Friday, 4 August 2023

विकासकासंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार

 विकासकासंदर्भातील तक्रारींची चौकशी करणार


– गृहनिर्माण मंत्री अतुल सावे


            मुंबई, दि. 3 : हिंद मिल कम्पाऊंड यांची मालकी असणारी मालमत्ता मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाला (म्हाडा) सन 1961 मध्ये हस्तांतरीत करण्यात आली होती. ही जागा लोकमान्य नगर, प्रियदर्शिनी सहकारी गृहनिर्माण संस्थेला सन 1988 पासून 90 वर्षांच्या भाडेपट्ट्यावर देण्यात आली आहे. हा भूखंड विकासकाकडे देण्यात आला होता. यासंदर्भात देण्यात आलेल्या चटई क्षेत्र निर्देशांक, करारनाम्याचे उल्लंघन आणि अटी व शर्तींचा भंग झाला असेल तर त्याची चौकशी करण्यात येईल, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दिली.


            सदस्य कैलास गोरंट्याल यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला मंत्री श्री. सावे यांनी उत्तर दिले.         


            ते म्हणाले की, या संस्थेच्या 10 चाळी अस्तित्वात होत्या व त्यामध्ये एकूण 264 (संस्थेच्या कार्यालयासह) भाडेकरु / रहिवाशी व 08 सफाई कामगार आहेत. मुख्य अधिकारी, मुंबई मंडळ यांनी या संस्थेस ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास संमती दिली होती. त्यानुसार लोकमान्य नगर, प्रियदर्शिनी संस्थेने विकासकाची नेमणूक केली. म्हाडाने यासंदर्भातील करारातील अटी विकासकाने पूर्ण केल्याचे दिसत असले, तरी यासंदर्भात तक्रारी असतील, तर त्याची चौकशी करण्यात येईल, असे मंत्री श्री. सावे यांनी सां

गितले. 


मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकासासाठी

 मुंबईच्या झोपडपट्टी पुनर्विकासासाठसीआरझेड’च्या निकषांसंदर्भात केंद्राकडे पाठपुरावा करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


          मुंबई, दि. 3 : सीआरझेड 2 मध्ये येणाऱ्या झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी केंद्र सरकारने मागविलेला पर्यावरणीय खर्च व फायदा विश्लेषण अहवाल मुंबई महानगरपालिका आणि झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरणाकडून तयार करून दोन महिन्यांच्या आत केंद्राकडे पाठवण्यात येईल. हा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना झोपडपट्टी पुर्नवसन प्राधिकरण व बृहन्मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकासाचे रखडलेली सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले.


          सदस्य ॲड.आशिष शेलार यांनी या संदर्भातील लक्षेवधी उपस्थित केली होती, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते.


          मुख्यंत्री श्री.शिंदे म्हणाले की, मुंबईतील समूद्रकिनारी असलेल्या झोपडपट्ट्यांच्या विकासाचे प्रकल्प गेल्या काही वर्षापासून रखडेलेले आहेत ते तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास, धोकादायक इमारती इत्यादी पुनर्विकासाचे जे प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले आहेत ते पूर्ण करण्याचे शासनाचे धोरण आहे. यामध्ये एमएमआरडीए, म्हाडा, सिडको अशा सर्व शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून हे सर्व पुनर्विकासचे प्रकल्प मार्गी लावण्यास शासनाचे प्राधान्य असून जनतेला मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


          यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य वर्षा गायकवाड, मंदा म्हात्रे, नाना पटोले, बच्चू कडू यांनी सहभाग घेतला.



००००


सर्पदंशाने मुलीच्या मृत्यूप्रकरणी त्रिसदस्यीय समिती

 सर्पदंशाने मुलीच्या मृत्यूप्रकरणी त्रिसदस्यीय समिती


- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत


 


            मुंबई, दि. 3 : पेण (जि. रायगड) येथील 12 वर्षीय मुलीचा सर्पदंशाने मृत्यू झाल्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नेमण्यात येईल आणि ही समिती तीन दिवसांत त्यांचा अहवाल सादर करेल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी आज विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली.


            पेण येथील उपजिल्हा रुग्णालयात ही मुलगी दाखल झाली. तेथे तिच्यावर औषधोपचार करुन तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तरीही तब्येतीत सुधारणा होत नसल्याने तिला अलिबाग येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे तिच्यावर उपचार कऱण्यात आले. मात्र, तब्येतीत सुधारणा न झाल्याने 108 या रुग्णवाहिकेद्वारे या मुलीला नवी मुंबईतील इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे तिला अत्यवस्थ वाटू लागले. तिथेच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल, असे निवेदन मंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी केले.

अमेरिका, महाराष्ट्राच्या सुदृढ संबंधातून उज्वल भविष्य घडेल

 अमेरिका, महाराष्ट्राच्या सुदृढ संबंधातून उज्वल भविष्य घडेल


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


अमेरिकन स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रम


 


            मुंबई, दि. 3 :- 'अमेरिका आणि महाराष्ट्राचे सौहार्द, सुदृढ संबंध उज्वल भविष्य घडविण्यात महत्वपूर्ण ठरतील,' असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.


            अमेरिकच्या २४७ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने अमेरिकन वकिलात व वाणिज्य दूतावास यांच्यावतीने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.


            कार्यक्रमास अमेरिकेचे भारतातील राजदूत एरीक गार्सेटी, दूतावास प्रमुख माईक हॅन्की, पद्मश्री श्रीमती रीमा नानावटी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर - पाटणकर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी याप्रसंगी उपस्थित अमेरिकन वकिलात, वाणिज्य दूतावासाशी निगडित वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधी, नागरिक तसेच मान्यवरांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले की, अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा आणि लोकशाहीच्या बळकटीकरणातील योगदान उल्लेखनीय आहे. भारत आणि अमेरिकेतील मैत्री दिवसेंदिवस वृद्धिंगत होत आहे. त्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतलेला पुढाकार उल्लेखनीय आहे. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी अलिकडेच अमेरिकेच्या केलेल्या दौऱ्यात या मैत्रीच्या नात्याचे प्रतिबिंब पडले. यामुळे दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंध आणखी वृद्धिंगत होतील. या माध्यमातून भारत आणि अमेरिका हे दोन्ही देश जगातील आव्हानांना यशस्वीपणे सामोरे जातील,असेही त्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री म्हणाले की, अमेरिकेतील गुंतवणूकदारांना महाराष्ट्र राज्यात गुंतवणुकीच्या उत्तम संधी उपलब्ध आहे. राज्यात कुशल मनुष्यबळ आणि पायाभूत सोयीसुविधांचा विकास गतीने होत आहे. राज्यात महिला सक्षमीकरण, तरुणांमधील कौशल्य विकास, मुलींच्या जन्माचे स्वागतासाठी 'लेक लाडकी' योजनेतून अनुदान देण्यात येत आहे. स्त्री- पुरुष समानतेवर भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगित

ले.


00000



 


पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यास प्राधान्य देणार

 पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यास प्राधान्य देणार


- पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील


          मुंबई, दि. 3 : पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जा प्रकल्पावर राबविण्यासाठी शासनाला शक्य आहे, तिथे प्राधान्याने मार्गदर्शक तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल, असे उत्तर पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानपरिषदेत दिले.


            सदस्य रणजितसिंह मोहिते - पाटील यांनी जलजीवन मिशनअंतर्गत सोलापूर जिल्ह्याला दिलेले ७५ हजार नळ जोडण्यांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तसेच राज्यात सौर ऊर्जेवर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. पाटील बोलत होते.


            मंत्री श्री.पाटील म्हणाले की, सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात ५ लाख ७६ हजार ०७८ नळजोडण्या देण्याचे उद्दिष्ट होते. सन २०२३ अखेर प्रगतिपथावरील ८५५ पाणीपुरवठा योजनांमधील नळजोडण्या देऊन उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २४ नळयोजना सौर ऊर्जा प्रकल्पावर कार्यरत आहेत. नव्याने अशी काही मागणी आल्यास त्याबाबत शासनाच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.


            यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य गोपीचंद पडळकर, नरेंद्र दराडे, महादेव जानकर यांनी सहभाग

 घेतला.


वाहन चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करणार

 वाहन चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करणार


- मंत्री दादाजी भुसे


                      मुंबई, दि. 3 : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याचे, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादाजी भुसे यांनी आज विधानसभेत सांगितले.


               सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान समृद्धी महामार्गावरील होणारे अपघात याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.


               मंत्री श्री. भुसे म्हणाले की, या महामार्गावर दररोज किमान १७ ते १८ हजार वाहने प्रवास करतात. भविष्यात या महामार्गावर प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सर्व वाहनांना १२० किलोमीटर प्रती तास इतकी वेगमर्यादा घालण्यात येणार आहे. समृद्धी महामार्गावर प्रवाशांच्या सुरक्षिततेकरिता तसेच अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. अपघात होऊ नये यादृष्टीने परिवहन विभागातर्फे वाहन चालकांचे वेळोवेळी समुपदेशन केले जाते. वेग मर्यादा न पाळणाऱ्या वाहन चालकांना दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आवश्यक दिशादर्शक चिन्हे, सूचना फलके, माहिती फलके, वेगमर्यादा दर्शक फलके लावणे, लेन मार्किंग करणे, उपाययोजना केलेल्या आहेत, असेही मंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.


                  यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हरिभाऊ बागडे, सुनील केदार यांनी सहभाग घेतला.


****

आरे वसाहतीतील मूलभूत सुविधाबाबत

 आरे वसाहतीतील मूलभूत सुविधाबाबत


महानगरपालिका आयुक्तांसोबत बैठक घेणार


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील


            मुंबई, दि. 3 : गोरेगाव येथील आरे वसाहतीच्या विकासासाठी व्यापक आराखडा तयार करण्यात येणार आहे. या वसाहतीतील मूलभूत सोयी सुविधाबाबत मुंबई महानगरपालिका आयुक्तांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत सांगितले.


                  सदस्य रवींद्र वायकर यांनी अर्धा तास चर्चेदरम्यान आरे वसाहतीतील रस्ते देखभाल, पथदिवे, वैद्यकीय सुविधा याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.


            मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, आरे वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती व देखभाल मुंबई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. येथील अतिक्रमणाबाबत ड्रोनद्वारे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मागील काही दिवसात आरेमध्ये तीनशेपेक्षा जास्त पथदिवे बसविण्यात आले आहेत. आरेमधील रहिवाशांना पाणी, रस्ते, आरोग्य, वीज अशा मूलभूत सोयीसुविधा तत्काळ पुरवण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल. आरेच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाने गठित केलेल्या समितीची बैठक घेण्यात येईल, असेही मंत्री श्री. विखे पाटील यांनी सांगितले.


            यावेळी झालेल्या चर्चेत योगेश सागर यांनी सहभाग घेतला.

Featured post

Lakshvedhi