवा

  - मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार.

            मुंबई, दि. 27 :- नागपूर जिल्ह्यातील माहे ऑगस्ट-सप्टेबर २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती,पिके,रस्ते फळबांगाचे अतोनात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या भागातील नुकसानीचा एकत्रित प्रस्ताव पाठवावा तसेच प्रलंबित प्रस्तावावर कार्यवाही करावी अशा सुचना मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केल्या.

            सिंहगड निवासस्थानी नागपूर जिल्ह्यातील गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत बैठक पार पडली.यावेळी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार,मृद व जलसंधारण सचिव दिलीप पांढरपट्टे,मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव संजय धारूरकर, नागपूर विभागीय आयुक्त माधवी खोरे या दूरदृश्यप्रणालीव्दारे यावेळी उपस्थित होत्या.

            मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, माहे ऑगस्ट सप्टेंबर २०२१ मध्ये सततच्या पावसामुळे शेती पिक, रस्ते, फळबागा व रस्ते यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या शेतकरी सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे अनेक संकटांना तोंड देत असून गत वर्षी सततचा पाऊस. गारपीट, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस यामुळे पुरताच कोलमडून गेला होता.शहरी ग्रामीण भागातील रस्ते उखडले होते वाहुन गेले तसेच अतिवृष्टीमुळे बंधारे,तलावाला गळती लागली होती.चंद्रपूर,गडचिरोली,गोंदिया जिल्हात सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकावर किडीचा प्राद्रुर्भाव होऊन टोळधाड पहावयास मिळाली व प्रचंड नुकसान झाले येथील नुकसानीचा सविस्तर अहवाल सादर करावा अशा सूचना मदत व पनुर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिल्या.      

           मंत्री श्री.वडेट्टीवार म्हणाले, ७२ तासात एकूण पर्जन्यमान किती झाले पावासाची नोंद किती हे स्पष्ट झाली पाहिजे. तसेच नुकसान किती झाले हे मांडणे आवश्यक आहे.३३% पेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीसाठी निकषानुसार व दरानुसार मदत केली जाईल.शेतीपिकाच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दराने निधी सर्व विभागीय आयुक्तांना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जून ते आक्टोबर २०२० या कालावधीत अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे शेतीपिकाच्या नुकसानीसाठी वाढीव दराने शासनाने मदत केली आहे, असेही मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाईच्या प्रलंबित

प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करा

- पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार

            पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार म्हणाले, नागपूर, चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या २०१५ पासूनचे नुकसानभरपाईचे प्रस्ताव प्रलंबित आहेत. तसेच गेल्या वर्षीही अतिवृष्टीमुळे शेती, पिके, रस्ते फळबांगाचे अतोनात नुकसान झाले याबाबत प्रशासनाने योग्य ते प्रस्ताव पाठवून यावरती कार्यवाही केली जावी.नागपूर जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाच्या दुरूस्ती,अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांसाठीही ३६ कोटी च्या निधी देखील उपलब्ध करून देण्यात यावा. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानभरपाई ही लवकरात लवकर मिळावी अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी केली.


0000



 इतर मागास, बहुजन कल्याण मंत्रालयाकडून नवीन ६४ व्यावसायिक,

कृषी अभ्यासक्रमाच्या शिष्यवृत्तींना मान्यता

- इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार.

             मुंबई, दि. 27 : इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती सुरु केल्याची माहिती इतर मागास,बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली.

            मंत्री श्री.विजय वडेट्टीवार म्हणाले यामध्ये नवीन ६४ व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी महाडिबीटी प्रणालीवर मॅपींग करण्यास मान्यता देण्यात आली आहे. इतर मागास, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेषमागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखापर्यंत मर्यादित आहे तो विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी पात्र असेल. तसेच विद्यार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला व परराज्यात शिक्षण घेत असला तरी त्यास शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क/परीक्षा शुल्क लागू करण्यात आले आहे.

            मागासवर्गीय, ओबीसी, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे रोजगार, स्वयंरोजगार, व्यावसायिक अभ्यासक्रमातून जीवनमान उंचावणे व त्यांना रोजगारसंधी उपलब्ध व्हाव्यात या हेतुने इतर मागास बहुजन कल्याण विभाग सतत प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी संपूर्ण ६०५ अभ्यासक्रम होते आता एकूण ७३६ अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. त्यात २०२०-२०२१ सालापासून ४० तर २०२१-२०२२ पासून २४ अभ्यासक्रम नव्याने सुरु केल्याची माहिती यावेळी मंत्री श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

*****



Featured post

Lakshvedhi