Tuesday, 20 June 2023

छातीतील 'कफ' पासून मिळवा सुटका या घरगुती उपायांनी*

 *छातीतील 'कफ' पासून मिळवा सुटका या घरगुती उपायांनी*


कमी तापमान आणि हवेमधील प्रदूषण यामुळे श्वसनमार्गाचा दाह होतो. यामुळे नाकातून पाणी, शिंका आणि कफयुक्त खोकला सुरू होतो.


कधी कधी छातीत खूप कफ असतो, तो खोकताना छातीत वाजतो, पण सुटत नाही. खोकून खोकून बरगडय़ा-पोटात दुखायला लागते. 


म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे कफपासून तुम्हाला सहज सुटका मिळू शकते. 


*जाणून घ्या 'कफ' वरील उपाय-*


▪️ *लिंबू :* लिंबामध्ये असणारे सी-व्हिटॅमिन आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. लिंबामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. त्यामुळे वारंवार होणारी सर्दी आणि कफ यांची समस्या कमी होण्यास उपयोग होतो.


▪️ *लसूण :* लसूण आहारातील एक अतिशय महत्त्वाचा पदार्थ आहे. लसणामध्ये असणारे गुण आरोग्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे तुम्हाला सर्दी-खोकल्याचा त्रास वारंवार होत असेल तर तुम्ही आहारात लसूण आवर्जून ठेवा.


▪️ *आले :* आल्यामध्येही अनेक उपयुक्त गुणधर्म असतात जे कफ आणि सर्दीच्या त्रासापासून सुटका करण्यासाठी उपयुक्त ठरु शकतात. 


▪️ *गुळण्या करणे :* गुळण्या करणे हा घसा, सर्दी आणि कफासाठी एक उत्तम उपाय आहे. गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून गुळण्या केल्यास घशाचा संसर्ग लवकर बरा होतो.



जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.*

 *जर आपण भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केले तर काय होते वाचा.* 


खुप काम आहे, असे म्हणत अनेकजण जेवण टाळतात. परंतु आरोग्यासाठी हे अतिशय घातक ठरू शकते. यामुळे शरीरात विविध प्रकारचे आजार निर्माण होऊ शकता तसेच कार्यक्षमतेवर देखील वाईट परिणाम होऊ शकतो काही व्यक्ती वजन कमी करण्यासाठी जेवण टाळात पण आरोग्यासाठी हे घातक आहे.


*हे आहेत दुष्परिणाम.* 


◼️ *चक्कर येणे.* 

भुकेले राहिल्याने अशक्तपणा येऊन अनेकदा भोवळ येते.


◼️ *ताण-तणाव.* 

भुकेल्या अवस्थेत शरीरात कोर्टिसोल नावाच्या हार्मोन्समध्ये वाढ होते. यामुळे तणाव जाणवतो.


◼️ *लठ्ठपणा वाढतो.* 

भूक लागल्यावर वेळेवर अन्नग्रहण नाही केल्यास, वेळी-अवेळी खाल्लास, वजन वाढते, म्हणजे लठ्ठपणा वाढतो... वेळेत जेवण न केल्याने चयापचय प्रक्रिया बिघडते व फॅट्स शरीरात जमा होतात, यामुळे वजन वाढण्यास सुरुवात होते. तेव्हा वजन नियंत्रणात ठेवायचे असेल तरं, भूक लागेल तेव्हा वेळेवर योग्य-पौष्टिक आहार घ्या आणि किमान 20 मिनिटे व्यायाम करा...


◼️ *मेंदूचे कार्य बिघडते.* 

ग्लुकोजच्या मदतीने मेंदूचे कार्य सुरू असते. यासाठी योग्य प्रमाणात आणि वेळेत जेवण करा. अन्यथा रक्तातील साखरेची पातळी खालावते. लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता कमी होते.


◼️ *चिडचिड.* 

भुकेमुळे जास्त चिडचिड होते. रक्तातील साखरेची पातळी खालावल्याने मेंदूप्रमाणे तुमच्या मूडवर याचा परिणाम होतो...


*सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे संतु निरामया|*

*सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद दुःख भागभवेत्||*


*संकलन-* 

डॉ. प्रमोद ढेरे,




दिलखुलास कार्यक्रमात योग तज्ज्ञ सानिका बाम यांची मुलाखत

 दिलखुलास कार्यक्रमात योग तज्ज्ञ सानिका बाम यांची मुलाखत


            मुंबई, दि. 19 : आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि आंतरराष्ट्रीय संगीत दिवस हे दरवर्षी 21 जून रोजी जगभरात साजरे केले जातात. माणसाला तणावमुक्त राहण्यासाठी योग आणि संगीत खूप फायदेशीर ठरते. या दिनानिमित्त योग तज्ज्ञ सानिका बाम यांची विशेष मुलाखत 'दिलखुलास' कार्यक्रमात प्रसारित होणार आहे.


            राष्ट्रीय स्तरावरील योग तज्ज्ञ सानिका बाम यांनी योग दिनाचा मुख्य उद्देश, योगाचे प्रकार, संगीत थेरपी अशा महत्त्वपूर्ण विषयावर सविस्तर माहिती दिली आहे.


            माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत मंगळवार दि.20 आणि बुधवार दि. 21 जून, 2023 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर प्रसारित होणार आहे. निवेदक रिताली तपासे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


000

२६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता

 २६ नदी खोऱ्यात पूरनियंत्रण यंत्रणाउभारण्यासाठी १२ कोटींच्या निधीस मान्यता


कोकण पाटबंधारे विकास महामंडळ नियामक मंडळाची बैठक


 


            मुंबई दि. १९ :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली कोकण पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळाच्या ८४व्या बैठकीत कोकण प्रदेशातील पूरनियंत्रणासाठी माहिती संपादन प्रणाली (Real Time data Acquisition system) ची सर्व २६ नदी खोऱ्यात उभारणी करण्यासाठी १२ कोटी रुपये निधी देण्यास मान्यता देण्यात आली.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            या बैठकीत कोकणातील सिंचन प्रकल्पांना गती देण्यासाठी ३६ विषयांबाबत चर्चा होऊन मान्यतेचे निर्णय घेण्यात आले. गडनदी, गडगडी, तिलारी प्रकल्पांच्या भूसंपादन व प्रकल्पग्रस्तांना अनुदान, पुनर्वसित गावठाणातील नागरी सुविधांची दुरुस्ती कामांना मान्यता देण्यात आली. पाली-भूतावली, कोर्लेसातंडी, तिडे बेर्डेवाडी इत्यादी प्रकल्पाच्या कामांवरील वाढीव आर्थिक दायित्व सुमारे ९० कोटी रुपयास मान्यता देण्यात आली.


-----000-

विदर्भातील 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांनासुधारित प्रशासकीय मान्यता

 विदर्भातील 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांनासुधारित प्रशासकीय मान्यता


विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाची बैठक


 


            मुंबई, दि. 19 :- उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर नियामक मंडळाच्या 83 व्या बैठकीत 4199.72 कोटी रुपयांच्या 11 प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या बैठकीस जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, सचिव आणि कार्यकारी संचालक रा. द. मोहिते, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी उपस्थित होते.


            बैठकीत एकूण 73 विषय मंजूर करण्यात आले. तसेच रु. 240.02 कोटीचे १२ दायित्व प्रस्ताव मंजूर करण्यात आले. 8 सिंचन प्रकल्प सौर उर्जेवर कार्यान्वित करण्यासाठी रु. 681.68 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. सिंचन प्रकल्पांतर्गत विविध कारणांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई किंमत 3.79 कोटींचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या भूसंपादन निवाड्यामधून सुटलेल्या मालमत्तांची मूल्यांकन रक्कम तसेच फळझाडे व वनझाडांचा मोबदला तसेच पूनर्वसनबाधीत कुटुंबांना मोबदल्यातून सुटलेल्या, मालमत्तांचे मोबदला रक्कम १४८.४८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. असे एकूण 5273.69 कोटी रूपयांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले.  



----000-----


महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता

 महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 19 :- राज्य शासनाचे विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात. मात्र, आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यकता भासणार असून त्यासाठी ‘महाराष्ट्र मिशन ड्रोन’ प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. 


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे महाराष्ट्र ड्रोन मिशनबाबत बैठक झाली.


            यावेळी अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव नितीन करीर, अपर मुख्य सचिव मनिषा म्हैसकर, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव पराग जैन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, सध्या ‘आयआयटी’ येथे या मिशनची सुरूवात करण्यात यावी, नंतर यामध्ये अधिक सुसुत्रता आणण्यात यावी. शेतीच्या विविध कामांचे पूर्ण चक्र आपण याव्दारे संनियंत्रण करु शकतो. शेती क्षेत्रासाठी हे अत्यंत उपयुक्त ठरेल. प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव सादर करण्याचे तसेच यासंदर्भातील आदर्श कार्यपद्धती (SOP) तयार करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिले.


            ‘आयआयटी’चे अधिष्ठाता मिलिंद अत्रे यांनी सादरीकरण केले. जागतिक दर्जाचे ड्रोन हब तयार करणे, मुख्यालय स्थापन करणे, त्याचे विकेंद्रीकरण करणे, या सर्व यंत्रणा उभारण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, ड्रोन पोर्ट तयार करणे, या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची निर्मिती करणे, एकात्मिक यंत्रणा उभारणे, ही कामे याअंतर्गत करण्यात येतील. विविध क्षेत्रासाठी हे तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, कृषी क्षेत्रात या तंत्रज्ञानामुळे मोठे बदल घडू शकतात. उद्योग क्षेत्रालाही याद्वारे चालना मिळेल, रोजगार निर्मितीलाही याद्वारे चालना मिळू शकेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.


----000----

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीवाढवण बंदर महत्त्वपूर्ण ठरणार

 राज्याच्या सर्वांगीण विकासासाठीवाढवण बंदर महत्त्वपूर्ण ठरणार


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


            मुंबई, दि. 19 :- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर अतिशय महत्त्वाचे ठरणार असून या बंदराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत वाढवण बंदर उभारणीसंदर्भात आढावा बैठक झाली.


            यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, मुख्य सचिव मनोज सौनिक, परिवहन व बंदरे विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष राजीव जलोटा, 'जेएनपीए'चे अध्यक्ष संजय सेठी, सागरमालाचे सह सचिव भूषण कुमार, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, वाढवण बंदरामुळे परिसराचे चित्र बदलणार आहे‌. उद्योग व रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. वाढवण बंदराच्या परिसरात विविध विकासकामे राबविण्यासाठी संबंधित विभागांनी प्रस्ताव सादर करावे. येथे मासेमारीसाठीही स्वतंत्र भाग असावा. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात यावेत. परिसरात जनतेच्या आवश्यकतेनुसार सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात.


            केंद्रीय बंदरे, शिपिंग आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल तसेच बंदरे व खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनीही वाढवण बंदर उभारणीसंदर्भात विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन केले.


यावेळी वाढवण बंदर उभारणीसंदर्भात सादरीकरण करण्यात आले.


            वाढवण बंदर उभारणीनंतर ते क्रमांक १ चे महसुली उत्पन्नाचे स्त्रोत राहील. 'जेएनपीटी' पेक्षा तीन पट भव्य असेल.


            केंद्र-राज्य ७४:२६ असा सहभाग असेल. राज्य शासन मेरीटाईम बोर्डामार्फत सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


-----000-----

Featured post

Lakshvedhi