Tuesday, 7 March 2023

ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबोट यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट.

 ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबोट यांनी घेतली

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट.

            मुंबई, दि 6 :- ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबोट यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते. ऑस्ट्रेलियातील उद्योग क्षेत्रातील शिष्टमंडळही यावेळी उपस्थित होते. अर्थ, उद्योग, कौशल्य विकास या क्षेत्रातील सहकार्यासंदर्भात यावेळी चर्चा झाली.


            उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, विविध क्षेत्रात एकत्रितपणे काम करण्यासाठी खूप मोठ्या संधी आहेत. महाराष्ट्रात खनिकर्म क्षेत्रही खूप मोठ्या प्रमाणात विस्तारते आहे. या क्षेत्रातील संधींचाही पाठपुरावा करणे गरजेचे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ग्रीन हायड्रोजन प्रकल्पाची उभारणी करण्यासंदर्भात शक्यता पडताळून पाहता येईल. त्यादृष्टीनेही सर्वेक्षण करण्यात यावे असेही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.


            ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबोट म्हणाले, ऑस्ट्रेलियासाठी भारतासोबतची मैत्री महत्त्वाची आहे. दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंध मजबूत करण्यास वाव असून विशेषत: ऊर्जा क्षेत्रात मोठ्या संधी असल्याचे त्यांनी सांगितले.


-----000-----



रंगच तो

 *रंगच तो..*


पसरला की

लाजलेला समजतो,


सांडला की

रागवयाला लावतो..


उडाला तर 

अपमान कळवतो,


फिकट झाला तर

खिन्नता पसरवतो..


आकाशी उडाला तर

आनंद पसरवतो,


विखुरला तर

नाराजी पसरवतो..


खुलला तर

हिरवाई पसरवतो,


उधळला तर

उन्मत्तत्ता पसरवतो..


रंगच तो...


माणसाचं आयुष्य रंगवतो,

सुख दुःखाच्या भावना खुलवतो..


म्हणून रंगावे आणि रंगवावे....


सगळ्या सुंदर रंगांनी तुमचं आमचं आयुष्य रंगुन जावो अशा रंगीत शुभेच्छा..


🌹 रंग पंचमीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा 🌹

Monday, 6 March 2023

महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅड्स “जन औषधी सुगम"ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती

 महिलांना मिळणार १ रुपयात सॅनिटरी पॅड्स

“जन औषधी सुगम"ॲपच्या माध्यमातून मिळेल औषधांची माहिती.

            प्रधान मंत्री भारतीय जन औषधी योजना (PMBJP) औषधे, रसायन आणि खते मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार सर्वांना परवडणाऱ्या किंमतीत दर्जेदार जेनेरिक औषधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आणि जेनेरिक औषधांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे देशभर उघडण्यात आली आहेत.


            आतापर्यंत देशभरात ९१७७ हून अधिक जन औषधी केंद्रे उघडली गेली आहेत, जी देशातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील ७४३ जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहेत. यावर्षी दिनांक डिसेंबर २०२३ पर्यंत या केंद्रांची संख्या १०,००० पर्यंत वाढविण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. जनऔषधी जेनेरिक औषधांच्या किमती खुल्या बाजारात उपलब्ध असलेल्या ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा ५० ते ९० टक्के कमी आहेत. त्यामुळे, ही योजना दररोज औषधे घेत असलेल्या लोकांसाठी खूप फायद्याची ठरत आहे. चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये आतापर्यंत प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रांद्वारे ११०० कोटी रुपयांची विक्री झाली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांसाठी सुमारे ६६०० कोटी रुपयांची बचत झाली आहे. मागील आठ वर्षांत जनऔषधी केंद्रांची संख्या जवळपास १०० पटीने वाढली आहे आणि त्याचप्रमाणे जनऔषधी औषधांच्या विक्रीतही १०० पटींनी वाढ झाली आहे आणि अंदाजे २०,००० कोटी रुपयांची बचत झाली आहे. (त्यानुसार मागील ८ वर्षात सुमारे २०००० कोटी रुपयांची बचत झाल्याचा अंदाज आहे.)


             महिलांच्या आरोग्य सुरक्षेची दखल घेऊन, भारत सरकारने जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड सर्व जन औषधी केंद्रांमध्ये माफक दरात उपलब्ध करून दिले आहेत.जन औषधी केंद्रांवर जन औषधी सुविधा सॅनिटरी पॅड्स रु.१/- प्रति पॅड या दरामध्ये उपलब्ध आहेत. जन औषधी केंद्र चालकांना शासनाकडून रु. ५.०० लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली जाते. महिला उद्योजक, दिव्यांग व्यक्ती, निवृत्त सैनिक, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या अर्जदारांना तसेच ईशान्येकडील राज्यांच्या डोंगराळ भागातील अर्जदारांना रु.२.०० लाखांची आर्थिक मदत दिली जाते.


             “जन औषधी सुगम" नावाचे मोबाईल ॲप्लिकेशन आता Google Play Store आणि Apple Store वर उपलब्ध आहे. त्याशिवाय या मोबाईल अप्लिकेशनच्या माध्यमातून आता तुम्हाला आवश्यक असलेल्या औषधांची माहिती कधीही - कुठेही मिळू शकणार आहे. औषधाची किंमत, उपलब्धता आणि तुमच्या जवळच्या जन औषधी केंद्राची माहिती इत्यादीबाबत या ॲपद्वारे माहिती मिळेल.

प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध

 प्रधानमंत्री जन औषधी केंद्रांवर औषधे माफक दरात उपलब्ध

            मुंबई, दि. 6 :- सर्वसामान्यांना माफक व स्वस्त दरामध्ये औषधे प्राप्त व्हावीत, यासाठी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना ही केंद्र शासनाची योजना राबविण्यात येत आहे. गरजूंनी माफक दरात औषध खरेदी करण्यासाठी या केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.


            या योजनेंतर्गत आत्तापर्यंत 9 हजार औषध दुकान सुरु करण्यात आले आहेत. या दुकानांमध्ये सर्व औषधे 50 ते 90 टक्के इतक्या स्वस्त दरात उपलब्ध आहेत. WHO-GMP प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या उत्पादकांकडून ही औषधे तयार करुन घेण्यात येतात. सन 2014 मध्ये संपूर्ण भारतात 80 जन औषधे केंद्र होते. डिसेंबर 2023 पर्यंत 10 हजारचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट आहे.


०००००

जय महाराष्ट्र' कार्यक्रमात विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत

 जय महाराष्ट्र' कार्यक्रमात

विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुलाखत


 


            मुंबई, दि. 6 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमात 'जागतिक महिला दिनानिमित्त' विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत बुधवार, दि. 8 मार्च 2023 रोजी सायं 7.30 वा. महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर पाहता येईल.


 


यू ट्यूब- https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR


फेसबुक- https://www.facebook.com/MahaDGIPR


ट्विटर – https://twitter.com/MahaDGIPR


 


            दरवर्षी जागतिक महिला दिन 8 मार्च रोजी सर्वत्र साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने महिला धोरण अधिक मजबूत होण्यासाठी घेतलेला पुढाकार, शासनाच्यावतीने आवश्यक ते धोरणात्मक निर्णय घेण्यासाठीचा पाठपुरावा डॉ. गोऱ्हे यांनी केलेला आहे. त्यासाठी राज्यातील महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून कसे संरक्षण देता येईल, यासाठी त्यांचे सर्व स्तरातून प्रयत्न सुरू आहेत.


            समाजात घडत असलेल्या विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर पालकांनी आपल्या पाल्याशी मुक्त संवाद करणे, समाजाने संयम व समजदारीची भूमिका घेणे, महिलांना आत्मनिर्भर होण्यासाठी बचत गटांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना अशा विविध विषयांवर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमाच्या माध्यमातून सविस्तर संवाद साधला आहे. वरिष्ठ सहायक संचालक मीनल जोगळेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.


0000

राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होणार महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रम

 राज्यातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार होणार

महिला दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे विविध कार्यक्रम


- पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा.

            मुंबई, दि. 6 : राज्याच्या पर्यटन विभाग आणि इंडियन ऑईल यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाचे औचित्य साधून राज्यातील सर्व क्षेत्रांतील महिलांच्या योगदानाचा गौरव ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ च्या माध्यमातून करण्याचे निश्चित केले आहे. या दिनानिमित्त गेट वे ऑफ इंडिया येथे महिलांसाठी विशेष शो आयोजित करण्यात येणार असून, यासाठी राज्यभरातील विविध क्षेत्रांतील महिलांचाही सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर कक्ष येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.


           पर्यटनमंत्री श्री.लोढा म्हणाले, स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त गेट वे ऑफ इंडियाच्या भिंतीवर देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासाची आठवण करून देणारा ‘मल्टीमिडीया लाइट ॲण्ड साऊंड शो’ दि.28 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात आला आहे. दि. 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. महिला दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे रात्री 8 वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व महिला अधिकारी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल. या कार्यक्रमाला राज्यातील विविध क्षेत्रांत कार्यरत असणाऱ्या महिलांना आमंत्रित करण्यात येणार आहे. तसेच महाराष्ट्रातील सर्व क्षेत्रात योगदान दिलेल्या महिलांची माहिती देणारा पाच ते दहा मिनिटांचा मल्टीमिडीया लाईट ॲण्ड साऊंड शो यावेळी होणार आहेत. तसेच महिला आणि बालविकास विभागामार्फत उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सत्कार होणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारांचे वितरण या दिवशी करण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जास्तीत जास्त महिलांनी तसेच या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांनी उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.


          मंत्री श्री.लोढा म्हणाले,मुंबई उपनगरमध्ये महिलांसाठी फिरते कौशल्य विकास केंद्र तसेच फिरते स्वच्छता गृह हा उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविला जात असून उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर इतर महानगरातही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.


         यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय,पर्यटन संचालक बी.एन.पाटील, महिला व बालविकास आयुक्त आर.विमला, इंडियन ऑइलचे कार्यकारी संचालक बी.एन.दास,पर्यटन विभागाच्या सहसचिव उज्जला दांडेकर यावेळी उपस्थित होत्या.


०००००

होळी व धुलीवंदनाचा सण सर्वांच्या जीवनातआनंद आणि आदरभाव घेऊन येवो

 होळी व धुलीवंदनाचा सण सर्वांच्या जीवनातआनंद आणि आदरभाव घेऊन येवो


- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

            मुंबई, दि. 6 :- “होळी व धुलीवंदनाचा सण सर्वांच्या जीवनात आनंद आणि आदरभाव घेऊन येवो. समाज आणि वैयक्तिक द्वेषभावना, वाईट विचारांचे होळीत दहन होऊन नष्ट होवोत. निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणपूरक होळी साजरी करूया,” अशा शुभेच्छा महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी होळी आणि धुलीवंदन निमित्ताने दिल्या आहेत.


            आपल्या संस्कृतीत सणांची फार मोठी परंपरा आहे. या सणासुदीच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती आणि समाज जोडला गेलेला आहे. तसेच आजपर्यंत राज्यातल्या गावागावात, देश-विदेशात साजरा होणाऱ्या होळी, धुलीवंदनाच्या सणाला प्राचीन संदर्भ, ऐतिहासिक महत्व आहे. सणाच्या निमित्ताने एक वेगळे वातावरण आपल्याकडे पाहायला मिळते. त्यामुळेच सर्वांना एकत्र आणणारा हा सण प्रत्येकाचा सन्मान, निसर्गाचा समतोल राखत साजरा केला पाहिजे. होळीसाठी वृक्षतोड न करणे, धुलीवंदनासाठी नैसर्गिक रंगाचा वापर करणे, रंग लावताना डोळ्यांना, शरीराला इजा होणार नाही याची काळजी घेणे, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत, सर्वांनी हा सण आनंदाने, उत्साहाने साजरा करावा, असे आवाहन राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.


००००

Featured post

Lakshvedhi