Tuesday, 14 December 2021

 खासदार सदाशिवराव लोखंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट              

            नवी दिल्ली, 13 : शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली.

          परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी तथा प्रभारी उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी श्री. लोखंडे यांचे स्वागत केले. उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

            यावेळी श्रीमती अरोरा यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राद्वारे प्रका‍शित करण्यात येणारी प्रकाशने, प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय, कार्यालयाच्या सोशल मिडीयावरुन देण्यात येणारी माहिती, दिल्लीस्थित विविध राज्यांच्या माहिती व जनसंपर्क विभागांशी साधण्यात येणाऱ्या समन्वयाबाबत माहिती दिली. तसेच, परिचय केंद्राच्यातवीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही दिली. श्री.लोखंडे यांनी परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

 राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे निकाली

१४७७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल जमा

            मुंबई, दि. १३ : राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये मिटलेल्या प्रकरणांची संख्या ही देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आहे. या वर्षातील शेवटच्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या माध्यमातून महाराष्ट्रात एकूण १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे एका दिवसात निकाली निघाली आहेत. या प्रकरणांच्या माध्यमातून शासनाला १४७७ कोटी रुपयांचा विक्रमी महसूल मिळाला आहे.  

            राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या निर्देशानुसार मुख्य न्यायमूर्ती व प्रमुख आश्रयदाते, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण श्री. दिपाकर दत्ता व न्यायमूर्ती श्री. अमजद सय्यद, कार्यकारी अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण याच्या मार्गदर्शनाखाली दि.११ डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्रातील सर्व न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.

            महाराष्ट्रातील ३४ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, ३ उच्च न्यायालय विधी सेवा समिती/ उपसमित्या आणि ३०९ तालुका विधी सेवा समित्या येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोक अदालतीमध्ये एकूण १४८२ पॅनल ठेवण्यात आलेले होते. या पॅनलसमोर ४८ लाख ७ हजार ६३२ वाद दाखलपूर्व प्रकरणे आणि ४ लाख ५ हजार ६४७ प्रलंबित प्रकरणे अशी एकूण ५२ लाख १३ हजार २७९ प्रकरणे ठेवण्यात आलेली होती.

            त्यापैकी एकूण १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे ज्यामध्ये १४ लाख १८ हजार ९७० बाद दाखलपूर्व प्रकरणे, ५७ हजार २४७ प्रलंबित प्रकरणे आणि विशेष बैठकीमध्ये ४७ हजार ४१९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. १५ लाख २३ हजार ६३६ प्रकरणे निकाली काढण्यात आली.

            यामध्ये सोलापूर येथे २७ वर्षापासून प्रलंबित असलेला दावा राष्ट्रीय लोक अदालतीचे पॅनल सदस्य व वकिल यांच्या प्रयत्नातून तडजोडीने निकाली निघाला. तसेच अंबेजोगाई तालुका विधी सेवा समितीसमोर भू-संपादन प्रकरण १० वर्षापासून प्रलंबित होते. ते राष्ट्रीय लोक अदालतीसमोर तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. या प्रकरणामध्ये ८० वर्षीय वयोवृध्द पक्षकाराला न्यायालयीन इमारतीच्या पायऱ्या चढून पॅनलसमोर येणे शक्य नसल्याने लोक न्यायालयाचे पॅनलवरील न्यायाधीश व इतर सदस्यांनी न्यायालयीन इमारतीच्या बाहेर पक्षकाराकडे जाऊन तडजोड नोंद केली व न्याय तुमच्या दारी या उक्तीचा प्रत्यय आणून दिला.

            या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये महाराष्ट्रातील वाहतूक विभागाची ट्रॅफिक ई-चलानची ३६ लाखापेक्षा जास्त प्रकरणे वाद दाखलपूर्व स्वरुपात राष्ट्रीय लोक अदालतीसमोर ठेवण्यात आलेली होती. त्यामध्ये जवळपास १२ लाख (एकूण ११,९२,६६१) प्रकरणे तडजोड होऊन निकाली निघाली व त्यामधून महाराष्ट्र शासनाच्या वाहतूक विभागाला रु ५१ कोटीपेक्षा जास्ती रुपयाचा निधी वसूल होऊन मिळाला. या सर्व ३६ लाख प्रकरणांमध्ये संबंधित पक्षकारांना आभासी पध्दतीने नोटीस पाठविण्यात आलेल्या होत्या.

            राष्ट्रीय लोक अदालत हे 'कोव्हिड-१९' या पार्श्वभूमीवर आयोजीत करण्यात आलेले असल्याने सर्वांना 'कोव्हिड-१९ साठी शासनाने जारी केलेल्या आदेश व नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत आदेशित केलेले होते. न्यायालयात होणारी गर्दी टाळण्यासाठी पक्षकारांना आभासी पद्धतीने सुद्धा हजर राहण्याची मुभा देण्यात आलेली होती.

            राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये तडजोड झाल्यानंतर उभयतांच्या संमतीने लेखी तडजोड नोंद केली जाते व त्याआधारे अॅवार्ड पारीत केला जातो तो अॅवार्ड अंतिम असतो व त्याला हुकूमनाम्याचे स्वरूप प्राप्त होते. त्या अवार्डच्या विरुद्ध अपीलाची तरतूद नाही.

            महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष, न्यायमूर्ती अमजद सय्यद, यांनी महाराष्ट्रातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणे, तालुका विधी सेवा समित्या यांच्यासोबत अनेकवेळा बैठका घेतल्या. तसेच या सर्व प्राधिकरणांना व समित्यांना राष्ट्रीय लोक अदालतीच्या यशस्वीतेसाठी लोक अदालतीपूर्वी वेगवेगळ्या बैठका घेऊन पक्षकारांना त्यांच्या प्रकरणाबाबत मार्गदर्शन करण्यासाठी आवाहन केलेले होते. या सर्व प्रयत्नामुळे राष्ट्रीय लोक अदालतीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.

            त्यामुळे यावेळीच्या राष्ट्रीय लोक अदालतीत मोटार अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, बँकांचे वसुलीचे दावे, कोर्टात प्रलंबित असलेले तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, वैवाहिक प्रकरणे, धनादेश अनादर झाल्याचे खटले, वीज कंपन्यांनी दाखल केलेले खटले, वित्त संस्था तसेच भ्रमणध्वनी कंपन्या यांची रक्कम वसुली प्रकरणे व पोलीसांची वाहतूक चलनाबाबतची प्रकरणे मोठ्या प्रमाणात ठेवण्यात आलेली होती, अशी माहिती महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबईचे सदस्य सचिव, दिनेश सुराणा यांनी दिली.


0000



 ऊर्जा संवर्धनाच्या जनजागृतीसाठी 14 डिसेंबर रोजी मुंबईत चित्ररथाचे आयोजन     

            मुंबई, दि. 13 : महाऊर्जातर्फे दरवर्षी 14 डिसेंबर हा ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस’ व दि. 14 ते 20 डिसेंबर हा कालावधी ‘ऊर्जा संवर्धन आठवडा’ राज्यात साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून महाऊर्जातर्फे जनसामान्यात ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने ऊर्जा संवर्धन चित्ररथाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्ररथाचे उदघाटन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, यांच्या हस्ते दि.14 डिसेंबर, 2021 रोजी 10:30 वाजता मुंबई येथे करण्यात येणार आहे. या चित्ररथाद्वारे राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयीची माहिती चित्रफितीच्या माध्यमातून प्रसारित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या चित्ररथावर लावलेल्या पोस्टर्सद्वारे सर्वसामान्यांना ऊर्जा बचतीचा संदेश देण्यात येणार आहे. तसेच ऊर्जा बचतीचे महत्व पटवून दिले जाणार आहे.

            राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक कार्यक्रम (State Level Energy Conservation Award) - महाऊर्जातर्फे राज्यात ऊर्जा संवर्धन आणि ऊर्जा व्यवस्थापन यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या घटकांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्यस्तरीय ऊर्जा संवर्धन पारितोषिक योजनेचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी या योजनेमध्ये 17 विविध क्षेत्रामधून विविध घटक (औद्योगिक, व्यावसायिक इमारती, शासकीय इमारती, लघु व मध्यम उद्योग, एमआयडीसी इ.) सहभागी होतात. 16 व्या राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन कार्यक्रमांतर्गत एकूण 78 घटकांनी सहभाग नोंदविला असून 46 विजेत्यांची यादी महाऊर्जा संकेतस्थळावर ऊर्जा संवर्धन दिन दि. 14 डिसेंबर, 2021 रोजी जाहिर करण्यात येणार आहे.

            रेडिओ जिंगलद्वारे जनजागृती - राज्यातील आकाशवाणी, रेड एफ.एम. व 91.1 एफ.एम. या रेडिओ चॅनलद्वारे ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान “एक मंत्र आणि एक विचार, वीज बचतीचा करु प्रसार...." या रेडिओ जिंगलचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.

            शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाची जनजागृती - राज्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालयांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृतीसाठी पोस्टर्स व बॅनर्सचे वितरण महाऊर्जा विभागीय कार्यालयांमार्फत ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत आहे.

            शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती - महाऊर्जामार्फत राज्यातील 400 शाळांमध्ये ऊर्जा क्लबची स्थापना करण्यात आली असून ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्याच्यादृष्टीने चित्रकला स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, निबंध स्पर्धा इ. चे आयोजन करण्यात येत आहे.

            ऊर्जा संवर्धनावर आधारित Graffity / Wall painting चे आयोजन - वास्तुविशारद / कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा संवर्धनावर आधारित Graffity / Wall painting चे आयोजन करण्यात आले असून त्यातून निवड केलेले चित्र महाऊर्जा कार्यालयाच्या भिंतीवर रंगविण्यात येणार आहे. त्याप्रमाणेच इतर शासकीय, निमशासकीय कार्यालयांच्या भिंतीवर चित्रे रंगविता येणार आहेत.

            विविध घटकांसाठी क्षमता बांधणी कार्यक्रम - राज्यातील विविध घटकांमध्ये ऊर्जा संवर्धनाविषयी जनजागृती करण्यासाठी क्षमता बांधणी कार्यक्रमांतर्गत दृकश्राव्य माध्यमातून वेबिनारचे आयोजन ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान करण्यात येत आहे.

            अभियांत्रिकी / औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांसाठी ऊर्जा परीक्षण संयंत्राचे प्रदर्शन शिबीर - अभियांत्रिकी / औद्योगिक प्रशिक्षण संस्थाच्या विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा संवर्धन संयंत्राची माहिती होणेसाठी तसेच ऊर्जा परीक्षणासाठी या संयंत्राचा वापर कशाप्रकारे केला जातो याची संक्षिप्त माहिती देण्यासाठी, महाऊर्जा मुख्यालयात ऊर्जा संवर्धन सप्ताहादरम्यान ऊर्जा परीक्षण संयंत्राचे प्रदर्शन शिबीर आयोजित करण्यात येत आहे.


०००



 विद्यार्थ्याला पर्यावरणाविषयी जबाबदार नागरिक बनविणार


- शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड

'माझी वसुंधरा अभ्यासक्रम' शालेय शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द

            मुंबई, दि. 13 : शिक्षण म्हणजे केवळ शालेय अभ्यासक्रम नसून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जबाबदार नागरिक घडविणे याला अधिक महत्त्व आहे. वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी पर्यावरण विभागाने अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम तयार केला असून शालेय शिक्षण विभाग त्याची कालबद्ध अंमलबजावणी करून आपली जबाबदारी निश्चित पूर्ण करेल, असे शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

            राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाने युनिसेफच्या साहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी वातावरणीय बदल म्हणजे नक्की काय, त्याचे परिणाम आणि आपण काय करायला हवे याबाबत माहिती देणारा ‘माझी वसुंधरा’ अभ्यासक्रम तयार केला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या अभ्यासक्रमाची पुस्तके शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांच्याकडे सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द केली. यावेळी शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ऑल इंडिया इन्स्टिट्युट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे महासंचालक जयराज फाटक, युनिसेफचे श्रीमती राजलक्ष्मी, श्री.युसूफ, माझी वसुंधराचे अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी यावेळी उपस्थित होते.

            शालेय शिक्षण मंत्री प्रा.गायकवाड म्हणाल्या, पर्यावरण विभागाने माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून अतिशय चांगले उपक्रम राबविले आहेत. वातावरणीय बदलांविषयी भावी पिढीला जागरूक करण्यासाठी शालेय अभ्यासक्रम हा त्यातील अत्यंत उपयुक्त उपक्रम ठरेल. शालेय शिक्षण विभागामार्फत नववीपासून पुढे असा अभ्यासक्रम यापूर्वीच शिकविला जातो. आता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये जागृतीसाठी नवीन अभ्यासक्रम मोलाचा ठरेल. शालेय शिक्षण विभागामार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अभ्यासक्रमासाठी समिती कार्यरत आहे. या समितीमध्ये पर्यावरणविषयक तज्ज्ञांचाही समावेश करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य आहेच, तथापि भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचण येऊ नये यादृष्टीने पहिलीपासून द्वैभाषिक अभ्यासक्रम शिकविण्याचे नियोजन असल्याचेही त्या म्हणाल्या.

स्वत:ला वाचवायचे असेल तर वातावरणीय बदलांबाबत आजच कृती आवश्यक

– पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

            या अभ्यासक्रमाची आवश्यकता सांगताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदल ही आता जागतिक समस्या बनली असून ती प्रत्येकाच्या दारापर्यंत पोहोचली आहे. यावर मात करण्यासाठी शासन विविध मार्गांनी प्रयत्न करीत आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला अभ्यासक्रम हा त्याचाच एक भाग असून विद्यार्थ्यांना बालपणापासूनच वातावरण बदलांविषयी तसेच त्यासाठी करावयाच्या उपाययोजनांविषयी माहिती होणे अत्यावश्यक आहे. वातावरणीय बदलांचे परिणाम ही गंभीर बाब बनली असून त्यापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर ही समस्या रोखण्यासाठी समाजातील प्रत्येकाने आजपासूनच कृती करणे आणि पर्यावरणपूरक सवयी अंगिकारणेही गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

            श्रीमती कृष्णा म्हणाल्या, वातावरणीय बदल ही गंभीर बाब असून त्याचा शालेय अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत, पर्यावरण विभागाने तयार केलेला अभ्यासक्रम त्यादृष्टीने अतिशय उपयुक्त ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

            प्रास्ताविकात श्रीमती म्हैसकर म्हणाल्या, वातावरणीय बदलासंदर्भातील परिणाम सर्वांना जाणवत आहेत. पर्यावरण विभाग त्याच्या परिणामांना रोखण्यासाठी विविध उपक्रम राबवित आहे. ‘माझी वसुंधरा अभियान’, इलेक्ट्रीक वाहन धोरण, 43 अमृत शहरांचा कार्बन न्युट्रॅलिटीकडे प्रवास आदी उपक्रमांची माहिती देऊन एक वर्षापूर्वी युनिसेफसोबत केलेल्या करारानुसार शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

            युनिसेफच्या श्रीमती राजेश्वरी आणि श्री.युसूफ यांनी यावेळी या अभ्यासक्रमाविषयी माहिती दिली. युनिसेफने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अंतर्गत रिजनल सेंटर फॉर अर्बन अँड इन्व्हायर्नमेंटल स्टडीज तसेच सेंटर फॉर इन्व्हायर्नमेंट एज्युकेशन, पुणे व शालेय अभ्यासक्रम तयार करणारे पर्यावरण तज्ज्ञ यांच्या साहाय्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यामध्ये जैवविविधता संवर्धन, घनकचरा व्यवस्थापन आणि वैयक्तिक आणि समुदाय आरोग्य, जलस्रोत व्यवस्थापन, ऊर्जा, वायू प्रदूषण आणि वातावरण बदल या विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

00000

Monday, 13 December 2021

Indian beauty world beaity

 


Family


 

 कैद्यांची मानसिकता बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न आवश्यक

- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

            मुंबई दि. 13 : “सुधारणा आणि पुनर्वसन” असे ब्रीद असलेल्या महाराष्ट्र कारागृह प्रशासनाकडून कारागृहात असलेल्या बंदीजनांचे पुनर्वसन करण्याबरोबरच त्यांची मानसिकता आणि वर्तणूक बदलण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न व्हावेत, असे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले.

            महाराष्ट्रातील पाच मध्यवर्ती कारागृह आणि एक सुधारगृह येथील बंद्यांच्या (न्यायाधीन आणि शिक्षाधीन) कल्याण व पुनर्वसनाकरिता दि टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या पथदर्शी प्रकल्पाचे सादरीकरण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत झाले. महाराष्ट्र शासन आणि दि टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेस यांच्यासोबत सामंजस्य करार करण्याच्या प्रस्तावास गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी मान्यता दिली. नागपूर, तळोजा, येरवडा, नाशिक व औरंगाबाद या पाच मध्यवर्ती कारागृहांमध्ये आणि किशोर सुधारालय, नाशिक येथे हा प्रकल्प राबविण्यात येत आहे.

            या सामजस्य करारामुळे बंद्यांना कायदेविषयक सहाय्य, शारीरिक-मानसिक आरोग्य सेवा तसेच कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन त्यांच्यात मूलगामी परिवर्तन घडविण्यास निश्चित मदत होईल, असा विश्वास गृहमंत्री श्री.वळसे-पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

            बंदी कारागृहात शिक्षा भोगत असतांना त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक अडचणी भासत असतात. हे लक्षात घेता त्यांच्या कुटुंबियांना शिक्षण, वैद्यकीय मदत तसेच सदस्यांच्या लग्नासाठी कर्जस्वरूपात आर्थिक मदत देण्यासाठी विशेष धोरण तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. यामुळे शिक्षेदरम्यान केलेल्या कामातून त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहास मदत होऊ शकते असेही ते म्हणाले. गृह विभागाने यासंदर्भात पुढाकार घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

            या बैठकीस अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, अपर मुख्य सचिव आनंद लिमये, प्रधान सचिव संजय सक्सेना, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस चे प्राध्यापक डॉ.विजय राघवन यांसह गृह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


००००



Featured post

Lakshvedhi