Wednesday, 9 August 2023

कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) प्रायोगिक तत्वावर

 कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (APEDA) प्रायोगिक तत्वावर

पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची प्रथम निर्यात खेप

अमेरिकेला हवाई मार्गाने केली रवाना

 

            नवी दिल्ली : फळांच्या निर्यात संधीना चालना देण्याच्या उद्देशाने केंद्रीय वाणिज्य आणि  उद्योग मंत्रालयांतर्गत कृषी उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाने (अपेडा) प्रायोगिक तत्वावर पहिल्या चाचणी अंतर्गत ताज्या डाळिंबाची पहिली निर्यात खेप अमेरिकेला हवाई मार्गाने रवाना केली.

            डाळिंबाची निर्यातीची ही पहिली खेप अपेडानेभारतातील राष्ट्रीय वनस्पती संरक्षण संघटना (NPPO),  अमेरिकेची प्राणी आणि वनस्पती आरोग्य तपासणी सेवा (US-APHIS), महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ (MSAMB) आणि भारतीय कृषी संशोधन परिषद-डाळिंबावरील राष्ट्रीय संशोधन केंद्रसोलापूर (राष्ट्रीय संशोधन केंद्र-सोलापूर) आणि इतर संस्थांच्या सहकार्याने अमेरिकेला रवाना केली.

अमेरिकेला होत असलेल्या  डाळिंब निर्यातीत वाढ झाल्यास परिणामी  डाळिंबाला चांगला दर मिळेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईलअसे अपेडाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितले. डाळिंबाच्या आयातदारांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद मिळत आहे.

            निर्यात मूल्य साखळीत आढावा घेण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी अपेडाने  विकसित केलेली प्रणाली अनार नेट (AnarNet) अंतर्गत शेतांची नोंदणी करण्यासाठी राज्य सरकारांच्या सहकार्याने नियमितपणे  जागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये भारतात तयार झालेल्या  उच्च दर्जाच्या डाळिंबाच्या निर्यातीला परवानगी मिळावीयासाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यामध्ये अपेडाने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

महाराष्ट्रातील उच्च दर्जाचे भगवा’ डाळिंब होणार निर्यात

            मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सीडंट तत्व आणि उत्कृष्ट फळांच्या वैशिष्ट्यांमुळेमहाराष्ट्रातील भगवा’ या प्रकारच्या डाळिंबामध्ये मोठ्या प्रमाणात निर्यात क्षमता आहे. डाळिंबाच्या  भगवा या वाणाला परदेशी बाजारपेठांमध्ये तुलनेने अधिक मागणी आहे. महाराष्ट्रातील सोलापूर या जिल्ह्यात संपूर्ण देशभरातील डाळिंबाच्या उत्पादनापैकी पन्नास टक्के उत्पादन होते. डाळिंबाच्या उत्पादनात भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे आणि एकूण लागवडीखालील क्षेत्र सुमारे 2,75,500 हेक्टर आहे.

0000000

 


रत्नागिरी येथे महाप्रित व कोकण रेल्वे शीतगृह उभारणार

 रत्नागिरी येथे महाप्रित व कोकण रेल्वे शीतगृह उभारणार


            मुंबई, दि. ८ : महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) व कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड यांच्यामध्ये रत्नागिरी येथे शीतगृह उभारण्याबाबत नुकताच करार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने कोकण रेल्वे कार्पोरेशनच्या पुढाकाराने रत्नागिरी रेल्वे विभागीय कार्यालयाच्या सभागृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.


              या बैठकीला कोकण रेल्वे कार्पोरेशनचे संचालक (संचलन व कमर्शियल) संतोषकुमार झा, मुख्य व्यवस्थापक एल. के. वर्मा, भारतीय कंटेनर कार्पोरेशन लिमिटेडचे अरूंजय कुमार सिंह, महाप्रित कंपनीचे महाव्यवस्थापक तेजस शिंदे, महात्मा फुले महामंडळ रत्नागिरीचे जिल्हा व्यवस्थापक के. व्ही. लोहकरे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.


                याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक संतोषकुमार झा म्हणाले, या बैठकीचा मुख्य उद्देश व्यवसाय मालकाच्या गरजा समजून घेणे व शीतगृह साखळी (कोल्ड स्टोरेज चेन) उभारणे, मालवाहतूक व लॉजिस्टिकचा विस्तार करून निर्यात वाढविणे हा आहे. तसेच रत्नागिरीच्या या कोल्ड स्टोरेजपासून जेएनपीटीपर्यंत रेल्वेव्दारे यापूर्वीच वाहतूक सुरू करण्यात आली आहे.


            याप्रसंगी तेजस शिंदे यांनी ‘महाप्रित’च्या शीतगृह प्रकल्पाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच या शीतगृह प्रकल्पामुळे कोकण विभागातील शेतकरी बांधवांना व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात लाभ मिळणार आहे.


            या बैठकीला कोकण विभागातील व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


०००



 

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा

 चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करा

- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

 

            मुंबईदि. 8 : चंद्रपूर जिल्ह्यात विविध प्रकारचे उद्योग आहेत. त्याचप्रमाणे शहराच्या परिसरातही उद्योग आहेत. या उद्योगांमध्ये स्टीलकागदसिमेंटऔष्णिक वीज उद्योगांचा समावेश आहे. शहर परिसरात उद्योगांमुळे वायूजल प्रदूषणासह आरोग्यावर परिणाम होत आहे. जिल्ह्यातील विविध उद्योगांमधील प्रदूषण नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना करण्याबरोबर दर्जेदार कार्यपद्धती अंमलात आणाव्यात, असे निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिले.

               सह्याद्री अतिथीगृह येथील सभागृहात चंद्रपूर जिल्हा प्रदूषण नियंत्रणाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अविनाश ढाकणेसहसंचालक विद्यानंद मोटघरेचंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडाचंद्रपूर मनपा आयुक्त श्री. पालीवालएसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आदी उपस्थित होते.

              चंद्रपूर शहरातील रनाळा तलावाला प्रदूषणमूक्त करून सौंदर्यीकरण करण्याच्या सूचना करीत मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणालेरनाळा तलावाचे सौंदर्यीकरण पूर्ण करावे. तसेच प्रदूषणाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यासाठी मोहिम स्वरूपात कार्यक्रम राबवावा. प्रदूषण दाखविणारा डिजीटल फलक शहरात प्रमुख चौकांमध्ये लावावा. प्रदुषण पातळीवरून नागरिकांनी कशापद्धतीने काळजी घेतली पाहिजे. याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करावे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणाचा आरोग्यावरील परिणामांबाबत जनजागृती करावी. 

              मंत्री श्री. मुनगंटीवार पुढे म्हणालेप्रदूषणाबाबत सध्या अस्तित्वात असलेले नियमकायदेराष्ट्रीय हरीत लवादाचे निर्णय आदींबाबत छोट्या- छोट्या पुस्तिका तयार कराव्यात. नागरिकांना याबाबत जागरूक करावे. चंद्रपूर जिल्ह्यातील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातील रिक्त पदे भरावीत. तसेच जिल्ह्यात खनिकर्म निधीमधून स्मशानभूमी देण्यात येणार आहे. यामध्ये दहन विधीसाठी पारंपरिक पद्धतीऐवजी नवीन तंत्रज्ञान वापरून पर्यावरणपूरक पद्धत वापरण्यात यावी. यासाठी यामधील नवीन तंत्रज्ञान तपासण्यात यावे.

              प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सहसंचालक श्री. मोटघरे यांनी सादरीकरण केले. सादरीकरणातून त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाबाबत माहिती दिली. तसेच उपाययोजना सांगितल्या. यावेळी संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

००००

मंत्री आदिती तटकरे यांची उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट

 मंत्री आदिती तटकरे यांची उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट


            मुंबई, दि. 8 : महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी डोंगरी येथील उमरखाडी निरीक्षण व बालगृहास भेट देवून पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.


            बालकांचे समुपदेशन करताना भेटायला येणाऱ्या पालकांचे समुपदेशन करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे. येथील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे, अशा सूचना मंत्री कु. तटकरे यांनी केल्या. यावेळी त्यांनी बालकांना देण्यात येणाऱ्या सुविधा, अन्न धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी असणारी स्वच्छता तसेच बालकांच्या सुरक्षिततेबाबत त्यांनी पाहणी केली.


             बालके, अधिकारी, कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. निरीक्षण व बालगृहातील मुलांच्या मानसिकता आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या उपचाराची मंत्री कु. तटकरे यांनी माहिती घेतली. तसेच कर्मचाऱ्यांच्याही समस्या जाणून घेवून त्या सोडवण्यासाठी लवकरच मंत्रालयात बैठक बोलवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


            मंत्री कु. तटकरे यांनी डोंगरी येथील बालगृहाला अचानक भेट दिली. या ठिकाणी बांधण्यात येणाऱ्या इमारतीविषयी माहिती घेतली. पुढील 25 वर्षात येणाऱ्या बालकांची संख्या लक्षात घेवून इमारती बांधकामाचे नियोजन करावे. बालकांना नियमानुसार सोयीसुविधा निर्माण कराव्यात, अशा सूचना त्यांनी केल्या.


            यावेळी बालविकास उपायुक्त राहुल मोरे, महिला व बालविकास विभागाचे विभागीय उपआयुक्त बापूराव भवाने,मुंबई शहरच्या जिल्हा महिला बाल विकास अधिकारी शोभा शेलार यांची उपस्थिती होती.


0000


राजू धोत्रे/विसंअ/

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार येथे राज्यस्तरीय कार्यक्रम

 मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मान्यवरांच्या उपस्थितीत


जागतिक आदिवासी दिनानिमित्त जव्हार येथे राज्यस्तरीय कार्यक्रम


            पालघर, दि. 8 (जिमाका) : आदिवासी समाजाचे सांस्कृतिक वेगळेपण, मानवतेबद्दल असीम श्रध्दा, निसर्गावरील अतुलनीय प्रेम आणि अत्युच्च प्रामाणिकपणा व पारंपरिक निखळ गुणांचा गौरव म्हणून दरवर्षी जागतिक स्तरावर 09 ऑगस्ट हा "जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात येतो. हा दिवस राज्यातील समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस आहे.


            जागतिक आदिवासी दिनानिमित्त आदिवासी विकास विभागामार्फत राज्यस्तरीय कार्यक्रम बुधवार दिनांक 09 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता राजीव गांधी मैदान जव्हार, ता. जव्हार जि. पालघर येथे आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमास मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर मान्यवर उपस्थ‍ित राहणार आहेत. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


            कार्यक्रमामध्ये विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याबरोबरच विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या आदिवासी बांधवांचा गुण गौरव करण्यात येणार आहे. पालघर जिल्ह्यातील सर्व आदिवासी बांधवांनी समग्र आदिवासी समाजासाठी अस्मितेचा व आत्मसन्मानाचा दिवस असलेला जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यासाठी उपस्थ‍ित राहण्याबाबत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू व जव्हार जि.पालघर यांनी आवाहन केले आहे.


००००



 

Tuesday, 8 August 2023

माझी माती, माझा देश’ अभियानदेश आणि वीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता

 माझी माती, माझा देश’ अभियानदेश आणि वीरांच्या बलिदानाप्रती कृतज्ञता


            देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाच आगामी काळात देशाची वाटचाल कशी असावी, यावर मंथन व्हावे, भविष्याचा वेध घेताना या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांचेही स्मरण व्हावे आणि 2047 पर्यंत आपला देश विकसित देश म्हणून नावारुपाला यावा, यासाठी सर्वांच्या योगदानाची गरज आहे. आपल्या देशाच्या मातृभूमीविषयीची कायम कृतज्ञता आणि या वीरांना योगदानाचे स्मरण व्हावे म्हणून देशात ‘मेरी मिट्टी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’ अभियान दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे. त्यानिमित्त आपल्या राज्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात अधिकाधिक लोकसहभाग असावा यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे.


            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक 09 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी - मेरा देश’ अर्थात ‘माझी माती - माझा देश’ या अभियानाची सुरुवात होत आहे. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तर असे विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे. लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत.


            दिनांक 9 ते 30 ऑगस्ट, 2023 दरम्यान, 'मेरी माटी - मेरा देश' मोहिमेत गाव आणि गट स्तरावर स्थानिक स्वराज्य संस्था तसेच राज्यस्तरावरील कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. दिल्लीत 'अमृत वाटिका' तयार करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून 7500 कलशांमध्ये माती घेऊन 'अमृत कलश यात्रा' काढण्यात येणार असून ही 'अमृत वाटिका' 'एक भारत श्रेष्ठ भारत' या वचनबद्धतेचे प्रतीक असणार आहे. जनसहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी https://merimaatimeradesh.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून, माती किंवा मातीचा दिवा हाती धरून काढलेला सेल्फी नागरिक या संकेतस्थळावर अपलोड करू शकणार आहेत. या उपक्रमात सर्वांचा सक्रीय सहभाग आणि आपल्या देशाच्या वीरांप्रतीची कृतज्ञता प्रत्येकाने व्यक्त करावयाची आहे.


