नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी भारत सज्ज
- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
· ‘इंडिया मेरीटाईम वीक - २०२५’ चे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन
मुंबई, दि. २७ : मुंबई हे भारताच्या सागरी क्षेतातील महत्वाचे स्थान असून ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ च्या निमित्ताने मुंबईमध्ये भारत नवीन सागरी इतिहास घडवण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. तर मुंबई ही देशाच्या सागरी शक्तीचा केंद्रबिंदू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. यावेळी नेस्को, गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक- २०२५’ या आंतरराष्ट्रीय सागरी परिषदेचे उद्घाटन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या वेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
उद्घाटन सोहळ्यास केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी व जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन शरण मांझी, केंद्रीय राज्यमंत्री शंतनु ठाकूर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आणि केंद्रीय सचिव विजय कुमार, आदी मान्यवर उपस्थित होते.