Friday, 4 August 2023

Aushyman भारत अभा कार्ड


 

खुतमापूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देणार

 खुतमापूर येथील शेतकऱ्यांच्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


 


            मुंबई, दि. 3 : नांदेड जिल्ह्याच्या देगलूर तालुक्यातील खुतमापुर येथे विद्युत तारेला स्पर्श झाल्याने शेतकऱ्याच्या झालेल्या मृत्यूप्रकरणी नुकसान भरपाई देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले.


            यासंदर्भात सदस्य जितेश अंतापूरकर, अशोक चव्हाण यांनी प्रश्न उपस्थित केला होता.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मयत शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना प्रथम आर्थिक मदत म्हणून 20 हजार रुपये मदत देण्यात आली आहे. या कुटुंबीयांनी वारसाहक्क प्रमाणपत्र सादर केल्यानंतर उर्वरित नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्यात येईल. तसेच या अपघात प्रकरणी विद्युत निरीक्षक नांदेड यांनी घटनास्थळी पाहणी करून अपघात प्रकरणी महावितरण कंपनी जबाबदार असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार संबंधितांना निलंबित करण्यात आले आहे, असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.


000

ठाणे येथे राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान

 ठाणे येथे राज्यातील पहिले अवयवदान जनजागृती उद्यान


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 3 : देशभरात आज ‘राष्ट्रीय अवयवदान दिवसʼ साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्नांचा भाग म्हणून राज्यातील पहिले ‘अवयवदान जनजागृती उद्यानʼ ठाण्यात तयार करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच भविष्यात अशा स्वरूपाचे उद्यान राज्यातील इतर शहरात महापालिका आणि नगरपरिषदेतर्फे चालू करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले की, राज्यातील हे पहिले उद्यान इंदिरा बाबुराव सरनाईक उद्यान, कम्युनिटी पार्क, पोखरण रोड नं २, येथील ६ हजार चौरस मीटरच्या जागेवर तयार करण्यात येणार आहे. या ठिकाणी अवयवदान संदर्भातील माहिती पुस्तिका उपलब्‍ध करून देण्यात येणार आहे. या उद्यानाची योग्य पद्धतीने देखभाल करण्यासाठी महापालिकेतर्फे कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येईल. प्रस्तावित उद्यानात मूत्रपिंड (किडनी), यकृत ( लिव्हर), हृदय, फुफ्फुस, स्वादुपिंड, छोटे आतडे, डोळे, त्वचा, हाडे, हात या अवयवाच्या आणि पेशींच्या प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. तसेच या अवयवांसंदर्भातील माहिती त्याठिकाणी मोठ्या फलकावर लावण्यात येईल. अवयवदानासंदर्भातील शास्त्रीय स्वरूपाची माहिती या ठिकाणी देण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या उद्यानात अवयवदान करण्याचा प्रतिज्ञा अर्ज नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. ज्या नागरिकांना हा अर्ज भरायचा आहे त्यांच्याकडून तेथेच भरून घेण्यात येईल. त्यानंतर तो अर्ज नोंदणीकरिता राज्य अवयव आणि उतीपेशी प्रत्यारोपण संस्था या राज्यस्तरीय संस्थेच्या कार्यालयात सुपूर्द करण्यात येईल.


            अवयवदान ही काळाची गरज आहे, याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता आल्यास अनेक जीव वाचण्यास मदत होणार आहे. यासाठी शासकीय आणि सामाजिक स्तरावर अवयवदानाबाबत जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात आहेत. या विषयावर अधिक व्यापक प्रमाणात जनजागृतीची व्हावी आणि अवयवदानासंदर्भात सोप्या पद्धतीने माहिती उपलब्ध व्हावी, याकरिता ठाणे येथील उद्यान महत्वाचे असणार आहे. नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर अवयवदानाचे अर्ज भरुन शासनाच्या मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यानिमित्ताने केले आहे.


