Monday, 14 October 2024

*आदिशक्तीची नऊ मंदिरे*

 *आदिशक्तीची नऊ मंदिरे*


*१) शैलपुत्री माता मंदिर, वाराणसी उत्तर प्रदेश / बारामुल्ला कारपीर:* पौराणिक साहित्यात नऊ नावांनी ओळखल्या जाणाऱ्या नवदुर्गांपैकी शैलपुत्री या प्रथम आहेत. शैलपुत्री म्हणजे हिमालयांची कन्या माता पार्वती. मोक्षनगरी काशीमध्ये वरुणा नदीजवळ माता शैलपुत्रींचे मंदिर आहे. येथे शैलपुत्री देवींची सुंदर मूर्ती आहे, हिमालयांची कन्या असल्याने शैलपुत्री म्हंटल्या जाणाऱ्या मातेची मंदिरेही पर्वतांमध्ये आहेत. काश्मीरमधील झेलमच्या काठावर बारामुल्ला येथे शैलपुत्री देवींचे मंदिर आहे, मंदिराच्या परंपरेनुसार मुख्य मंदिरात अन्नदान आणि. स्वच्छता नियोजनाचे काम फक्त कुमारी मुलीच करतात.


*२ ब्रह्मचारिणी माता मंदिर, वाराणसी, उत्तर प्रदेश: 'ब्रहा चारयितुं शीलं यस्याः सा ब्रह्मचारिणी'* म्हणजे ज्यांचा स्वभाव परब्रह्माचे खरे आनंदमय रूप प्राप्त करणे आहे, ते रूप म्हणजे ब्रह्मचारिणी होय. बाबा विश्वनाथांचे शहर काशीच्या कर्णघंटा परिसरात माता ब्रह्मचारिणी देवीचे मंदिरदेखील आहे. सदनीरा माता गंगेच्या तीरावरील बालाजी घाटावर असलेल्या या मंदिरात सुखकर्ता, समृद्धी देणाऱ्या आणि मनोकामना पूर्ण करणाऱ्या श्री मातेची आराधना केली जाते.


*३ चंद्रघंटा माता मंदिर, प्रयागराज आणि काशी, उत्तर प्रदेश: चंद्र: चन्द्रः घण्टायां यस्या सा चंद्रघंटा,* म्हणजे जे चंद्रासारखे शीतल असून ज्ञानाचा प्रकाश देतात, त्यांना चंद्रघंटा म्हणतात. चंद्रघंटा देवीच्या कपाळावर घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र सुशोभित आहे. तामिळनाडूतील कांचीपुरममध्ये भगवती चंद्रघंटाच्या रूपात देवींची पूजा केली जाते. माता चंद्रघंटाचे मंदिर प्रयागराज, त्रिवेणी संगम शहर आणि वाराणसी येथे देखील आहे, जिथे नवरात्रीच्या निमित्ताने विशेष गर्दी होते.


*४) कुष्मांडा माता मंदिर, घाटमपूर, कानपूर, उत्तर प्रदेश:* कुष्मांडा ही नवरात्रीच्या चौथ्या दिवसाची देवता आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर जिल्ह्यातील घाटमपूर शहरात कुष्मांडा देवींचे प्राचीन मंदिर आहे. येथे देवी पिंडी दोन मुखांसह विराजमान आहेत, जेथे भक्तांसाठी आश्चर्याचा स्रोत म्हणजे पिंडीतून नेहमी पडत असलेले पाणी आहे, जे भक्त पवित्र आशीर्वाद मानून त्यांच्या डोक्यावर आणि कपाळावर लावतात. मराठा शैलीत बांधलेल्या मंदिराच्या निर्मितीच्या तिथीवर इतिहासकारांचे एकमत नाही. परंतु, स्थानिक लोककथांमध्ये अबाधित आहे.


*५) स्कंदमाता मंदिर, विदिशा, मध्य प्रदेश / काशी, उत्तर प्रदेश:* उमा-महेशांचे पुत्र षण्मुख कार्तिकेय यांना स्कंद म्हणतात, ज्यावरून देवींचे एक नाव स्कंदमाता आहे. स्कंदमातेचे मंदिर वाराणसीच्या जगतपुरा भागातील बागेश्वरी देवी मंदिर परिसरात आहे. देवींच्या मांडीवर स्कंद बालस्वरूपात विराजमान आहे. स्कंदमातेचे आणखी एक मंदिर विदिशामध्ये आहे जिथे दुर्गा देवींची पूजा स्कंदमातेच्या रूपात केली जाते. तामिळनाडूतील सेलमजवळील स्कंदगिरी येथे दुगदिवींची स्कंदमातेच्या रूपात पूजा केली जाते.


*६) माता कात्यायनी मंदिर, वृंदावन, उत्तर प्रदेश:* श्री राधाराणी अंतर्गत, माता कात्यायनींचे प्राचीन मंदिर श्रीकृष्णाचे लीलास्थळ श्रीधाम वृंदावनात आहे. महर्षी कात्यायन यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन त्यांच्या घरी देवींनी पुत्रीरूपात जन्म घेतला होता. श्रीकृष्ण पती मिळावा म्हणून राधाराणीने कात्यायनी शक्तिपीठावर देवींची पूजा केली होती, असे मानले जाते.


*७) कालरात्री माता मंदिर, वाराणसी, उत्तर प्रदेश:* माता कालरात्रीला मातेचे सातवे रूप मानले जाते. कालरात्रीच्या रूपात देवीने राक्षसांचा वध केला, म्हणून त्यांची मूर्ती उग्र स्वरूपात पूजीली जाते. वाराणसीमध्ये माता कालरात्रीचे मंदिर दशाश्वमेध मार्गावर आहे. बिहारच्या सोनपूर, नयागाव डुमरी येथे माता कालरात्रीचे प्रसिद्ध मंदिर आहे, जिथे पिंडीच्या रूपात माता शक्तीची स्थापना केली आहे.


*८) महागौरी माता मंदिर, काशी, उत्तर प्रदेश:* देवी शक्तीच्या आठव्या रूपात असणाऱ्या पूज्य महागौरी मातेची मुद्रा अत्यंत शांत असून त्यांचे रूप तेजस्वी आहे. प्रसिद्ध काशी विश्वनाथाजवळ असलेल्या अन्नपूर्णा देवी मंदिरात स्थापित केलेल्या मूर्तीला माता महागौरी म्हणतात. महादेवांना वर म्हणून प्राप्त करण्यासाठी देवी पार्वतींनी कठोर तपश्चर्या केली होती, त्यामुळे त्यांचे रूप कृष्णवर्णी झाले होते. तपश्चर्येने प्रसन्न होऊन महादेवांनी गंगाजलाने देवींचे तेज पुन्हा परत आणले होते, अशी कथा आहे.


*९) सिद्धिदात्री माता मंदिर, छिंदवाडा, मध्य प्रदेश:* सिद्धिदात्री ही सर्व सिद्धीची जननी आहे. नवव्या दिवसाची अधिष्ठात्री माता सिद्धिदात्रीचे मंदिर मध्य प्रदेशातील छिंदवाड्यात आहे. चतुर्भुज रूपात विराजमान असलेली देवी कमळाच्या फुलावर विराजमान आहे. वाराणसीमध्ये भगवती सिद्धिदात्रींचे मंदिर असून येथे कृष्णवर्णातील मूर्ती आहे.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi