🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥
*🌹🍀🔥शास्त्र असे सांगते 🔥🍀🌹*
*🏵भारतातील प्रचंड संख्येने असलेल्या देवदेवता व साधुपुरुष पाहून नेमकी कोणती देवता उपासनेला घ्यावी वा कोणत्या संताचा मार्ग अनुसरावा हे काही कळेनासे होते. त्याबाबतीत नेमकी भूमिका कोणती असावी ?(भाग-१)*
*वरील प्रश्न बहुतेक सर्वांनाच भेडसावून राहिला आहे. ज्ञानेश्वरांनी "भावार्थदीपिकेत (अध्याय १४ ओवी ८१४ ते ८२१) अशा अज्ञानी भक्ताचे सुरेख वर्णन केले आहे.' माझी मूर्ती निपजवी। ते घराचे कोनीं बैसवी। आपण देवो देवी। यात्रे जाय ॥ ८१४॥ नीच आराधन, माझें। काजीं कुळदेवता भजे। पर्वविशेषे कीजे। पूजा आना ।।८१५॥ माझे अधिष्ठान घरीं। आणि बोबसे आनाचे करी। पितृकार्यावसरी। पितरांचा होय ॥८१६॥ एकादशींचा दिवशी । जेतुला पाडु आम्हांसी । तेतुलाचि नागांसी। पंचमीचां दिवशी ॥८१७॥ चौथा मोटकी पाहे। आणि गणेशाचाचि होये। चावदसी म्हणे माये। तुझाच वो दुर्गे ॥८१८॥ नित्य नैमित्तिकें कर्मे सांडी। मग बैसे नवचंडी । आदित्यवारी वाढी। भैरवांपात्रों ॥ ८१९॥ पाठी सोमवार पावे। आणि बेलेंसी लिंगा धांवे। ऐसा एकलाचि आघवे । जोगावी जो ॥८२०॥ ऐसा अखंड भजन करी। उगा नसे क्षणभरी। आघवेनि गांवद्वारी। अहेव जैसी ॥ ८२१॥*
*वरील अनवस्था बोकाळण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे श्रद्धेचा अभाव व दुसरे म्हणजे "नानात्व आणि एकत्व" या तत्त्वाविषयीचे अज्ञान होय. यापैकी पहिले कारण म्हणजे श्रद्धेचा अभाव अगदी सर्रास दिसून येतो. हातात पैसे घेऊन वैद्यांकडे जाणारे रुग्ण, खिशात पैसे ठेवून केशकर्तनालयात जाणारे लोक, भाजी खरेदी करणारे गिऱ्हाईक आणि सत्यनारायणाची किंमत देऊन धंद्यात बरकत आणू पहाणारे भक्त हे एकाच पंक्तीत असतात. सर्वांची भावना एकच की पैसे दिले की काम होते. व्यवहारातील पैशाच्या देवघेवीचा नियम देवापाशीही वापरण्याचा विनोद करून हे अज्ञानी भक्त आपल्या पायावर धोंडा पाडून घेतात.....*
*देवाकडे जाताना पैशापेक्षा श्रद्धेचा उपयोग होतो... किंबहुना भक्तीचे मनोरथ पूर्ण होण्यामागे ईश्वरापेक्षा ईश्वरावरील श्रद्धाच कारणीभूत असते, होमिओपॅथिशास्त्रातील "प्लॅसिबो" थिअरी येथेही लागू पडते. डॉक्टराने औषध म्हणून नुसती साखरेची गोळी दिली तरी ती श्रद्धेन घेणारे रोगी बरे होतात. अर्थात ते त्या औषधामुळे नव्हेत तर औषधावरील व डॉक्टाराविषयी असलेल्या श्रद्धेनेच. दररोज नवनवीन देव व सद्गुरु शोधणारे भक्त हताश होतात. कारण देव व सद्गुरु हे परमसाक्षात्कारी असूनही भक्तांमध्ये व त्यांच्यामध्ये संपर्क घडवून आणणारी श्रद्धा त्यांच्यात नसते.....*
*एखाद्या जागृत क्षेत्रात मूर्तीपाशी बारा महिने चोवीस तास राहणारे पुजारी लोक संतपदवीस पावलेले पहाण्यात येत नाहीत... कारण इतक्या जवळ कैवल्याचा खजिना असूनही श्रद्धा नसल्यामुळे त्या कैवल्याचा लेशही त्यांच्यामार्फत येत नाही. उलट उभ्या आयुष्यात मूर्तीचे तोंड न पहाणारे संत मोक्षपदवी प्राप्त करतात कारण त्याच्यात पूर्ण श्रद्धेचा वास असतो. चोखामेळ्यास विठ्ठलमंदिरात कधीही प्रवेश मिळाला नाही पण तो महान संत झाला.....(क्रमश:)*
*🔸संदर्भ : वेदवाणी प्रकाशन...*
🔥🔥🔥🔥🔥🌐🔥🔥🔥🔥🔥
No comments:
Post a Comment