Tuesday, 4 January 2022

 क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त

राज्यभरात ‘सावित्री उत्सव’ साजरा

            मुंबई दि. 3 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज सावित्री उत्सव म्हणून महिला व बाल विकास विभागाच्या राज्यभरातील सर्व कार्यालय व अंगणवाड्यांमध्ये कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळत उत्साहात साजरी करण्यात आली.

            जयंतीनिमित्त बोलताना महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर म्हणाल्या, भारताच्या इतिहासावर ज्यांची अमीट छाप आहे अशा स्त्री रत्न म्हणजे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. भारतीय स्त्री ने आज जी शैक्षणिक झेप घेतली आहे तिला पंख देण्याचे श्रेय क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना जाते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाचा प्रारंभ करण्याचे धाडस त्यांनी दाखवले. सावित्रीबाई फुले यांची जयंती गेल्या वर्षीपासून महिला व बाल विकास विभागातर्फे सावित्री उत्सव म्हणून साजरी केली जात आहे. सावित्रीबाई फुले यांच्या शिकवणीनुसार मी आणि माझा विभाग महिलांच्या उत्थानासाठी कार्यरत असल्याचे ॲड.ठाकूर त्यांनी सांगितले.

            सावित्री उत्सव साजरा करताना राज्यातील सर्व अंगणवाड्यांमधे कोविड प्रतिबंधात्मक नियम पाळून विविध कार्यक्रम हाती घेण्यात आले. अंगणवाडी व प्रकल्प स्तरावर प्रतिमा पूजन, अभिवाचन, जनजागृती कार्यक्रम, प्रभात फेरी, रांगोळी स्पर्धा असे कार्यक्रम घेण्यात आले. १०० टक्के लसीकरण करणा-या व पोषण माह मध्ये उत्कृष्ठ काम करणाऱ्या बिट मधील प्रत्येकी एक अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सत्कार करण्यात आला. माझी कन्या भाग्यश्री योजनेनूसार एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंब नियोजन करणा-या जोडप्यांना गौरविण्यात आले. कोरोना काळात एकल झालेल्या महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहेत. आज अनाथ बालकांच्या घरी भेटही महिला व बाल विकास विभागाच्या अधिकार्यांनी दिली. विविध खेळात देशपातळीवर प्राविण्य प्राप्त केलेल्या मुलींचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

0000



 डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना आणि वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

· पात्र विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज करण्याचे आवाहन

            मुंबई, दि. 03 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार शिष्यवृत्ती योजना तसेच सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज करण्यास दि. 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही विषयातील प्रवेश प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहेत. एल एल बी, बी एड यांसारख्या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सुरू असलेल्या फेरी फेब्रुवारी महिन्यापर्यंत सुरू राहणार असल्याचे सीईटी विभागाने कळवले असून, त्याअनुषंगाने वसतिगृह प्रवेश किंवा स्वाधार योजना यातील लाभांपासून एकही पात्र विद्यार्थी वंचित राहू नये, यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली असल्याचे श्री. मुंडे यांनी सांगितले.

            सामाजिक न्याय विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या वसतिगृहातील प्रवेश व स्वाधार योजना या दोन्हींसाठी अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले असून, पात्र विद्यार्थ्यांनी विहित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन श्री. मुंडे यांनी केले.

००

वि.वृ.क्र.18

दिव्यांग व्यक्तींच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत

राज्य सरकार सकारात्मक

- सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे

            पुणे, दि. 03 : दिव्यांग व्यक्तींचे जीवन सामान्य व्यक्तिप्रमाणे सुखकर व्हावे, यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहेत. दिव्यांग जोडप्यांच्या लग्नासाठी त्यांना विशेष अर्थसहाय्य देणारी योजना सुरू करण्याबाबत राज्य शासन सकारात्मक असून याबाबत राज्य स्तरावर लवकरच एक बैठक आयोजित करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली.

            खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या पुढाकारातून पुणे येथे आयोजित 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या विवाह सोहळ्यादरम्यान त्यांनी केलेल्या सुचनांची दखल घेवून श्री.मुंडे यांनी दिव्यांग जोडप्यांच्या विवाहासाठी अर्थसहाय्य योजनेबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याचे सांगितले.

            यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, अपंग हक्क विकास मंच, पवार चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई, महात्मा गांधी सेवा संघ संचालित दिव्यांग पुनर्वसन केंद्र पुणे यांच्या वतीने व खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकारातून प्रथमच आयोजित केल्या गेलेल्या 12 दिव्यांग जोडप्यांच्या अनोख्या सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे, विजय कान्हेकर, अभिजित राऊत, दीपिका शेरखाने यांसह मान्यवर उपस्थित होते.

            स्वतः कोविड बाधित असूनही दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात लग्न सोहळा अनुभूती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या कार्य व इच्छा शक्तीचे कुतूहल व आदर वाटतो असे म्हणत धनंजय मुंडे व राजेश टोपे यांनी सुप्रियाताई यांना कोविड मधून लवकर बरे होण्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

दिव्यांगांचा सामुदायिक विवाहसोहळा राज्यभर राबवावा – खा. सुप्रिया सुळे

            सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे व आरोग्यमंत्री राजेश टोपे या दोघांच्या सहकार्याशिवाय हा लग्न सोहळा होऊच शकला नसता. हा सामुदायिक विवाह सोहळा हा केवळ एक टप्पा असून पुढे अशा प्रकारचे कार्यक्रम राज्यभरात राबवायचे आहेत, यासाठी सामाजिक न्याय मंत्री व आरोग्यमंत्री यांनी आपल्या विभागांमार्फत सहकार्य करावे, अशी सूचना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी केली.

दिव्यांग नोंदणी व युडीआयडी राज्यव्यापी मोहीम

           खासदार सुप्रिया सुळे यांच्या पुढाकाराने खासदार शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसानिमित्त 12 डिसेंबर 2021 ते 12 मार्च 2022 या दरम्यान दिव्यांग व्यक्तींची नोंदणी करून त्यांना आवश्यक असलेले वैश्विक ओळखपत्र (UDID Card) देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त प्रयत्नातून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.

            राज्य व केंद्र शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळवण्यासाठी हे युडीआयडी कार्ड असणे अनिवार्य आहे. त्यामुळे नोंदणी नसलेल्या दिव्यांग बांधवांची या विशेष मोहिमेंतर्गत जास्तीत जास्त नोंदणी केली जावी यासाठी ही मोहीम राज्यभरात अधिक व्यापक पद्धतीने राबविली जाईल तसेच आरोग्य विभाग यासाठी आवश्यक सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

असा रंगला विवाह सोहळा...

            पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यालयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, सर्व 12 जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान मास्क वापरण्यासह कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.

 शिवडी - न्हावा शेवा सी लिंक वरील ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या

पहिल्या गाळ्याची यशस्वी उभारणी

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवडी - न्हावा शेवा सी लिंकची पाहणी

प्रकल्पाचे ६५ टक्के काम पूर्ण; डिसेंबर २०२३ पर्यंत सी लिंकचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

            मुंबई, दि. ३ - मुंबई शहराला नवी मुंबई शहर आणि रायगड जिल्ह्याशी जोडणाऱ्या शिवडी- न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा आज पार पडला. या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची यशस्वीरीत्या उभारणी करण्यात आली. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पीड बोटीतून या कामाची पाहणी केली.

            या पाहणी दौऱ्यात खासदार राजन विचारे, एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

            शिवडी आणि न्हावा शेवा या दरम्यान उभारण्यात येत असलेला पारबंदर मार्ग हा भारतातील सगळ्यात मोठा पारबंदर मार्ग आहे. तब्बल २२ किलोमीटर लांबीचा असा हा पारबंदर (सी लिंक) प्रकल्प असून १८ हजार कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे. आज या प्रकल्पात ऑर्थोट्रोपिक स्टील डेक सुपरस्ट्रक्चरच्या पहिल्या गाळ्याची उभारणी करण्यात आली. टाटा प्रोजेक्ट्स- देवू जेव्ही यांच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्यात येत असून असे ३२ गाळे बसवून हा ७.८१ किलोमीटर लांबीच्या पुलाचे काम पूर्ण केले जाणार आहे. या गाळ्याच्या फॅब्रिकेशनचे काम जपान, दक्षिण कोरिया, तैवान, व्हिएतनाम, म्यानमार या देशात करण्यात आले असून १८० मीटर एवढ्या लांबीच्या अजस्त्र गर्डर तयार करण्यात आले आहे. या संपूर्ण स्ट्रक्चरचे लाँचिंग करण्यासाठी एका खास बार्जची निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात शिवाजी नगर येथील इंटरचेंजचे काम देखील करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे काम जवळपास ६५ टक्के पूर्ण झाले असून डिसेंबर २०२३ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे.

मुंबई - नवी मुंबई दरम्यानचे अंतर कमी होणार; ठाणे-रायगड जिल्हे एकमेकांना जोडले जाणार

 - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

            शिवडी- न्हावा शेवा पारबंदर प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबई आणि नवी मुंबई या शहरातील अंतर कमी होणार असून ते २० मिनिटात कापता येणे शक्य होणार आहे. तसेच रायगड जिल्ह्यातील चिरले पर्यंत हा पारबंदर प्रकल्प जाणार असल्याने ठाणे आणि रायगड हे जिल्हे देखील एकमेकांना जोडले जाणार आहेत. या प्रकल्पामुळे नवी मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मोठी मदत होणार असून त्याद्वारे जेएनपीटी बंदरातून होणारी वाहतूक अधिक वेगवान होणार असल्याचे मत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

            या गाळ्यांच्या लाँचिंगसाठी कारंजा येथे विशेष जोडणी यार्ड तयार करण्यात आले असून तिथे जोडणी करून ते समुद्रात नेण्यात येतात. त्यासाठी खास बार्ज तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे अतिशय नियोजनबद्धरित्या हे महाकाय गाळे लाँच करण्याचे काम विक्रमी वेळेत पूर्ण करण्यात येणार असल्याचे एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी स्पष्ट केले.

            आज करण्यात आलेल्या या कामामुळे हा पारबंदर प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकण्यात आले आहे.

००००


 



Sunday, 2 January 2022

 *आप प्रसन्न हैं,*

*यह स्थिति उत्तम है,*

*परन्तु*

*यदि कोई आपके कारण प्रसन्न है,*

*तो यह परिस्थिति सर्वोत्तम है*

 शासकीय वसतीगृहाच्या सन २०२१-२२ साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक

            मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्या वतीने सन 2021-22 साठी वसतीगृह प्रवेश मिळविण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे :- शालेय विद्यार्थी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि. 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021, पहिली निवड यादी अंतिम करणे व प्रसिद्ध करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.

            इयत्ता १० वी व ११ वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यासाठी (व्यावसायीक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी 4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.

            पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.

            बी. ए./बी. कॉम / बी. एस. सी अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदविका / पदवी आणि एम. ए./ एम. कॉम. / एम. एस. सी असे पदवीनंतरचे पदव्युत्तर, पदवी, पदविका इत्यादी अभ्यासक्रम (व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून) ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि .4 ऑक्टोबर 2021 ते 20 डिसेंबर 2021.

            पहिली निवड यादी अंतिम करणे दि.24 डिसेंबर 2021 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 30 डिसेंबर 2021. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 5 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 13 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.20 जानेवारी 2022.

             व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ऑफलाईन प्रवेशासाठी अर्ज करावयाचा कालावधी दि.4 ऑक्टोबर 2021 ते 31 डिसेंबर 2021.

            पहिली निवड यादी अंतिम करणे दि.6 जानेवारी 2022 व पहिल्या निवड यादीनुसार विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची अंतिम मुदत 12 जानेवारी 2022. रिक्त जागेवर प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादीनुसार निवड यादी प्रसिद्ध करणे 20 जानेवारी 2022. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश 25 जानेवारी 2022, पहिल्या व दुसऱ्या निवड यादी खेरीज जागा रिक्त राहिल्यास स्पॉट ॲडमिशन देणे दि.1 फेब्रुवारी 2022.

            पहिल्या व दुसऱ्या निवड यादीखेरीज वसतीगृहातील प्रवेशाच्या जागा रिक्त राहिल्यास दिलेल्या रकान्यामधील दिनांकापर्यंत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास तात्काळ त्याच दिवशी वसतीगृहात प्रवेश द्यावा (स्पॉट अॅडमिशन) असे पुण्याचे समाजकल्याण आयुक्त यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 महिला शिक्षणातील अग्रणी.. सावित्रीबाई

        मुंबई दि.02: महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अग्रणी सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी ही जयंती. यानिमित्त त्यांच्या महिला शिक्षणक्षेत्रातील कार्याची ही थोडक्यात आठवण..

