Friday, 1 December 2023

श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना सामाजिक, आर्थिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न

 ई-श्रम कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना

सामाजिक, आर्थिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न

 - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बेस्ट उपक्रमातील १२३ नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायम सेवेचे नियुक्तीपत्र

          मुंबई दि. ३० : असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ई-श्रम पोर्टल सुरू केले. राज्यात जवळजवळ अडीच कोटी कामगारांची नोंद या पोर्टलमध्ये झाली आहे. या ई-श्रम नोंदणी कार्ड योजनेच्या माध्यमातून कामगारांना आर्थिक आणि सामाजिक सुरक्षा देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

            बेस्टमधील नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायम नेमणुकीची नियुक्ती पत्रे प्रदान करण्याचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आज झाला.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीबेस्ट उपक्रमातील नैमित्तिक कर्मचाऱ्यांना उपक्रमात कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी नैमित्तिक कर्मचारी आणि त्यांच्या संघटना सातत्याने करीत होत्या. या अनुषंगाने मागील १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या १२३ नैमित्तिक कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेऊन नियुक्ती पत्र देण्यात आले. उर्वरित कर्मचाऱ्यांच्या बाबतही लवकरच  निर्णय घेण्यात येईल. ई-श्रम पोर्टल यात नोंदीत कामगारांकरिता सामाजिक सुरक्षेचे महामंडळ तयार केले आहे. ज्याच्या माध्यमातून जे लोक असंघटित क्षेत्रात काम करतात त्यांना १४ प्रकारच्या सुविधा देण्यात येणार आहेत. त्यात आरोग्य कवचअकाली मृत्यू झाल्यानंतरची मदतमुलांचे शिक्षणपेन्शननिवृत्तीनंतर जगण्याची साधने इत्यादी कार्यक्रम हाती घेण्यात आले असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            आमदार प्रसाद लाड यांनी मनोगत व्यक्त केले. बेस्टचे महाव्यवस्थापक विजय सिंघल  यांनी प्रस्ताविक केले. या कार्यक्रमास आमदार गोपीचंद पडळकरबेस्टचे मुख्य व्यवस्थापक आर.डी.पाटसुतेकामगार संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.

देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान

 देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान

राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145 व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ

 

            पुणेदि. 30 : देशातील सर्वोत्कृष्ट प्रशिक्षण संस्थांमध्ये राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे विशेष स्थान असून सशस्त्र दल आणि देशासाठी एक मजबूत आधारस्तंभ म्हणून ही प्रशिक्षण संस्था ओळखली जातेअसे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज येथे केले.

            खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या 145व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत समारंभात (पासिंग आऊट परेड) मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. तसेच पाचव्या बटालियनच्या इमारतीच्या आगामी  बांधकामाची पायाभरणीही त्यांनी यावेळी केली.

            यावेळी राज्यपाल रमेश बैससार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसेदेशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहानलष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख ले. जनरल ए के सिंहराष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट व्हॉइस अडमिरल अजय कोच्चर यांच्यासह संरक्षण दलांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            राष्ट्रपती म्हणाल्या की, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) हा नेतृत्वाचा पाया आहेज्यातून महान योद्धे तयार झाले आहेत. एनडीएकडून मिळालेले प्रशिक्षण आणि जीवनमूल्ये उत्तीर्ण छात्रांना (कॅडेट्स) आयुष्यात प्रगती करण्यास सहाय्य करतातअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. त्यांनी कॅडेट्सना भविष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शिकून त्याचा अवलंब करून अग्रेसर रहाण्याचे आवाहन केले. सशस्त्र सेवेतील मूल्यांचे अनुसरण करून ते  प्रत्येक आव्हानाला धैर्याने आणि शौर्याने सामोरे जातीलअसा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

            एनडीएच्‍या पासिंग आऊट परेडमध्‍ये संचलन करणाऱ्या दलाच्या रूपात प्रथमच महिला कॅडेट्सचा सहभाग पाहून राष्‍ट्रपतींनी आनंद व्यक्त केला. हा दिवस खऱ्या अर्थाने ऐतिहासिक असल्याचे त्या म्हणाल्या. भविष्यात सर्व महिला कॅडेट्स देश आणि एनडीएला नव्या उंचीवर घेऊन जातीलअसा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

            शांततास्थैर्य आणि समृद्धीसाठी भारताच्या सीमांचे संरक्षण आणि अंतर्गत सुरक्षा आवश्यक असल्याचे राष्ट्रपती म्हणाल्या.आम्ही 'वसुधैव कुटुंबकम्या परंपरेचे पालन करतो. परंतुदेशाच्या एकता आणि अखंडतेच्या भावनेला हानी पोहोचवणाऱ्या कोणत्याही बाह्य किंवा अंतर्गत परिस्थितीला तोंड देण्यासाठी आमचे सैन्य पूर्णपणे सक्षम आणि सदैव तयार आहेअसेही त्यांनी  यावेळी नमूद केले.

 

कोल्हापूरच्या हर्षवर्धन भोसलेने पटकावले राष्ट्रपतींचे कांस्य पदक

            यावेळी एकूण गुणवत्तेच्या क्रमवारीनुसार पहिला क्रमांक पटकावून प्रथम सिंगने राष्ट्रपती सुवर्णपदक जिंकले. जतिन कुमार या छात्राने दुसरा क्रमांक मिळवून रौप्य पदक जिंकले, तर कोल्हापूर येथील रहिवासी असलेल्या हर्षवर्धन शैलेश भोसले या छात्राने तिसऱ्या क्रमांकासह राष्ट्रपतींचे कांस्य पदक पटकावले.

 

नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

 नौदल दिन पूर्वतयारीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

           

            सिंधुदुर्गनगरीदि. 30 (जिमाका) : मालवण किनाऱ्यावरील राजकोट येथे ४ डिसेंबर रोजी नौसेना दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंतशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरविभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकरजिल्हाधिकारी किशोर तावडेमुख्य कार्यकारी अधिकारी प्रज्योत नायरपोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल तसेच नौदलाचे अधिकारी उपस्थित होते.

            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची आणि राजकोट किल्ल्याच्या कामाची पाहणी केली. तसेच टोपीवाला बोर्डिंग ग्राऊंड येथील हेलिपॅडची देखील पाहणी करून विविध सूचना केल्या.

जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरीयंस सेंटर उभारणार

 जागतिक दर्जाचे डबेवाला एक्सपिरीयंस सेंटर उभारणार

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरिएंस सेंटरचे भूमीपूजन

डबेवाल्यांचे घराचे स्वप्न लवकरच पूर्ण करू

            मुंबईदि. 30 :- मुंबईचे वैभव म्हणून गेट वे ऑफ इंडियासीएसटीवरळी सी लिंक याकडे पाहिले  जात असले तरीही जीवंत माणसं हे खरे वैभव असते. डबेवाला हे मुंबईचे  खरे वैभव आहे. त्यांचे असामान्य कार्य लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. त्यामुळे डबेवाले जरी तंत्रज्ञान वापरत नसतील तरी त्यांचे एक्सपिरीयंस  सेंटर  तंत्रज्ञान वापरून जागतिक दर्जाचे उभारूयासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

            मुंबई डबेवाला भवनच्या एक्सपिरिएन्स सेंटरचे भूमीपूजन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी आमदार श्रीकांत भारतीयनगरसेविका सपनाताई म्हात्रे,  मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरेनूतन मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स चॅरिटी ट्रस्टचे नवीन अध्यक्ष उल्हास मुकेमुंबई टिफीन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनचे अध्यक्ष रामदास करवंदे उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीडबेवाले कंप्युटर पेक्षा हुशार आहेत. एकही चूक न होता ते अचूक काम करतातम्हणून जगभरातील विद्यापीठेनेते त्यांच्या व्यवस्थापन तंत्राचा अभ्यास करतात. जगभर या असामान्य कामाचे कौतुक केले जाते. डबेवाल्ल्यांपर्यंत पोहचायला १०-१५ वर्ष उशीर झाला असला तरी आता डबेवाल्यांशी तयार झालेला ऋणानुबंध कायम राहील. नैसर्गिक आपत्तीमध्ये डबेवाल्यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत स्वखर्चातून मदत केली. डबेवाल्यांना घरे मिळवून देण्यासही उशीर झालापण आता लवकरच त्यांचे घरांचे स्वप्न पूर्ण होईल. तिन्ही रेल्वे लाईनवर घरांची योजना राबविण्यात येईल. महाराष्ट्र धर्मस्वधर्म हा वारकरी संप्रदायामुळे ताठ मानेने उभा आहे. वारकरी वारी चुकवत नाही तसे डबेवाले रोज डबा पोहोचवून वारी करतात. त्यांच्या कामातून रोज वारी घडते.

            यावेळी आमदार श्रीकांत भारतीय प्रास्ताविक करताना म्हणालेमुंबईच्या जीवनात भागवत धर्माची पताका जीवंत ठेवण्याचे काम मुंबई डब्बेवाला यांनी केले आहे. विश्वासार्हता हा डबेवाला यांचा युनीक सेलिंग पॉईंट आहे.

            मुंबई डबेवाला संघटनेचे माजी अध्यक्ष सोपानकाका मरे म्हणालेडबेवाला संघटनेला १२५ वर्षाची वैभवशाली परंपरा आहे. या संघटनेसाठी ५२ वर्ष काम करीत असताना २५ वर्ष अध्यक्ष म्हणून राहिलो. डबेवाले घरापासून वंचित आहेत. ८० टक्के लोक भाड्याने राहतात. आमचे घराचे स्वप्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साकार करतील याची खात्री आहे, असे ते म्हणाले.

००००

नेपाळमधील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 नेपाळमधील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने घेतली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

 

            मुंबईदि. 30 : नेपाळमधील माधेशटेराई या भागातील 16 पत्रकारांच्या शिष्टमंडळाने आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली व विविध विषयांवर संवाद साधला. भारत व नेपाळमधील संबंध आणखी दृढ करण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने प्रयत्न करण्यात येईलअसे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            भारत व नेपाळ यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठी कार्य करणाऱ्या काठमांडू येथील भारत-नेपाळ फ्रेंडशीप सोसायटीच्या फ्री यूथ डेमॉक्रेटिक ऑर्गनायझेशनच्या वतीने नेपाळमधील पत्रकारांचे शिष्टमंडळ 26  नोव्हेंबर ते 2 डिसेंबर या कालावधीत भारत भेटीवर आले आहे. नवी दिल्लीनंतर  मुंबई भेटीवर आलेल्या या शिष्टमंडळाने आज सह्याद्री अतिथीगृहात उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी फ्री यूथ डेमोक्रेटिक ऑर्गनायझशनचे अध्यक्ष अरविंद मोहतोसचिव जीवित सुबेदीमाहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (वृत्त व जनसंपर्क) डॉ. राहुल तिडके यांच्यासह नेपाळमधील वरिष्ठ पत्रकार उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीभारत व नेपाळमध्ये पुरातन काळापासून सांस्कृतिक संबंध आहेत. नेपाळबद्दल प्रत्येक भारतीयांच्या मनात प्रेमस्नेह आहे. मुंबईपुणेनागपूर यासह महाराष्ट्रातील विविध भागात नेपाळी समाज वास्तव्यास आहे. या नेपाळी नागरिकांना येथील नागरिक हे आपले बंधू समजतात. येथे वास्तव्यास असणाऱ्या नेपाळी बांधवांनीही येथील संस्कृती आत्मसात केली आहे. भारत नेपाळमधील संबंध अधिक वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वतीने सहकार्य करण्यात येईल.

            मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे देशातील प्रगत राज्य आहे. देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा हा 15 टक्के आहे तर निर्यातीमध्ये 20 टक्के व उत्पादन निर्मितीमध्ये 20 टक्के वाटा राज्याचा आहे. देशात येणाऱ्या परदेशी गुंतवणुकीपैकी 29 टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात येते. मुंबई ही देशाची आर्थिकव्यावसायिक केंद्राबरोबरच करमणुकीची राजधानी म्हणूनही ओळखली जाते. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पायाभूत प्रकल्प पहायला मिळतात. मुंबई बरोबरच पुणे हे मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञानउत्पादन व सेवा क्षेत्रात आघाडीवर आहे. सुंदर समुद्र किनाराघाट रस्तेवने याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या किल्ल्यांमुळेही राज्यात पर्यटन क्षेत्र वाढले आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान असल्याचेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी भारत नेपाळ संबंध वृद्धिंगत करण्यासाठी महाराष्ट्रातील क्रिकेट अकादमीत नेपाळच्या खेळाडूंना प्रशिक्षण देणेत्यांच्यात नेपाळमध्ये सामने आयोजित करणेसांस्कृतिक देवाणघेवाण करणेयासाठी  उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी पुढाकार घ्यावाअशी विनंती शिष्टमंडळातील पत्रकारांनी केली.

जायकवाडी फ्लोटिंग सोलारसह कन्व्हेन्शन सेंटर,ओव्हर ब्रीजच्या कामास गती द्यावी

 जायकवाडी फ्लोटिंग सोलारसह

 कन्व्हेन्शन सेंटर,ओव्हर ब्रीजच्या कामास गती द्यावी

- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

            मुंबई, दि. 30 : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकवाडी धरणावर फ्लोटिंग सोलारडी.एम.आय.सी.मध्ये इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर, वाळूज ते शेंद्रा ओव्हर ब्रीज या कामाचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेऊन,या विकासकामांना गती द्यावी अशा सूचनाही यावेळी दिल्या.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथील विकास कामांसंदर्भात केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या उपस्थितीमध्ये सहयाद्री अतिथीगृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.

            या बैठकीला ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाळ रेड्डीपर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडेउद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळेउपमुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव डॉ. श्रीकर परदेशीमहावितरणचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रमहापारेषणचे व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमारराष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित(एनटीपीसीचे) व्यवस्थापकीय संचालक गुरुदीप सिंग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव(रस्ते)श्री.साळुंकेडॉ.कराड यांचे खासगी सचिव अमित मीना, संबंधित अधिकारी उपस्थित होते.

            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले कीपैठण येथील जायकवाडी धरणावर बाराशे मेगावॉट ऊर्जा निर्मितीचा फ्लोटिंग सोलार प्रकल्प सुरू करण्यासंदर्भात राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित  महाराष्ट्र शासन यांच्यात सामंजस्य करार करण्यात येईल. 

            तसेच  पक्षी अभयारण्य आणि पर्यावरणाबाबत सर्वेक्षणासाठी तातडीने एजन्सी नियुक्त करून  पर्यावरणस्थानिक पातळीवरील अडचणी पक्षी अभयारण्य, आरक्षण याबाबत सर्वेक्षण करून घ्यावे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा. त्यानंतर हा अहवाल  केंद्र शासनाकडे पाठविण्यात येईल. याबाबतच्या पर्यावरण विषयक परवानगी संदर्भात केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येईल.

            छत्रपती संभाजीनगर शहराचा सध्या होत असलेला विस्तारवाढणारी लोकसंख्या आणि त्यामुळे जालना रोडवर निर्माण होणारी वाहतूक कोंडी यातून कायमस्वरूपी सुटका करण्यासाठी वाळूज   एमआयडीसी ते शेंद्रा औद्योगिक वसाहत फ्लाय ओव्हर ब्रीज याबाबत माहिती घेऊन हे विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा सूचनाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिल्या.

0000

आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय

 आरोग्य यंत्रणा मजबुतीसाठी सर्व जिल्ह्यांमध्ये स्पेशालिटी रुग्णालय


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे लोकार्पण ; ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रमाचा शुभारंभ


            रत्नागिरी, दि.30 : सर्वसामान्य जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी पाऊले उचलत आहोत. प्राथमिक आरोग्य केंद्र अद्ययावत करत आहोत. सर्व जिल्ह्यांमध्ये सर्व सुविधांयुक्त स्पेशालिटी रुग्णालये उभारण्यात येतील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सांगितले.


               येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण झाले. दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ देऊन ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री उदय सामंत, वैद्यकीय शिक्षण आयुक्त डॉ. राजीव निवतकर, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, शिरगावच्या सरपंच फरिदा काझी, माजी आमदार विनय नातू, माजी नगराध्यक्ष राहुल पंडित आदी उपस्थित होते.


                मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यासंबंधी निर्णय झाला होता आणि वर्षभरातच त्याचा शुभारंभ होत आहे. 430 खाटांचे जिल्हा रुग्णालय स्थापन करण्यासाठी मान्यता दिली आहे. 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी देखील 400 ठिकाणी झाली आहे. औषध खरेदीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. आरोग्य विभागाचा कायापालट झाला पाहिजे. ज्या अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेची रक्कम 5 लाखांवर वाढविली आहे. शासन आपल्या दारी कार्यक्रमातून 1 कोटी 80 लाख लाभार्थ्यांना लाभ मिळाला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.


            कोकणात जेवढी विकास कामे आणता येतील तेवढी आणू. रत्नागिरी विमानतळाला 118 कोटी मंजूर केले आहेत. मुख्यमंत्री आरोग्य सहाय्यता निधीमधून 160 कोटी रुपये खर्च झाले आहेत. राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. परंतु, बळीराजाने चिंता करु नये. सरकार त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. आरोग्य, शिक्षण, उद्योग, शेतकरी, महिला, कामगार, दिव्यांग, मागासवर्ग घटक अशा सर्व घटकांचा सर्वसमावेशक विकासासाठी शासन कटिबध्द आहे. ‘नमो 11’ सूत्री कार्यक्रम या सर्व घटकांना न्याय देणारा उपक्रम आहे. शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहोचला पाहिजे, हा आमचा प्रयत्न आहे. असेही मुख्यमंत्री म्हणाले.


            वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, या महाविद्यालयामुळे मागणी पूर्ण झाली आहे. त्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पाठपुरावा केला. भविष्यात टप्प्या-टप्प्याने पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्याचा मानस आहे. बी.एस.सी. नर्सिंग अभ्यासक्रम देखील या महाविद्यालयात सुरु केला जाईल. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचारी भरतीसाठीचा शासन निर्णय काढूनच येथे आलो आहे. शेवटच्या माणसापर्यंत योजना पोहचविण्यासाठी अधिकारी आणि पदाधिकारी यांनी हातात हात घालून काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले.


            पालकमंत्री श्री. सामंत म्हणाले की, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाविषयी मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो. त्यानंतर मुख्यमंत्री यांनी वैद्यकीय शिक्षण सचिवांना दूरध्वनीवरुन मंत्रिमंडळ बैठकीत विषय आणण्यास सांगितले. त्यासाठी 522 कोटी रुपये मंजूरही केले. पुणे, मुंबई नंतर रत्नागिरीला परिपूर्ण एज्युकेशन हब बनविण्यासाठी मेडिकल कॉलेज देखील दिले. उद्योजकांना 100 टक्के इन्सेव्टिव्ह देण्याचा निर्णय देखील घेतला.


            कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. सिंह यांनी, तर मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी आभार प्रदर्शन केले.


दिव्यांग लाभार्थ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लाभ


            वसंत घाणेकर, संजय पावसकर यांना घरकुल योजनेसाठी 6 लाख 80 हजार निधी वितरीत करण्यात आला. दिनेश शितप व मुक्ता शिरसाट, सूरज अवसरे व सोनाली जाधव यांना दिव्यांग-दिव्यांग विवाह योजनेत 5 लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला. अंकिता कोलगे, संदीप कांबळे, भारती भायजे, संतोष रहाटे यांना स्वयंचलित 3 चाकी सायकल वाटप करण्यात आल्या. त्याचबरोबर जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थ्यांना व्हील चेअर, सीपी चेअरचे वाटप करण्यात आले.


            जिल्ह्यातील 2 हजार 443 सीआरपींना मोबाईल वाटप करण्यात येणार आहे. त्यापैकी प्रातिनिधिक स्वरुपात 6 महिलांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोबाईल वाटप करण्यात आले. ‘नमो शेततळी’ अभियानांतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करुन त्यांचा सन्मान करण्यात आला.


000

Featured post

Lakshvedhi