Thursday, 30 December 2021

  


बँकांनी स्वयंसहाय्यता समुहांना संवेदनशीलता ठेऊन आर्थिक पाठबळ द्यावे.

- डॉ.हेमंत वसेकr

            मुंबई, दि. 29 : सर्व बँकर्सनी ग्रामीण भागातील बचतगटांना कर्ज वितरण करताना संवेदनशील दृष्टीकोन ठेवायला हवा, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.हेमंत वसेकर यांनी केले.

            नवी मुंबई येथील महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानच्या राज्य कक्षातर्फे राज्यातील सर्व सार्वजनिक, खाजगी व सहकारी क्षेत्रातील बँकर्सच्या राज्यस्तरीय प्रमुखांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. राज्यातील स्वयंसहायता समूहांना योग्यवेळी पतपुरवठा उपलब्ध करणे, खाते उघडणे, समूह सदस्यांना विमा सुरक्षा कवच उपलब्ध करणे हे विषय कार्यशाळेत चर्चिले गेले.

            राज्यातील सर्व बँकर्स सोबत आयोजित चर्चासंवादात बँकांनी केलेल्या कामगिरीबाबत बँकनिहाय आढावा घेण्यात आला. या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अतिरिक्त संचालक परमेश्वर राऊत यांनी सादरीकरण केले. रिझर्व बँकेच्या निर्देशांप्रमाणे बँकांनी प्राधान्य क्षेत्राला पतपुरवठा करणे अपेक्षित आहे. त्यामुळे वंचित घटकांना उपजिविकेची साधने उपलब्ध होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळते, असे प्रतिपादन त्यांनी केले. प्रत्येक बँकेची उद्दिष्ट व साध्य, बँकांचा प्रादेशिक विभागनिहाय दृष्टीकोन, भविष्यातील नियोजन आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांसाठी प्रोत्साहन कार्यक्रम याविषयीची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

            एचडीएफसी बँकेने पतपुरवठ्याचे उद्दिष्ट पूर्ण केल्याबद्दल बँकेला अभियानाकडून गौरविण्यात आले. एचडीएफसी बँकेने त्यांनी अंगिकारलेल्या कार्यपद्धतीबद्दल अन्य बँक प्रमुखांना माहिती देण्यात आली.

            याच कार्यशाळेत बँक ऑफ इंडियासोबत ग्रामीण बचत गटांना अल्पदराने पतपुरवठा करण्याबाबत सामंजस्य करारही करण्यात आला. राज्यस्तरीय बँकर्स समितीच्यावतीने राजेश देशमुख यांनी राज्यातील सर्व बँका महिला स्वयंसहायता समुहांना सर्वप्रकारे सकारात्मक मदत करतील व महाराष्ट्र देशात सर्वात पुढे राहील यासाठी प्रयत्न करतील, असे प्रतिपादन केले.

             राज्यातील सर्व प्रमुख बँकांचे अधिकारी प्रतिनिधी, अभियानाचे उपसंचालक डॉ.राजेश जोगदंड, अभियान व्यवस्थापक श्रीमती कावेरी पवार यावेळी उपस्थित होते.

 कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाच्या कामासाठी कालबद्ध आराखडा तयार करावा

- वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

            मुंबई, दि. 29 : नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील रेडिओथेरपी विभागाचे श्रेणीवर्धन करण्यात येत असून येथे कर्करोग उपचाराच्या अत्याधुनिक सोयीसुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे कॅन्सर इन्स्टिट्यूट बांधकामाला गती देण्यात यावी, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.

            नागपूर कॅन्सर रुग्णालयाच्या कामाबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंह, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, सहसंचालक डॉ.अजय चंदनवाले, उपसचिव प्रकाश सुरवसे यांच्यासह नागपूर कॅन्सर रुग्णालयासाठी काम करणारे संबंधित उपस्थित होते.

            श्री. देशमुख म्हणाले की, या इन्स्टिट्यूटच्या बांधकामासाठी सुमारे 76.10 कोटी रुपये खर्चास प्रशासकीय मान्यात देण्यात आली आहे. इन्सिट्यूट उभारणी करीत असताना बांधकाम कशा पद्धतीने करण्यात येणार आहे, यामध्ये कोणत्या सुविधा असणार आहेत याबाबतची माहिती वैद्यकीय संचालक यांनी घ्यावी. बांधकाम करीत असताना यंत्रसामग्री, सोयी सुविधा आणि मनुष्यबळ निर्मिती कशा पद्धतीने करण्यात येणार आहे याबाबतची माहितीही देण्यात यावी. तसेच औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व कर्करोग रुग्णालय यांनी कर्करोग रुगणालय बांधताना टाटा स्मृती कर्क रुग्णालयाची मदत घेतली असून या इन्स्टिट्यूट उभारणीसाठीही मदत घेण्यात यावी.

