Tuesday, 27 July 2021

 महाराष्ट्रात लसीचे दोन्ही डोस

घेतलेल्यांची संख्या एक कोटींवर

           

            मुंबईदि. 26 : कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन त्यांना संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून संपूर्ण देशात एक कोटीहून अधिक नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देण्याचा विक्रम महाराष्ट्राने आज स्वत:च्या नावावर नोंदविला.

            दोन्ही डोस देऊन एक कोटीहून अधिक नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण करण्याकामी आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कौतुक केले आहे. 

            सायंकाळी चार वाजेपर्यंत राज्यात दिवसभरात सुमारे पावणेचार लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून दोन्ही डोस देण्यात आलेल्या नागरिकांची संख्या एक कोटी 64 हजार 308 एवढी झाली आहे.

            लसीकरणामध्ये नवनवीन विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविले जात आहे. आतापर्यंत राज्यातील तीन कोटी 16 लाख 9 हजार 227 नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे तर आज सुरु असलेल्या लसीकरणामुळे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या संख्येचा एक कोटीचा टप्पा पार झालाअसे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ.प्रदीप व्यास यांनी सांगितले.

            राज्यात आज सुमारे 4100 लसीकरण केंद्र सुरु असून त्याद्वारे सायंकाळी 4 वाजेपर्यंत तीन लाख 75 हजार 974 नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी उशीरापर्यंत या संख्येत वाढ होऊ शकतेअसे डॉ.व्यास यांनी सांगितले.

 मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती रोखण्यासाठीच्या उपायांचा

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

 

            मुंबईदि. 26 : महाराष्ट्र सध्या विविध आपत्तींचा सामना करीत आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे आणि दरड कोसळल्याने आपत्ती ओढवली आहे. ज्या ठिकाणी संरक्षक भिंती असूनही नुकसान झालेअशा आणि इतर धोकादायक ठिकाणी आयआयटीच्या तज्ज्ञांच्या मदतीने अभ्यास करून सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध पर्याय सादर करावेतअशा सूचना पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केल्या.

            मुंबई उपनगर जिल्ह्यातील धोकादायक ठिकाणांचा श्री.ठाकरे यांनी वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकरनिवासी उपजिल्हाधिकारी विकास नाईकसबंधित विभागातील महानगरपालिकेचे सहायक आयुक्त आदी उपस्थित होते.

            पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी पावसामुळे आपत्ती ओढवलेल्या मुंबई उपनगरातील ठिकाणांची मागील आठवड्यात प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर आयोजित बैठकीत त्यांनी या जागा अतिशय धोकादायक असल्याने जेथे मागणी आणि आवश्यकता आहे तेथे तातडीने संरक्षक भिंत बांधण्याची सूचना केली. तसेच जेथे संरक्षक भिंतींचा उपयोग होणार नाही अशा ठिकाणी तज्ज्ञांमार्फत इतर पर्यायांचा अभ्यास करावाअसे सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह महानगरपालिकाएमएमआरडीएवन विभागम्हाडा आदी विभागांनी समन्वयाने काम करावे आणि वस्त्या असलेल्या ठिकाणांना प्राधान्य द्यावेअशी सूचनाही त्यांनी केली.

            यावेळी जिल्हाधिकारी श्री बोरीकर आणि महापालिकेच्या सहायक आयुक्तांनी धोकादायक असलेल्या जागा आणि तेथे सुरू असलेल्या कामांबद्दल माहिती दिली.

 

 

महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून

बाल न्याय निधीला दोन लाख रुपयांची देणगी

 

            मुंबईदि. 26 बालकांसाठी स्थापित बाल न्याय निधीसाठी मंत्रालयातील महिला व बालविकास विभागाच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने वर्गणी करुन जमा केलेल्या लाख हजार 500 रुपये रकमेचा धनादेश प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांच्या हस्ते महिला व बालविकास आयुक्त राहुल मोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

            बाल न्याय अधिनियम, 2015 च्या कलम 105 अन्वये, राज्य शासन बाल न्याय अधिनियमांतर्गत बालकांचे कल्याण व पुनर्वसनाकरिता निधी निर्माण करण्याबाबत तरतूद आहे. तसेच महाराष्ट्र राज्य बाल न्याय नियम, 2018 मधील नियम 85 अन्वये राज्य शासन बाल न्याय निधीनावाचा निधी निर्माण करील अशी तरतूद आहे. त्यानुसार जून 2018 मधील शासन निर्णयानुसार बाल न्याय निधी स्थापित करण्यात आला आहे.

 

व्यक्तिगत देणगीदारसंस्थाकंपन्यांनी देणगीद्वारे योगदान द्यावे

प्रधान सचिव श्रीमती आय. ए. कुंदन यांचे आवाहन

            बाल न्याय निधीमध्ये व्यक्तिगत तसेच संस्थांकडूनही ऐच्छिक देणग्याकंपन्यांचे सामाजिक उत्तरदायित्त्व (सीएसआर) निधी मधूनही देणग्या स्वीकारण्याची तरतूद असून बालकांचे कल्याण आणि पुनर्वसनाचा दृष्टीकोन लक्षात घेता सामाजिक उत्तरदायित्व म्हणून अधिकाधिक व्यक्तिगत देणगीदारसंस्थाकंपन्या यांनी या उदात्त कामात आपले योगदान द्यावेअसे आवाहन श्रीमती कुंदन यांनी यावेळी केले.

मुलांचे कल्याण व पुनर्वसनासाठी आणि केंद्र शासनाच्याराज्य शासनाच्या किंवा इतर कोणत्याही योजनेत समाविष्ट नाहीत अशा कार्यक्रमांची अंमलबजावणी करणेअनाथ, निराधार, परित्यागीत अशा बालकांच्या मोठ्या आजारांवरील शस्त्रक्रिया किंवा वैद्यकीय सहाय्यासाठी तरतूदउद्योजकता विषयक सहाय्यकौशल्य विकास प्रशिक्षण किंवा व्यवसाय प्रशिक्षण यासाठी तरतूदबाल न्याय अधिनियमान्वये समावेश असलेल्या मुलांकरिता विशेष व्यावसायिक सेवासमुपदेशकअनुवादकदुभाषीविशेष शिक्षकसमाजसेवकमानसिक आरोग्य सेवकव्यवसाय शिक्षण प्रशिक्षक यांची तरतूद करणे. या मुलांची सर्वंकष वाढविकास व कल्याणाकरीता सहाय्यभूत होण्यासाठी कोणताही इतर कार्यक्रम किंवा उपक्रमबालकांसाठी कार्यरत संस्थांतील मुलांच्या कल्याणासाठी असलेल्या नाविन्यपूर्ण कार्यक्रमांना सहाय्य करणे आदींसाठी या बाल न्याय निधीतून तरतूद करण्यात येते.

 

बाल न्याय निधी (जेजे फंड) खात्याचे परिचालन कर्ते :

DY-COMMI. (CHILD DEVELOP) AND MEM SECY & TRY MS CHILD FUND

Account No. 11099464354

State Bank of India- Pune Main Branch

Collector Office Compound, Pune

Branch Code: 454

IFSC-SBIN0000454

MICR:411002002

 

उपायुक्त (बाल विकास) तथा सदस्य सचिव नि कोषाध्यक्षराज्य बाल न्याय निधी

बँकेचे बचत खाते क्र. 11099464354

भारतीय स्टेट बँकपुणे मुख्य शाखा,

जिल्हाधिकारी कार्यालय आवारपुणे

शाखा कोड- 454

आयएफएससी कोड- SBIN0000454

मायकर कोड (एमआयसीआर):411002002


 सीएसआर निधी तसेच बिगर शासकीय संस्थांच्या समन्वयाने

लसीकरण अधिक गतिमान करावे

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

           

            मुंबईदि. 26 : महानगरपालिका क्षेत्रात कोविड-१९ वरील लसीकरणाचे काम उत्तम रितीने सुरू आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसींची उपलब्धता वाढविण्याचा प्रयत्न करून लसीकरण गतिमान करावेअशी सूचना पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केली.

            पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी लसीकरणासह शहरातील विविध कामांचा आढावा घेतला. यावेळी महानगरपालिका आयुक्त इक्बालसिंह चहलअतिरिक्त महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडेपी.वेलरासूसुरेश काकाणीडॉ.संजीव कुमारसहआयुक्त श्री. चंद्रशेखर चोरेउपायुक्त राजन तळकरअजय राठोर आदी उपस्थित होते.

            प्रारंभी पालकमंत्री श्री.ठाकरे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाचा आढावा घेतला. त्याबद्दलची सविस्तर माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सादर केली. श्री. ठाकरे म्हणाले कीबिगर शासकीय संस्थांमार्फत तसेच कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीतून लस साठा उपलब्ध करण्याचा प्रयत्न करावाज्यांना लसीचा दुसरा डोस घ्यावयाचा आहे मात्र त्यांनी घेतलेला नाही अशा व्यक्तींसाठी जनजागृती मोहीम राबवावीतसेच दोन डोस घेतले असले तरी संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये जे जोखीमग्रस्त असू शकतातअशा नागरिकांसाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यातअसे निर्देश पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी दिले.

            पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी शहरातील रस्त्यांवरील खड्डयांबाबतही आढावा घेतला. तसेच खड्डे बुजवण्याबाबत विविध उपाययोजनांवर चर्चा केली. नागरिकांकडून त्यांच्या भागातील खड्ड्यांबाबत आलेल्या तक्रारीची तातडीने दखल घेऊन ते बुजवण्यात यावेत असेही त्यांनी सांगितले. बैठकीदरम्यान शहरात पूर परिस्थिती हाताळण्यासाठी अमलात आणलेल्या उपायोजनांचाही त्यांनी आढावा घेतला.

00000

 पूरग्रस्त भागातील वीजपाणी पुरवठारस्ते दुरूस्ती तातडीने करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छताआरोग्य सुविधा द्या

पूरसंरक्षक भिंतीइशारा यंत्रणादरडग्रस्त वस्त्यांचे पुनर्वसन यासाठी कार्यवाही करा

राज्यातील पूरामुळे झालेल्या नुकसानीचा घेतला आढावा

           

            मुंबईदि. 26 : -  पूरग्रस्त भागातील वीज आणि पाणी पुरवठा तातडीने सुरु करण्यात यावा. तसेच अनेक ठिकाणी रस्ते खचले असूनपूल पाण्याखाली गेले आहेत. तेथील वाहतूक तातडीने सुरु होईलयासाठी दुरुस्तीची कामे हाती घ्या. पूरग्रस्त भागात रोगराई पसरू नये यासाठी स्वच्छतेच्या आणि आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही कराअसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.

            अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थिती आणि नुकसानीबाबत मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी आढावा घेतला. बैठकीस उद्योग मंत्री सुभाष देसाईराज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटेमुख्यमंत्री कार्यालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंहपाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय चहांदेआरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ड़ॉ. प्रदीप व्यासऊर्जा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दिनेश वाघमारेमहावितरणचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघलमुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगेवित्त विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्तामदत व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीमकुमार गुप्तानगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. महेश पाठकपशु संवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ताग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमारम्हाडाचे उपाध्यक्ष तथा गृह निर्माण विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकरजलसंपदा विभागाचे विशेष कार्य अधिकारी विजय गौतमसार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव श्री.देबडवारअन्न व औषध प्रशासन आय़ुक्त परिमल सिंह उपस्थित होते.

            पूरग्रस्त भागातील रस्तेपाणी पुरवठा योजनावीज पुरवठा यांच्या अनुषंगाने बैठकीत तपशीलवार आढावा घेण्यात आला.

नुकसान भरपाईमदतीचे प्रस्ताव तयार करा

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीनुकसानीबाबतची आकडेवारी आणि करावयाच्या मदतीबाबत तपशीलवार वस्तुनिष्ठ अहवाल तयार कराजेणेकरून आपदग्रस्तांना वेळेत आणि तातडीने मदत पोहचविता येईल. पूराचा फटका बसलेल्या सर्वच व्यापारीव्यावसायिकांची माहिती एकत्र करात्यांना राज्य आणि केंद्राच्या कोण-कोणत्या योजनांमधून सवलत देता येईलमदत करता येईल त्याबाबतचे प्रस्ताव तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. तात्काळ मदत देऊचपुन्हा पुन्हा ही आपत्ती येऊ नये. त्यातून बचाव करता येईल यासाठी पूरसंरक्षक भिंतीधोकादायक वस्त्यां याबाबत जिल्हानिहाय प्रस्ताव तयार करा. डोंगराळ भागातील खचणारे रस्तेपायाभूत सुविधांबाबतही एक सर्वंकष आराखडा तयार कराअसेही त्यांनी सांगितले. पंचनामे करण्यासाठी ड्रोन तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा. तसेच हे पंचनामे वेळेत पूर्ण करावेतअसेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोकणात पूराचा इशारा देणारी यंत्रणा तीन महिन्यात

            कोकणामधे एकंदर २६ नद्यांची खोरे असूनयाठिकाणी पुराबाबत इशारा देणारी आरटीडीएस’ यंत्रणा लवकरात लवकर कार्यान्वीत कराअसे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. त्यानुसार जलसंपदा विभागाकडून पहिल्या टप्प्यात सात नद्यांवर येत्या तीन महिन्यात अशी यंत्रणा कार्यान्वीत करण्यात येणार आहे.

एसडीआरएफचे बळकटीकरण करणार

            एनडीआरएफच्या धर्तीवर राज्यात प्रत्येक जिल्ह्यात एसडीआरएफचे केंद्र असावे. तसेच त्याठिकाणी जवांनांना मदत व बचावाचे प्रशिक्षण द्यावे यासाठी तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागाला दिले.

दरडग्रस्त गावांचे पूनर्वसन

            महाड येथील तळीये गावांचे पुनर्वसन करण्यासाठी योग्य जागा निश्चित करा. तेथील सोयी-सुविधांसाठी नियोजन कराउद्योजकांची देखील मदत घ्या. गावकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी अडचण येणार नाही असे बघातसेच त्यांच्या घरांचा आराखडा लगेच तयार करून कार्यवाही करा. अशा प्रकारे डोंगरउतारांवरील वाड्या आणि वस्त्या ग्रामीण भागात तसेच शहरी भागात देखील आहेत. धोकादायक स्थितीतील या वाड्या-वस्त्यांचे कशापद्धतीने पुनर्वसन करता येईलयावर निश्चित असा आऱाखडा तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

रस्त्यांची दुरूस्ती युद्धपातळीवर

            सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार यांनी माहिती दिली कीमहाबळेश्वरपोलादपूर आणि पन्हाळा याठिकाणचे रस्ते अर्धे खचले आहेत. त्याठिकाणी पाईप्स टाकून एकमार्गी वाहतूक सुरु करण्यात येत आहे. एकूण २९० रस्ते दुरूस्त करण्याची गरज असून४६९ रस्त्यांवरची वाहतूक बंद आहे. ८०० पूल आणि मोऱ्या पाण्याखाली गेल्या आहेत. प्रत्येक विभागात एक-एक अतिरिक्त मुख्य अभियंता दर्जाचा अधिकारी नियुक्त केला आहे. तो प्रत्यक्ष सर्वेक्षण करत आहे.

वीज पुरवठा सुरळीत

            ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले कीबारामती- सातारा  आणि पेण अशा दोन उपकेंद्रांचे नुकसान झाले आहे. १४ हजार ७३७ ट्रान्सफॉर्मर्स नादुरूस्त झाले होतेत्यापैकी ९ हजार ५०० दुरूस्त झाले आहेत. नादूरुस्त ६७ उपकेंद्रांपैकी ४४ परत सुरू करण्यात आले आहेत. एकंदर ९ लाख ५९ हजार बाधित ग्राहकांपैकी साडे सहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. महाडमध्ये दोन मोठे वीज मनोरे तातडीने दुरूस्त करणे सुरु आहे.

पाणी पुरवठा योजनांची तातडीने दुरुस्ती

            पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी सांगितले कीरत्नागिरीचिपळूणखेडपोलादपूर याठिकाणी पाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले असूनरत्नागिरीत १७ गावांना तसेच सिंधुदुर्गात २० गावांत पाणी पुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या ठिकाणी टँकर्सद्वारे पाणी पुरविण्यात येत आहे. पूरग्रस्त ७४६ गावांमध्ये पाणी पुरवठा योजनांचे नुकसान झाले आहे.

साथ रोग पसरू नये म्हणून काळजी

            आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले कीपूरग्रस्त ४९६ गावांमध्ये ४५९ वैद्यकीय पथके प्रत्यक्ष घरोघर भेटी देत आहेत. कोल्हापूर जिल्हयात २९३ तर रत्नागिरी जिल्ह्यात ६ मदत छावण्या उघडण्यात आल्या आहेत. ही पथके पाणी शुद्धीकरणासाठी क्लोरीनच्या गोळ्यांचे वाटपकिटकनाशक औषधांची फवारणी करत आहेत. याशिवाय सर्पदंशावरील लशीची पुरेशी उपलब्धता आहे. गरोदर माता आणि लहान मुलांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. लेप्टास्पायरोसीस टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक औषधे देणे सुरु केले आहे. याशिवाय गंभीर रुग्णांना पुरेश्या रुग्णवाहिकांची सोय करण्यात आली आहे.

 टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी बॅडमिंटनपटू चिराग शेट्टी च्या कुटुंबियांचा

पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार

 

            मुंबईदि. 26 : टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक 2020 मध्ये सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील दहा खेळाडूंपैकी चिराग शेट्टी हा मुंबई उपनगर जिल्ह्यातील बॅडमिंटनपटू (पुरूष दुहेरी) आहे. त्यांचे मनोधैर्य उंचावण्याच्या उद्देशाने चिराग यांचे वडील चंद्रशेखर शेट्टीकाका चंद्रेश आणि भाऊ शशांक या कुटुंबियांचा जिल्ह्यातील क्रीडा प्रेमींच्या वतीने पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकरनिवासी उप जिल्हाधिकारी विकास नाईकजिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के आदी उपस्थित होते. यावेळी ऑलिम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या सेल्फी पॉइंटचे श्री ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

            चिराग शेट्टी यांनी आतापर्यंत विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्राविण्य संपादन केले असून ते केंद्र सरकारच्या अर्जुन पुरस्काराचे मानकरी आहेत.

0000


 महाराष्ट्राच्या पूरग्रस्त भागातील व्यापाऱ्यांचे हजारो कोटींचे नुकसान : ललित गांधी*

-----------------------------
*सरकारने तातडीने बिनव्याजी कर्ज व नुकसान भरपाई द्यावी*
------------------------------
महाराष्ट्रात कोकण व पश्चिम महाराष्ट्र विभागात आलेल्या प्रलयंकारी महापुरा मध्ये हजारो कुटुंबांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर हजारो व्यापाऱ्यांचे सर्वस्व नष्ट झाले आहे. अशा व्यापाऱ्यांना सरकारने तात्काळ नुकसानभरपाई देऊन, पुन्हा व्यापार सुरू करण्यासाठी बिनव्याजी कर्ज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री  (वेसमॅक्) चे अध्यक्ष ललित गांधी यांनी केली आहे. 2019 नंतर अवघ्या दोनच वर्षात पुन्हा एकदा महापुरा चा सामना करावा लागला आहे.
या दरम्यान कोरोना  महामारीच्या संकटामुळे व्यापारी कोलमडून पडला आहे. व्यापाऱ्यांची आर्थिक घडी आधीच विस्कटलेली आहे. त्यात या महापुरामुळे  व्यापाऱ्यांचे सर्वस्व संपुष्टात आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक  भागात व्यापारी पुराच्या संकटात सापडला आहे. सांगली मधील नुकसान अवर्णनीय आहे. अशाच पद्धतीने महाड, चीपळून, बांदा अशा कोकणातील अनेक बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांचे सर्वस्व महापुरात वाहून  गेले आहे.
*समाजातील सर्वच घटक महापुराच्या संकटात सापडले आहेत. अशा घटकांना अन्य सुस्थितीतील व्यापारी व उद्योजक मोठ्या प्रमाणात मदत कार्य करीत आहेत. पुराच्या कालखंडात अन्नधान्य व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा याला प्राधान्य  देण्यात येत आहे.*
मात्र व्यापाऱ्यांचे नुकसान प्रचंड आहे. चेंबर तर्फे करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये या सहा जिल्ह्यातील सुमारे आठ हजार व्यापाऱ्यांचे सर्वस्व वाहून गेले असून आरंभिक नुकसानीचा आकडा सतराशे कोटी रूपये असल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली . या बाधित व्यापाऱ्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे. अनेक भागात विमा कंपन्यांकडून क्लेम देण्यामध्ये यापूर्वी अडचणी आल्या होत्या. तशा अडचणी पुन्हा येऊ नयेत यासाठी सरकारने विमा कंपन्या व व्यापार यांना कर्ज देणाऱ्या बँकांना स्पष्ट निर्देश देण्याची गरज आहे असेही ललित गांधी यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज चे पदाधिकारी लवकरच पूरग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. सर्वसामान्य नागरिक व व्यापारी उद्योजक यांच्या नुकसानीची माहिती घेऊन समाजाच्या स्तरावर होऊ शकणारी मदत, तसेच सरकारकडून नुकसानभरपाई व मदत मिळण्यासाठी चेंबर तर्फे पाठपुरावा करणार असल्याची माहिती वेसमॅक चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

Featured post

Lakshvedhi