मी साधारण 1963/64 ते आता 2024 पर्यंतचे अलिबाग अनुभवते आहे. खूप मोठ्या कालावधीची साक्षीदार बनले आपोआप. मुद्दाम कधी विचार केला जात नाही की काय आणि किती बदलले… सगळेच. आज मात्र सगळ्याचा लेखाजोखा मांडायला बसले आहे.
एखाद्या गावाचे वर्णन करताना टुमदार शब्द वापरला जातो. तेव्हाच्या अलिबागला हा चपखल बसणारा शब्द. सुबक, टुमदार, सुरेख असे अलिबाग.
नारळ पोफळीच्या वाड्यांनी गच्च भरलेले गाव. एस टी ने गावात प्रवेश करतानाच मन प्रसन्न होते. वैशंपायनांची वाडी, ठोसरांची वाडी, कामतांची वाडी अशा अनेक बागा, त्यात कौलारू सुबक घरे. काही दुपाखी, काही चौपाखी, काही माडीची… म्हणजे एक मजला वर असलेली. ब्राह्मण आळी, कामत आळी, मिरची गल्ली, बाजारपेठ, ठिकुरली नाका, कोळी वाडा, लिमये वाडी… असे बरेच विभाग आणि थोडेफार वास्तुशास्त्रात बदल असलेली घरे. जीना, पडवीची चौकट, खिडक्या, दारे सगळे उत्तम लाकडी बांधकाम. घरांमध्येही कणखर लाकडी आधाराचे मेरू खांब.
ओटी, पडवी त्यानंतर बैठकीची खोली, माजघर, देवघर, स्वयंपाकघर, दोहो बाजूला वावरायच्या खोल्या. त्यावेळी स्वतंत्र बेडरूम अस्तित्वातच नव्हती. साठवणीच्या खोल्या वेगळ्या. त्यात वर्षभराची बेगमी धान्ये, लोणची, मसाले अशी महत्त्वाची साठवण असे. बाकी मग खोल्यातून एखादा पलंग, गाद्या, उशा, पांघरूणे यांची चळत, कपड्यांची कपाटे वगैरे.
मागची पडवी त्या जवळ मोरी, म्हणजेच बाथरूम. घरातील मंडळींसाठी बंदिस्त केलेली. त्या बाथरूमही वैशिष्टयपूर्ण असत. दगडी दोणी पाणी साठवण्यासाठी. एका बाजूला चूल किंवा जरा वरील स्तरातील घर असेल तर पाणी तापवण्यासाठी तांब्याचा बंब यासाठी राखीव जागा. लाकडांचा, धुराचा, साबणाचा, शिकेकाईचा एक मिश्र गंध कायम जाणवत असे.
एकेका समाजाची विशेष रचना. माळी, शेतकरी यांची वेगळी, ब्राह्मणांची वेगळी आणि कोळ्यांची आणखी वेगळी. घरांच्या रचना आणि जरूरीची अवजारे एवढाच फरक. कायस्थांची घरे ही खूप. समान धागा म्हणजे स्वच्छता. आगरी, माळी, कायस्थ, ब्राह्मण कोणीही असो कोकणवासी मंडळी घर आंगण लख्ख ठेवण्याबाबत जागरूक. घरासमोर धूळ केरकचरा अजिबात दिसणार नाही. अगदी साधे गरिबाचे घर असेल तरी अंगणाच्या कडेला दोनचार रोपे तरी खोचलेली नक्की दिसतील. तुळस, तगर, जास्वंदी असणारच. हिरवाईची आवड ही कोकणी माणसाच्या रक्तातच मुरलेली. ज्यांचे आवार मोठे ते आनंदाने शक्य ती लागवड करत. एखादा हापूस, पायरी आंबा, शेवगा, नारळ, सुपारी, कोकंब, रामफळ, सीताफळ, चाफा अशी झाडे दारोदारी दिसत. ज्यांच्या वाड्याच आहेत ते सुख काय वर्णावे? हजार-पाचशे नारळ सुपाऱ्या यांची झाडे. बाग शिंपण्याचे काम मोठे. मग काटेकोरपणे आळ्या पाडून पाणी वाहते ठेवण्याची सुरेख व्यवस्था. शिपणानंतर बाग अत्यंत प्रफुल्लित, प्रसन्न जाणवते. मी आमच्या लहानपणी ज्या मोठ्या वाड्या पाहिल्या त्यातील रहाटगाडगे हा आम्हा मुलांचा फार आकर्षणाचा विषय असे. एका बाजूला डोळ्यांना झापड लावलेला बैल गरगर फिरत राही आणि त्यामुळे विहिरीवर रहाटगाडगे फिरून मोठ्या दगडी डोणीत छोट्या घागरी रिकाम्या करत राही. त्याचवेळी वाडीचे शिंपण होत असे. ते बघत बसायला मजा येई. पण जसे मोठे झालो त्या बैलाची दया यायची. काही तास त्याचे ते गरगरणे मनाला अस्वस्थ करे. असो.
