शासन शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट मदत व योजनांचा लाभ देऊ शकेल. कोणत्याही चुकीच्या नोंदी टाळल्या जातील आणि खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य लाभ पोहोचेल. आजपर्यंत या योजनेत महाराष्ट्रातील १ कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करुन आपला नंबर प्राप्त करुन घेतला आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या तलाठी, कृषी सहायक किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन लवकरात लवकर नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
उत्पादनामध्ये प्रचंड वाढ होणे म्हणजे स्वयंपूर्ण झालो असे नाही. उत्पादनाची गुणवत्ता राखली जाणे, त्याची व्यवस्थित जाहिरात होणे, बाजारपेठ मिळणं आणि त्याला बाजारभाव मिळणे ही मूल्यसाखळी आपल्याला निर्माण करायची आहे.
हवामान बदलामुळे शेतीपुढे खूप आव्हाने आहेत. एका क्षणात शेतीचे प्रचंड नुकसान होते. अशा परिस्थितीत शासन म्हणून शेतकऱ्यांच्या मागे उभे राहणं, आपला विचार, अभ्यास, प्रत्यक्षात आणणं, त्यातून शेतकऱ्याला ज्ञान देणं ही खरी काळाची गरज आहे.
या ‘अॅग्री हॅकॅथॉन’मध्ये सहभागी होणाऱ्या संशोधकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना मांडण्याची संधी मिळेल. यशस्वी संकल्पनांना वित्तीय आणि तांत्रिक मदतही दिली जाणार आहे. तसेच, खासगी कंपन्यांच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान प्रत्यक्षात साकारण्यात येईल, ही बाब महत्वाची आहे. पुणे आंतरराष्ट्रीय ‘अॅग्री हॅकॅथॉन’हे महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्राला नवसंजीवनी देणारं ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कृषि हॅकॅथॉनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करुन राज्यातील युवा संशोधक, स्टार्टअप्स आणि कृषितज्ज्ञ यांना एकत्र आणून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीसंबंधी समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
कृषी मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यावेळी म्हणाले, भविष्यात शेती सुरक्षित व संरक्षित कशी करता येईल यादृष्टीने शासन प्रयत्न करीत आहे. तसेच पुढील काळात शेतीसाठी मनुष्यबळाची कमतरता यादृष्टीने विचार करण्याची आवश्यकता आहे. रासायनिक शेतीमुळे जमिनीची पोत खराब होत असल्याने रासायनिक शेती हळूहळू कमी करुन सेंद्रीय शेतीकडे जाणे आवश्यक आहे. सेंद्रीय शेतीतून उत्पादन कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीसाठी मार्केट महत्वाचे असून, मार्केट जोडण्याची आवश्यकता आहे. यासाठी देशातील कंपन्या पुढाकार घेण्यास तयार आहेत. राज्यात विभागस्तरीय सहा अद्यावत शेती प्रयोगशाळा, शॉपिंग मॉल उभारण्याच्या दृष्टीने कृषी विभाग प्रयत्नशील आहे. उत्तम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्यास कृषी क्षेत्रात महाराष्ट्र अधिक प्रगतशील होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शेती व शेतकरी सक्षम होण्यासाठी शासनामार्फत विविध धोरण राबविण्यात येत असून या कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून शेतीसाठी नवतंत्रज्ञान आत्मसात करुन शेतकऱ्यांनी त्याचा फायदा इतरांनाही होण्यासाठी प्रयत्न करावेत. कृषी हॅकॅथॉनच्या माध्यमातून नवनवीन माहिती शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत. यातूनच सर्वसमावेशक व शेतकऱ्यांच्या फायद्याचे कृषी धोरण राबविण्याचा विचार कृषी विभाग करत आहे, असे त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment