सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी
'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा करावा
गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठक
मुंबई, दि. 13 : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये भारताने जगाला ऑपरेशन सिंदूरद्वारे दाखविलेली शक्ती आणि स्वदेशी वस्तूंच्या वापराविषयी जनजागृती करावी. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी प्रशासनासोबत समन्वय ठेवून हा गणेशोत्सव शांतता व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करीत ' ऑपरेशन सिंदूर' वर आधारित देखावे हे जवानांसाठी समर्पित असण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गणेशोत्सवा दरम्यान गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारे अडचणी येणार नाहीत, त्यापद्धतीने कार्यवाही करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या. सार्वजनिक गणेशोत्सव निमित्त कायदा व सुव्यवस्था बैठकीचे आयोजन सह्याद्री अतिथीगृह येथे करण्यात आले.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाप्रमाणे मूर्तीकरांनाही सलग पाच वर्ष परवानगी देण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, मूर्तीकारांनी या परवान्यांचे दरवर्षी नूतनीकरण करावे. परवानगीसाठी महापालिके मार्फत सुरू करण्यात आलेल्या संगणकीय प्रणालीवर आधारित एक खिडकी योजनेचा लाभ घेण्यात यावा. गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी कृत्रिम तलावांची संख्या आणि उंच मूर्तींचे खोल समुद्रात विसर्जनासाठी बोटींची संख्याही समुद्रकिनारी वाढविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
No comments:
Post a Comment