नुसते घर स्वच्छ नाही तर एकूणच कोकणातील माणूस शरीर स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक. शेतावरून, कामावरून आले की संध्याकाळची आंघोळ ठरलेली. डॉ. विठ्ठल प्रभू यांनी त्यांच्या अभ्यासात या विषयी नोंद करून ठेवली आहे. स्वच्छ सवयींमुळे होणारे स्त्रियांचे प्रश्न कोकणातील स्त्रियांना कमी भेडसावतात. हा एक महत्वाचा गुणच.
अलिबागमध्ये वीज 1961/1962 मध्ये आली. त्याआधी चिमण्या, कंदील यांची गरज मोठी. रस्त्यावरही थोड्या थोड्या अंतरावर खांबावर तेलाचे दिवे लावले जात. त्यासाठी नगरपालिका खास माणूस नेमत असे. घरगुती स्वयंपाकाचा गॅस, घरोघरी दिवे ही चैनच होती. गॅस घ्या हो असे सांगायला कंपनीची मंडळी घरोघर जात असत आणि मिनतवारी करून विक्री करत. आता जराशा निमित्ताने होणारा झगमगाट पाहताना कधीतरी हे आठवले की कालचक्राची गंमत वाटते खरी.
शिक्षणाबाबत बोलायचे तर त्यावेळी अलिबागेत शाळा अगदी एका हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच. जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा, जानकीबाई रघुनाथराव हळदवणेकर कन्या शाळा आणि मुलांसाठी इंडस्ट्रिअल हायस्कूल. तीनच शाळा. लोंढे गुरुजींनी एक खूप सुंदर प्राथमिक शाळा सुरू केली साधारण 67/68 साली. त्या शाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला. ती खूपच लवकर नावारूपाला आली. जनता शिक्षण मंडळ यांच्या तर्फे नलिनी कुवळेकर यांनी बालवाडी याच सुमारास सुरू केली. अगदी चार मुलांना घेऊन सुरुवात झालेली ती शाळा ‘कुवळेकर बाईंची शाळा’ या नावाने ओळखली जाऊ लागली. हळूहळू प्रगती करत संपूर्ण प्रायमरीचे वर्ग तेथे सुरू झाले. मान्यता मिळाली, शिक्षकांना समाधानकारक वेतन मिळू लागले. कुवळेकरबाई मात्र तेव्हा निवृत्त झाल्या. त्यांनी एक मोठे योगदान दिले. अलिबागजवळील अष्टागरातील मुले हायस्कूलसाठी वर उल्लेखलेल्या दोन शाळांमध्ये येत. बहुतांशी चालतच यावे लागे. पावसाळ्यात त्यांचे फारच हाल होत. कोकणातला पाऊस. बरेचदा संततधार लागलेली असे. छत्री असली जरी तरी तिचा शून्य उपयोग. मुले संपूर्ण भिजून येत आणि ओले कपडे अंगावरच वाळवत.
कॉलेजही तेव्हा एकच. J. S. M. College ची स्थापना 1961 मध्ये झाली. पेण, रोहा, रेवदंडा सगळीकडून विद्यार्थी येत. मला आठवतंय एक हजार विद्यार्थी संख्या झाली या विशेष आनंदात कॉलेजला सुट्टी दिली होती. आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्स तीनही फॅकल्टीज उत्तम सुरू होत्या. खरोखर उत्तम प्रोफेसर वर्ग संस्थेने निवडला होता. त्यावेळी कॉलेजचे प्रिन्सिपॉल होते आर. टी. कुलकर्णी. पुण्यात प्रोफेसर असणारे आणि समोर अत्युच्च संधी सहज मिळत असताना त्यावेळेच्या खेडेगावात येण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि एक द्रष्टा माणूस संस्थेला लाभला. प्रिन्सिपॉल पदावर असणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्त्व कसं असावं याचे ‘आरटीके’ हे उत्तम उदाहरण म्हणायला हरकत नाही. हसतमुखाने अतिशय सौम्य शब्दात बोलणाऱ्या सरांचे विद्यार्थ्यांना प्रेम, आदर तर होताच पण जरबही होती. कितीही उनाड मुलगा असू दे या सरांसमोर कधीही उलट बोलण्याचे, वागण्याचे धाडस मुलांनी केले नाही. ते उत्तम शिक्षक होतेच तसेच त्यांनी विचारपूर्वक कॉलेजही घडवले. विद्यापीठातर्फे ज्या काही स्पर्धा घेतल्या जात त्या सगळ्यात मुलांनी भाग घ्यावा, तयारी करावी, हे विश्व अनुभवावे हा त्यांचा आग्रह असे. मैदानी खेळ असोत वा शैक्षणिक स्पर्धा. मुले तयार व्हावीत यासाठी तयारी करून घेतली जायची. उत्तम जिमखाना, लायब्ररी, प्रयोगशाळा या कॉलेजमध्ये घडल्या. टेनिस आणि बास्केटबॉल सारखी मैदाने घडली. स्थानिक मुले कबड्डी खेळात अग्रेसर होती. त्यांना विशेष कोचिंग मिळाले. ती टीम विद्यापीठात नाव, दबदबा कमावू लागली. क्रिकेट, बास्केटबॉल स्पर्धांना मुले वेगवेगळ्या ठिकाणी पोचू लागली. सरांनी अतिशय द्रष्टेपणा दाखवून धोरणे राबवली. मुख्य म्हणजे त्यांनी कॉलेज हे राजकारण्यांचा अड्डा कधीही बनू दिला नाही. राजकारण चार हात दूरच ठेवले आणि कॉलेज आवारात वातावरण निकोप ठेवले. आर.टी. कुलकर्णी सरांनी संस्था सर्व अर्थानी एका उंचीवर नेली हे नि:संशय.
अलिबागमधील खाद्य जीवनाबद्दल बोलायचे तर किती छोट्या सहज सोप्या आठवणी आहेत. एक निसर्गदत्त विस्तीर्ण समुद्र किनारा लाभलेले हे गाव. मत्स्यप्रेमींसाठी स्वर्ग. ताजी फडफडीत मासळी रोज मिळणारच. आगरी, माळी, मराठा लल(कुणबी) समाज मोठा. मासळीशिवाय एक दिवसही न राहू शकणारे अनेक अनेक लोक आहेत. म्हणजे उपास असला आणि नाईलाज असला तर चुलीत सुका बोंबील भाजत ठेवून त्या वासावर जेवणारी माणसे आजही मला माहिती आहेत.
पोह्याचे पापड, तांदळाचे पापड, ओल्या ताज्या फेण्या साईच्या दह्याबरोबर या येथील खास गोष्टी. या पट्ट्यात कडवे, गोडे वाल भरपूर पिकतात. सर्वच मंडळींना वाल अतिप्रिय. आमच्या बाप्पाला सुध्दा मोदकांबरोबर डाळींब्यांचा नैवैद्य लागतो. अळुवड्या, अळूची पातळ भाजी हवीच. ओल्या वालाचे दाणे, वांगी, शेवग्याची शेंग ही मिश्र भाजी प्रसिध्दच. अनेक समाजाच्या लोकांना लग्नाच्या जेवणातही लागतेच लागते. अलिबागचा गोड पांढरा कांदा हा आता सगळीकडेच मोठी मागणी मिळवतो आहे. शेतकरी ठराविक काळात याचे उत्पन्न घेतात. तो हा हा म्हणता संपूनही जातो. विशिष्ट पद्धतीने माळा बनवून तो विकतात. उन्हाळ्यात घरोघरी या माळा लटकलेल्या असतात.
खाद्य जीवनाच्या आठवणी काढतेच आहे तर आमच्या अलिबागचे भूषण म्हणावे अशा मयूर बेकरीचा उल्लेख अपरिहार्य आहे. कोळीवाडा किंवा अजून एखाद दोन ठिकाणी छोट्याशा बेकरी होत्या. पाव, बटर, खारी मिळत. पण सुखवस्तू, शिक्षित कुटुंबातील एका सुनेने वेगळा विचार केला. सुलभ सोपे आयुष्य होते, काही करावेच तर शिक्षिका होतीच ती मुलगी. इंग्लिश विषय हायस्कूलमध्ये शिकवत होती. पण बेकरी कोर्स करू असा विचार करून एक अवघड वाट तिने निवडली आणि यशस्वीपणे परत येऊन स्वतःची बेकरी सुरू केली. एक अत्यंत देखणी वास्तू उभारून प्रशस्त, मोठे दालन उघडले. आज बेकरीतील सर्व उत्तम पदार्थ अलिबागकरांना उत्तम दर्जा आणि रास्त दरात उपलब्ध आहेत. ते अलिबागमध्ये एक प्रेक्षणीय स्थळ यादीत येते आणि हे सुध्दा चाळीस पन्नास वर्षापूर्वी निर्माण झालेय.
