Wednesday, 26 January 2022

 


 राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती


            मुंबई, दि. 26 : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया, ॲड. संगीता चव्हाण, सुप्रदा फातर्पेकर, दीपिका संजय चव्हाण, आभा विजयकुमार पांडे, उत्कर्षा रुपवते या सहा जणींची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात याबाबत 25 जानेवारी 2022 रोजी अधिसूचना प्रसिध्द झाली असून अधिसूचना प्रसिध्दी दिनांकापासून ही नियुक्ती तीन वर्षे कालावधी करीता आहे.

 महिला अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या "निर्भया" पथकांमुळे

महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

· मुंबईतील महिलांना आता "निर्भया" पथकाचे सुरक्षा कवच

· 103 क्रमांक डायल करून निर्भया पथकाची मदत घेता येणार

मुंबई, दि. 26 : महिला अत्याचाराच्या घटना घडूच नयेत, दुर्देवाने घडल्याच तर तिथल्या तिथे आरोपींचा बंदोबस्त करणारी यंत्रणा उभी राहावी यासाठी मुंबई पोलीस दलाने आज निर्भया पथक व इतर उपक्रमांच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेसाठी एक अतिशय महत्वाचे पाऊल टाकल्याचे व यामुळे महिला सुरक्षेच्या कामाला अधिक बळकटी प्राप्त होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्र्यांच्या दूरस्थ उपस्थितीत आज निर्भया पथकाचे तर मान्यवरांच्या उपस्थितीत इतर विविध निर्भया उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास विधानपरिषदेच्या उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, महिला व बाल विकास मंत्री यशोमती ठाकूर, (दूरदृष्यप्रणालीद्वारे) गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील (दूरदृष्यप्रणालीद्वारे), मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रियंका चतुर्वेदी, खासदार अरविंद सावंत यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्यासह पोलीस दलातील इतर वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, आज निर्भया पथक आणि महिला सुरक्षिततेच्या उपाययोजनांचे विविध उपक्रम सुरु करून मुंबई पोलीसांनी एक स्तुत्य काम केले आहे. त्याबद्दल गृहमंत्री आणि मुंबई पोलीस दलाचे विशेष कौतूक आहे. आज प्रत्येक क्षेत्रात महिला सक्षमपणे काम करत आहेत, विविध क्षेत्रात त्यांची ही घोडदौड सुरु असतांना समाजातील सामान्यातल्या सामान्य महिलेला सुरक्षितता पुरवणे गरजेचे आहे. एखादी घटना घडते, त्या काळापुरता हल्लकल्लोळ माजतो परंतू नंतर काही काळाने सगळे थंड होते, महिला सुरक्षितता हा विषय फक्त त्या दिवसापुरता चर्चेत राहतो. असे होता कामा नये.

निर्भया पथके कायद्याचा वचक निर्माण करतील

             आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, ते मातृभक्त होते. आपण झाशीच्या राणीचे नाव घेतो, आपल्या महाराष्ट्राला साधुसंतांची शिकवण आणि संस्कार आहे. परंतू जिथे महिलांवर दुर्देवाने अत्याचार घडतात तिथे कायद्याचा वचक निर्माण करणारी ही निर्भया पथके महत्वाची ठरणार आहेत. आज मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिलेला 11 लाखाचा निधी हा महिला सुरक्षिततेच्या कामासाठीच वापरला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पोलीसदलाचे काम कठीण आणि आव्हानात्मक आहे. अशाही परिस्थितीत ते उत्तमप्रकारे काम करत आहेत, मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील महिलांची सुरक्षा करणे, राज्याची सुरक्षा राखणे हे आपल्या सर्वाचे कर्तव्य आहे. त्यात सरकार म्हणून आवश्यक असलेले सर्व सहकार्य करण्यात येईल, आपला प्रत्यक्ष पाठिंबा राहील, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

महिलांवर अत्याचार करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती मोडून काढल्या पाहिजेत, असे सांगतांना मुख्यमंत्र्यांनी पुरस्काराने गौरवांकित झालेल्या पोलीस दलातील कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राची मातृभक्त महाराष्ट्र, शक्तीपुजक महाराष्ट्र आणि महिलांचा रक्षणकर्ता महाराष्ट्र अशी ओळख देशालाच नाही तर जगाला होईल अशा पद्धतीने आपण सर्वजण मिळून काम करूया, असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.

समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षिततेवर अवलंबून- गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

            समाजाची प्रतिष्ठा ही महिलांच्या सुरक्षिततेवर अवलंबून असून जिथे महिला सुरक्षित नाहीत तिथे कधीही प्रगती होत नसल्याचे स्पष्ट करून गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज निर्भया पथकासह सुरु केलेल्या विविध निर्भया उपक्रमाचे कौतूक केले. यातून महिला सुरक्षिततेचे बळकट पाऊल पुढे पडल्याचे ते म्हणाले. त्यांनी शौर्य/सेवा/ राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पोलीसांच्या एकनिष्ठ सेवेचा अभिमान असल्याचे सांगून त्यांनी भविष्यातही अशीच उत्कृष्ट कामगिरी करावी, ही अपेक्षा व्यक्त केली. महाराष्ट्र आणि मुंबई पोलीस दलाला एक गौरवशाली परंपरा असल्याचे सांगतांना गृहमंत्र्यांनी निर्भया प्रकरणानंतर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी साकीनाका घटनेचा उल्लेख केला. इथे पोलीसांचा प्रतिसाद कालावधी फक्त 10 मिनीटांचा होता आणि अवघ्या 18 दिवसात दोषारोपपत्र दाखल केल्याचे ते म्हणाले. याचपद्धतीने मुंबई पोलीसदलाचे तपास काम सुरु राहिल्यास गुन्हेगारांवर नक्कीच वचक बसेल, असेही ते म्हणाले. 


पोलीस स्टेशनला तक्रार घेऊन येणाऱ्या महिलेचे म्हणणे ऐकून घेतल्यास गुन्हेगारांचे धैर्य वाढणार नाही, मोठ्या घटना घडणार नाहीत, पोलीसांवरील ताण कमी होईल याकडेही गृहमंत्र्यांनी लक्ष वेधले. महाराष्ट्रातील प्रत्येक महिला भयमुक्त राहील यासाठी काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्याला सर्वोच्च प्राधान्य- हेमंत नगराळे


            अर्भक ते वार्धक्य या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध करणे, अत्याचार होत असल्यास हस्तक्षेप करून तिला सुरक्षितता देणे, गुन्ह्यांचा त्वरीत तपास करणे, कोर्टातील प्रकरणांचा पाठपुरावा करणे हे बृहन्मुंबई पोलीस दलाचे प्राधान्याचे काम असल्याचे मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी आपल्या प्रास्ताविकात म्हटले. महिलांवरील अत्याचार थांबवणे, तत्काळ प्रतिसाद देऊन महिलांना संरक्षण देण्यासाठी निर्भया पथके काम करणार असून मुंबईतील ९१ पोलीस ठाण्यात अशी पथके स्थापन करण्यात येत आहे. जाणीव जागृतीसाठी आज निर्भया फेसबूक, निर्भया पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. निर्भया संकल्पगीत, निर्भया लोगोचे अनावरण अशा अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिला सुरक्षिततेप्रती लोकमनात जागृती करण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. १०३ हा हेल्पलाईन नंबर डायल केल्यानंतर निर्भया पथकाची मदत मिळणार आहे. यासाठी पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना डेटा सुविधासह फोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.


विविध उद्घाटन कार्यक्रमाची क्षणचित्रे

· निर्भया संकल्पगीताचे उद्घाटन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते झाले. हिंदी चित्रगीत चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी तयार केले असून त्यास अभिनेते अमिताभ बच्चन यांचा आवाज लाभला आहे तर मराठी चित्रगीत राहूल रायकर आणि त्यांच्या टीमने तयार केले आहे.

· रोहित शेट्टी यांनी 50 लाख रुपयांचा निधी निर्भया पथकासाठी दिला.

· प्रख्यात सिने दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या हस्ते सत्कार

· मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पाच प्रादेशिक समुपदेशन केंद्राचे उदघाटन

· एम पॉवर संस्थेच्या नीरजा बिर्ला यांचा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

· निर्भया चित्रगीत (मराठी) तयार करणाऱ्या राहूल रायकर आणि सहकाऱ्यांचे मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते गौरव

· गृहमंत्री दिलीप वळसे -पाटील यांच्याकडे 11 लाखाचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात आला

· निर्भया मार्गदर्शक पुस्तिका प्रकाशन पालकमंत्री अस्लम शेख आणि उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते झाले

· खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते मुंबई पोलीस दलाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन

· विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते निर्भया बोधचिन्हाचे प्रकाshan

· महापौर किशोरी पेडणेकर यांच्या हस्ते निर्भया फेसबूक पेजचे उद्घाटन

· महिला कक्षाचे उदघाटन खासदार प्रियंका चतुर्वेदी यांच्या हस्ते

· दिनदर्शिका ज्यांच्या छायाचित्राने सजली आहे त्या छायाचित्रकार प्रवीण टलानी आणि समाज माध्यम तज्ज्ञ संचिका पांडे यांचा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते सत्कार

· उपस्थित मान्यवरांनी कार्यक्रमात निर्भया पथकाच्या वाहनांना ध्वजांकित (फ्लॅग ऑफ) केले.

· राष्ट्रपती पदक प्राप्त झालेल्या बृहन्मुंबईतील पोलीस अधिकाऱ्यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार.

· उत्कृष्ट कामाबद्दल निर्भया पथकातील महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा गृहमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

· रिलायन्स फाऊंडेशनमार्फत 3 वर्षाच्या इंटरनेट सुविधेसह 100 आयफोन देण्यात येणार आहेत. पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी निर्भया पथकातील 5 प्रादेशिक अधिकाऱ्यांना हे आयफोन प्राधिनिधिक स्वरूपात वितरीत केले.

· रिलायन्स फाऊंडेशनचे श्रीमती सिराज कोतवाल यांचा पालकमंत्री श्री. ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला.

· यावेळी निर्भया पथकातील नवीन वाहनांचे मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून लोकार्पण करण्यात आले.


 

             महाराष्ट्राला तीन ‘परम विशिष्ट सेवा पदक’

राज्याच्या एकूण 14 सेना व नौदलाच्या अधिकारी-जवानांना‘शौर्य पदक’

               नवी दिल्ली, दि. 25 : लष्कराच्या सेनाधिकारी व महाराष्ट्रकन्या ले.जनरल माधुरी कानिटकर(सेवानिवृत्त) ,ले.जनरल मनोज पांडे तसेच नौदलाचे व्हाईस ॲडमिरल सतिशकुमार घोरमाडे यांना ‘परम विशिष्ट सेवा पदक’ जाहीर झाले असून मुळचे महाराष्ट्राचे असलेल्या अन्य 11 अधिकारी व जवानांना ‘शौर्य पदक’ जाहीर झाले आहेत.

          राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज लष्कराच्या एकूण 317 आणि नौदलाच्या एकूण 34 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी ‘शौर्य पदक’ मंजूर केले आहेत. या पदकांमध्ये 22 ‘परम विशिष्ट सेवा पदक’ (पीव्हीएसएम), 4 ‘उत्तम युध्द सेवा पदक’(युवायएसएम), 40 ‘अती विशिष्ट सेवा पदक’(एव्हीएसएम), 6 ‘शौर्य चक्र’, 84 ‘सेना पदक’ (शौर्य), 10 ‘युध्द सेवा पदक’, 40 ‘सेना



        ऊसतोड कामगारांची नोंदणी प्राधान्याने पूर्ण करा

-.                                       उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

          मुंबई, दि.25 : ऊसतोड कामगारांसाठी आरोग्य, सामाजिक न्याय, महिला व बालविकास, कामगार विभाग तसेच विविध सामाजिक संस्था काम करत आहेत. स्थानिक पातळीवर या विभागांमार्फत राबविण्यात येणा-या योजनांची जनजागृती करून राज्यातील ऊस तोड कामगारांची नोंदणी सामाजिक न्याय विभागाने प्राधान्याने पूर्ण करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिले.

             दूरदृश्यप्रणालीव्दारे ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी यापूर्वी घेतलेल्या बैठकीतील निर्देशांबाबत केलेल्या अंमलबजावणीबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत उपसभापती डॉ.गो-हे बोलत होत्या. यावेळी बैठकीला सामाजिक न्याय विभागाच्या अपर मुख्य सचिव जयश्री मुखर्जी,सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे,साखर आयुक्त शेखर गायकवाड,सहकार आयुक्त अनिल कवडे,सार्वजनिक आरोग्य विभागाचे सहसचिव विजय लहाने,कामगार विकास उपआयुक्त सुनिता म्हैसेकर, महिला व बालविकास विभागाचे उपायुक्त राहुल मोरे,महिला बालविकास विभागाचे उपसचिव श्री. ठाकूर, सामाजिक संस्था मकाम च्या (बीड) मनिषा टोकले व पल्लवी हर्षे, समता प्रतिष्ठानच्या शुभांगी कुलकर्णी, महिला आरोग्य परिषदच्या काजल जैन, एकल महिला संघटनाचे राम शेळके, साथीचे अभिजित मोरे व अरुण गद्रे, मासुमच्या निलंगी सरदेशपांडे ,आरोग्य अभियानाचे अभय शुक्ला, बहुउद्देशीय सामाजिक संस्थाचे श्रीधर आडे,नाशिकचे सिव्हिल सर्जन डॉ अशोक थोरात उपस्थित होते.

         उपसभापती डॉ.नीलम गो-हे म्हणाल्या, ऊसतोड कामगारांसाठी विविध विभागांच्या माध्यमातून योजना राबविल्या जातात. ऊसतोड कामगार महामंडळाच्या योजनांना विधी व न्याय विभागाने नुकतीच मान्यता दिली आहे. या योजनांची माहिती ऊसकामगारांना होण्यासाठी स्थानिक प्रशासनाने जनजागृतीपर उपक्रम राबवावेत. आरोग्य तपासणी शिबीर,महिलांची तपासणी तसेच गर्भाशय काढण्याची शस्त्रक्रिया (हिस्ट्रेक्टामी) करण्यासंदर्भात बीड आरोग्य विभागाने केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्यात यावा. सार्वजनिक आरोग्य विभागानेही याबाबतची माहिती पडताळून पहावी. परजिल्ह्यात जावून कोणी ऊसतोड महिला शस्त्रक्रिया करत असतील तर त्याचीही माहिती नजिकच्या जिल्ह्यांकडून घेण्यात यावी. ऊसतोड कामगारांचे प्रश्न सुटावेत यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या होत्या. सर्व विभागांनी केलेल्या सूचनांप्रमाणे त्यामध्ये नव्या बाबींचाही समावेश करण्यात येईल. सामाजिक संस्थांनीही ऊसतोड कामगारांसाठीच्य कामामध्ये अशाच प्रकारे सातत्य ठेवावे. अशा सूचना या बैठकीत उपसभापती डॉ. गो-हे यांनी दिल्या. ऊसतोड कामगारांसोबत महिला व बालविकास विभागाने बीड येथे बैठक आयोजित करावी. 15 फेब्रुवारी रोजी साखर आयुक्त व सहकार आयुक्त यांनी ऊस कारखान्यांच्या संचालकांना सहभागी करून ऊस तोड कामगांराबाबत कोणते निर्णय घेता येतील याबाबत सविस्तर माहिती सादर करावी. सामाजिक न्याय विभागाने ऊस तोड कामगारांची नोंद प्राधान्याने करावी जेणेकरून राज्यातील ऊस तोड कामगारांची माहिती उपलब्ध होईल, अशा सूचनाही उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.

             समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे म्हणाले, राज्यातील उसतोड कामगारांसाठी विविध कल्याणकारी व आर्थिक सुधारणांचा लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.या महामंडळासाठी साडे तीन कोटी रूपये मंजूर झाले आहेत. या महामंडळाचे (पुणे) येरवडा येथे मुख्य कार्यालय होणार असून परळी येथे क्षेत्रीय कार्यालय सुरू होणार आहे. स्थलांतरीत ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी कामगारांची संख्या अधिक असलेल्या तालुक्यांच्या ठिकाणी “संत भगवान बाबा शासकीय वसतिगृह योजना” राबविण्यात येते.सध्या मुलांची दहा व मुलींची दहा अशी २० वसतिगृह सुरू करण्यात आली आहेत. ऊसतोड कामगारांच्या नोंदणीची कार्यवाही लवकरच पूर्ण करणार आहे. ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण कार्यवाही सुरू आहे अशी माहिती डॉ.नारनवरे यांनी बैठकीत दिली.

       साखर आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले, ऊसतोड कामगारांच्या प्रश्नांबाबत सहकार आयुक्त व आम्ही संयुक्तपणे काम करत आहोत.सामाजिक न्याय विभागाशीही चर्चा करत आहोत. साखर कारखान्यांसोबत बैठक घेवून ऊसतोड कामगारांसाठी अन्य कोणकोणत्या सुविधा देता येतील याची माहिती घेण्यात येईल.

           महिला व बालविकास विभाग, जिल्हा आरोग्य विभाग बीड, कामगार विभाग यांनीही त्यांच्या विभागामार्फत ऊसतोड कामगारांसाठी सुरू असलेल्या कामांची माहितीही यावेळी दिली.        


      

 गृह मंत्री दिलीप वळसे - पाटील यांच्या अध्यक्षतेखाली

 खाजगी कोल्डस्टोअरेजमधील अनधिकृत फळ विक्रीबाबत बैठक

          मुंबई, दि. 25 : मुंबई बाजार समितीच्या कार्यक्षेत्रांमध्ये अनधिकृतपणे सुरू असलेल्या फळ,भाजीपाला कांदा - बटाटा व्यवसायासंदर्भात गृह मंत्री दिलीप वळसे - पाटील आणि सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली.

          यावेळी आमदार शशिकांत शिंदे सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे संचालक सुनील पवार, कामगार विभागाचे आयुक्त सुरेश जाधव, नवी मुंबई पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंग, मुंबई पोलिस सह आयुक्त विश्वास नांगरे - पाटील, नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक संजय पानसरे, अशोक वाळुंज, शंकर शेठ पिंगळे, माजी संचालक बाळासाहेब भेंडे, बाजार समिती सचिव संदीप देशमुख, उपायुक्त श्रीमती लोखंडे, उपसचिव महेंद्र म्हस्के व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

          कोल्ड स्टोअरेजमध्ये केवळ कृषी माल साठविण्यास परवानगी देण्यात आलेली आहे.यामध्ये विना परवानगी कृषी उत्पन्नाची खरेदी विक्री करू नये, मुंबई बाजार समिती आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या कार्यक्षेत्रामधील बोरिवली, गोरेगाव,दहिसर,नागपाडा,दादर ,घाटकोपर, अश्या अनेक ठिकाणी अनधिकृत खाजगी विक्री सुरू असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे मुंबई शहरातील अनधिकृत खाजगी बाजार तात्काळ बंद करावे,असे निर्देश सहकार व पणन मंत्री श्री. पाटील यांनी दिले.

           कोल्ड स्टोरेजमधून अवैद्यरीतीने होणाऱ्या सफरचंद विक्रीचा दाखला देत त्या पद्धतीने मुंबई, मुंबई उपनगर, नवी मुंबई शहर, कांदिवली, बोरिवली, मालाड या ठिकाणी होणाऱ्या अवैध भाजी-पाला, फळ विक्रीमुळे बाजार समितीमधील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचे तसेच याचा विपरीत परिणाम होऊन शेतकऱ्यांना हमखास भाव देणाऱ्या बाजार समित्यांवर होत असल्याने याबाबत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असेही श्री.पाटील यांनी सांगितले.

          त्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने सहकार्य करावे असे सांगून सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी याबाबत समिती स्थापन करून अवैध व्यवसाय करणाऱ्या कोल्ड स्टोरेज वेअरहाऊस बरोबर मार्केटच्या बाहेरील अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करावी असे निर्देश सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

          मुंबई आयुक्त, नवीमुंबई आयुक्त, पोलीस प्रशासन, पणन अधिकारी, व बाजार समितीचे अधिकारी यांची संयुक्त समिती स्थापन करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

           ज्या व्यापाऱ्यांकडे लायसन्स नाहीत त्यांच्यावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या दहा वर्षापासून फार मोठ्या प्रमाणावर विदेशी फळांची आयात होत आहे. काही वर्षापासून हा व्यवसाय अनधिकृतरित्या परस्पर कोल्ड स्टोअरेजमधून खरेदी-विक्री होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषत: अफगाणिस्तान आणि इराण या देशातील व्यापारी स्वतः नवी मुंबई कोल्ड स्टोअरेजमधून थेट व्यापार करत आहेत. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फळांचे घाऊक मार्केट बंद पडण्याचं मार्गावर आहे. नियमनमुक्तीचा फायदा घेऊन हे परदेशी व परप्रांतीय व्यापारी मुंबई येथे अनधिकृत रित्या व्यापार करीत आहेत या सर्व व्यापाराची कुठेच नोंद होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

            कोल्ड स्टोअरेजमध्ये सुरू असलेल्या अनधिकृत व्यवसायावर तातडीने कार्यवाही करण्यात यावी. जाहीर केलेल्या नियमाशिवाय कोणत्याही जागेचा उपयोग करता येणार नाही. तसेच वैध अनुज्ञप्तिशिवाय दलाल प्रक्रिया करणारा, तोलारी मापणारा सर्वेक्षक, वखारवाला या नात्याने किवा इतर कोणत्याही नात्याने काम करत असल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

0000



 

               वंदे मातरम’ नित्यनूतन, प्रेरणादायी

                                           - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

               मुंबई, दि. 25 : वाल्मिकी रामायण तसेच तुलसीदासांच्या रामचरित मानसप्रमाणे बंकीम चंद्र यांचे वंदे मातरम हे काव्य व त्याचे सांगीतिक सादरीकरण कधीही जुने न होणारे असे नित्यनूतन व प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दिवंगत गायक-संगीतकार विनायक देवराव अंभईकर यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘संपूर्ण वंदे मातरम्’वर आधारित नव्या सांगीतिक रचनेचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन, मुंबई येथे करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी संपूर्ण वंदेमातरम रचनेचे गायक मंदार आपटे, गायिका स्वाती आपटे व अर्चना गोरे, निर्माते नचिकेत अंभईकर, दिवंगत विनायक अंभईकर यांचे कुटुंबीय, उद्योजक रवींद्र प्रभुदेसाई, एजियाज फेडरलचे उपाध्यक्ष राजेश आजगावकर, वन्दे मातरम् च्या नृत्य दिग्दर्शिका पूजा पंत, पखवाज वादक चंद्रशेखर आपटे, व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

            'आनंदमठ' कादंबरी लिहिली गेली त्यावेळी बंकीम चंद्र यांनी त्यातील वंदे मातरम ही रचना अजरामर होईल अशी कल्पना देखील केली नसेल असे सांगून देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात 'वंदे मातरम्' हे प्रेरणा गीत ठरले तसेच अनेक क्रांतिकारक 'वंदे मातरम' चा उद्घोष करीत वधस्तंभावर गेले असे राज्यपालांनी सांगितले.

            वंदे मातरम या गीताला शेकडो संगीतकारांनी संगीतबद्ध केल्याचे नमूद करून विष्णू सहस्त्रनामाप्रमाणे या रचना नेहमीच प्रेरणादायी असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

            यावेळी मंदार आपटे व अर्चना गोरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे 'ने मजसी ने' हे गीत सादर केले.

०००००

Governor releases new musical version of ‘Vande Mataram’

       Governor Bhagat Singh Koshyari released the new musical composition 'Sampoorn Vande Mataram' at Raj Bhavan Mumbai on Tuesday (25 Jan). The musical rendition is based on the original musical composition of vocalist and musician late Vinayak Ambhaikar.

       Playback singers Mandar Apte, Swati Apte and Archana Gore, producer Nachiket Ambhaikar, businessman Ravindra Prabhudesai, Sr Vice President of Ageas Federal Rajesh Ajgaonkar, Chandrashekhar Apte, choreographer Pooja Pant, family members of late Vinayak Ambhaikar, cartoonist Shrinivas Prabhudesai and others were present. 

०००००



 

Featured post

Lakshvedhi