Sunday, 21 January 2024

आशियातील स्वच्छ गावाची न ऐकलेली

 आशियातील स्वच्छ गावाची न ऐकलेली


कहाणी !

(मेघालय डायरी)

आशिया खंडातील स्वच्छ गाव कसं असेल?... मेघालयाला जाताना याबाबत बरीच उत्सुकता होती. चेरापुंजीमधून ‘मॉलिनाँग’ या गावात गेलो आणि हे गाव पाहिले तेव्हाच ही उत्सुकता शमली. हे गाव अगदी बांगलादेशच्या सीमेपासून काही अंतरावर. चेरापुंजीपासून मस्त दाट झाडी असलेल्या जंगलातून वळणा-वळणाचा घाट रस्ता या गावात जातो. या रस्त्याने आपण बरेच खाली उतरतो. मॉलिनाँग गावापासून आणखी खाली गेले की बांगलादेशच्या पातळीवर म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या मैदानावर पोहोचतो.

पोहोचायला रात्र झाल्याने सकाळी उठून गावात फेरफटका मारला. रस्त्यावर कचरा सोडाच, साधा कपटासुद्धा नाही. जागोजागी कचरापेट्या. त्यासुद्धा बांबूने विणलेल्या. इतक्या आकर्षक की त्यात कचरा टाकायचं मन होत नाही. गावातील प्रत्येकाला स्वच्छतेची इतकी सवय झालीए की लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येक जण स्वच्छतेची काळजी घेतो. घरे सजवलेली. झाडांवर विविधरंगी फुले येणारे ऑर्किड बांधलेले. गटारे तुंबलेली दिसत नाहीत, लोकही हसरे. रस्त्यावर पडलेलं पानसुद्साधा उचलून कचरापेटीत टाकतात. ‘मी कचरा केला नाही, तो मी उचलणार नाही...’ असा बाणा नाही. शाळकरी मुलं असोत वा मोठे, सर्वांचीच ही वर्तणूक... असे हे गाव. त्याला स्वच्छ किताब मिळाला नाही तरच नवल!

या छोट्याशा गावाने हे कसे साध्य केले, याची कहाणी अतिशय प्रेरणादायी आहे. गावातील ज्येष्ठ नागरिक आणि पूर्वीचे शिक्षक Lamphrang Khongthohrem यांनी ती सांगितली. ते आता सत्तरीत आहेत. त्यांची पिढी तारुण्यात असताना याची सुरुवात झाली. त्यामुळे ही गोष्ट त्यांच्या तोंडून ऐकणे हा आनंद होता. या कहाणीचा सार असा की, तिथे गावागावात जनावरे पाळली जातात. त्यात डुकरांचे प्रमाण सर्वाधिक. हे प्राणी आणि वस्ती एकाच ठिकाणी असेल तर त्यांचे खाद्य, विष्ठा, परिसरात वावरणे यामुळे दुर्गंधीला आमंत्रण. हे समजून गावाने महत्त्वाचे काम केले, ते म्हणजे- जनावरे पाळण्याचे ठिकाण गावापासून दूर हलवले. सर्वांची जनावरे गावापासून दूर एकाच ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था केली. त्यामुळे गाव स्वच्छ व्हायला मदत झाली. आपोआपच संसर्ग, आजार, रोगराई यांचे प्रमाण कमी झाले.

याशिवाय स्वच्छतेबाबत शाळांमधून मुलामुलांमध्ये जागरुकता केली. त्यासाठी गावकऱ्यांनाही तयार केले. हळूहळू त्याचे चांगले परिणाम दिसायला लागले. लोकांना हुरूप आला. एका नियतकालिकाने गावाच्या प्रयोगाची दखल घेतली. हे माहीत झाल्यावर माध्यमांनी गावाला उचलून धरले. पर्यटक यायला लागले. हळूहळू मॉलिनाँग हे गाव प्रसिद्धीच्या झोतात आले आणि आशियातील स्वच्छ गाव म्हणून नावाजले गेले. त्याने पर्यटकांना आणखी आकर्षित केले. आता तर स्वच्छता ही बाब लोकांमध्ये भिनली आहे. गावात फिरताना त्याचा प्रत्यय येतो.

पण या स्वच्छतेला दुसरी बाजूसुद्धा आहे. Lamphrang Khongthohrem यांनी ती सांगितली. ते म्हणतात, ‘या स्वच्छ गावाच्या किताबामुळे आमचे प्राधान्यक्रमच बदलले आहेत. आता आम्हाला बाकी सारी कामे सोडून गावाची स्वच्छता टिकवून ठेवावी लागते. पर्यटकांना वेळ द्यावा लागतो. त्यामुळे आमची शेतीची कामे, काही रिती, प्रथा, परंपरागत कामे हे सारे मागे पडले आणि गावाचे नाव टिकवण्यासाठी हे करावे लागते.’

गावात आम्हाला जाणवलेला बदल म्हणजे, जो तो पर्यटकांना राहण्यासाठी कॉटेजेस बांधू लागला आहे. पूर्वी विरळ असलेली वस्ती आता दाट बनते आहे. स्थानिक लोकांशी बोललो तर त्यांनीही तेच बोलून दाखवले. पर्यटकांची संख्या वाढते आहे. त्यांना होम-स्टे उपलब्ध करून देण्यासाठी कॉटेजेस्, विविध बांधकामे बनत आहेत. हे सारे एकाच गावात होत असल्याने गर्दी एकवटत आहे. त्यात गावाची पूर्वीची ओळख आणि गावपण टिकणार का? हे आव्हान उभे राहिले आहे. ते गावाला पेलणार का आणि त्याला गाव कसे सामोरे जाणार? १०-१५ वर्षांनंतर गावाचे स्वरूप कसे असेल? असे अनेक प्रश्न मला पडले. गावातील काही रहिवाशांनीही ती बोलून दाखवली... आशियातील स्वच्छ गावाची कहाणी आणि त्याची माहीत नसलेली दुसरी बाजू समजून घेताना हा प्रदेश उलगडत जातो.

नेहमीच्या गोष्टींपलीकडचा मेघालय समजून घेण्यासाठी,

चलो मेघालय...

(Exclusive Meghalaya - Kaziranga)
26 Feb - 4 Mar 2024

9545350862 / bhavatal@gmail.com

(मोजक्याच जागा शिल्लक)

- अभिजित घोरपडे

................

भवताल
(हवा, पाणी, पर्यावरणाचा आरसा)
९५४५३५०८६२ / bhavatal@gmail.com

Bhavatal
(A platform dedicated to issues in water, environment and sustainability)
9545350862 / bhavatal@gmail.com

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi