हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या आकांक्षा पूर्ण करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
---
271 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन
· हिंगोलीतील वैद्यकीय महाविद्यालयास भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव
· औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव स्थळाच्या विकासासाठी निधी
हिंगोली दि. 29 : सामर्थ्यशील भारतासोबत सामर्थ्यशील महाराष्ट्र घडवताना हिंगोली जिल्ह्याच्या विकासाच्या सर्व आशा-आकांक्षा निश्चितपणे पूर्ण करू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते हिंगोलीतील विविध विकासकामांच्या उद्घाटन तसेच भूमिपूजन प्रसंगी बोलत होते. हिंगोली येथील वैद्यकीय महाविद्यालयास हिंगोलीचे सुपुत्र भारतरत्न नानाजी देशमुख यांचे नाव देताना हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हिंगोलीतील 271 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, संजय केनेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव तसेच औंढा नागनाथ तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वसमत येथील मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रास 100 कोटी रुपयांचा निधी दिला असून येथील तंत्रज्ञान विकासासाठी निधीसह सर्वप्रकारचे सहकार्य करू.
हिंगोली जिल्ह्यातील गोरेगाव तालुका निर्मितीचा निर्णय राज्यातील एकत्रित स्वरुपात होणाऱ्या तालुका निर्मितीच्यावेळी घेतला जाईल. तोपर्यंत तालुक्याच्या ठिकाणी उपलब्ध असणाऱ्या सर्व व्यवस्था गोरेगावमध्ये विकसित केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.