            सध्याच्या घडीला एक मेंदूमृत व्यक्ती अवयवदान करून ८ व्यक्तींना जीवनदान देऊ शकते. गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यातच वैद्यकीय विश्वातील प्रगतीमुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया मोठ्या प्रमाणात यशस्वी होत आहे. त्यामुळे अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रुग्ण पुढे येत आहे. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयवदान होण्याची संख्या आणि अवयवाची गरज असणाऱ्या रुग्णांची संख्या यामध्ये मोठी तफावत आहे. ती दूर करण्यासाठी मेंदूमृत अवयवदान मोठ्या प्रमाणात होणे गरजेचे आहे. सध्या राज्यात अवयव प्रत्यारोपणासाठी मोठ्या प्रमाणावर रुग्ण प्रतिक्षेत आहेत. यात किडनी प्रत्यारोपणासाठी - ५,८३२, लिव्हर प्रत्यारोपणासाठी - १,२८४, हृदय प्रत्यारोपणासाठी – १०८, फुफ्फुस प्रत्यारोपणासाठी – ४८, स्वादुपिंड प्रत्यारोपणासाठी – ३५, छोटे आतडे प्रत्यारोपणासाठी – ३ एवढे रुग्ण प्रतिक्षेत आहेत.


0

000



 


पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला

 पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला 


रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट नाही


            मुंबई, दि. 3 : भारतीय हवामान खात्याच्या माहिती नुसार पुढील 24 तासांकरिता राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला रेड अलर्ट किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना सध्या येलो अलर्ट देण्यात आला आहे. वरील सर्व जिल्हे वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये 65 मिमी पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला असून ग्रीन अलर्ट देण्यात आला आहे. अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.


            राज्यातील काही महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युमेक्स) खालीलप्रमाणे-:


सुर्या धामणी (ठाणे) (एकूण क्षमता २७६.३५ दलघमी) आत्तापर्यंत ११९.८४ क्युमेक्स विसर्ग


गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आत्तापर्यंत ५४२.५७ क्युमेक्स विसर्ग


हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आत्तापर्यंत ३७९ क्युमेक्स विसर्ग


भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आत्तापर्यंत २३.३६ क्युमेक्स विसर्ग


दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४ दलघमी) आत्तापर्यंत ३५.४० क्युमेक्स विसर्ग


धोम- बलकवडी (सातारा) (एकूण क्षमता ११२.१४ दलघमी) आत्तापर्यंत ५८ क्युमेक्स विसर्ग


राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आत्तापर्यंत १२१ क्युमेक्स विसर्ग


ऊर्ध्व वर्धा (अमरावती) (एकूण क्षमता ५६४.०५ दलघमी) आत्तापर्यंत ४६ क्युमेक्स विसर्ग


बेंबळा (यवतमाळ) (एकूण क्षमता १८३.९४ दलघमी) आत्तापर्यंत ४० क्युमेक्स विसर्ग


निम्न वर्धा (वर्धा) (एकूण क्षमता २१६.८७ दलघमी) आत्तापर्यंत ७८.३५ क्युमेक्स विसर्ग


वारणा (सांगली) (एकूण क्षमता ७७९.३४ दलघमी) आत्तापर्यंत २२९ क्युमेक्स विसर्ग


कृष्णा-धोम (सातारा) (एकूण क्षमता 331.05 दलघमी) आत्तापर्यंत ३८ क्युमेक्स विसर्ग


काटेपूर्णा (अकोला) (एकूण क्षमता 86.35 दलघमी) आत्तापर्यंत १७.१६ क्युमेक्स विसर्ग


इराई (चंद्रपूर) (एकूण क्षमता १७२.२० दलघमी) आत्तापर्यंत ३६.४० क्युमेक्स विसर्ग


चासकमान (पुणे) (एकूण क्षमता २१४.५० दलघमी) आत्तापर्यंत ३० क्युमेक्स विसर्ग


रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे.


