Saturday, 29 March 2025

केशवतीर्थ प्रयासराज !* होय.हे तीर्थस्थळ भारतात ,त्र्यंबकेश्वर तालुक्यात हिवाळी नावाच्या गावात . ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे.

 *केशवतीर्थ प्रयासराज !*


होय.हे तीर्थस्थळ भारतात 

महाराष्ट्रात 

नाशिक जिल्ह्यात 

त्र्यंबकेश्वर तालुक्यात 

हिवाळी नावाच्या गावात .

ठाणापाडा नावाच्या आदिवासी पाड्यावर आहे.


ही जिल्हापरिषदेची बारा तास भरणारी बारमाही शाळा आहे.अगदी ३६५ दिवस अखंडपणे या शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक आनंदाने शाळेत येत असतात.रविवार नाही,दिवाळी नाही की कसलीही स्थानिक सुट्टी बिट्टी कुछ नही !

असं काय असतं या शाळेत ? 

यु ट्यूबवर या शाळेचा एक व्हीडीओ पाहण्यात आला.३६५ दिवस बारा तास भरणारी शाळा या थंबनेलने मला थांबवलं.मग एकच नव्हे तर या शाळेचे लागोपाठ अनेक व्हीडीओ समोर आले.आणि त्या शाळेबद्दल जे कळलं त्याने अनावरा उत्सुकता निर्माण झाली. 

याच अमाप कुतूहलाने मी या शाळेला भेट दिली.

या शाळेचे कर्ता करविता आहेत,

श्री.केशव गावित गुरूजी.

२००९ सालात डी.एड,होऊन या शाळेत शासनाकडून त्यांना 'टाकलं' गेलं.

बियाणं कसदार असलं की कुठल्याही मातीत टाकलं तरी जोमदारपणे वाढतं तसे गुरूजी स्वतः तर तिथे रूजलेच पण त्यांनी आजतागायत तिथे असंख्य रोपे फुलवली आहेत ;नव्हे तर नव्या पिकासाठी बियाणी तयार करण्याचा अखंड यज्ञ सुरू ठेवला आहे.

या शाळेत बालवाडी पासून सहावीपर्यंत विद्यार्थी आहेत.

शाळेला वेळापत्रक नाही पण बांधीव कृतिकार्यक्रम आहे.सकाळी साडेनऊ वाजता शाळा भरते ती रात्री साडेनऊला संपते.

शाळेचं बांधकाम पर्यावरण पूरक आहे.

या इमारतीत एकही खिडकी नाही पण दहा दिशातून येणारा उजेड वारा शाळेला मोकळा श्वास देतो,भिंती असलेल्या वर्गखोल्या नाहीत पण ज्ञानाच्या खोलीपर्यंत मुलं स्वतः उतरू शकतात.

या शाळेत अॕम्फी थिएटर आहे.

अद्ययावत वाचनालय आहे,

संगणककक्ष आहे.

बोलक्या भिंती आहेत,

गोशाळा आहे.परसबाग आहे.

या सा-यांशी जीवप्राण जोडलेले केशवगुरूजी आहेत,गावकरी आहेत आणि पासष्ट विद्यार्थी आहेत.

नेमलेला अभ्यासक्रम जून ते आॕक्टोबर पर्यंत पूर्ण होतो आणि नंतर सुरू होते ते अभ्यासक्रम मनात मुरवण्यासाठीचा कौशल्यविकास !


डावा आणि उजवा मेंदू सतत कार्यरत ठेवण्याचे

तो एकाच वेळी यशस्वी कार्यरत करण्याचे कौशल्य !


या शाळेतले विद्यार्थी दोन्हा हातांनी दोन वेगवेगळी कामं एकाचवेळी करतात.

दोन्ही हातांनी कितीही संख्येची उजळणी लिहितात.


म्हणजे डावा हात एक ते दहा लिहित असेल तर त्याच वेळी उजवा हात अकरा ते वीस पाढे लिहितो,


डावा हात मराठी शब्द लिहित असतो त्याच्याच समोर योग्य अंतरावर त्याच वेळी त्याच अर्थाचा इंग्रजी शब्द लिहिला जातो.


डाव्या हाताने लिहिलेल्या इंग्रजी किंवा मराठी शब्दांची दर्पण प्रतिमा ( mirror image )उजवा हात लिहितो.


डाव्या उजव्या हाताने कामं चाललेली असतांना तोंडाने संविधानाची कुठलीही  कलमे अचूक सांगता येतात.ही नुसती पाठांतराची पोपटपंची नसते.विद्यार्थी त्याचा अर्थही सांगू शकतात.(विचारून बघा ना,तुमची स्वतःची पाठ असली तर  संविधानातली कुठलीही कलमे नि पोटकलमे !)


रंगांची सुसंगत रचना करणारे ठोकळे  (  क्यूब साॕल्व्हर )  काही मिनिटात एका ओळीत सहज फिरवले जातात.

मुलं प्रश्न विचारतात.

यू ट्युबवर बघून वाद्य शिकतात,गाणी शिकतात,विविध भाषा शिकतात.

पाचवी सहावीचे विद्यार्थी खालच्या वर्गातल्या मुलांना शिकायला मदत करतात.त्यांची काळजी घेतात.

 

ही कौशल्ये माझ्याही अंगात नाहीत हे केशव गुरूजी मोकळळेपणी मुलांसमोरच कबूल करतात.कशी आत्मसात करता येतील त्याचे मार्ग ते दाखवतात आणि वर्षे तीन ते दहा बाराची पोरं पोरी त्या कौशल्यांचे बाप होतात.


गो पालन! यात गायीची काळजी घेणं,गोठा साफ करणं,शेणखत  तयार करणं ,गायीवर माया करणं याच शाळेतला अभ्यासक्रम आहे.

परसबाग फुलवणं,झाडांना पाणी घालणं ही या शाळेची दैनंदिनी आहे.शाळेच्या भोवती असलेल्या कुंडीत पाणी जास्त झालं आणि शाळेत ओघळ आले तर बालवाडीच्या मुलांचे चिमुकले हात फडक्याने ते पाणी टिपतात आणि झाडांच्या मुळांशी जाऊन पिळतात.


मी मुलांसाठी नेलेला केळी हा खाऊ खाऊन झाल्यावर सालपटांचा खाऊ लगोलाग गोमातेच्या मुखी घातला गेला.


केशव गुरूजींनी या शाळेत जी किमया केली तिचा सुरूवातीचा प्रवास खडतरच होता.तो वृत्तांत त्यांच्याशी केलेल्या संभाषणातून सोबतच्या व्हीडीओमधून  कळेल.

या शाळेला भेट दिल्यावर प्रभावित होणार नाही तो माणूसच नव्हे.

अनेक दानशुरांनी या शाळेला भरघोस मदत केली आहे.

श्री रमेश आणि उमा अय्यर या दांपत्याने या शाळेच्या दोन वेळच्या भोजनाची कायमस्वरूपी जबाबदारी उचललेली आहे.

विशेष म्हणजे नव्या ईमारतीच्या उद्घाटन सोहळ्यासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्र्यांसह इतर मंत्रीही भाषणात जास्त वेळ न दवडता संपूर्णपणे विद्यार्थ्यांच्या बरोबरच बोलत होते.


शासनाने गुरूजींच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या कामाच्या स्वातंत्र्यासाठी  आणि स्वातंत्र्यासाठी त्यांची बदली केलेली नाही.


या विद्यार्थ्यांना भारताच्या राजधानी दिल्लीत येण्याचे निमंत्रण खुद्द मा.पंतप्रधान श्री.नरेन्द्र मोदीजींनी दिले आहे.

या शाळेतले माजी विद्यार्थी MPSC च्या परीक्षेची तयारी करत आहेत.

इथल्या चिमुकल्यांना शास्त्रज्ञ , शेतकरी, चित्रकार,भाषाअभ्यासक,शिक्षक व्हायची स्वप्ने आहेत,त्यांच्या स्वप्नांना आकार देणारा कुशल हात केशव गुरूजींच्या रूपाने मुलांच्या पाठीशी आहे.आॕनलाईन आणि आॕफलाईन शिक्षणपद्धतीची डोळस सांगड त्यांनी घातली आहे.


त्यांची एकूलती मुलगी अनन्या ही सुद्धा बालवाडीत सगळ्यांबरोबरच शिकते आहे.तिनेही सगळी कौशल्ये आत्मसात करायला सुरूवात केली आहे.


गुरूजींनी आजवर नाटक सिनेमा यांची चैन केलेली नाही.घरातील लग्न असो की विघ्न यात ते जरुरीपीरताच सहभाग घेतात.पत्नी सविता आणि आईवडील भावंडं यांचा पूर्ण पाठिंबा गुरूजींना आहे.

 


बाकी माझ्यासारख्या सामान्य निवृत्त शिक्षिकेने तासादोन तासांच्या भेटीत

राजकारण,जातीधर्मकारण ,या बाहेर जाऊन संविधानाचे मर्म मुलांच्या मनात रुजवून त्यांचे शेत पिकवणा-या

व्यावहारिक प्रलोभनांपसून आश्चर्यकारक रितीने लांब रहाणा-या

 या ऋषितुल्य श्री.केशल गावित या गुरूजींची स्तोत्रे 

किती गावित ?


नाशिकमधल्या पारंपरिक तीर्थक्षेत्रांहून परमपवित्र असे हे प्रयासराज तीर्थ प्रत्येक शिक्षकाने जाऊन पहायला हवेच असे !



वैशाली पंडित.

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi