Tuesday, 6 June 2023

किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 किलबिलाट रुग्णवाहिनी’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण


            मुंबई, दि. 6 : अनाथ तसेच रस्त्यावर राहणाऱ्या लहान मुलांना तत्काळ उपचार मिळावे, तसेच रुग्णवाहिनीमधील तणावाचे वातावरण दूर व्हावे यासाठी महानगरपालिका आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ तयार करण्यात आली असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस, मंत्री श्री. लोढा, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबालसिंह चहल यांच्या उपस्थितीत ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’चे आज सह्याद्री अतिथीगृह येथे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी उपमुख्यमंत्री बोलत होते.


            “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये ‘किलबिलाट रुग्णवाहिनी’ सेवा सुरू झाली होती. ही सेवा आता मुंबईत सुरू झाली आहे. लवकरच या सेवेचा राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे”, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा यांनी दिली.


            रुग्णवाहिनीच्या सायरनचा धडकी भरवणारा आवाज, तणावाचे वातावरण याऐवजी बाळाच्या गोड आवाजाचा सायरन, आत रंगीबिरंगी चित्रे, मंद संगीताची सोबत असे आल्हाददायक वातावरण या ‘किलबिलाट रुग्णवाहिके’त असेल.


            महिलेला बाळतपणासाठी वा गर्भारपणाच्या काळात काही त्रास झाला तर रुग्णालयात पोहोचविण्यासाठी बाळ आजारी असल्यास रुग्णालयात नेण्यासाठी, या रुग्णवाहिनीचा उपयोग होणार आहे.


            पहिल्या टप्प्यात पाच रुग्णवाहिनी रुजू होतील. ही सेवा विनामूल्य असेल. मुंबईनंतर राज्याच्या अन्य भागातही ही सेवा सुरु करण्यात येणार आहे.

ऊर्जा क्षेत्राच्या सक्षमतेसाठीउदंचन जलविद्युत प्रकल्पांवर भर

 ऊर्जा क्षेत्राच्या सक्षमतेसाठीउदंचन जलविद्युत प्रकल्पांवर भर


- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी सामंजस्य करार


 


            मुंबई दि 6 :- राज्याच्या ऊर्जा क्षेत्राला अधिक सक्षम करण्यासाठी तसेच वीज साठवणुकीच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या उदंचन जलविद्युत प्रकल्पांवर अधिक भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


            सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे राज्यात उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसनासाठी महाराष्ट्र शासन व नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड तसेच टोरंट पॉवर लिमिटेड यांच्या दरम्यान अनुक्रमे रू. 44,000 कोटी व रु. 27,000 कोटी इतक्या रकमेचे सामंजस्य करार करण्यात आला.


            यावेळी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी.अन्बलगन, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ संजय कुमार, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.


            उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील हे वैशिष्ट्यपूर्ण तंत्रज्ञान आहे. उदंचन जलविद्युत प्रकल्पांव्दारे राज्यातील शेती, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्रातील विजेची वाढती मागणी भागवता येणे शक्य होणार आहे. या प्रकल्पांत हरित आणि स्वच्छ ऊर्जा निर्मितीमुळे पर्यावरणाचेही रक्षण होईल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.


            नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) राज्यात 7,350 मेगावॅट क्षमतेचे उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करणार आहे. केंद्र सरकारने नॅशनल हायड्रो पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्या मूल्यांकन अहवालानुसार राज्यातील सावित्री (2250मेगावॅट), काळू (1150 मेगावॅट), केंगाडी (1550 मेगावॅट) व जालोंद (2400 मेगावॅट) या 4 ठिकाणी ऑन स्ट्रिम (On-stream) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसित करण्यासाठी ही ठिकाणे या कंपनीस वाटप केली आहेत.


            मे. टोरंट पॉवर लि. कंपनी कर्जत (3000 MW), मावळ (1200 MW), जुन्नर (1500 MW) या तीन ठिकाणी एकूण 5700 MW क्षमतेचे ऑफ स्ट्रिम (Off Stream) उदंचन जलविद्युत प्रकल्प विकसीत करणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यामध्ये सुमारे रु. 27,000 कोटी इतकी गुंतवणूक होणार आहे. याअंतर्गत राज्यात 13,050 मेगावॉट क्षमतेचे उदंचन प्रकल्प उभारले जाणार असून याव्दारे एकूण ₹71,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. ग्रीड बॅलन्सिंग, पीक डिमांड पूर्ण करणे, ब्लॅक स्टार्ट इत्यादी बाबतीत महाराष्ट्र स्वावलंबी होईल. याव्दारे रोजगार निर्मितीलाही चालना मिळणार आहे. पर्यावरणपूरक पर्यटनाच्या संधीही वाढणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.


उदंचन जलविद्युत प्रकल्प तंत्रज्ञान


            उदंचन जलविद्युत प्रकल्प (Pumped Storage Projects) नवीकरणीय ऊर्जेचा भाग असून ते बॅटरी स्टोरेजप्रमाणे कार्य करतात. यामध्ये सौर, पवन किंवा अन्य नवीकरणीय ऊर्जेद्वारे Lower Reservoir मधून Upper Reservoir मध्ये पंपिंग मोडद्वारे पाणी घेऊन या पाण्याचा वापर हायड्रोइलेक्ट्रिक विद्युत निर्मितीसाठी केला जातो. उदंचन जलविद्युत प्रकल्प हे गेल्या शतकभरामधील सिद्ध ठरलेले तंत्रज्ञान आहे. यामध्ये प्रदूषण जवळपास होत नाही, त्याचबरोबर केवळ अल्प साठवणूक क्षमतेच्या निम्न व ऊर्ध्व जलाशयामुळे मानवी वस्तीचे संपादन, पुनर्वसनचे प्रश्नही उद्भवत नाही. या तंत्रज्ञानालाच ‘नैसर्गिक बॅटरी’ असेही संबोधण्यात येते.


            बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्ट‍िम दीर्घकाळ टिकाऊ ठरत नाही; तर, उदंचन संच प्रकल्प दीर्घकाळ टिकाऊ ठरतात. त्यामुळे उदंचन संच प्रकल्प जास्त व्यवहार्य ठरतो. देशात व महाराष्ट्रात ती क्षमता केवळ पश्चिम घाटाच्या परिसरामध्येच मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. याचे मुख्य कारण पश्चिम घाटांमधील अनुकूल अशी सह्याद्रीच्या पर्वत रांगांची प्राकृतिक रचना होय.


---000-



 

शेवटची सुट्टी'* last holiday

 *'शेवटची सुट्टी'*


असाच एक _English picture_ बघितलेला...


*'Last Holiday'*


'आयुष्याची शेवटची सुट्टी' जरा उशिरा लावलेला पण तरीही थोड्या वेळाने कथानक लक्षात यायला लागलं... 


त्यातली नायिका ही सर्वार्थाने सर्वसामान्य असणारी तरूणी. त्यामुळे अर्थातच आयुष्यही सर्वसाधारणच. मात्र एक दिवस तिला अचानक, असाध्य रोग असल्याचं निदान होतं. 


मग ती ठरवते की आपण नोकरी सोडून, अजून पर्यंत जी _'सुट्टी घेणं'_ परवडत नव्हतं, त्या _'मोठ्ठ्या सुट्टी'_ वर जायचं आणि शेवटच्या पै पर्यंत सगळे पैसे उधळून टाकायचे. 


ती उंची पोषाख खरेदी करते आणि एका पंचतारांकित हाॅटेल मध्ये... आपण श्रीमंत असल्याची बतावणी करत, उच्चभ्रू वर्तुळात वावरते. 


तिथे तिच्या नशिबाचे फासे पलटतात. जुगारात शंभर हजार डाॅलर्स जिंकते. आता बतावणी करायची गरज नाही. लक्ष्मी खरंच प्रसन्न झालेली असते. तिला आनंद तर होतो...पण ती देवाला विचारते....


_*"why now...?* आयुष्य संपताना का एवढा मेहेरबान झालास?"_


पण आता तिला कशाचच सोयर सुतक नसतं. तसंच तिला आता _'आणखी काही'_ गमावण्याचीही भिती नसते. म्हणून ती उरलेलं आयुष्य खरेपणाने जगायचं ठरवते. समाजात वावरताना लागणारा _'दांभिक सभ्यतेचा'_ बुरखा फाडून, स्वतःशी आणि इतरांशी निव्वळ प्रामाणिक रहाते... वागतेे... बोलते.


आणि तिला जाणवतं... 


*आतापर्यंत, आयुष्य गृहीत धरताना, आपण आयुष्य खऱ्या अर्थाने जगलोच नाही. केवळ 'भविष्य' आणि 'लोकं काय म्हणतील'....याची चिंता करण्यात हे सुंदर आयुष्य फुकट घालवलं."*


*_"I have wasted too much of time on assumptions.....now I have time only for reality!"_* 


राहिलेलं दोन आठवड्यांच आयुष्य सच्चेपणानं जगायला सुरवात करते. तिच्या _departmental store owner_ लाही खरी खोटी सुनावते... त्याच्या चुकीच्या वागण्याची जाणीव करून देते.


आणि अचानक तिला कळतं की तिचे reports चुकीचे आहेत... तिला कसलाही आजार नाही... ती एवढ्यात मरणार नाही. तिच्या आनंदाला पारावार रहात नाही. पण या last holiday नं शिकवलेला धडा, ती कधीच विसरत नाही. तिला तिची नोकरी आणि प्रियकर दोन्ही परत मिळतात... 


फिल्मी भाग सोडला, तर नायिकेच्या या आयुष्याचा प्रवास खरंच विचार करायला लावणारा होता. 


आपणही... आजचा/ आत्ताचा क्षण कधी भरभरून जगतंच नाही... 


मनात कायम उद्याची चिंता! काही तरी अशाश्वत मिळवण्या साठी... कायम हातचं सोडून पळत्या पाठी, जीवाच्या आकांताने पळत रहातो...


इतरांपेक्षा मागे पडू नये म्हणून मनाविरुद्ध जगाच्या् शर्यतीत सहभागी होतो. 


सगळा आनंद/सगळी मजा, एखाद्या 'सुट्टीत' उपभोगण्यासाठी, शिलकीत टाकत जातो....


आणि हे सगळं व्यर्थ आहे... जे खरच हवं होतं... आनंद/ समाधान... हे या कशात नव्हतंच... हेे कळायच्या आतच... *'शेवटची सुट्टी लागते'.* 


शिलकीतली _'पुंजी'_ तशीच राहून जाते... न वापरलेली... कोरीच्या कोरी... पण आता निरूपयोगी ! 


या *'शेवटच्या सुट्टी'* पर्यंत वाट न पाहता प्रत्येक क्षण , त्याच क्षणात, चिंता व भयमुक्त जगून घेतला तर? 


तर प्रत्येक क्षण त्या *'सुट्टी'* इतकाच आनंद देईल.

🌲🪴🌿🍁🍁🍀

Ho खेळ खेलाच

 😂😂🙈🙈 येवढा एकच खेळ पहायला नव्हता😂😂🙈🙈


लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय*

 *लहान बाळाच्या उचकीवर हे करा घरगुती उपाय*


*बाळाला उचकी लागणे :*


एक वर्षाच्या 🧒🏻 आतील बाळांना वरचेवर उचकी येऊ शकते. ही एक सामान्य बाब असते. त्यामुळे बाळास उचक्या येत आहेत म्हणून फार काही चिंता 😱 करण्याचे कारण नसते.


दूध पिल्यानंतर 🍼बाळाला उचकी येऊ शकते. तसेच उचकी आल्यामुळे पिलेले दूधही थोड्या प्रमाणात बाहेर येऊ शकते. हे प्रामुख्याने रिफ्लक्स मुळे होत असते. अशावेळीही फारशी काळजी करण्याची गरज नसते. 


*बाळाची उचकी थांबवण्यासाठी हे करा उपाय :*



▪️बाळाला स्तनपान केल्यानंतर 20 मिनिटे ⏱️ उभ्या स्थितीत राहील याची काळजी घ्यावी.


▪️दूध पाजल्यावर बाळाची ढेकर जरूर 😮‍💨काढावी.


▪️ एकाचवेळी भरपूर दूध पाजण्यापेक्षा बाळाला वरचेवर थोडे थोडे दूध पाजत 🍼 राहावे.


*अशी काळजी घेतल्यास बाळाला उचकी लागण्यापासून थांबवता येते.*


( *संकलन:* आर्या देव) 


रोगांच्या खात्रीशीर निदान व उपचार यांसाठी वैद्य तुषार साखरे (आयुर्वेदाचार्य) यांना जरूर संपर्क करा.


💁🏻‍♀️ *माहिती आवडल्यास इतरांशी जरूर शेअर करा.* 🤗


🌺🌺🌺🌺🌺🙏🤝🌺🌺🌺🌺🌺


जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण

 जागतिक पर्यावरण दिनी माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण


पर्यावरणाचे संवर्धन करीत शाश्वत विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध


– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 5 : विकास आणि पर्यावरण संवर्धन व जतन याला राज्य शासनाने महत्व दिले आहे. पर्यावरण पूरक विकासाला राज्य शासनाचे प्राधान्य असून राज्याला लाभलेला सह्याद्री पर्वतरांगा, समुद्र किनारे आणि पश्चिम घाट हा पर्यावरणाचा ठेवा जतन करण्याची सर्वांची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. राज्यातील नागपूर, मुंबई, महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी आणि नाशिक या शहरात सर्क्युलर इकॉनॉमी पार्कची निर्मिती करण्यात येणार असून ग्रीन बॉण्डच्या माध्यमातून सन 2024 पर्यंत 5 हजार कोटींचा निधी उभारण्याचा संकल्प असल्याचे ते म्हणाले. कांदळवनाच्या जतन आणि संवर्धनात महाराष्ट्र आघाडीवर असून राज्यात 18 नवीन आणि सात प्रस्तावित संवर्धन राखीव वनक्षेत्रे घोषित केली आहेत. नागरी जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली.


            पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते 'माझी वसुंधरा ३.०' पुरस्काराचे वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार संजय गायकवाड, आमदार राजेंद्र राऊत, पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, स्वीत्झर्लंडचे उच्चायुक्त मार्टिन मेयर, आबासाहेब जऱ्हाड, विजय नाहटा यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी- अधिकारी उपस्थित होते.


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, निरोगी आयुष्यासाठी पर्यावरण महत्वाचे आहे. विकास आणि पर्यावरण संवर्धन हातात हात घालून पुढे गेले पाहिजेत. देशात पर्यावरणीय दृष्ट्या महाराष्ट्र राज्याचे आगळे - वेगळे स्थान आहे. निसर्ग सौंदर्यानी नटलेले आपले राज्य असून हा अनमोल ठेवा आपल्याला जतन करावयाचा आहे. पर्यावरण रक्षणासाठी राज्य शासन कटिबध्द आहे. देशात पर्यावरणीय दृष्टीने राज्याचे महत्व आगळे - वेगळे असून निसर्गाचे वरदान आपल्याला लाभले आहे. पश्चिम घाट, समुद्रकिनारा, सह्याद्री पर्वतरांग हा आपला अनमोल ठेवा असून त्याचे जतन ही काळाची आणि समाजाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.


            प्रकल्प पुढे नेताना पर्यावरणाचा ऱ्हास न होता शाश्वत विकास महत्त्वाचा असून आर्थिक विकास करताना निसर्गाचे संवर्धन व समतोल राखून प्रकल्प आपण करतो आहोत. पर्यावरण पूरक विकास हा राज्याच्या अर्थसंकल्पाचा अविभाज्य अंग आपण मानले आहे. राज्यात सौरऊर्जा, जल, पवन ऊर्जा या क्षेत्रात सरकारने तीस हजार कोटीचे सामंजस्य करार केले आहेत. ग्रीन हायड्रोजन, ग्रीन अमोनिया तसेच पवन ऊर्जा क्षेत्रात 75 हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, माझी वसुंधरा 3.0 च्या माध्यमातून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली. त्यांच्या या सकारात्मक कामगिरीमुळे आज 174 कोटी रुपयांचे बक्षीस या स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आले आहे. पर्यावरण संवर्धनासाठी या स्थानिक स्वराज्य संस्था, अधिकारी यांचा पुढाकार निश्चितपणे महत्वपूर्ण आहे. पंचमहाभूतांच्या संवर्धनात मोलाची कामगिरी करून माझी वसुंधरा अभियान 3.0 आपण राबविले. या अभियानाच्या माध्यमातून दोन कोटी वृक्ष लागवड करण्यात आली, ही कौतुकास्पद बाब आहे. 16 हजार 714 नवीन हरित क्षेत्र राज्यात तयार केली आहेत.


            जागतिक स्तरावर वातावरणीय बदलाची चर्चा सुरू आहे दावोस मध्ये झालेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेवेळीही हाच चर्चेचा विषय होता. तापमान वाढ, समुद्राच्या पाणी पातळीत वाढ, जैव प्रजाती नष्ट होण्याच्या घटनेत वाढ, अन्न सुरक्षा आणि आरोग्याबाबतच्या समस्या असे धोके निर्माण होत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाबाबत सजग आणि संवेदनशील होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            आजच्या पर्यावरण दिनानिमित्त ‘सोल्यूशन टू प्लास्टिक पोल्यूशन’ अशी संकल्पना घेऊन आपण काम करत आहोत. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून पर्यावरण पूरक समृद्धी महामार्ग आपण तयार केला आहे. या महामार्गाच्या दुतर्फा 33 लाख झाडे आपण लावणार आहोत, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.


            या कार्यक्रमावेळी ‘माझी वसुंधरा 4.0’ च्या लोगोचे अनावरण, नोंदणीसाठी पोर्टलचे अनावरण, युनिसेफच्या पुस्तिकेचे प्रकाशन, विज्ञानधारा मासिकाचे प्रकाशन, मुख्यमंत्री श्री. शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर, महसूल मंत्री श्री. विखे पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.


            या वेळी सेंटर फॉर वॉटर सॅनिटेशन यासह विविध सामंजस्य करार करण्यात आले.


माझी वसुंधरा 3.0 पुरस्कारांचे वितरण


            यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि इतर मान्यवरांच्या हस्ते विविध संस्थांना पुरस्कार देण्यात आले. यामध्ये राज्यस्तरावरील पुरस्कारांमध्ये अमृत शहरे (१० लाखावरील लोकसंख्या) गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई महानगरपालिका द्वितीय आणि पुणे महानगरपालिकेने तृतीय पुरस्कार पटकावला.


            अमृत शहरे (३-१० लाख लोकसंख्या) गटात मीरा भाईंदर मनपा, अहमदनगर मनपा आणि पनवेल मनपाने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


अमृत शहरे (१-३ लाख लोकसंख्या) गटात सातारा नगरपालिका, बार्शी नगरपालिका आणि भुसावळ नगरपालिकेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


नगरपरिषद आणि नगरपंचायत (५० हजार ते १ लाख लोकसंख्या) गटात कराड नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद आणि बारामती नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.


नगरपरिषद आणि नगरपंचायत (२५ हजार ते ५० हजार लोकसंख्या) गटात गडहिंग्लज, मोहोळ आणि शिर्डी नगरपरिषदेने अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार ते २५ हजार लोकसंख्या) गटात दहिवडी, मालेगाव आणि निफाड नगर पंचायतीनी अनुक्रमे प्रथम तीन पुरस्कार पटकावले.


नगरपरिषद आणि नगरपंचायत ( १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या) गटात पाचगणी, पन्हाळा आणि महाबळेश्वर नगरपरिषद यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक मिळवले.


ग्रामपंचायत ( १० हजार पेक्षा जास्त लोकसंख्या) गटात मंद्रूप (सोलापूर), गुंजाळवाडी ग्रा. पं. ( अहमदनगर) आणि विंचुर ग्रा.पं. (नाशिक) यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


ग्रामपंचायत ( ५ ते १० हजार लोकसंख्या) गटात बोराडी (धुळे), धरणगुट्टी (कोल्हापूर) आणि शिंदे (नाशिक) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकावले.


ग्रामपंचायत ( २.५ ते ५ हजार लोकसंख्या) गटात वाघोली (अहमदनगर), जवळगाव (नांदेड) आणि घाटनांद्रे (सांगली) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.


ग्रामपंचायत ( २.५ हजार लोकसंख्या पेक्षा कमी) गटात शिरसाठे (नाशिक), सिंदखेड (बुलढाणा) आणि मन्याची वाडी (सातारा) या ग्रामपंचायतींनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले.


            भूमी थीमॅटिक क्षेत्रातील सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या शहरांना यावेळी गौरविण्यात आले. यामध्ये विविध गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका, मीरा भाईंदर महानगरपालिका, सातारा नगरपरिषद, लोणावळा नगरपरिषद, गडहिंग्लज नगरपरिषद, दहिवडी नगरपंचायत, पांचगणी नगरपरिषद, सोनई ग्रामपंचायत, बोराडी ग्रामपंचायत, वाघोली ग्रामपंचायत, शिरसाठे ग्रामपंचायत यांना गौरविण्यात आले.


            यावेळी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचाही गौरव करण्यात आला. विभागीय आयुक्त गटात सौरभ राव (पुणे), राधाकृष्ण गमे (नाशिक) आणि श्रीमती विजयालक्ष्मी बिदरी (नागपूर विभाग) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.


            सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी गटात डॉ. राजेश देशमुख (पुणे), रूचेश जयवंशी (सातारा) आणि राहुल रेखावार (कोल्हापूर) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.


            सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद गटात जितेंद्र डूडी (सांगली), आशिष येरेकर (अहमदनगर) आणि श्रीमती आशिमा मित्तल (नाशिक) यांना अनुक्रमे प्रथम तीन क्रमांकाने गौरविण्यात आले.


            कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधान सचिव श्री. दराडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय भुस्कुटे यांनी केले.    


00000


दीपक चव्हाण/विसंअ/

केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन

 केंद्रप्रमुख पदासाठी विभागीय परीक्षेचे आयोजन


 


            मुंबई, दि. 5 : राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षेद्वारे नियुक्ती देण्यासाठी ‘केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा – 2023’ या परीक्षेचे ऑनलाईन पद्धतीने जून 2023 च्या शेवटच्या आठवड्यात आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन प्रणालीद्वारे दि. 15 जून 2023 पर्यंत अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेचे माध्यम, अभ्यासक्रम, पात्रता, अर्ज करण्याची कार्यपद्धती व कालावधी याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयुक्त शैलजा दराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.  


००००

Featured post

Lakshvedhi