            स्वातंत्र्यपूर्व शंभर वर्षापूर्वीचा काळ हा सामाजिक रूढी परंपरांचा काळ होता. महिलांचे शिक्षण हे त्या काळी वर्ज्य होते. त्या काळात सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विशेषत: महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य जोतिराव व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षण घेऊन महिलांसाठी शिक्षिकेचे काम केले. त्यांच्या या अनन्यसाधारण कार्यामुळेच त्यांना महिला शिक्षणाचे प्रवर्तक मानले जाते.

            सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंचा विवाह १८४० मध्ये जोतिरावांसोबत झाला. सावित्रीबाईचे शिक्षण जोतिरावांनीच पुरे केले. जोतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरीता प्रेरणा मिळत होती, ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू व संरक्षक देखील होते. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवित असत. सावित्रीबाई यांनी शिक्षिकेचे व्रत अंगीकारून पतीच्या कार्यात पूर्ण सहकार्य दिले. त्यांच्या या योगदानामुळे महिला-शिक्षणाची महाराष्ट्रातील अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते.

            शिक्षण पूर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हता, कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती. यासाठी सावित्रीबाईंनी खूप संघर्ष केला आणि या रूढीला तोडण्यासाठी पती जोतिबांच्या साहाय्याने 1 जानेवारी 1848 पासून शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आज आपण म्हणतो त्या पुण्याच्या भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. पती जोतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक साहाय्य न घेता सुरूवात करून दोघांनी पुढे अनेक शाळा सुरू केल्या. महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या.

            सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे बहुजन समाजाचे हे जोडपे आणि त्यांचे त्याकाळातील कार्य संस्मरणीय आहे. म. फुले यांनी मुलींसाठी काढलेल्या शाळेत लहुजी साळवे यांनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस पाठविले आणि राणबाच्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती. या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे. असे तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासून डगमगल्या नाहीत, ध्येयापासून परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि महिला शिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली. अस्पृश्याचे हाल पाहून जोतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. जोतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली.

            सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवयित्री, अध्यापिका, समाजसेविका देखील आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता खर्ची घातले.

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतीपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. त्यानंतरही सावित्रीबाई फुले यांनी आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.

            शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात... ‘विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन..’सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिकविणे सुरू केले, यात त्यांच्या जोडीने महिला शिक्षणाची ज्योत पुढे नेण्याचे काम केले ते फातिमा शेख यांनी. त्या खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या सहकारी, सखी आणि सहशिक्षिका मानल्या जातात. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा त्या समर्थपणे सांभाळत. काही ठिकाणी वाचनात येते की, महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यावेळेस उस्मान शेख यांनी त्यांना आपल्याकडे जागा दिली. फातिमा त्या उस्मान शेख यांची बहीण होत्या. १९२४-३० या काळात पुण्यातून मजूर हे मासिक प्रकाशित होत होते, त्या मासिकात सावित्रीबाईंसह फातिमा शेख यांचा फोटो छापला होता असा उल्लेख डॉ.मा.गो.माळी यांनी आपल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केला आहे. असाच फोटो लोखंडे नावाच्या ख्रिस्ती मिशनऱ्याने काढलेल्या पुस्तकातही प्रसिद्ध केला होता, हे दोन्ही फोटो सारखेच असल्याने सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांची ओळख पटते, असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेल्या एका पत्रात, ‘माझी तब्येत ठीक होताच मी परत येईन, फातिमाला सध्या त्रास होईल, पण ती कुरकूर करणार नाही, असा फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या.

            एकविसाव्या शतकात स्वतंत्र भारतातील महिला शिक्षण क्रांतीच्या मोठ्या टप्प्यावर उभे आहे. प्रामुख्याने शहरी विभागापुरते मर्यादित असलेले हे शिक्षण आता ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागापर्यंत विस्तारले आहे. एक महिला शिकली की, ती सारे कुटुंब साक्षर करते, संस्कारक्षम करते, या महात्मा फुलेंच्या वचनाला स्मरून महिला-शिक्षणाला भारतवर्षाने प्राधान्यक्रम दिला आहे. महिलेला शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत आता समान संधी आहे. ज्या देशात महिलांचे कर्तृत्व जगाला गवसणी घालते, त्या देशात महिलांचा आणि महिला शिक्षणाचाही खऱ्या अर्थाने सन्मान होतो. याची सुरूवात सावित्रीबाईंनी केली, याचे श्रेय निश्चितच त्यांना जाते.

            महाराष्ट्र राज्य हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रातील प्रागतिक राज्य असून सावित्रीबाई फुले दत्तक योजनेची अभिनव कल्पना महाराष्ट्रात राबविली गेली. बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा पायंडा महाराष्ट्रात प्रथम पाडला गेला. असंख्य अडचणींवर मात करून महिला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘महिला शिक्षणदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या ३ जानेवारी या जन्मदिवसापासून ते शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या १२ जानेवारी या जन्मदिनापर्यंत शाळांमधून ‘जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत.

            महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, महिला उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या क्रांतिज्योति सावित्रीबाईंना त्यांच्या जयंती दिनानिमित्त वनम्र अभिवादन!

००००


 



 केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया योजनेत अनुसुचित जाती व नवबौद्ध समाजाच्या

घटकांकरीता मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याबाबत आवाहन

 

            मुंबईदि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागशासन निर्णय क्र. मासाका/२०१८/प्रक्र. २५९ (२)/अजाकदिनांक 08 मार्च२०१९ अन्वये केंद्र शासनाच्या स्टैंड अप इंडिया या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्याच्या अनुसुचित जातीच्या सवलती घेण्यास पात्र असलेला अनुसुचित जाती व नवबौद्ध घटकातील नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षम नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थ्यांना एकुण प्रकल्प किमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्श्यामधील २५ % मधील जास्तीत जास्त १५ % मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

            योजने बाबत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागमहाराष्ट्र राज्यशासन निर्णय क्र. मासाका /२०१८/प्रक्र. २५९(२)/अजाकदिनांक ०८ मार्च२०१९ मध्ये प्रस्ताव सादर करण्याबाबत सर्व माहिती देण्यात आलेली आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांना सुंदर योजनेचा लाभ घेण्यासाठी शासन निर्णयामध्ये नमुद माहितीनुसार सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरचेंबुर४०००७१ यांचे कार्यालयामध्ये योजनेच्या लाभाकरीता अर्ज सादर करावा.

            अर्ज करण्यासाठी कार्यालयाचा पत्ता सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगरप्रशासकीय इमारत था मजलाआर. सी. मार्गचेंबुर (पूर्व)मुंबई ४०० ०७१ दुरध्वनी ०२२ २५२२२०२३ईमेल आयडी acswomumbaisub@gmail.com या पत्यावर अर्ज करावा. असे सहायक आयुक्तसमाज कल्याणमुंबई उपनगर यांनी कळविले आहे.

००००


नृत्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस

आचार्य पार्वतीकुमार" राज्य सांस्कृतिक पुरस्कार

 

            मुंबई,  दि. 30 : राज्यात एकूण 12 विविध सांस्कृतिक क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्य सांस्कृतिक पुरस्कार देऊन दरवर्षी सन्मानित करण्यात येते.यापैकी "नृत्य" या कलाक्षेत्रातील पुरस्कार यावर्षापासून आचार्य पार्वतीकुमार" यांचे नावाने देण्यात येईल. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे .

००००


मुंबई शहर जिल्ह्यातील अनुसूचित जातीप्रवर्गातील विद्यार्थ्यांना

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता राबविण्यात येणारी भारत सरकार मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती योजना (GOIPMS-SC) साठी सन २०२१-२२ या चालू शैक्षणिक वर्षासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता महाडिबीटी पोर्टल http://mahadbt.gov.in  या संकेतस्थळावर दि १४ डिसेंबर २०२१ पासून प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. या पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याकरिता शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नूतनीकरण (Renewal) ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम मुदत दि. ०४ जानेवारी २०२२ आहे तर शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या नवीन अर्ज (Fresh) ऑनलाईन सादर करण्याची अंतिम मुदत दि. ०९ जानेवारी२०२२ आहे. तरी मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व महाविद्यालांमध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थी, सर्व प्राचार्यकर्मचारी यांना शिष्यवृत्तीचे अर्ज अचूक भरावे असे, आवाहन  मुंबई शहरचे सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण, यांनी केले आहे.

00000

 

Featured post

Lakshvedhi