Monday, 27 December 2021

 ऑनलाईन संगणक प्रशिक्षणातील अनियमिततेबाबत

15 दिवसांच्या आत चौकशी केली जाईल

 - ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

            मुंबई, दि. 27 : नागपूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कोविडकाळात मुलींना देण्यात आलेल्या ऑनलाईन संगणक प्रशिक्षणातील अनियमिततेबाबत येत्या 15 दिवसात चौकशी केली जाईल असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत सांगितले.

            ऑनलाईन संगणक प्रशिक्षणातील अनियमिततेसंदर्भातील प्रश्न आज तारांकित प्रश्नाच्या वेळी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, विधानसभा सदस्य संजय सावकारे, राजेश पवार यांनी उपस्थित केला होता.

            मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, जिल्हा परिषद सेस फंड योजना 2019-20 अंतर्गत मुलींना संगणक प्रशिक्षण देणे ही योजना राबविण्यात येत असून या योजनेकरिता 30 लाख रुपये उपलब्ध करुन देण्यात आले होते. ग्रामविकास विभागाने 24 जानेवारी 2014 च्या शासन निर्णयानुसार लाभार्थींचे प्रशिक्षण याकरिता सन 2019-20 यावर्षी मार्च 2020 मध्ये 15 लाख रुपये इतकी रक्कम अग्रिम म्हणून संबंधित संगणक प्रशिक्षण संस्थेला अदा केली तर उर्वरित 14 लाख 86 हजार रुपये इतकी रक्कम सन 2020-21 या वर्षात मार्च 2021 मध्ये अदा करण्यात आली. संगणक प्रशिक्षणाच्या दरम्यान मार्च 2020 पासून कोविडमुळे ऑफलाईन प्रशिक्षण न देता ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये 714 विद्यार्थ्यांपैकी 711 विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण केले. अशी माहितीही मंत्री श्री.मुश्रीफ यांनी दिली.


--

 बीड जिल्ह्यातील मौजे वरपगाव येथील सोयी सुविधांकरिता

निधी उपलब्ध करून देणार

- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार

            मुंबई, दि. 27 : बीड जिल्ह्यातील मौजे वरपगाव या पुनर्वसन करण्यात आलेल्या गावासाठीच्या सोयी-सुविधेकरिता प्रस्ताव मागवून आवश्यक निधी एका महिन्यात उपलब्ध करून देण्यात येईल, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

            मांजरा नदीची उपनदी बोभाटी नदीला आलेल्या पुरामुळे बाधित झालेल्या बीड जिल्ह्यातील मौजे वरपगावचे विशेष बाब म्हणून पुनर्वसन करण्यात आलेले आहे. पुनर्वसित गावात एकूण ६६३ भूखंड पाडण्यात आले असून, सर्व लाभार्थ्यांना ६१७ प्लॉट वाटप करण्यात आलेले आहे. ग्रामपंचायतीच्या मालकीकडे ४६ प्लॉट देण्यात आलेले आहेत. तसेच गावात पहिली ते सातवी पर्यंतची जिल्हा परिषदेची शाळा, लाईट व पाण्याची सोय, ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत, अंगणवाडी इमारत आणि प्राथमिक आरोग्य उपविभागाची इमारत इत्यादी नागरी सुविधा देण्यात आल्या असल्याची माहिती श्री.वडेट्टीवार यांनी दिली.

            मौजे वरपगावमध्ये ४०० ते ५०० मी. पर्यंतचे रस्त्यांचे काम झालेले आहे. या गावासाठी अंतर्गत रस्ते व नाली बांधकामासाठी नव्याने अंदाजपत्रक तयार करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी यावेळी सांगितले. मांजरा प्रकल्पामुळे तसेच वैजापूर तालुक्यातील बाधित गावांना सुद्धा सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माहिती घेऊन मार्ग काढू, असेही त्यांनी उपप्रश्नांच्या उत्तरात सांगितले.

विधासभा सदस्य प्रकाश सोळंके यांनी यासंदर्भातील लक्षावेधी सूचना उपस्थित केली होती. सदस्य श्रीमती नमिता मुंदडा, रमेश बोरनारे यांनी यावेळी झालेल्या चर्चेत सहभाग घेतला

०००००

पालघर जिल्ह्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये

पथदिवे आणि हायमास्ट बसविणार

- आदिवासी विकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे

            मुंबई, दि. 27 : पालघर जिल्ह्यातील 30 शासकीय आश्रमशाळांमध्ये सोलर पथ दिवे आणि हायमास्ट बसविण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

            ‘कोविड-१९’ च्या प्रार्दुभावामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्येत वाढ झाल्याने व कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांना सुद्धा कोविड-१९ ची लागण झाल्याने व शासनाच्या निर्देशानुसार कार्यालयातील उपस्थिती संख्येवर मर्यादेत निर्बंध असल्याने तसेच प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, डहाणू येथील प्रकल्प अधिकारी यांचेकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आल्याने या प्रकरणावर विहित मुदतीत कार्यवाही करणे शक्य झाले नाही. तथापि, ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे राज्यमंत्री श्री.तनपुरे यांनी सांगितले. या कामांना विलंब होण्याची अन्य कारणे असल्यास त्याबाबत चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

            यासंदर्भात सदस्य श्री.सुनील भुसारा यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

०००००

शाश्वत विकासाचे उद्दिष्ट समोर ठेवून कामे सुरू

- पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

            मुंबई, दि. 27 : राज्याचा विकास व्हावा आणि तो शाश्वत असावा हे उद्दिष्ट समोर ठेवून शासन काम करीत आहे. मिरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील दगडखाणीमुळे गावामध्ये लहान मुलांना व ज्येष्ठांना दमा व डोळ्यांचे आजार होत असल्याची तक्रार मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या वैद्यकीय विभागाकडे प्राप्त झालेली नाही. तथापि, दगडखाणीमुळे आजार होत असल्यास त्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

            कांदळवनाचा ऱ्हास करणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांबाबत तसेच युवक प्रतिष्ठान या संस्थेने खोटी बिले सादर केल्याबाबतही चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

            सदस्य प्रताप सरनाईक यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती.

            पर्यावरण मंत्री श्री.ठाकरे आपल्या लेखी उत्तरात म्हणाले, मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मंजूर विकास योजनेअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापासून 100 मीटरपेक्षा जास्तीच्या अंतरावर असणाऱ्या रेडिमिक्स प्लांटकरिता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडील ना हरकत दाखला प्राप्त करून घेतल्यानंतर या प्लांटकरिता महानगरपालिकेमार्फत तात्पुरत्या स्वरूपामध्ये परवानगी देण्यात येते. या महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 22 रेडीमिक्स काँक्रिट प्लांट कार्यरत असून या प्लांटची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत वेळोवेळी पाहणी करण्यात येऊन दोषी आढळलेल्या उद्योगावर कारवाई करण्यात येते.

            केंद्र शासनाच्या निर्मल भारत अभियानाच्या धर्तीवर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत एमएमआर क्षेत्रामध्ये निर्मल एमएमआर अभियान राबविण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला असून याअंतर्गत मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत मे.युवक प्रतिष्ठान या अशासकीय संस्थेस स्वच्छतागृह बांधण्याची कामे देण्यात येऊन एकूण 16 ठिकणी स्वच्छतागृह बांधण्याची कामे पूर्ण केलेली असल्याचेही श्री.ठाकरे यांनी लेखी उत्तरात सांगितले आहे.

            राज्यातील सागर तटीय जिल्ह्यांकरिता कांदळवनाचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी महसूल व वन विभागामार्फत उपसमित्या गठीत करण्यात आल्या आहेत. मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात कांदळवनाचे नुकसान केल्याबाबत सन 2010 पासून आतापर्यंत एकूण 42 फौजदारी स्वरूपाचे गुन्हे महसूल विभागामार्फत दाखल करण्यात आल्याची माहिती श्री.ठाकरे यांनी दिली.

            मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम, विविध विकास प्रकल्प, कांदळवनाचे संरक्षण, पर्यावरणपूरक विकास, सीआरझेड अधिसूचनेची अंमलबजावणी आदींबाबत पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, नगरविकास विभाग व सर्व संबंधितांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असेही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

००००

पीएमजीपी वसाहतीतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा

निर्णय येत्या महिनाभराt

- गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

            मुंबई, दि. 27 : मुंबईतील अंधेरी पूर्व येथील पीएमजीपी वसाहतीतील जुन्या व जीर्ण इमारतींच्या पुनर्विकासासाठी येत्या महिनाभरात उच्चस्तरीय बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिली.

