अवयवदान व अवयव प्रत्यारोपणासाठी यंत्रणा
समर्पित क्रिटीकल केअर विभाग सुरु करणार
अवयवदान व अवयव प्रत्यारोपणाचा दर वाढवण्यासाठी, तसेच जनजागृती करण्याकरिता रुग्णालयांमध्ये समर्पित क्रिटीकल केअर विभाग स्थापन करून, त्यात पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यासाठी पंचवीस शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत १५० पदे निर्माण करण्यात येतील. ज्याठिकाणी असा अभ्यासक्रम सुरु करणे शक्य नाही, तिथे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची क्रिटीकल केअर विषयातील बारा महिन्यांची फेलोशिप करण्यात येईल. त्याचप्रमाणे या महाविद्यालयांमध्ये ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटर हे पद निर्माण करण्यात येईल. या महाविद्यालयांमध्ये अवयव पुनर्प्राप्ती केंद्र स्थापन करण्यात येतील. वार्षिक अवयव प्रत्यारोपणाच्या क्रमवारीत भारत हा अमेरिका आणि चीन नंतर तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे. देशात प्रत्यारोपणाची एकूण संख्या २०१३ मधील ४ हजार ९९० पासून २०१९ पर्यंत १२ हजार ६६६ इतकी वाढली आहे.