Saturday, 4 June 2022

शाळेला बुट्टी

 


 अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम प्रवेश धोरण निश्चितीसाठी समिती.

            मुंबई दि, 3: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत दहावीनंतर तांत्रिक पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी धोरण निश्चित करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून संचालक, तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली 7 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे.

समितीचे सदस्य सचिव म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, जि. रायगडचे कुलसचिव असतील. समितीत अन्य 5 सदस्य असतील.


समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे आहे:

(१) दहावीनंतर तांत्रिक पदविका अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यासाठी असलेल्या धोरणाचा आढावा घेऊन आवश्यक असल्यास सुधारीत धोरणाची शिफारस करेल.

(२) उद्योगांसाठी आवश्यक असणारे पदविकास्तरीय कुशल मनुष्यबळ, रोजगार वाढीचा दर, तंत्रनिकेतन मधील विद्यार्थ्याची उपलब्ध संख्या आणि अभियांत्रिकी महाविद्यालयातील रिक्त जागा यासाठी सदर समिती बृहत योजना तयार करेल.

(३) समिती अभियांत्रिकी शिक्षणासह तंत्रनिकेतन शिक्षण यामधून पदवी/पदविका प्राप्त करून बाहेर पडणाऱ्या कुशल मनुष्यबळाची उद्योगांना आवश्यक असणारी आवश्यकता यामधील ताळमेळ साधण्याबाबतची यंत्रणा कशी असावी, याचा आराखडा तयार करेल.

(४) यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून शासनास शिफारस करेल.

(५) डॉ. माशेलकर समितीच्या अहवालातील मुद्यांशी संबंधित शिफारशींचाही समिती विचार करून मार्गदर्शक सूचना निश्चित करेल.

समितीने अहवाल शासनास तीन महिन्यात सादर करावा, असे म्हटले आहे.

.......

अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद व फार्मसी कौंसिल ऑफ इंडियाच्या अखत्यारितील अभ्यासक्रम प्रवेश नियमावलीत सुधारणा.

            मुंबई दि, 3: आखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या अखत्यारित असलेल्या संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एस.एस.सी. पदविका अभियांत्रिकी, थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी. पदविका हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी तसेच फार्मसी कौंसिल ऑफ इंडिया, नवी दिल्ली यांच्या अखत्यारित संस्थेतील प्रथम वर्ष पोस्ट एच.एस.सी पदविका औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेश नियमावलीमध्ये सुधारणा करण्यात आल्या आहेत. त्याबाबतचा उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. 


000


 शिक्षकांच्या शैक्षणिक कालावधीतील कार्य मूल्यमापनासाठी समिती.

            मुंबई दि, 3: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत शिक्षकांच्या शैक्षणिक कालावधीतील कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने 8 सदस्यीय समिती स्थापन केली आहे. त्याबाबतचा शासन आदेश निर्गमित करण्यात आला आहे. तंत्र शिक्षण संचालनालय, मुंबई यांचे संचालक डॉ. अभय वाघ या समितीचे अध्यक्ष आहेत.

            समितीचे सदस्य सचिव म्हणून शासकीय तंत्रनिकेतन, पुण्याचे प्राचार्य डॉ. विठ्ठल बांदल आहेत. समितीत अन्य 6 सदस्य आहेत.

समितीची कार्यकक्षा पुढीलप्रमाणे आहे:

(१) समिती शिक्षकाच्या वार्षिक कार्यमूल्यमापनाबाबत विद्यापीठ अनुदान आयोग, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यासारख्या शिखर संस्थांच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या अधिसूचनांचा अभ्यास करून मार्गदर्शक सूचना तयार करेल.

(२) शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने कार्यमूल्यमापनाकरिता कोणकोणत्या बाबींचा समावेश असावा याबाबत शिफारशी करेल.

(३) नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाची भूमिका व कार्याचा आढावा घेऊन हा कक्ष अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने उपाययोजना सुचवेल.

(४) यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोगाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचा विचार करून शासनास शिफारस करेल.

(५) डॉ. माशेलकर समितीच्या अहवालातील मुद्यांशी संबंधित शिफारशींचाही समिती विचार करून मार्गदर्शक सूचना निश्चित करेल.

समितीने आपला अहवाल शासनास तीन महिन्यांत सादर करावयाचा आहे.



 स्वयं सहाय्यता गटातील महिलांच्या मुलांकरिता मोफत ई- लर्निग ॲप.

            मुंबई, दि. 3 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि स्माईल्स फाऊंडेशन यांच्यातील सामंजस्य करारातून राज्यातील लाखो स्वयं सहाय्यता गटाच्या महिलांच्या शालेय शिक्षण घेत असलेल्या मुला-मुलींना बायजूज या कंपनीचे प्रीमियम दर्जाचे ई-लर्निग ॲप मोफत दिले जाणार आहे, अशी माहिती ग्राम विकास व पंचायती राज विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांनी दिली.


            राज्याच्या ग्रामीण भागातील सामान्य आर्थिक परिस्थिती असणाऱ्या महिलांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणे हे महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियानाचे ध्येय आहे. यासाठी त्यांच्या उत्पन्न वाढीसोबतच त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांचे जीवनमान उंचावणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी स्माईल्स फाऊंडेशनने मदतीचा हात पुढे केला आहे, असे श्री.राजेश कुमार यांनी सांगुन विभागाच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले.


            अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी यावेळी या करारातून ग्रामीण क्षेत्रातील महिलांच्या 4 थी ते 12 वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व शाखांच्या विद्यार्थ्यांना हे ॲप मिळणार आहे. तसेच या ॲप मुळे विद्यार्थ्यांची अभ्यासातील रुची वाढेल आणि गुणवत्ता वाढीस मदत होईल, असे सांगितले.


            स्माईल्स फाऊंडेशनच्या अध्यक्ष उमा आहुजा आणि धीरज आहुजा यांना अपर मुख्य सचिव यांचे हस्ते सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. फाऊंडेशनच्या वतीने धीरज आहुजा यांनी राज्यभर ग्रामीण महिलांसाठी कार्य करणार असल्याचे सांगितले. ग्रामीण विद्यार्थ्यांना या प्रकारची सुविधा उपलब्ध करून देत असल्याबद्दल स्माईल्स फाऊंडेशनच्या सर्व सदस्यांना अभिमान आहे, भविष्यातही उमेद अभियानाच्या उपक्रमांमध्ये आमचा सक्रिय सहभाग असेल, असे सांगितले.


 



 बुलडाण्यातील उंद्री गावाचे नाव आता उदयनगर

            मुंबई, दि. 3 : बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातील मौजे उंद्री गावाचे नामकरण आता मौजे उदयनगर असे करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात याबाबत दि. 31 मे 2022 रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात करण्यात आली आहे. या बद्दलची नोंद सर्व संबंधितांनी आपल्या राज्य शासकीय अभिलेखांमध्ये घ्यावी, असे अधिसूचनेत म्हटले आहे.



 वरळी नायगाव येथील बीडीडी चाळींचे नामकरण.

            मुंबई, दि. 3 : वरळी, ना.म. जोशी मार्ग व नायगाव येथील बी.डी.डी. चाळींच्या पुनर्वसन प्रकल्पाची कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. आता चाळींचे नामकरण करण्यात आले आहे. यापुढे बी.डी.डी चाळ वरळी ला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नगर, बी.डी.डी. चाळ ना. म. जोशी मार्गसाठी स्वर्गीय राजीव गांधी नगर आणि बीडीडी चाळ, नायगांवला श्री. शरद पवार नगर असे संबोधण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय नुकताच जाहिर करण्यात आला आहे.

            सन 1921-1925 च्या दरम्यान तत्कालीन मुंबई विकास विभागाने (Bombay Development Department) या चाळी बांधलेल्या असल्याने , त्या बी.डी.डी. चाळी म्हणून ओळखल्या जातात. या चाळींचा पुनर्विकास होत असल्याने या चाळींचे नामकरण करण्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी सन 2022 च्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत जाहीर केले होते. त्यानुसार हे नामकरण करण्यात आले आहे.


            तत्कालीन मुंबई विकास विभागाने (बी.डी.डी.) सन 1921-1925 च्या दरम्यान मुंबईतील वरळी, ना.म.जोशी मार्ग, नायगांव व शिवडी येथे एकूण 207 चाळी बांधलेल्या आहेत. प्रत्येक चाळ ही तळ + ३ मजल्यांची असून, त्यात प्रत्येकी 80 प्रमाणे रहिवाशी गाळे आहेत. तसेच या बी.डी.डी. चाळींच्या परिसरात झोपडपट्टीसदृश्य बांधकामे स्टॉल्स, दुकाने, सामाजिक / शैक्षणिक संस्था देखील आहेत. सदर बी. डी. डी. चाळी जवळपास 96 वर्षांपेक्षा जास्त जुन्या झालेल्या असल्याने, त्यांचा पुनर्विकास करण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.

०००


 



 

 नाहक त्रास देण्याच्या हेतूने देण्यात येणाऱ्या भेटीस आळा

घालण्यासाठी वैधमापन शास्त्र विभागाचे आवाहन

              मुंबई, दि.3 : विभागीय सह नियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याबाबतची माहिती नियंत्रक कार्यालयास व उपनियंत्रक यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वी त्याबाबतची माहिती सह नियंत्रक कार्यालयास देणे आवश्यक असल्याचे निर्देश नियंत्रक, वैध मापन शास्त्र डॅा. रविंद्र कुमार सिंगल यांनी दिले आहेत.

          विभागीय सह नियंत्रक व उपनियंत्रक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील आस्थापनांना भेटीस जाण्यापूर्वीचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे शासन परिपत्रक क्र. वैमाशा-2019/465/प्र.क्र.143/ग्रासं-३, दि. 26/11/2019 अन्वये देण्यात आलेले आहेत तसेच याबाबत वेळोवेळी नियंत्रक कार्यालयाकडूनही याबाबतचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तरीसुद्धा काही अधिकारी आस्थापनांना भेटी देऊन नाहक त्रास देत असल्याचे निदर्शनास आले आहे. तरी अशा काही तक्रारी असल्यास व्यापारी व आस्थापनांना त्यांबाबत खातरजमा करता येणार आहे, असे परिपत्रक प्रसिध्दीस दिले आहे.

             नाहक त्रास देण्याच्या हेतूने देण्यात येणाऱ्या भेटीस आळा घालण्यासाठी यंत्रणेतील सह नियंत्रक यांनी भेटीबाबत मुख्यालयास आगाऊ माहीती दिली असल्याबाबतची खातरजमा संबधित व्यापारी/आस्थापनांना 022- 22621968 या क्रमांकावर करता येईल. तसेच उपनियंत्रक यांच्या भेटीबाबत खालील विभागीय कार्यालयांच्या संपर्क क्रमांकावर खातरजमा करता येईल. अशी नियंत्रक कार्यालयाकडून व्यापारी आस्थापनांना सांगण्यात आले आहे. मुंबई महानगर विभाग- बृहनमुंबई- 022-24148494 कोकण विभाग- 022-27574074 ( ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधूदूर्ग जिल्हा),पूणे विभाग- 020- 26697232 (पुणे,सातारा, कोल्हापूर,सांगली व सोलापूर जिल्हा) नाशिक विभाग- 0253- 2455696 ( नाशिक, अहमदनगर, धूळे, नंदूरबार, जळगांव) औरंगाबाद विभाग- 0240-2952656 (औरंगाबाद, बीड, जालना, लातूर, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड),अमरावती विभाग - 0721-2990038 (अमरावती, यवतमाळ, बुलढ़ाणा, अकोला, वाशिम),नागपूर विभाग- 0712- 2540292,( नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया) अशी माहिती नियंत्रक, वैध मापन शास्त्र विभागाकडून एका पत्रकाद्वारे प्रसिद्धीस देण्यात आली आहे. 


                                                       




 



Featured post

Lakshvedhi