अहिराणी आणि खानदेशी :
खानदेशात अहिरांचे वास्तव्य होते. अहिरांनी सुपीक जमिनीवर गुरे चारण्या सोबतच शेती व्यवसाय सुरु केला. शेती व्यवसायाला पूरक असे विविध व्यवसाय करणारे इतर लोक अहिरांशी सततच्या संपर्कात येवू लागले. सत्ता, व्यापार, व्यवसाय यातील अहिरांच्या भाषेचे वर्चस्व हे खानदेशभर वाढल्याने अहिराणी ही प्रदेशाच्या नावाने म्हणजे खानदेशी बोली या नावाने ओळखली जाऊ लागली. ती एका जातीची भाषा न राहता ती त्या प्रदेशात राहणाऱ्या लोकांची, प्रदेशाची भाषा झाली. अहिरांशी सततचा इतर भाषिकांचा संपर्क आला. तो इतर भाषिक समाजही त्यांच्या स्वतःच्या बोलींची छाप असणारी अहिराणी, मिश्र अहिराणी बोलू लागला. बोलीचा उल्लेख करतांना ती त्या प्रदेशाची बोली, खानदेशाची बोली म्हणून खानदेशी या नावाने गणली गेली. खानदेशी बोली ही संकल्पना अहिराणी बोली ह्या संकल्पनेपेक्षा विशाल आहे. त्या-त्या परिसरातील खानदेशी ही त्या-त्या परिसराच्या नावाने संबोधली जाऊ लागली. ज्या ज्या जमातींनी ती भाषा स्वीकारली त्या-त्या जमातींच्या नावाने ती बोली ओळखली जाऊ लागली. यानुसार खानदेशी बोलीचे सामाजिक आणि प्रादेशिक असे प्रभेद निर्माण झालेत. खानदेशीच्या प्रादेशिक प्रभेदांचा विचार करता, खानदेशाच्या नैऋत्येकडील बागलाण भागातील ती बागलाणी, उत्तरेकडील तापीच्या परिसरातील ती तप्तांगी, दक्षिणेकडील ती दखनी किंवा डोंगरांगी, पश्चिमेकडील ती वरल्ह्यांगी, पूर्वेकडील ती खाल्ल्यांगी, नेमाड कडील ती नेमाडी, डांगान परिसरातील ती डांगी, तसेच तावडी असे प्रादेशिक प्रभेद आढळतात. तर सामाजिक प्रभेदात, खानदेशात वास्तव्यास असणाऱ्या प्रत्येक जातीच्या स्वतःच्या बोलीची छाप असलेली अहिराणी बोली ही त्या जातीची स्वतंत्र नामधारण करुन सामाजिक प्रभेदाचे रुप बनली. त्यात महाराऊ, लाडशाखीय वाण्यांची ती लाडसिक्की, भिल्लाची ती भिलाऊ, अहिरांची ती अहिराणी, लेवा पाटीदारांची ती लेवा पाटीदार बोली, पावरांची ती पावरी, काटोनी भिल्लांची ती काटोनी, घाटावरुन आलेल्यांची स्वतःच्या बोलींची छाप असलेली ती घाटोयी, गुजरांची ती गुजरी, भावसारांची ती भावसारी, परदेशांची ती परदेशी अशा जातीनिहाय अहिराणीच्या सामाजिक प्रभेदांची यादी वाढतच गेली. या सर्व सामाजिक आणि प्रादेशिक प्रभेदांना एकाच नावाने सामावून घेणारी विशाल संकल्पना ही "खानदेशी बोली" जी संपूर्ण खानदेशात बोलली जाते.
डॉ. रमेश सूर्यवंशी
'अभ्यासिका', वाणी मंगल कार्यालया समोर कन्नड
ता. कन्नड जि. छत्रपती संभाजी नगर (महाराष्ट्र) पिन ४३११०३
No comments:
Post a Comment