राज्यपालांच्या उपस्थितीत अश्वमेध महायज्ञासाठी भूमिपूजन संपन्न
मुंबई, दि.4 : २३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत खारघर येथे होणाऱ्या ४८ व्या अश्वमेध महायज्ञानिमित्त भूमीपूजनाचा कार्यक्रम राज्यपाल रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (दि. ४) मध्यवर्ती मैदान, खारघर येथे संपन्न झाला. अखिल विश्व गायत्री परिवार शांतिकुंज हरिद्वार या संस्थेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
अश्वमेध यज्ञ हे केवळ धार्मिक अनुष्ठान नाही, तर त्याचे सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक व आध्यात्मिक महत्व आहे. सर्व समाजाला एकत्र घेऊन यज्ञ करीत असल्यामुळे त्यातून मतभेद मिटून एकात्मतेची भावना वाढते असे राज्यपालांनी सांगितले.
आज पर्यावरण आणि सामाजिक ऐक्याला धक्का लावणाऱ्या घटना घडत आहेत. अश्यावेळी अश्वमेध यज्ञाच्या माध्यमातून समष्टी, सद्भावना व मांगल्याची पुनर्स्थापना होण्याला मदत होईल, असे राज्यपालांनी सांगितले.
जागतिक हवामान बदलांचे परिणाम तीव्र होत असून अलीकडच्या काळात राज्याने वारंवार दुष्काळ व पूरस्थिती अनुभवली आहे असे सांगून पर्यावरण व विकास यामध्ये यांचा समतोल साधण्याची आवश्यकता आहे असे राज्यपालांनी सांगितले.
विश्वकल्याणाच्या उद्देशाने अश्वमेध महायज्ञाचे आयोजन केल्याबद्दल राज्यपालांनी अखिल विश्व गायत्री परिवाराचे अभिनंदन केले.
यावेळी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार, देव संस्कृती विश्व विद्यालयाचे प्र-कुलगुरू चिन्मय पंड्या, अखिल विश्व गायत्री परिवाराचे संचालक मनुभाई पटेल, उद्योजक डॉ निरंजन हिरानंदानी, राधिका मर्चंट तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
Governor Bais performs Bhumi Pujan for Ashwamedh
Maha Yagya in Mumbai
Maharashtra Governor Ramesh Bais attended the Bhumi Pujan ceremony for the hosting of the 48th Ashwamedh Mahayagya at Central ground, Kharghar, Navi Mumbai on Sunday (4 June).
The Maha Yagya is being organised by the Gayatri Parivar, Shanti Kunj Haridwar from 23 to 28 January 2024.
Minister of Culture Sudhir Mungantiwar, Pro Vice Chancellor of Dev Sanskti Vishwa Vidyalaya Chinmay Pandya, Director of the Akhil Vishwa Gayatri Parivar Manubhai Patel, business leader Dr Niranjan Hiranandani, Radhika Marchant and others were present.
000
वृत्त क्र. 1793
पर्यावरण दिनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार साधणार 'वनवार्ता' कार्यक्रमातून संवाद
आकाशवाणीवरून सोमवारी सकाळी ८.४० वाजता होणार प्रसारण
मुंबई, दि. 04 - जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोमवार, ५ जून रोजी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगुंटीवार “वनवार्ता” कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. आकाशवाणी केंद्रावरून सकाळी ८-४० वाजता या कार्यक्रमाचे प्रसारण होणार आहे. सध्याच्या काळाची गरज बघता पर्यावरण रक्षणाचे गांभीर्य, त्यासाठी करावयाची उपाययोजना व संविधानात नमूद प्रत्येक नागरिकांच्या या पर्यावरणीय कर्तव्यांविषयी जनसामान्यांना समजेल अशा सहज सोप्या भाषेत व स्वत:ला त्या गोष्टी कृतीत उतरवता येतील अशा पध्दतीने पर्यावरणविषयक बाबींची माहिती या कार्यक्रमाच्या माध्यमातून मंत्री श्री. मुनगंटीवार देणार आहेत.
एकविसाव्या शतकात जागतिक तापमान वाढ, प्रदुषण, अवकाळी होणारा पाऊस, दुष्काळ यासारख्या मोठया समस्यांना आपण सामोरे जात आहोत. पर्यावरणाच्या या समस्या सोडविणे हे काम कुठल्याही एका विभागाचे अथवा समुहाचे नसून त्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जनसामान्यांना पर्यावरण विषयक असणाऱ्या कर्तव्याची जाणीव करून देणे, त्यांना पर्यावरण रक्षणासाठी प्रोत्साहित करणे यासाठी हा कार्यक्रम असणार असल्याची माहिती सामाजिक वनीकरण विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. सुनीता सिंग यांनी दिली.
वननिती नुसार एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33% वनाच्छादन असणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने राज्यातील वनक्षेत्र वाढावे यासाठी मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला. वृक्ष लागवड ही लोकचळवळ व्हावी यासाठी विशेष प्रयत्न केला. सन 2016 ते सन 2019 मध्ये झालेल्या 50 कोटी वृक्षलागवड कार्यक्रमामध्ये लोकसहभाग घेतला. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील वनाच्छादन, मॅन्युव्ह इत्यादींच्या टक्केवारीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे.
"वनवार्ता “ कार्यक्रमाच्या माध्यमातून वनांविषयी कुतूहल, गंमतीजमती, रंजक गोष्टींपासून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या पर्यावरण विषयक चर्चा व महत्त्वाच्या बाबी, त्यावरील उपाय, मानव-वन्यजीव संघर्ष, वन्यजीव पर्यटन, हरित सेना (इको क्लब), वृक्ष लागवडी संदर्भात मंत्री श्री. मुनगंटीवार माहिती देणार आहेत.
05 जून 2023 रोजी सकाळी 8.40 वाजता जागतिक पर्यावरण दिनाच्या दिवशी वनवार्ता या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. हा कार्यक्रम 15 मिनिटांचा असून पुढील सत्रांचे नियोजन ४ महिन्यांकरिता दर 15 दिवसांनी रविवारी (दि. 18/06/2023 पासून पुढे) सकाळी 7.25 वाजता आकाशवाणी वरुन प्रसारित होणार आहे.
या कार्यक्रमाद्वारे वने व सामान्य नागरिक
यांचे नाते सुदृढ होण्यास मदत होणार आहे.
000