इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी : राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (आयआयसीटी) - मुंबईत स्थापन होणारे राष्ट्रीय उत्कृष्टता केंद्र सर्जनशील अर्थव्यवस्थेसाठी क्षमता बांधणीत एक मैलाचा दगड ठरणार आहे. केवळ एव्हीजीसी-एक्सआर (AVGC-XR) क्षेत्राला समर्पित असणाऱ्या या संस्थेची औपचारिक स्थापना वेव्हज 2025 च्या तिसऱ्या दिवशी करण्यात आली. प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीला जागतिक दर्जाच्या संस्थेच्या रुपात स्थापित करण्यासाठी वेव्हजने उद्योग संघटनांसोबत धोरणात्मक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी देखील केली. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या धोरणात्मक सहयोगाला औपचारिकरित्या हिरवा झेंडा दाखवला. वैष्णव यांनी प्रसार माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात जागतिक स्तरावर आघाडीचे स्थान मिळवण्याच्या भारताच्या क्षमतेवर भर दिला. ज्याप्रमाणे आयआयटी आणि आयआयएम या संस्था तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिक्षणात आदर्श बनल्या आहेत त्याप्रमाणेच आयआयसीटी आपल्या क्षेत्रातील एक प्रमुख संस्था बनण्याच्या मार्गावर आहे असे वैष्णव यांनी सांगितले. दीर्घकालीन सहकार्यासाठी हात पुढे करणाऱ्या काही कंपन्यांमध्ये जिओस्टार, अॅडोब, गुगल आणि यूट्यूब, मेटा, वॅकॉम, मायक्रोसॉफ्ट आणि एनव्हीआयडीआयए यांचा समावेश आहे.
क्रिएट इन इंडिया चॅलेंज आणि क्रिएटोस्फीअर: सर्जनशील प्रतिभेचा जागतिक उत्सव
वेव्हज 2025 चे एक प्रमुख आकर्षण म्हणजे क्रिएट इन इंडिया चॅलेंज (सीआयसी) पर्व 1 चा भव्य समारोप होता. या स्पर्धेत 60 हून अधिक देशांमधून सुमारे एक लाख जणांनी नोंदणी केली होती. वेव्हज अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू करण्यात आलेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजने (सीआयसी) ॲनिमेशन, एक्सआर, गेमिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, चित्रपट निर्मिती, डिजिटल संगीत आणि इतर क्षेत्रातील निर्मात्यांना वयोगट, भौगोलिक आणि विषयांच्या सीमा ओलांडून एकत्र आणले होते. या उपक्रमाने यात सहभागी झालेल्या प्रत्येक क्रिएटरला स्टार बनवले आहे.
32 कल्पक आणि भविष्यवेधी आव्हानांमधून 750 हून अधिक स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले होते. या स्पर्धेत 1100 हून अधिक आंतरराष्ट्रीय सहभागींचा समावेश होता. या प्रतिभावान व्यक्तींनी वेव्हजमधील समर्पित नवोन्मेषी विभाग असलेल्या क्रिएटोस्फीअरमध्ये आपले सृजन सादर केले. या व्यासपीठावर त्यांनी आपले प्रकल्प सादर केले तसेच संभाव्य सहयोगासाठी उद्योगातील धुरीणांशी ते संपर्क करू शकले.
क्रिएट इन इंडिया चॅलेंज केवळ एक स्पर्धा न राहता, विविधता, युवा ऊर्जा तसेच परंपरा आणि तंत्रज्ञानात रुजलेली कथाकथन साजरे करणारी एक चळवळ बनली आहे. 12 ते 66 वर्षे वयोगटातील अंतिम स्पर्धक तसेच सर्व भारतीय राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील लोकांच्या जोरदार सहभाग असलेल्या या उपक्रमात समावेशकता आणि आकांक्षा प्रतीत झाली होती. होती. क्रिएटोस्फीअर हे तळागाळातील नवोन्मेष, ड्रोन स्टोरीटेलिंग आणि भविष्यासाठी सज्ज आशय यासारख्या संकल्पनांसाठी जगासमोर येण्याची एक संधी देखील होती. क्रिएटोस्फीअर हे व्यासपीठ उद्याच्या सर्जनशील भारताची झलक दाखवणारे होते. "प्रवास आता सुरू झाला आहे,” हे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सीआयसीच्या पुरस्कार सोहळ्यात उच्चारलेले शब्द सार्थ आहेत आणि क्षितीजावरील भारतीय सर्जनशील तंत्रज्ञान संस्थेसारख्या उपक्रमांनी या गतीला अधिकच बळ मिळत आहे.
No comments:
Post a Comment