            सदस्य सुनिल प्रभु, रविंद्र वायकर, अमिन पटेल यांनी मुंबईतील अंधेरी पूर्व, कामाठीपूरा, उमरखाडी या भागातील पीएमजीपी अंतर्गत येणाऱ्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. यास उत्तर देताना गृहनिर्माण मंत्री श्री. आव्हाड बोलत होते.

          गृहनिर्माण मंत्री श्री.आव्हाड म्हणाले, अंधेरी पूर्व येथील परिसरात 17 इमारती 6.41 एकरात असून, 984 गाळे आहेत. तीन वेळा देकार पत्र देऊनही विकासक पुनर्विकास करत नसल्याने, चौकशी केली असता विकासक आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने तो पुनर्विकास करू शकत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईतील म्हाडाअंतर्गत येणाऱ्या सोसायटीच्या रहिवाशांना निवासस्थानाची अडचण भासू नये तसेच जीर्ण इमारत आणि स्थानिकांच्या जीवला धोका होवू नये यासाठी पीएमजीपी अंतर्गत येणाऱ्या वसाहतींचा पुनर्विकास करण्यासाठी महिनाभरात उच्चस्तरीय बैठक घेऊन तातडीने निर्णय घेवून कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री.आव्हाड यांनी सांगितले.

          मुंबईतील म्हाडाअंतर्गत येणाऱ्या वसाहतीतील नागरिकांना निवासाचा प्रश्न भेडसावणार नाही यासाठी भविष्यात निर्णय घेण्यात येतील. पीएमजीपी अंतर्गत येणाऱ्या इमारतींचा प्रश्नही तातडीने सोडविण्यात येईल यासाठी सोसायटीचे पदाधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि विकासक यांच्याशी चर्चा करण्यात येईल. इमारतींच्या पुनर्विकासासाठी शासनाकडून घेण्यात येणाऱ्या विविध मान्यताही लवकर घेऊन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही श्री.आव्हाड यांनी यावेळी सांगितले.

०००



 वाढत्या कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरणाचा वेग वाढवावा

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

             मुंबई दि.27 : कोविडचा संसर्ग वाढत असून तो रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग अधिक वाढविण्याची गरज आहे. आपल्याला अधिक दक्षता बाळगून काटेकोर पाऊले उचलावी लागणार आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. टास्क फोर्सची बैठकही येत्या एक दोन दिवसांत आयोजित करावी असेही निर्देश त्यांनी दिले.

            राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडच्या वाढत्या संसर्गावर चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी सादरीकरणात जानेवारीच्या मध्याला कोविडच्या सक्रिय रुग्णात वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली. लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज आहे असे सांगितले. काही दिवसांपूर्वी आपण दिवसाला 8 लाख डोसेस देत होतो, सद्या 5 लाख डोसेस दिवसाला दिले जातात.

             यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करून आपापल्या जिल्ह्यांत लसीकरण वेगाने होईल असे पाहण्याचे निर्देश दिले.

            डॉ. व्यास यांनी अधिक माहिती देताना सांगितले की 8 डिसेंबर रोजी 6200 सक्रिय रुग्ण होते . मात्र आज 10 हजार सक्रिय रुग्ण आहेत. एकूणच गेल्या 20 दिवसांत सक्रिय रुग्णांत 50 टक्के वाढ झाली असून मागील सहा दिवसांत रुग्णांच्या संख्येत तिपटीने वाढ झाल्याची माहिती दिली. राज्यात पॉझिटिव्हिटी रेट 1.06 टक्के झाल्याचेही ते म्हणाले.

00000

 कोविड काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

आणि रुग्णालयांना आवश्यक निधी वितरीत

 - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

            मुंबई, दि. 27 : मागील पावणे दोन वर्षापासून राज्य शासन कोविड संकटाशी दोन हात करीत असून या काळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला आवश्यक असणारा निधी वेळोवेळी वितरीत करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज विधानसभेत दिली.

            चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयात आवश्यक औषधांचा साठा उपलब्ध करुन देण्याबाबतचा तारांकित प्रश्न विधानसभा सदस्य सुधीर मुनगंटीवार, किशोर जोरगेवार, सुभाष थोटे यांनी विधानसभेत विचारला होता.

            श्री. देशमुख म्हणाले की, राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांना कोविडकाळात आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्याबरोबरच काही तातडीची औषधे खरेदी करण्याची परवानगीही देण्यात आली आहे.राज्यातील वैद्यकीय रुग्णालयाला आवश्यक असणारी औषधे हाफकिन महामंडळामार्फत पुरविली जात असली तरी सध्याची परिस्थिती पाहता याबाबतही आवश्यक ते अधिकार या वैद्यकीय महाविद्यालयाला देण्यात येतील.

            सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयात या प्रकरणी सुरु असलेली कार्यवाही, वेगवेगळे आरक्षण, बिंदू नामावली यामुळे रिक्त पदे भरण्याबाबत विलंब झाला. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्याबाबतची कार्यवाही सुरु असून याबाबत जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. वर्ग 3 आणि वर्ग 4 ची पदे वैद्यकीय संचालनालयामार्फत भरण्यात येत असताना याबाबतही कालबध्द आराखडा आखून ही पदे भरण्यात येतील. काही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना औषध पुरवठा नियमित होत नसल्याबाबत तक्रारी येत असल्यास याबाबत तपासणी करण्यात येईल, असेही मंत्री श्री.देशमुख यांनी सांगितले.

 हळद शेतमालाच्या व्याख्येत नसणे हास्यास्पद, जीएसटी लावण्याच्या निर्णयास विरोध - ललित गांधी


महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सर्व स्तरावर विरोध करणार

महाराष्ट्र जीएसटी च्या अग्रीम अभिनिर्णय प्राधिकरणाने (अ‍ॅडव्हान्स रूलींग ऑथोरीटी) हळद ही शेतमालात समाविष्ट होणार नाही असा निर्णय देणे हास्यास्पद असुन महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकरी व व्यापार्‍यांवर अन्यायकारक असल्याने ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर’ तर्फे या निर्णयास विरोध केला जाईल अशी माहीती महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली.

हळद (हळद पावडर अतिरीक्त) विक्रीसाठी जीएसटी लागु होणार किंवा कसे यासंदर्भात अग्रिम निर्णयासाठी सांगली येथील हळद अडत्यांनी दाखल केलेल्या प्रकरणात निर्णय देताना जीएसटी आयुक्त (AAR ) यांनी हा निर्णय दिला असुन, हळद विक्रीसाठी अडत्यांना मिळणार्‍या दलालीवरही जीएसटी भरावा लागेल असा निर्णय दिल्याने शेतकरी व व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.  

ललित गांधी पुढे म्हणाले की, हळद कंद पिकविल्यानंतर शेतकरी स्वतः सदर हळद कंद वाळवुन बाजारात विक्रिसाठी आणतो, शेतमाल शेतातुन काढल्यानंतर बाजारापर्यंत पाठविण्यायोग्य आवश्यक सामान्य प्रक्रिया त्या वस्तुचे मुळ गुणधर्म बदलत नसतील तर तो शेतमाल व्याख्येतच गृहीत धरावा असे गुजरात व अन्य प्रकरणात पूर्वी निर्णय झालेले असताना महाराष्ट्राच्या प्राधिकृत आयुक्तांनी बरोबर उलट निर्णय दिला आहे ही बाब आश्‍चर्यकारक आहे.

महाराष्ट्राच्या हळद उत्पादक जिल्ह्यातील शेतकरी, बाजार समिती पदाधिकारी, हळद व्यापारी आदी संबंधित घटकांची संयुक्त बैठक ‘महाराष्ट्र चेंबर’ मध्ये लवकरच आयोजित करण्यात येत असुन यानिर्णयाला कायदेशीर प्रक्रियेद्वारे व शासन दरबारी आव्हान देऊन हा निर्णय बदलण्यास भाग पाडावे लागेल असे ललित गांधी यांनी स्पष्ट केले.

 



 

Featured post

Lakshvedhi