हॉटेल व्यवसाय मात्र त्याकाळात अजिबात भरभराटीचा नव्हता. मोघे खानावळ, कुंटे खानावळ या दोन खानावळी लोकांना पोटभर अन्नदान करत. पाटील खानावळ सामिष जेवणासाठी पर्वणी. मात्र याशिवाय फारसे पर्याय उपलब्ध नव्हते.
काळ हा हा म्हणता बदलत गेला. सारी दुनियाच बदलली. आमचे हे चिमुकले गावही कात टाकून नवेच झाले अगदी. किती किती काय काय बदलावे हो?
राष्ट्रीय केमिकल्स फर्टिलायझर्स ही फार मोठी कंपनी अलिबागेत थळ येथे आली. गाव बदलायला लागले. स्थानिक भरती झालेच पण विविध प्रांतीय लोकही आले, राहिले, रुजले. त्यांची त्यांची संस्कृती घेऊन तेथे नांदू लागले. ज्या एस टी स्टँडवर मराठी वर्तमानपत्रच दिसत तेथे आता कन्नड, तमिळ, बंगाली… असे सर्वभाषिक पेपर्स सर्रास मिळू लागले. एक काळ होता, की मुंबईत अलिबागला जाणाऱ्या बसमध्ये अर्ध्याहून अधिक माणसे ओळखीची असत. अलिबागचा एकही रस्ता असा नसे जेथे आपल्याला ओळखणारे कोणी नाही. आता मात्र अशी परिस्थिती आली. लोकसंख्या इतकी कशी बुवा वाढली ? कोठून आले इतके लोक? प्रश्न पडू लागले.
आता गावाचे शहरीकरण वेगाने होऊ लागले. छोटी टुमदार घरे नाहीशी झाली. घरांची गरज वाढली त्यामुळे त्याजागी इमारती उभ्या राहू लागल्या. साधारण 1980 या दशकात पुनर्विकास सुरू झाली. वाड्या भुईसपाट झाल्या. हजार पाचशे नारळ सुपाऱ्या जावून तेथे सजावटीपुरती चारपाच झाडे उरली. हिरवेगार गाव आता सिमेंटचे जंगल झाले. अशी सगळी सुधारणा खरंच पाहता पाहता झाली. मुंबई-पुणे शहरे जवळ असल्याने सुधारणा वेगाने तेथे सरकू लागल्या. उद्योगधंदे वाढू लागले. बऱ्याच मोठ्या कंपन्या स्थिरावल्या. गावात खरोखर पैसा वाहू लागला. एक-दोन-चारचाकी जेथे होत्या तेथे घरोघरी मोटारी…किमानपक्षी दुचाकी तर खेटून उभ्या झाल्या.
वेशभूषा बदलल्या, बोलणे बदलले. मराठीच बोलीभाषा असणारे गाव हिंदी-इंग्लिश ऐकू लागले. रस्ते अरुंद वाटू लागले. गाड्यांची वर्दळ वाढली. सारे स्वरूप बदलले. आता शाळा नव्या नव्या उदयाला आल्या. इंग्रजी मिडीयम आले, स्टेट बोर्ड सोडून इतर अभ्यासक्रम मुलांसाठी उपलब्ध झाले. आजूबाजूच्या लहान लहान गावांतून जिल्हा परिषदेने शाळा उभारल्या. अर्थात गंमत आज अशी की गावात शाळा असून आजही अष्टागरातील मुले अलिबागमध्ये शाळेत प्रवेश घेण्यासाठी धडपडतात. त्यांना तीच प्रगती वाटते. एकूण शिक्षणाबाबत उत्क्रांती घडली.
पदवी कॉलेजही दुसरे आलेच. त्याशिवाय विविध अभ्यासक्रम आता तेथे शिकता येऊ लागले. मेडिकल, लॉ सगळे शिक्षण तेथेच मिळू लागले. होमिओपॅथी कॉलेजही सुरू झाले. तरीही शहरात शिकायला जाण्याची ओढ आणि सवय कायम राहिली. मुले मुली वेगवेगळी क्षेत्र पादाक्रांत करू लागली.
अलिबागमध्ये टुरिस्ट प्रचंड प्रमाणात वाढले. अलिबाग मिनी गोवा म्हणून ओळखले जाऊ लागले. (गोवा, महाबळेश्वर, माथेरान ही मध्यम वर्गासाठी जरा लांबची ठिकाणे आणि तेथला समुद्र देखणा,म्हणून). त्यासाठी आपोआप हॉटेल इंडस्ट्री जोमाने वाढली. समुद्र किनाऱ्याजवळ असलेल्या छोट्या गावात मोठ्या प्रमाणात रिसॉर्ट्स उभी राहिली. अगदी राहत्या घरातही सुधारणा करून स्थानिकांनी होम स्टे व्यवसाय सुरू केला. समृद्धी चहुदिशांनी येऊ लागली. मुंबईहून समुद्र मार्गे सुलभ, सोपा आणि वेगाने प्रवास योजना आल्या. बोट सर्व्हिस आली. एवढेच नव्हेतर रो रो सारखी सुविधा आल्यामुळे प्रवासी खूपच खुश झाले. आता प्रवासाची दगदग कमी झाली. खर्च जरी वाढला तरी ती फिकीर आता कोणी करत नाही. हे वास्तव आहे. आपल्याकडे वेस्टर्न कंट्रीज् प्रमाणे वीकएंडला फिरायला जाण्याची आवड खूप वाढली आहे. अलिबाग हे सर्वात जवळचे डेस्टिनेशन आहे. त्यामुळे पसंती मिळालेले आवडते ठिकाण म्हणून अलिबागची प्रसिध्दी आहे. अलिबागमध्ये जवळपास बरेच समुद्र किनारे आहेत. अक्षी, नागाव, रेवदंडा, किहीम, सासवणे, मांडवा असे बरेच. टुरिझममुळे किनारे गजबजले, नवनवीन वॉटर गेम्स आले. घोडे आले, उंट आले. घाण वाढली, गर्दी बेसुमार झाली. सरत्या वर्षाला निरोप द्यायला अलिबागच्या लोकसंख्येच्या दुप्पट टुरिस्ट येतात. सगळी रिसॉर्ट्स भरून जातात. तरीही उरलेले लोक किचनमध्ये झोपायची सोय करा ना अशी विनवणी करताना दिसतात. ही प्रगती आहे की काय हे ज्याने त्यानेच ठरवावे. कारण या दिवसात दारूच्या दुकानांसमोर खूप मोठ्या रांगा लागतात. सगळे समुद्र किनारे गर्दीने भरतात. राहायला जागा न मिळालेले तेथेच पथारी पसरतात. अलिबागचे रहिवासी मात्र पुढचे काही दिवस किनाऱ्यावर पाय ठेवत नाहीत. ही वस्तुस्थिती आहे.
एरवीही आता virgin beach मूळ रहिवासी शोधतात. वर्दळ, कलकलाट, स्टॉल्स, घोडे, मोटरसायकली यात वाळूवर फिरणे हरवले आहे. प्री वेडिंग शूटिंग ही सध्या लोकांची नवी आवड आहे. समुद्र त्यासाठी उत्तम ‘लोकेशन’ झालाय. आम्ही मात्र शांत जागा बसायला शोधत राहतो. आता किनाऱ्यांचे सुशोभीकरण झाले आहे. चौपाटी तयार झालीय. तरी मऊ मुलायम वाळू नाहीशी झालीच.
एक काळ होता जेव्हा मुख्य अलिबागचा किनारा मोकळा असे. संपूर्ण भरतीच्या वेळेलाही एका मर्यादेपर्यंत पाणी यायचे. पाण्याने त्याची मर्यादा ओलांडली नव्हती. आम्ही एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत आरामात चालत असू, पावले न भिजवता. आता निसर्गानेही रूप बदलले. मुंबईत समुद्र दाबला, रेक्लमेशन घडले. वसाहती उभ्या राहिल्या. ते पाणी कुठे जाणार? अलिबागला भरतीला पाणी आता फार पुढे येते आणि खूप खोल असते. त्यात बुडणारे लोक वाढले. निसर्ग त्याची ताकद दाखवत असतो. त्याला हरवणे शक्य नाहीच हे पुनःपुन्हा तो सिध्द करतो. डोळे उघडायला हवेत आपलेच. आपले नाव नकाशावर कोरून आजचे अलिबाग दिमाखात उभे आहे.