*शाळांमध्ये लैंगिक शिक्षण काळाची गरज*
भारतासारख्या उष्ण कटिबंधात मुले-मुली पौगंडावस्था (वयात येण्याचे) वय हळूहळू कमी होत चालले आहे. वयाच्या दहाव्या वर्षी मुलीला मासिक पाळी सुरू झाल्याची उदाहरणे समोर येत आहेत. या वयात मुलीचे शरीर तयार होत असले तरी तिचे मन एका बालिकेचेच असते. तिला तिच्यात होणाऱ्या बदलांची योग्य ती जाणीव करून देणे आवश्यक आहे.
२ आता शालेय वयापासून मुलं-मुली हे स्मार्टफोन, इंटरनेट वापरतात. विशेषतः इंटरनेटवर अक्षरशः लाखोंच्या संख्येने उपलब्ध असणारी पोर्नोग्राफिक संकेतस्थळे आणि त्यातून दाखवली जाणारी लैंगिक विकृती, भारतात अगदी सहजासहजी उपलब्ध असणारे लैंगिक साहित्य आणि पोर्नोग्राफिक फिल्म्स यांच्या नकारात्मक परिणाम मुलांवर होऊ नये म्हणून त्यांना निकोप कामजीवनाची ओळख, स्वत:च्या शरीराची ओळख शाळेतच करून दिली पाहिजे. तसेच समाजात बलात्कार, लैंगिक आत्याचाराच्या घटना, घडतात. यामागे अनेक कारणं आहेत, पण एक महत्त्वाचं कारणं, ते म्हणजे ‘लैंगिक शिक्षणा’चा अभाव !
मुलांना शाळेत पचनसंस्था, मज्जासंस्था वगैरेंसोबत मानवी प्रजननासाठी उपयुक्त ठरणारे अवयव, कार्य इत्यादींवरही एखाद प्रकरण असते . शाळेमध्ये ह्या धड्यातील काही भाग शिक्षक शिकवतात. परंतु, पचनसंस्था वा मज्जासंस्थेवरील धडा जेवढा खोलात जाऊन शिकवला जातो, तेवढाच प्रजनन संस्थेची माहिती देणारा धडा वरवर शिकवला जातो. मुले-मुली एकत्र असलेल्या शाळांत शिक्षक/शिक्षिकांना अत्यंत अवघडल्यासारखे वाटल्यामुळे अनेकदा हा धडा न शिकविण्याकडेच कल दिसून येतो. तसेच ह्या धड्यावर एकही प्रश्न परीक्षेत विचारला जात नाही. हा विषय वगळून इतर धड्यांवर भर देणे सहज शक्य होते. मात्र हा स्वतंत्र विषय म्हणून अभ्यासक्रमामध्ये घेतला तर तो वगळणे शक्य होणार नाही आणि खात्रीपूर्वक शिकवला जाईल.
7 वीपासून तरी मुलांना लैंगिक शिक्षण आवश्यक आहे.शरीरात अचानक होणारे बदल आणि शारीरिक आकर्षण या वयापासूनच वाढतं, त्यामुळे त्यांच्यात होणारे बदल त्यांना स्वीकारणं अवघड जाणार नाही, बऱ्याच वेळा याबाबतीत पुरेशी माहिती नसल्यामुळे मुलं-मुली केवळ शारीरिक आकर्षणाचे बळी ठरतात आणि त्यांच्यात लहान वयातच लैंगिक संबंध निर्माण होतात. असे शरीरसंबंध ठेवण्याचं योग्य वय कोणतं हे मुलांना लहान वयातच बिंबवलं तर आज निर्माण होणारे अनेक लैंगिक प्रश्न सुटतील.
अनेक वेळा कुटुंबात मुलांशी आमचा लैंगिक विषयावर संवाद होत नाही. पालक म्हणून अनेकवेळा या विषयावर मुलांशी कशा प्रकारे संवाद साधायचा यावर पालकांना मर्यादा येतात. लैंगिक शिक्षण हे शाळेंमध्ये दिले गेले तर पालकांना त्या शालेय अभ्यासाच्या निमित्ताने मुलांशी संवाद साधने सोप्पे होईल. त्यामुळे शाळेमध्ये एखादा तास न घेता स्वतंत्र्य पुस्तक आणि अभ्यासक्रम असावा. या अभ्यासामुळे येणारी पिढी ही लैंगिक साक्षर असेल , ही आत्ताच्या काळाची गरज आहे.
No comments:
Post a Comment