            पुढील २४ तासांकरिता किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी दुपारी १:५५ वाजता भरतीची वेळ देण्यात आली असून साधारण ४.९ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज आहे.


            वीज कोसळण्याची शक्यता असणा-या जिल्ह्यातील नागरिकांनी अद्ययावत व सतर्क राहण्यासाठी आपल्या मोबाईलमध्ये “DAMINI” ॲप डाउनलोड व इन्स्टॉल करावे. हे ॲप वापरकर्त्यांना 20 ते 40 किलोमीटर जीपीएस (GPS) नोटिफिकेशनद्वारे सतर्क करते तसेच घ्यावयाच्या खबरदारीचे उपाय देखील देते. नागरिकांनी आपत्तीचा इशारा आणि अधिकृत सूचना प्राप्त करण्याकरिता “SACHET” App डाउनलोड व इन्स्टॉल करावे.


            राज्य शासनाद्वारे नागरिकांना CAP-SACHET या पोर्टल च्या माध्यमाने वेळोवेळी सूचना आणि संदेश पाठविण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी प्राप्त होणाऱ्या सूचनांचे पालन करावे.


            आपत्ती-संबंधित माहिती व मदतीसाठी नागरिकांनी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या खाली नमूद केलेले सोशल मीडिया अकाउंट फॉलो करावे :


फेसबुक: https://www.facebook.com/SDMAMaharashtra?mibextid=ZbWKwL 


ट्विटर: https://twitter.com/SDMAMaharashtra


अतिरिक्त माहितीकरिता खालील दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा:


जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष: 1077 (टोल फ्री क्रमांक)


राज्य आपत्कालीन कार्य केंद्र: 022-220279900


ईमेल: controlroom@maharashtra.gov.in


            महाराष्ट्र शासनाचे मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून ३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता प्राप्त आकडेवारीनुसार महाराष्ट्र हवामान सद्यस्थिती आणि अंदाज प्रसिद्धीसाठी देण्यात आला आहे. रेड अलर्ट म्हणजे 24 तासात २०४ मिमी पेक्षा जास्त तर ऑरेंज अलर्ट म्हणजे 24 तासात 115 ते 204 मिमी पाऊस असा आहे. तर येलो अलर्ट हा 65 ते 115 मिमी इतका अंदाजे पाऊस पडणार असेल तर देण्यात येतो. अशी माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून प्रसिद्धीसाठी देण्यात आली आहे.


****

कात व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक

 कात व्यावसायिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक


- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. 3 : कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील कात उत्पादकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासन सकारात्मक असून याविषयावर विविध पैलूंचा अभ्यास करून यासंदर्भात मार्ग सुचविण्याकरीता दोन तज्ज्ञ अधिकाऱ्यांची समिती गठित करण्याचे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.


            कात व्यावसायिकांच्या अडचणींबाबत विधानभवनात मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार शेखर निकम, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव भंडारी यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, कात व्यावसायिकांच्या अडचणींची शासनाला जाणीव आहे. त्या सोडविण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील. त्यासाठी दोन सदस्यीय समिती गठित करण्यात येईल. या समितीने अभ्यास करून अहवाल सादर करावा. तसेच खैर वृक्ष लागवडीबाबत प्रोत्साहन देण्याबाबतचाही अभ्यास करण्यात येईल. या अभ्यासाकरिता श्री. भंडारी यांनी मदत करावी, अशी सूचनाही मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केली. यावेळी कात व्यावसायिकांतर्फे आमदार श्री. गोगावले, श्री. निकम, सामाजिक कार्यकर्ते श्री. भंडारी यांनी विविध सूचना केल्या.


००००

अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींनाजमिनीची मालकी हक्क देण्यासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस करणार

 अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासींनाजमिनीची मालकी हक्क देण्यासंदर्भात केंद्र सरकारला शिफारस करणार


- वनमंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई दि ३ : अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी यांना वनहक्काची जमीन उपजीविकेसाठी देण्याची तरतूद कायद्यात आहे. मात्र, जमिनीचा मालकी हक्क देण्याच्या मागणी संदर्भात केंद्र सरकारला शिफारस पाठविण्यात येणार आहे, असे वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी वनहक्काची मान्यता अधिनियम २००६ नियम २००८ व सुधारणा नियम २०१२ची अंमलबजावणी अन्वये वैयक्तिक वनहक्क धारकांची ७/१२ सदरी भोगवटादार वर्ग २ अशी नोंद घेण्याबाबत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या संदर्भात आज विधान भवन येथे आयोजित बैठकीत समिती सदस्य मंत्री मुनगंटीवार बोलत होते.


            यावेळी समितीचे सदस्य तथा आदिवासी विकास विभाग मंत्री डॉ.विजयकुमार गावित, सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, आमदार विनोद निकोले, माजी आमदार जे.पी. गावित, महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव प्रदीप व्यास, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते.


            अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वनातील निवासींना भूसंपादन मोबदला न मिळणे, शेती कर्ज मिळण्यास होणाऱ्या अडचणी, शासनाच्या इतर शेती विषयक योजनांचा लाभ मिळण्यास येणाऱ्या अडचणी तसेच वनहक्काच्या अनुषंगाने इतर सूचनांबाबत सकारात्मक विचार करून निर्णय घेण्यासाठी ही समिती गठित करण्यात आली आहे.


            महसूल मंत्री श्री. विखे पाटील म्हणाले की, वन निवासींना नियमानुसार चार हेक्टर एवढी जमीन भोगवट्यासाठी अनुज्ञेय आहे. मात्र, धारकांनी केलेल्या अर्जानुसार किती जमीन मंजूर करण्यात आली, किती धारकांनी अर्ज दाखल केले आणि नामंजूर करण्याची कारणे याबाबत जिल्हानिहाय संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागविण्यात येईल. अहवालाअंती त्यावर समिती चर्चा करून न्याय देण्याच्या अनुषंगाने निर्णय घेणार असल्याचे महसूल मंत्री श्री. विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.


०००


श्रद्धा मेश्राम/ससं/

रत्नागिरीतील प्राणी संग्रहालयाच्याउभारणीसाठी सहकार्य

 रत्नागिरीतील प्राणी संग्रहालयाच्याउभारणीसाठी सहकार्य


- वन मंत्री सुधीर मुनगंटीवार


            मुंबई, दि. ३ : रत्नागिरी येथे प्राणीसंग्रहालयाच्या उभारण्यासाठी तज्ज्ञ सल्ल्यासह आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.


            रत्नागिरी येथे प्राणी संग्रहालय उभारणीबाबत आज विधानभवनात मंत्री श्री. मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, आमदार शेखर निकम, वन विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उपवनसंरक्षक विवेक होशिंग, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधव भंडारी यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.


            मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, रत्नागिरी येथे प्राणिसंग्रहालय उभारण्याची संकल्पना कौतुकास्पद आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून प्राणीसंग्रहालय साकारता येईल. प्राणीसंग्रहालयाच्या उभारण्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य करण्यात येईल. तसेच देशातील अन्य प्राणीसंग्रहालयांची पाहणी करीत त्याच्या व्यवस्थापनाची माहिती करून घ्यावी. या प्राणीसंग्रहालयामुळे कोकणातील पर्यटन वृद्धिसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. तसेच मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी प्राणीसंग्रहाल्याच्या उभारणीसंदर्भात विविध मौलिक सूचना केल्या. उद्योग मंत्री श्री. सामंत यांनी प्राणी संग्रहालयासाठी जागा उपलब्ध असून सिंधुरत्न योजनेंतर्गत निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.


००००


गोपाळ साळुंखे/ससं/



 

Featured post

Lakshvedhi