            स्वातंत्र्यानंतरच्या अमृतमहोत्सवी काळात देशाने अनेक बाबतीत उत्तुंग झेप घेतली आहे. आता विकसित देश बनण्याच्या दृष्टीने प्रत्येकाचे या देशासाठी योगदान, गुलामगिरीची मानसिकता दूर करणे, समृद्ध वारशाचा अभिमान, एकता आणि बंधुता टिकवणे, नागरिकाची कर्तव्ये पार पाडणे आणि देशाचे रक्षण करणाऱ्यां प्रति आदर व्यक्त करणे यावर आधारित पंचप्रण प्रतिज्ञा या उपक्रमात घेण्यात येणार आहे.


            केवळ एखादा कार्यक्रमापुरते मर्यादित न राहता गाव ते शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी याबाबत अभियान स्वरुपात कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. या अभियानात ग्रामीण स्तरावर ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी तसेच, नागरी भागात नगरपंचायती, नगरपरिषदा, महानगरपालिका यांनी त्यांच्या स्तरावर अधिकाधिक लोकसहभागातून उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे.


            तीन टप्प्यात हा उपक्रम राज्यात सर्वत्र राबविण्यात येणार आहे. राज्यस्तरावरील कार्यक्रमाची सुरुवात दिनांक 9 ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती मैदान येथे सकाळी 9-30 वाजता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री. सांस्कृतिक कार्य मंत्री यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होत आहे. त्याचबरोबर, याच दिवशी सकाळी 10 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे मंत्रालयातील सर्व अधिकारी –कर्मचारी हे या मान्यवरांच्या उपस्थितीत पंचप्रण प्रतिज्ञा घेणार आहेत.


            ग्रामपंचायत स्तर- दिनांक 09 ते 14 ऑगस्ट 2023 या दरम्यान त्या त्या जिल्ह्यांच्या नियोजनाप्रमाणे कोणत्याही एका दिवशी खालील पाच उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. यामध्ये शिलाफलक, वीरांचा सन्मान, वसुधा वंदन (अमृत वाटिका), पंचप्रण शपथ, आणि ध्वजारोहण व राषट्रगीत यांचा समावेश आहे.


            शिलाफलक : गावातील संस्मरणीय एका ठिकाणी (अमृत सरोवर / शाळा / ग्रामपंचायत इ.) शिलाफलकाची उभारणी करण्यात येणार आहे. त्यावर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो, मा. प्रधानमंत्री यांचा व्हिजन 2047 संदेश, स्थानिक शहीद वीराची नावे, ग्रामपंचायत/शहराचे नाव दिनांक याबाबी नमुद केल्या जाणार आहेत.


            स्वातंत्र्यसैनिक, वीरांना वंदन – यावेळी स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबियांचा सत्कार, हौतात्म्य पत्करलेल्या सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार, संरक्षण, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त व्यक्तींचा सत्कार या उपक्रमाच्या माध्यमातून केला जाणार आहे.


            वसुधा वंदन: यामध्ये गावातील योग्य जागा निवडून वसुधा वंदन म्हणून 75 देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करून अमृत वाटिका तयार करण्यात येणार आहे. वन विभागाच्या समन्वयातूीन स्थानिक पातळीवर ही रोपे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.


            पंचप्रण (शपथ) घेणे: देशाला विकसित बनवण्याचे स्वप्नं साकार करण्यासाठी ही प्रतिज्ञा घेतली जाणार आहे. ‘भारताला विकसित देश बनवायचे आहे. तसेच 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण (शपथ) यावेळी घेतली जाणार आहे. यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधी, माजी सैनिक, स्वयं सहाय्यता महिला बचत गट, सर्व अधिकारी, कर्मचारी, शाळा, महाविदयालयातील विदयार्थी, विदयार्थिनी व


शिक्षक वृंद, अशासकीय संस्था, नेहरू युवा केंद्र, विदयार्थी सैनिक दल, राष्ट्रीय सेवा योजनेतील विदयार्थी ग्रामपंचायत स्तरावरील सर्व अधिकारी कर्मचारी यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. हातात दिवे लावून पंचप्रण शपथ घेण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून तयार केलेल्या मातीच्या दिवे वापरावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.


             या कार्यक्रमा दरम्यान ग्रामपंचायतीच्या हददीतील 1-2 मूठ माती घेवून सन्मानपूर्वक पंचायत समिती स्तरावरील समन्ययक अधिकारी यांच्याकडे ती सोपविण्यात येईल. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला दरवर्षीप्रमाणे झेंडावंदन करण्यात येईल.


            तालुका स्तर- दिनांक 16 ते 20 ऑगस्ट 2023 या कालावधीत पुढील उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. विविध गावागावांतून वसुधा वंदन कार्यक्रमातून जमा केलेली एक मूठ माती कलशामध्ये गोळा केली जाणार आहे. या कलशावर तालुका, जिल्हा व राज्याचे नाव लिहून हा मातीचा कलश दिनांक 27 ते 30 ऑगस्ट 2023 या दरम्यान प्रधानमंत्री महोदयांच्या कार्यक्रमासाठी दिल्ली येथे नेला जाणार आहे. त्यासाठी नेहरु युवा केंद्रातील युवकाची निवड करण्यात येणार आहे. दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे अभियानाचा समारोप समारंभ होणार आहे. 


            याशिवाय, मागील वर्षी प्रमाणे यावर्षीही दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा उपक्रम राबविला जाणार आहे. सर्व नागरिकांनी या कालावधीत आपल्या घरांवर या दिवशी तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात येत आहे.  


दीपक चव्हाण, विभागीय सं

पर्क अधिकारी


0000


माझी माती, माझा देश’ अभियानास आजपासून सुरुवात

 माझी माती, माझा देश’ अभियानास आजपासून सुरुवात


मंत्रालयात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत


अधिकारी-कर्मचारी घेणार पंचप्रण शपथ


 


            मुंबई, दि. 8 : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सांगता सोहळ्यानिमित्त केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्यात ‘मेरी माटी मेरा देश’ अर्थात ‘माझी माती माझा देश’अभियान बुधवार, दिनांक 09 ऑगस्ट, 2023 पासून सुरु होत आहे. त्या अनुषंगाने सकाळी 10 वाजता मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगण येथे पंचप्रण शपथ तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्यासह मंत्रीमंडळातील इतर मंत्री आणि मान्यवरांची यावेळी उपस्थिती असणार आहे.


            स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या उपक्रमाचा सांगता सोहळा दिनांक 09 ऑगस्ट पासून सुरु होत आहे. या सांगता सोहळ्याच्या निमित्त राज्यात ‘मिट्टी को नमन, वीरों का वंदन’ या घोषवाक्यासह देशभर आयोजित ‘मेरी माटी - मेरा देश’ अर्थात ‘माझी माती - माझा देश’ या अभियानाची सुरुवात होत आहे. राज्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर विविध उपक्रम त्यानिमित्त आयोजित केले जात आहेत. देशासाठी बलिदान दिलेल्या शहीद वीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि नमन करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.


            लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभाग अशा सर्वांचा सहभाग यामध्ये राहणार आहे. पंच प्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन यांसारखे उपक्रम तसेच गाव, पंचायत, गट, शहर, नगरपालिका क्षेत्रातील स्थानिक शूरवीरांच्या त्यागाला वंदन करणारे शिलाफलक किंवा स्मारक फलक शहरी आणि ग्रामीण भागात उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात दिनांक 09 ते 14ऑगस्ट या कालावधीत ग्रामस्तरावर विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, मंत्रालयातील विविध विभागांचे अधिकारी –कर्मचारी यांची उपस्थिती असणार आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवण्याचं स्वप्न साकार करायचं आहे. गुलामगिरीची मानसिकता मुळापासून उखडून टाकायची आहे. देशाच्या समृद्ध वारशाचा अभिमान बाळगायचा आहे. एकता आणि एकजुटता यासाठी कर्तव्यदक्ष राहायचं आहे. नागरिकांचे कर्तव्य बजावयाचे आहे. तसेच देशाचे रक्षण करणाऱ्यांचा आदर ठेवायचा आहे’, ही पंचप्रण (शपथ) सर्व अधिकारी- कर्मचारी मान्यवरांच्या उपस्थितीत घेणार आहेत.


000

Featured post

Lakshvedhi