Thursday, 4 September 2025

स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेबर बालाजीनगर व बिबवेवाडी येथे अतिरिक्त स्थानक

 स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गिकेबर बालाजीनगर व बिबवेवाडी येथे अतिरिक्त स्थानक उभारण्यात यावीतअशी मागणी होत आहे. त्याबाबत लोकप्रतिनिधींकडून निवेदने प्राप्त झाली आहेत. तसेचकात्रज मेट्रो स्थानक शेजारच्या पीएमपीएमएल बस स्थानकाशी जोडले जावे यासाठी त्याचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करावे लागणार आहे. नवीन दोन मेट्रो स्थानके उभारणीमुळे आणि बोगद्याची लांबी अंदाजे ४२१ मीटर ने वाढविल्यामुळे येणाऱ्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या अतिरिक्त खर्चास मान्यता देण्यात आली. यात महामेट्रोला पुणे महानगरपालिकेला २२७ कोटी ४२ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. उर्वरित आवश्यक निधीसाठी कर्ज उभारणीस व अनुषांगिक करारांना बैठकीत मान्यता देण्यात आली.

--

पुणे मेट्रोवरील बालाजीनगर, बिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी

 पुणे मेट्रोवरील बालाजीनगरबिबवेवाडी या दोन नवीन स्थानकांना मंजूरी

पुणे शहरात स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्गावर बालाजीनगर व बिबवेवाडी ही दोन नवीन स्थानके उभारण्यास आणि कात्रज मेट्रो स्थानकाचे दक्षिणेकडे सुमारे ४२१ मीटरने स्थलांतरण करण्यास व यासाठीच्या ६८३ कोटी ११ लाख रुपयांच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा-१ या एकूण ३३.२८ कि.मी च्या दोन मार्गिकांचा समावेश असलेल्या प्रकल्पाची महामेट्रोमार्फत अंमलबजावणी सुरू आहे.मार्गिका - १ पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट (लांबी १७.५३ कि.मी) (१४ स्थानके) (उत्तर-दक्षिण कॉरीडॉर) तसेच मार्गिका २: वनाज ते रामवाडी (लांबी ५५.७५ कि. मी १६ उन्नत स्थानके) (पश्चिम-पूर्व कॉरीडॉर) या मार्गांवर मेट्रो सेवा सुरु आहे. पुणे मेट्रो मार्ग-३ (हिंजवडी ते शिवाजीनगर) या २३.३ कि. मी. उन्नत लांबीच्या मेट्रो रेल्वे प्रकल्पाची उभारणी सार्वजनिक खासगी सहभाग  तत्वावर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत करण्यात येत आहे.


ठाणे वर्तुळाकार मेट्रो, पुण्यातील मेट्रो मार्गिका–२, मार्गिका–४, नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता

 (नगरविकास विभाग)

ठाणे वर्तुळाकार मेट्रोपुण्यातील मेट्रो मार्गिकामार्गिका,

नागपूर मेट्रोच्या टप्पा दोनच्या कर्जांस मान्यता

ठाणे शहरातील वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पपुणे शहरातील पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉरस्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉरवनाज ते रामवाडी (मार्गिका क्र. २) च्या विस्तारीत मार्गिका वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) आणि पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उपमार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांसाठी आवश्यक कर्ज घेण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्पपिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉरस्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉरवनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली मेट्रो कॉरीडॉर (विठ्ठलवाडी)पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला - स्वारगेट - हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उप मार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांना यापुर्वीच मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची जबाबदारी स्वीकारण्यास तसेच त्यासाठी आवश्यक करार करण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांना मंजूर केलेल्या मर्यादेत द्वीपक्षीयबहुपक्षीय वित्तीय संस्था किंवा अन्य संस्थांमार्फत सुलभ व्याज दराचे कर्ज उपलब्ध करून घेता येणार आहे. त्यांना या कर्जाची मुद्दलव्याज व इतर शुल्क यांची परतफेड करावी लागणार आहे. या कर्जाच्या अनुषंगाने आवश्यकता वाटल्यास शासन हमी देण्यास आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

--००

मुंबईतील आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-११ प्रकल्पास मान्यता,

 मुंबईतील आणिक डेपो-वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-११ प्रकल्पास मान्यता२३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांची तरतूद करणार

मुंबईतील आणिक डेपो – वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया मेट्रो मार्गिका-११ प्रकल्पास व त्यासाठी आवश्यक २३ हजार ४८७ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

मुंबई मेट्रो मार्गिका-११ ही मुंबई मेट्रो मार्गिका-४ (वडाळा-ठाणे-कासारवाडवली) चा विस्तार भाग आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन (DMRC) कडून तयार करुन घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. यांच्यावतीने या प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार आहे. या मार्गिकेचा ७० टक्के भाग हा भुयारी आहे. यात १३ भूमिगत आणि एक भू-समतल स्थानक उभारण्यात येणार आहेत. या १७.५१ किलोमीटर लांबीच्या प्रकल्पास पायाभूत सुविधा मंत्रिमंडळ उपसमितीने यापुर्वीच मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे ३ हजार १३७ कोटी ७२ लाख रुपयांचे समभाग (equity) आणि ९१६ कोटी ७४ लाक रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य मिळविण्याकरिता विनंती करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी स्वीकारण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.

--००

अनुसूचित जमातीतील नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आता केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

 अनुसूचित जमातीतील नववीदहावीच्या विद्यार्थ्यांसाठी

आता केंद्राची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना

राज्यातील अनुसूचित जमातीतील इयत्ता नववी आणि दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यनिक शिष्यवृत्ती योजनेऐवजी आता केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्यात येणार आहे. या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            राज्यात जिल्हा परिषदेच्या शाळांमधील अनुसूचित जमातीच्या नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येत आहे. ही योजना व केंद्र सरकारच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजनेशी तुलना केली असता केंद्राच्या योजनेमध्ये शिष्यवृत्तीची रक्कम राज्याच्या योजनेपेक्षा अधिक मिळते. त्यामुळे या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारची पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यात शासकीय वसतीगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या योजनेतील लाभ दिल्यानंतरची रक्कम वगळून उर्वरित रक्कम वसतीगृह योजनेतून दिली जाणार आहे. ही योजना अनुदानित व शासकीय निवासी आश्रमशाळाएकलव्य निवासी शाळा तसेच नामांकित शाळा यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लागू राहणार नाही.

--००

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधी धोरणास मान्यता

 (ऊर्जा विभाग)

औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील राखेच्या वापरासंबंधी धोरणास मान्यता

महानिर्मिती कंपनीच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात तयार होणाऱ्या राखेच्या वापरासंबंधीच्या धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

            केंद्र सरकारच्या पर्यावरणवन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या सूचनेनुसार औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रात तयार होणाऱ्या राखेच्या वापराबाबतचे धोरण २०१६ मध्ये निश्चित करण्यात आले होते.  केंद्र सरकारच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार सदर धोरणात बदल करणे प्रस्तावित होते. त्यानुसार या धोरणास मान्यता देण्यात आली. या धोरणाद्वारे राखेच्या १०० टक्के पर्यावरणपूरक पध्दतीने विनियोग कार्यपध्दती निश्चित करण्यात आली आहे. या धोरणाद्वारे विविध घटकांकरिता राख वापरण्यासाठी प्रोत्साहनात्मक सवलती देण्यात येणार आहेत. यामुळे स्थानिक आणि प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार 

गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ

  गांधी निराधारश्रावणबाळ योजनेतील

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ

            संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात एक हजार रुपयांची वाढ करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या लाभार्थ्यांना दीड हजार रूपये अर्थसहाय्य दिले जात होते. आता ते अडीच हजार रुपये दिले जाईल.

            राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुषमहिलाअनाथ मुलेदिव्यांगातील सर्व प्रवर्गनिराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते. सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ४ लाख ५० हजार ७०० आणि श्रावणबाळ योजनेत २४ हजार ३ दिव्यांग लाभार्थी आहेत.  या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास मान्यता देण्यात आली. हे अनुदान ऑक्टोबर २०२५ पासून देण्यात येईल. यासाठी आवश्यक ५७० कोटी रुपयांच्या तरतुदीस मान्यता देण्यात आली.


Featured post

Lakshvedhi