            निविदा प्रक्रिया ते काम पूर्ण होईपर्यंतचा कालावधी याचा समावेश करुन बांधकामाबाबतचा कालबद्ध आराखडा तयार करण्यात यावा. रुग्णालय ठिकाणी शांततेची आवश्यकता असल्याने साऊंड प्रूफ यंत्रणा कशी बसविता येईल याबाबतही इन्स्टिट्यूट उभारणीदरम्यान विचार करण्यात यावा, असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.

 सर्व एमआयडीसी परिसरात इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारणार

- सुभाष देसाई

· देशातील पहिल्या इव्ही पोलचे उद्घाटन

            मुंबई, दि. 29 : भायखळा व दादर परिसरातील इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांसाठी मजेंडा व मध्य रेल्वेच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या चार्जिंग पोलचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते परळ येथे करण्यात आले.

            राज्यात दिवसेंदिवस इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विशेष धोरण तयार केले असून इलेक्ट्रीक दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना अनुदान देण्यात येते. एका बसमागे २० लाख रुपये अनुदान दिले जाते. याशिवाय इलेक्ट्रिक वाहने, उत्पादन, चार्जिंग स्टेशन आदींसाठी अनुदान दिले जाते. विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांच्या नोंदणीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग स्टेशनची संख्या वाढत आहे. येत्या काळात केंद्राने अधिक प्रोत्साहने वाढविण्यावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे श्री. देसाई म्हणाले.

            इंधनांवर चालणारी वाहने भंगारात विकली तर इलेक्ट्रिक वाहने घेण्यासाठी सवलत दिली जाणार आहे. त्यामुळे येत्या काळात अधिकाधिक इलेक्ट्रिक वाहने वापरण्याची गरज आहे, असे श्री. देसाई म्हणाले.

             राज्यातील सर्व एमआय़डीसी परिसरात इव्ही चार्जिंग स्टेशन्स उभारली जाणार असून असून त्यासाठी जमीन व इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

००००


 

 D


Wednesday, 29 December 2021

 कोविडच्या प्रादूर्भावातही मुंबई महानगरपालिकेचे काम उत्तम नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

         मुंबई हे अधिक लोकसंख्येचे प्रगत शहर आहे. या शहराचे जगभर आकर्षण आहे. रोजगारासाठी देशभरातून नागरिकांना मुंबईत यावेसे वाटतेयामुळे लोकसंख्या वाढून महानगरपालिकेवरील ताण वाढतोय. महापालिकेसमोर विविध आव्हाने आहेत. त्यावर मात करून महापालिका उत्तम काम करीत असल्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावास उत्तर देताना सांगितले. एमएमआरडीए ने कोविड रूग्णांसाठी देशातील पहिले जम्बो फील्ड रूग्णालय उभारले. महापालिकेच्या संबंधित सर्वांनी जीव धोक्यात घालून काम केले. कोविड काळात झालेल्या कामांबद्दल निती आयोगासह मुंबईचे सर्वत्र कौतुक झाले. निती आयोगानुसार आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. इज ऑफ डुईंगमध्ये महापालिकेच्या सर्व सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. शहरातील दोन हजार किमी रस्ते येत्या पाच-सहा वर्षात काँक्रीटचे केले जातील असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.

 जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची प्रशासनाकडून तयारी

22 ठिकाणी पार्किंग तर 260 बसेसची व्यवस्था

            पुणे, दि. 28 : कोरेगावनजिक पेरणेफाटा येथील जयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाची शासनस्तरावरुन नियोजन सुरू असून जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक पूर्वतयारी करण्यात येत आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा मिळाव्यात तसेच शांततामय वातावरणात कार्यक्रम व्हावा यासाठी प्रशासकीय पातळीवर विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

            जयस्तंभास आकर्षक फुलांची सजावट तसेच सुशोभिकरण करण्यात येणार आहे. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून कार्यक्रमाचे थेट प्रसारण करण्यात येणार आहे. अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी समाज कल्याण विभाग, जिल्हा प्रशासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) मार्फत नियोजन सुरू आहे.

            जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे. त्यानुसार पोलिस विभाग, जिल्हा परिषद विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, पी.एम.पी.एल., राज्य परिवहन महामंडळ, अन्न व औषध प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभाग, बार्टी, समाज कल्याण आयुक्तालय, महावितरण कंपनी, जिल्हा माहिती कार्यालय यांच्यासह विविध विभागाकडून आवश्यक कामे करण्यात येत आहेत.

            कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून प्रथमोपचार केंद्र उभारण्यात येत असून ५ सुसज्ज रुग्णवाहिका व १५ इतर रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व खाजगी दवाखान्यात १० टक्के खाटा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी परिसरात ड्राय डे घोषित करण्यात आला आहे.

            अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांची वाहने पार्किंग करण्यासाठी एकूण २२ ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे व तेथून जयस्तंभ येथे जाण्यासाठी पुणे महानगर परिवहन मंडळाच्यावतीने ३१ डिसेंबर व १ जानेवारी रोजी २६० बसची व्यवस्था करण्यात आली आहे.

वाहतूक मार्गात बदल

            चाकण ते शिक्रापूर व शिक्रापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल.

            अहमदनगरकडून पुणे मुंबईकडे येणारी जड वाहने ही शिरुर, न्हावराफाटा, न्हावरा, पारगाव, चौफुला, यवत, हडपसर मार्गे पुण्याकडे येतील. पुण्याकडून अहमदनगरकडे जाणारी जडवाहने खराडी बायपास येथून हडपसर, पुणे-सोलापुर महामार्गाने चौफुला, केडगाव मार्गे न्हावरा, शिरुर, अहमदनगर अशी जातील.

            सोलापुर रस्त्यावरून आळंदी-चाकण भागात जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो ट्रक) ही वाहने हडपसर, मगरपट्टा, खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी व चाकण येथे जातील.

            मुंबई येथुन अहमदनगरकडे जाणारी जड वाहने, माल वाहतूक (टेम्पो/ट्रक) वाहने वडगांव मावळ, चाकण, खेड, मंचर, नारायणगांव, आळेफाटामार्गे अहमदनगरकडे जातील. मुंबई येथून अहमदनगरकडे जाणारी हलकी वाहने वडगाव मावळ, चाकण, खेड, पाबळ, शिरुरमार्गे अहमदनगर येथे जातील.

            आळंदी- शेलपिंपळगाव बहुळ साबळेवाडी दोन्ही बाजूकडील जाणारी येणारी सार्वजनिक तसेच खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. आळंदी मरकळ लोणीकंदकडे जाणारी येणारी दोन्ही बाजूकडील सार्वजनिक तसेच खाजगी प्रवासी वाहतूक पूर्णपणे बंद असेल.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाहतूक बदल

            नाशिककडून येणारी मोठी वाहने शिक्रापूरकडे न जाता तळेगाव चाकण चौकातून मोशी व तळेगावकडे जावू शकतील.

            देहूरोड येथे मुंबई जुन्या महामार्गाने येणारी वाहने सेंट्रल चौकातून निगडी पिंपरी-चिंचवडकडे न सोडता सेंट्रल चौकाकडून मुंबई बेंगलोर महामर्गाने सरळ वाकडनाका, चांदणी चौकातून इच्छीत स्थळी जावू शकतील.

            मुंबईकडून एक्स्प्रेस महामार्गाने पुणेकडे येणारी वाहने उर्से टोल नाका येथून मुंबई बेंगलोर महामार्गाने (निगडी मुकाई चौकाकडे न जाता) वाकडनाका व राधा चौक येथून पुणेकडे जावू शकतील.

            मुंबईकडून एक्सप्रेस हायवेने खिंडीतून तळेगावकडे जाणारी वाहतूक वडगाव फाट्याकडे न जाता उर्से टोल नाका येथून देहूरोडकडे जाणारा बाह्यवळण रोडने जावू शकतील.

            नाशिक व तळेगावकडून येणारी वाहतूक तळेगाव चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता मोशी नाशिकफाटा मार्गे पुणे शहरकडे जावू शकतील. 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून 1 जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतुकीत बदल करण्यात आला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडचे पोलीस उप आयुक्त आनंद भोईटे यांनी दिली.

0000


Featured post

Lakshvedhi