अहिर - अहिराणी :
रामायण, महाभारत, मत्स्यपुराण, बृहदसांहिता, नासिक लेणे, महाराष्ट्र ज्ञानकोश, डब्ल्यू क्रूक यांचा कास्ट अॅण्ड ट्राइब्ज इन नॉर्थ वेस्टर्न इंडिया, आ. इ. इन्थोव्हेन यांचे ट्राईब्ज अॅण्ड कास्ट ऑफ बॉम्बे इ. ग्रंथावरुन अहिरांच्या इतिहासावर प्रकाश पडतो. त्या नुसार खानदेश हा मूळचा अहिरांचा देश. अहिर ही शेतकऱ्यांची, गवळ्यांची एक जात. प्रमुख उद्योग गुरे राखणे. मत्स्यपुराणात सात तर वायू पुराणात दहा अहिर राज्यांची संख्या दिसते. इ.स. १५० मध्ये आध्रांचा ऱ्हास होऊन अभीरांचे राज्य आले. वायव्येकडून ते दक्षिणेकडे सरकत आले. चौथ्या शतकात खानदेशावर अहिरांचे राज्य होते. आठव्या शतकात काठी लोक जेव्हा गुजरातेत आले तेव्हा बराच मुलुख हा अहिरांच्या ताब्यात होता.
या अहिरांची वाणी-बोली ती अहिरवाणी किंवा अहिराणी. खानदेशात अहिराणी ही कृषि जीवन जगणाऱ्याची बोली आहे. खानदेशातील जिल्ह्यातील भूप्रदेशात ती बोलली जाते. म्हणून ती खानदेशी. आता खानदेश हा जळगांव व धुळे या दोन जिल्ह्यात विभागला आहे. मात्र या बोलीचे क्षेत्र या जिल्ह्याच्या क्षेत्राहून ही मोठे आहे. चांदवडचे डोंगर, सातपुड्याचे डोंगर, वाघुर नदी आणि संह्यपर्वत, अजिंठ्यांचे डोंगर या निसर्गाने तोडून वेगळ्या ठेवलेल्या खोलगट भूभागात, खदाणीत, खाणीत ही खानदेशी, अहिराणी बोलली जाते. या भूभागात मग नासिक, नंदूरबार, छत्रपती संभाजी नगर, जळगांव, धूळे या जिल्ह्याच्या गावांचाही समावेश होतो.
खानदेशात अहिर होते. कालानुरुप त्यांच्या नावांत बदल झाला. मात्र त्यांची अहिराणी, अभिरोक्ती किंवा अभिरी आजही टिकून आहे. अभीर म्हणजे यदुवंशीय; अभीर किंवा अहिर ही गवळ्यांची, गुरे चारणाऱ्यांची, कृषि-उद्योग करणाऱ्यांची एक जात.
इतर भाषिकांनी अहिरांच्या बोलीला अहिरवाणी किंवा अहिराणी म्हणून ओळखले किंवा संबोधले. अहिर हे खानदेशात सर्वत्र पसरलेले असल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्यांच्या बोलीवर सुद्धा अहिराणीची छाप पडणे साहजिकच होते. खानदेशातील अहिराणीला खानदेशी या प्रादेशिक नावाने देखील ओळखले जाऊ लागले.
No comments:
Post a Comment