माविमच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात चौथे महिला धोरण जाहीर
महिलांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास
- महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे
मुंबई, दि. ७ : महिलांच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय असलेले व या ध्येयासाठी आखण्यात आलेल्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर देणारे राज्याचे चौथे महिला धोरण जाहीर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे महिलांच्या उन्नतीसाठी काम करत असलेल्या महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षातच चौथे महिला धोरण जाहीर होत असल्याचे, प्रतिपादन महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले.
महिला आर्थिक विकास मंडळ व युनायटेड नेशन्स वुमन्स यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिना निमित्त सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रामावेळी त्या बोलत होत्या. यावेळी महिला व बाल विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, यूएन वुमन्सच्या राष्ट्रीय प्रतिनिधी सुझन फर्ग्युसन, टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या लक्ष्मी लिंगम, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक माया पाटोळे आदी उपस्थित होते.
महिलांचा विकास हे उद्दिष्ट ठेऊन राज्यात आतापर्यंत ३ महिला धोरणं जाहीर करण्यात आल्याचे सांगून मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या, चौथे महिला धोरण आपल्या सर्वांसमोर ठेवताना आनंद होत आहे. महाराष्ट्र हे महिला धोरण आणणारे देशातील पहिले राज्य आहे. यापुढे महिलांसोबत लिंगभेदभाव नष्ट करून लैंगिक समानता आणणारे, महिला तसेच इतर लिंगी समुदायाला त्यांची ओळख आणि हक्कांसाठी लढावं लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण करण्यासाठी हे धोरण मार्गदर्शक ठरणार आहे. हे धोरण तयार करण्यासाठी महिला व बालकल्याणमंत्री म्हणून स्वतः लक्ष दिलंच पण या धोरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारकाईने लक्ष होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या, या तिन्ही धोरणांपेक्षा वेगळे आणि अंमलबजावणीवर भर देणारे असे हे चौथे महिला धोरण असणार आहे. या धोरणामध्ये महिलांच्या आर्थिक, सामाजिक उन्नतीसोबतच यामध्ये अष्टसूत्रीचा समावेश आहे. त्यामध्ये आरोग्य, पोषक आहार, शिक्षण, कौशल्य, महिला सुरक्षा, महिलांबाबतच्या हिंसाचाराच्या घटना थांबविणे, लिंग समानता, पूरक रोजगार, हवामान बदल, नैसर्गिक आपत्ती टाळणे यामध्ये महिलांचा समावेश तसेच खेळाडूंना आर्थिक सहाय्य, सांस्कृतिक क्षेत्रात महिलांचा सहभाग याचा समावेश या महिला धोरणामध्ये आहे. या धोरणामुळे समाजामध्ये स्त्री - पुरुष समानता येण्यास मदत होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बालविकास विभागाने हे महिला धोरण तयार केले आहे. या धोरणामध्ये अंमलबजावणीवर भर असणार आहे. त्यासाठी त्रिसूत्री ठरवण्यात आली आहे. या धोरणाच्या अंमबवजावणीसाठी राज्यस्तरावर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यानंतर महिला व बालविकास मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल. तर जिल्हास्तरावरील अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावर जिल्ह्यांचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली समिती कार्यरत असेल. या धोरणाच्या माध्यमातून महिला आर्थिक स्वावलंबी होतील. समाजामध्ये स्त्रि-पुरूष समानता येण्यासाठी महिलांचे अवलंबित्व कमी होणे गरजेचे आहे. यासाठी या धोरणामध्ये भर देण्यात आला आहे. तसेच सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग वाढवण्याचे नियोजनही या धोरणामध्ये करण्यात आले आहे.
यापुढे महिलांना सर्वच क्षेत्रात समान संधी देण्याबरोबरच अर्थसंकल्पात योग्य तरतूद, शासन - प्रशासनात योग्य स्थान, रोजगार - स्वयंरोजगाराच्या क्षेत्रात समान संधी, तंत्रज्ञानाचा योग्य वापर, कौंटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण, संपत्तीत समान वाटा, उद्यमी महिला तसेच इतर लिंगी समुदायाला योग्य मार्गदर्शन आणि बाजारपेठ, आरोग्याच्या चांगल्या सेवा या व अशा अनेक बाबींवर या महिला धोरणाने योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. समाजातील कोणत्याही घटकाला वगळले जाणार नाही सर्वांचा समावेश असलेलं हे सर्व समावेशक धोरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
मंत्री अदिती तटकरे पुढे म्हणाल्या, समाजामध्ये स्त्री - पुरुष समानतेविषयी नेहमीच चर्चा केली जाते. ही समानता येण्यासाठी पुरुषांनीही साथ देणे गरजेचे आहे. महिला दिन हा वर्षातून एकदा नाही. तर रोज साजरा केला जावा. येत्या काळात माविमच्या माध्यमातून महिलांना आणखी चांगले अर्थसहाय्य मिळेल. त्या माध्यमातून अनेक महिला उद्योजक निर्माण होतील व राज्यासह देशाच्या अर्थिक प्रगतीमध्ये सहभागी होतील. अनेक महिला नवनवीन उद्योग उभारत आहेत याचा आम्हाला अभिमान असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
महिला व बाल विकास विभागाचे सचिव श्री. यादव म्हणाले, महिलांना आता नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करुन नवीन क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. लोणची, पापड यामधून बाहेर पडून इतर क्षेत्रामध्ये काम केले पाहिजे. शेती क्षेत्रामध्ये नवनवीन प्रयोग करण्यास वाव आहे. या क्षेत्रामध्ये आता महिलांनी काम करावे.
यावेळी बचतगटाच्या माध्यमातून उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये समुद्री शैवाल उत्पादनामध्ये चांगले काम करणाऱ्या रत्नागिरीच्या वर्षा गोरिवले, हायड्रोफोनिक शेती करणाऱ्या लता जाधव, दूध व दुग्धजन्य पदार्थामधून आर्थिक स्थैर्य साधणाऱ्या गोंदियाच्या ममता ब्राह्मणकर, आदिवासी भागात काम करणाऱ्या यवतमाळच्या कल्पना लिंमजी मंगाम, सरपंच म्हणून ग्रामविकासाचे रोल मॉडेल तयार करणाऱ्या नंदुरबारच्या कौशल्या वडवी आणि छत्रपती संभाजीनगरच्या वर्षा सांगळे यांच्या सन्मान करण्यात आला.
00000
No comments:
Post a Comment