Friday, 3 November 2023

आणि मला दुर्गा सापडली*

 *आणि मला दुर्गा सापडली*


सिक्किमजवळच्या पेलिंगला नेमकी आमच्या यांची कॉन्फरन्स घोषित झाली. नवरात्राचे दिवस. यांच्या आग्रहामुळे मला जावच लागलं. मनात मात्र घरचं  नवरात्र हुकल्याची हुरहुर होती.  आमची गाडी त्या दिवशी सारखा त्रास देत होती.  गाडीच्या ड्रायव्हरच्या मावशीचं घर रस्त्यावरच होतं. वळणावळणाच्या त्या रस्त्यावर एका घराशेजारी गाडी थांबली. घरासमोर बरीच  मुलं  खेळत होती. लहान -मोठी, गोबर्‍या लाल गालांची, बसक्या नाकाची. गाडीचा आवाज ऐकून एक मध्यमवयीन बाई बाहेर आली आणि आमच्या  ड्रायव्हर भीमला म्हणाली,  ' ताबा तस खै ? ' कसा आहेस ? भीमने आमची ओळख करून दिली. ही कुंती, माझी मावशी. जरा कुरकुरणार्‍या   गाडीची डागडुजी  करायला   भीम गाडी घेऊन गेला.   कुंती अगदी चारचौघींसारखी दिसत होती. सिक्कीमी बायकांचा  गुडघ्यापर्यंत येणारा बाखू  तिने घातलेला. कान लोंबेपर्यंत, कानाची पाळी फाकवणारे कानातले झुमके, अकाली पडलेल्या सुरकुत्या आणि चेहेर्‍यावर हसू. तिचं  वय असेल सहज पन्नाशीला आलेलं. पण कुंती गरोदर होती. या वयाची बाई गरोदर बघून मला धक्काच बसला. एक बारकं  मूल तिच्या कडेवर होतं. एक पाठीशी झोळीत बसून तिच्या मागून वाकून मिचमिच्या डोळ्यांनी  आमच्याकडे बघत होतं. इतक्यात झोपडीतून नुकतीच चालायला लागलेली, नीट चालणारी पण शेंबूड पुसणारी आणखी दोन तीन पाठोपाठची मुलं  बाहेर आली. कुंतीनं  आमचं  स्वागत केलं. तिने हाक मारल्यावर झोपडीच्या मागच्या उतारावर शेतात काम करणारा एक चौदा पंधरा वर्षांचा मुलगा धावत आला. आणि आम्हाला बसायला त्यानं  एक बाक आडवा केला.  कुंतीला तोडकं  मोडकं  हिन्दी येत होत. पण तिथल्या एका मुलाला  नीट हिन्दी येत होती. त्याच्या मदतीने आमचा संवाद सुरू झाला. 

        माझ्या चेहर्‍यावरचं  आश्चर्य बघून कुंतीनेच संभाषणाची  सूत्र हातात घेतली. ' दीदी , ही सगळी माझीच मुलं. ' ' तुझी म्हणजे, तुझी स्वत:ची ? ' मी उडालेच. ' हो. माझी, माझ्या पोटची. ' पण .. आपला कायदा आहे ना ..दो या तीन .. 'कुंतीला या प्रश्नांची अपेक्षाच असावी. ' हो, आहे ना कायदा. आणि मुलांची संख्या वाढवली तर सरकारवर त्यांचा बोजा टाकायचा नाही, हे ही ठाऊक आहे. माझी मुलं  आणि आम्ही स्वावलंबी आहोत. आम्ही आमच्या शेतात राबतो, पिकवतो,  रोज कमावतो, रोज खातो, साठवून ठेवायला मात्र आमच्याकडे पैसे नाहीत. ' त्यापुढे कुंतीने  जे  सांगितलं, ते या पृथ्वीतलावरच वाटलंच  नाही मला. 

         कुंती आणि दोरजा, तिचा नवरा, दोघं  पेलिंगच्या कष्टकरी लेपचा जमातीतले. हिमालयाच्या  निसर्गरम्य पहाडात हातावर पोट  असलेलं त्यांचं कुटुंब.  दोरजा सैन्यासाठी लाकूडफाटा   सीमेवर पोचवण्याचं  काम करायचा. कुंती गावातल्या बायकांबरोबर लाकडं गोळा करायला जायची. देशाला आपली तेवढीच मदत. कुंती कधी दोरजासोबत मिरची - भाकरी सैनिकांसाठी पाठवायची.  त्यांचा मोठा मुलगा राम,  विसाव्या वर्षीच सैन्यात भरती झाला. कुंतीला त्याचं  कोण अप्रूप. सगळ्या गावाला तिने त्याचा गणवेष कौतुकाने फिरून दाखवला. दाजूमुळे ( मोठा भाऊ )  आणि घरातल्या देशप्रेमी वातावरणामुळे   धाकट्या दोघांना ही सैन्यात जायचे वेध लागलेले. राम काश्मीर सीमेवर तैनात असताना, अवघ्या बावीसाव्या वर्षी  त्याला वीरमरण आलं.  हिमालयातला बर्फ वितळेल, असा कुंतीचा शोक चालला होता.  तिला  मुलगा गेल्याचं दु:ख होतच. पण  मुलाची  देशसेवा अर्ध्यावर राहिली याची तिला  जास्त खंत होती. 

            कुंतीच्या धाकट्या दोघांनी दाजूचं  स्वप्न पूर्ण करण्याचं ठरवलं आणि कुंतीने आपला निर्णय दोरजाला सांगितला. मला देशासाठी लढणारे सैनिक निर्माण करायचे आहेत. नाहीतरी माझ्यासारखी स्त्री देशाची सेवा कशी करणार ? दोरजाने आधी तिला समजावलं. नातेवाईकांना वाटलं ती वेडी झालीये. पण नंतर दोरजाला कुंतीच्या ठाम निर्णयाचा अंदाज आला.  मुलांच्या लष्कर भरतीत कुंतीच्या संगोपनाचाच वाटा होता. दोरजाला फक्त कुंतीच्या प्रकृतीची काळजी वाटत होती. कुंती म्हणाली , दोरजा, तू फक्त साथ दे. आपण कष्ट करू, मुलांना स्वावलंबी बनवू. त्यांना देशासाठी घडवू आणि देशालाच अर्पण करू. मला शक्य आहे तोपर्यंत मला हे करू दे. दोरजा म्हणाला, पण एखाद्या मुलाला हे पटलं  नाही तर. ' ज्याला नाही पटणार, तो दोन वर्ष  देशसेवा करून नंतर आपलं  आयुष्य जगू शकतो.  माझ्या दुधाचं  हे मुलांवर असलेले कर्ज  त्यांनी फेडावं, असं  सांगेन मी त्यांना . ' आणि कुंतीच्या घरात वर्ष दोन वर्षात पाळणा हलू लागला. ' चांगल्या  कामाला निसर्ग ही साथ देतो दीदी. माझं  वय काय ठाऊक नाही. पण अजून तरी कूस फळतेय. मुलांना  अंगाई म्हणून ही  देशाचीच गाणी गाते. माझी मुलं ही फार  गुणी आहेत. माझं   ऐकतात. आमच्यासारखचं देशाचं  प्रेम त्यांनाही आहे. मध्यंतरी भीमाची बहीण वारली.  तिच्या नवर्‍याने दुसरं लग्न केलं. पोटच्या पोरांना परकं  केलं. मी म्हटलं, आण त्यांना इकडे. आता माझ्या पिल्लांसोबत  तिचीही मुलं  वाढताहेत. पण  अट त्यांनाही तीच. सैन्यात भरती व्हायचं. मुलांना  तायक्वंडोचं शिक्षण, रोज पहाडात दौड लावायचा सराव सक्तीचा केलाय मी. ' ती परत हसली. ' सैन्यात नंबर लागायला हवा ना, म्हणून जरा सक्ख्त आई झालेय. '  कुंती एकीकडे दोन मुलींना आणि एका मुलाला, सैनिकांसाठी  भाकर्‍या कागदात बांधायला सांगत  होती. दोरजाची गाडी सीमेकडे जायला निघेल म्हणून ती त्यांना घाई करत होती. शेतातल्या भाज्या आणि मिरच्यांचा वानवळा ही सोबत जायचा होता. 

          हिमालयाच्या कुशीतल्या, बर्फाळ पहाडावर,  एक निरक्षर आई, आपलं  मातृत्व  देशाला अर्पण करत होती. त्यासाठी तिनं  स्वत:चं शरीर पणाला लावलं होतं. मला माझीच  लाज वाटली. पण   माझं  नवरात्र हुकलं  नव्हतं.  आज  मनात चांगल्या विचारांची  घटस्थापना झाली होती.  कुंती हसली. तिच्या सुरकुत्या मला विलक्षण सुंदर दिसल्या.  माझी दुर्गा  माझ्यासमोर होती.  🙏🏻


*डॉ. स्मिता दातार*

 आगळी वेगळी देशभक्ती

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi