Thursday, 20 June 2024

हिंदू धर्मात बेल, वड, पिंपळ, तुळस,,आंबा,कमळ, शमी,

 || श्रीराम ||


वटपौर्णमा परवावर आली आहे.  आज माझे व माझ्या मैत्रिणीचे सहज काही बोलणे झाले. मी या विषयावर दोन-तीन वाक्य बोलून गेले. तर तिने मला तू वटपौर्णिमा व हरतालिका यावर काही लिही असे सुचवले. आणि माझे विचार चक्र सुरू झाले. 

हिंदू धर्मात बेल, वड, पिंपळ, तुळस,,आंबा,कमळ, शमी, पारिजातक अशा काही झाडांना अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. काही झाडांची फळे काही झाडांची पाने तर काही जणांची फुले वेग वेगळ्या देवांना अर्पण करतात. या सर्वांचे विविध औषधी उपयोग आहेत .आज आपण वटपौर्णिमेचे महत्त्व जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. 

जगात सर्वात दाट सावली असते वडाची. संपूर्ण मोठ्या झालेल्या वृक्षाच्या  पारंब्यांमधून अखंड पाणी टपकत असते. त्यामुळे वडाखालील जमीन सदैव ओलसर असते. याचसाठी वडाची सावली अत्यंत गुणकारी आहे, त्याचे गुण वर्णन करणारे एक सुभाषित प्रसिद्ध आहे. 

"कूपादेकं वटच्छाया तथा मृद्निर्मितंगृहम्‌ | शीतकाले भवदुष्णं उष्णकाले तु शीतलम्||"

अर्थात विहिरीचे पाणी, वडाची सावली आणि मातीचे घर उन्हाळ्यात थंड तर हिवाळ्यात गरम असते.  अशी घर होती तोपर्यंत कूलर, एसी लागत नव्हता. वडाचे वैज्ञानिक वैशिष्ट्य जगात सर्वाधिक ऑक्सिजनचे उत्सर्जन करणारा वृक्ष म्हणून आहे .

 ज्येष्ठ महिन्याच्या जीवघेण्या घुसमट करणाऱ्या उन्हात लाकडे तोडण्यास गेलेला सत्यवान ऊन लागून पडला. उष्णतेने त्रासला. प्राणवायूच्या अभावाने कासावीस झाला. त्याला सत्यवतीने वडाच्या झाडाखाली आणले. त्या सावलीत, त्या पारंब्यांच्या तुषारात, त्या थंडाव्यात आणि उपलब्ध सर्वाधिक ‘ऑक्सिजन’ युक्त स्थानी आल्यावर त्याचे प्राण वाचले. हे आहे पतीचे प्राण वाचविणे. बाकी पुराण कथा ‘रोचनार्था फलश्रुति:|’ प्रकारातील समजायची असते. ज्या वडाच्या या गुणधर्मामुळे पती वाचला त्या वडाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करणे. निसर्गाला धन्यवाद देणे आहे वटपौर्णिमा!

वडात भरपूर औषधी गुणधर्म आहेत. स्त्रियांच्या अनेक विकारांमध्ये उपचारासाठी वडापासून तयार केल्या औषधीचा उपयोग करतात. वडाच्या खोडाची साल, पाने, अंकुर व पानांचे चूर्ण अशा विविध स्वरूपांत  औषध तयार होते. 

पक्ष्यांचेही वास्तव्य वडाच्या झाडावर असते.

पौर्णिमेच्या उपासाचा सात जन्माची काही एक संबंध नाही .आपण सर्वजण भागवत कथा ऐकतो त्यामध्ये याचा उल्लेख आलेला आहे. एकाच जन्मात पती असलेला गेल्या जन्मी पुत्र पुढच्या चरणी पिता असेही घडू शकते. जीवशास्त्र सांगते आपल्या शरीरात पेशी सतत परिवर्तित होत राहतात. जुन्या पेशी मरतात नव्या जन्मतात. सतत बदल घडत राहतो.

 संपूर्ण शरीरातील सगळ्या पेशींचे परिवर्तन व्हायला काळ लागतो १२ वर्षे. म्हणून तर ‘तप’ १२ वर्षे. नवीन तयार होणारी प्रत्येक पेशी तप:पूत असावी म्हणून १२ वर्षे तपश्‍चर्या. १२ वर्षांत सगळ्या पेशी बदलतात. जणू पुनर्जन्म. सगळ्या नव्या पेशी. नवा देह. असे सात वेळा १०० वर्षाच्या आयुष्यात घडू शकते म्हणून सात जन्म. 

आपण सध्या काय करतो? मोठी वडाची झाडे तर फारशी उरली नाहीतच मग वडाच्या फांद्या तोडून आणतो किंवा वडाचा पूजेचा कागद आणतो. दोन्ही कृती सावित्रीला शोभणाऱ्या नाहीत. कारण प्रत्येकाने फांदी आणायची म्हटले तर झाडाला राहणारच काय आणि कागद जरी म्हटला तरी वृक्षतोड होणारच आहे. या सगळ्याचा विचार करावा. उपासाचा याच्याशी अर्थाअर्थी काही संबंध नाही. सावित्रीने पतीचे प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी पराकष्ठेचे प्रयत्न केले.तेही खंबीर राहून हातपाय न गाळता.आपणही आपल्या पतींना त्यांच्या व्यवसायात  त्याच्या समाज उपयोगी कार्यात भक्कम साथ द्यावी. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी प्रयत्न करावे. नाहीतर आपला उपास म्हणून त्यांना बाहेर जेवायला सांगणे यासारखा विरोधाभास नाही. एखादे कार्य करत असताना त्यात तल्लीन झाल्यावर उपास घडणे ही वेगळी गोष्ट आहे वटपौर्णिमेच्या निमित्ताने वडाचे संवर्धन करणे हे आपले कर्तव्य आहे. वटवृक्ष हा अनेक पारंब्या असल्यामुळे वंश वृक्ष देखील मानल्या जातो त्याचा विचार करावा. आजकाल सर्व भगिनी वर्ग सुशिक्षित आहे. प्रत्येक व्रतवैकल्या मागील कारण जाणून घेऊन आपले आचरण तसे असावे. केवळ नटून थटून वडाला दोरे, चिंध्या बांधून काहीही साध्य होत नाही हे लक्षात ठेवावे.

शतायुष्याच्या प्रार्थनेबरोबरच निसर्गाची कृतज्ञता मानण्याचा हा दिवस आहे. सावित्रीला हे वटमहात्म्य माहीत होते. म्हणून तिचा सत्यवान वाचला. आपण विनाकारणच केवळ उपचार म्हणून "वटवृक्ष " तोडले तर आपल्या सत्यवानाचे काय याचा विचार करण्याचा दिवस आहे. "वटपौर्णिमा""

यावर्षीपासून आपण वडाच्या फांद्या न तोडता वडाचे शास्त्रीय महत्त्व जाणून वडाचे झाड लावून वटपौर्णिमा साजरी करूया. उपास करणे किंवा न करणे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

तसेच हरतालिका च्या उपासाचे देखील आहे त्याचा विचार नंतर करू . 


सद्गुरू चरणी अर्पण🙏🙏🙏

|| जय जय रघुवीर समर्थ||


सौ. वीणा भाले 

अकोला.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi