Tuesday, 6 June 2023

तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान

 तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान


- मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे


एलजीबीटीआयक्यू अभिमान पदयात्रेत प्रथमच शासकीय यंत्रणेचा सहभाग


 


            मुंबई, दि. 5 : पारलिंगी (तृतीयपंथी) समुदायातील व्यक्तींचा मतदार यादीत समावेश व्हावा यासाठी भारत निवडणूक आयोग वचनबद्ध असल्याचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी म्हटले आहे. आपला समाज एलजीबीटीआयक्यू समुदायाला समजून घेत आपलेसे करेल,तुमच्या अस्तित्वाचा स्वीकार, हाच लोकशाहीचा खरा सन्मान, असे मतही श्री. देशपांडे यांनी व्यक्त केले.


            एलजीबीटीआयक्यू समुदायाच्या 'अभिमान महिन्या'निमित्त पुण्यातील 'युतक' या संस्थेच्या वतीने आणि द हमसफर ट्रस्ट, द ललित, केशवसुरी फाउंडेशन व बिंदू क्विअर् राइट्स फाऊंडेशन यांच्या मदतीने 4 जून रोजी पुण्यात 11 वी एलजीबीटीआयक्यू समुदायाची अभिमान पदयात्रा आयोजित करण्यात आली होती.


            राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय आणि जिल्हा निवडणूक कार्यालय, पुणे हेही या पदयात्रेत सहभागी झाले होते. या अभिमान पदयात्रेमध्ये २००० लोक सहभागी झाले होते. तसेच सारथी ट्रस्ट नागपूर, अजिंक्य सातारा, नाशिक एलजीबीटीआयक्यू, नगर क्वीयर, पुणेरी प्राइड फाऊंडेशन, पुणे, पालकांचा 'सपोर्ट ग्रुप स्वीकार' मुंबई देखील यात सहभागी झालेला होता. याशिवाय या चळवळीला समर्थन देणाऱ्या अनेक संस्था मासूम, कनेक्टिक, विदुला सायकोलॉजी कन्सल्टन्सी, यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज, 8 पेक्षा अधिक कॉर्पोरेट कंपन्यांनी या अभिमान यात्रेमध्ये सहभाग घेतला.


            महाराष्ट्र निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी श्री. देशपांडे या पदयात्रेसाठी ग्रॅण्ड मार्शल म्हणून चालले. देशात प्रथमच एक सरकारी कार्यालय अशा प्रकारच्या पदयात्रेत सहभागी झाले होते. पारलिंगी व्यक्तींना मतदानाचा हक्क मिळावा आणि त्याचबरोबर मतदान कार्ड मिळावे यासाठी श्री. देशपांडे यांचे प्रयत्न उल्लेखनीय आहेत. कोणताही दस्तऐवजाशिवाय सहज पद्धतीने मतदान कार्ड मिळावे यासाठी यांनी दोन दिवसांचे शिबिर आयोजित केलेले होते. निवडणूक अधिकारी यांच्यासोबत पोलिस भरतीसाठी पात्र ठरलेल्या दोन पारलिंगी व्यक्तींनी सहभाग घेतला.


              ‘लोकशाहीतील सर्वसमावेशकता आणि आदर’ ही या अभिमान पदयात्रेची संकल्पना होती. त्या निमित्ताने पारलिंगी व्यक्तींची मतदार नोंदणी, आणि त्यांच्या लोकशाहीतील समावेशनाविषयी समाजात जाणीव-जागृती करण्याच्या उद्देशाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रथमच या अभिमान पदयात्रेत सहभाग घेतला होता.


****

प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच

 प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


            मुंबई, दि. 5 : पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचे विपरीत परिणाम ग्लोबल वॉर्मिगच्या स्वरूपात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच, असा संकल्प आजच्या जागतिक पर्यावरण दिवशी करू या, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            ‘भामला फाऊंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेतर्फे वांद्रे येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, आजच्या पर्यावरण दिनानिमित्त ‘सोल्यूशन टू प्लास्टिक पोल्यूशन’ अशी संकल्पना घेऊन राज्य शासन काम करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लाईफ स्टाईल फॉर एन्व्हायरमेंट ही संकल्पना मांडली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे अवेळी पाऊस, वाढते तापमान आदी समस्या जगाला भेडसावत आहेत. या समस्येवर वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धन हाच उपाय आहे. प्रदूषण निर्मूलनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मात्र, या प्रयत्नांना नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे. नागरिकांचे सहकार्य मिळाल्यास प्रदूषण निर्मूलन चळवळीस बळ प्राप्त होईल. प्रदूषण निर्मूलनासाठी ‘भामला फाऊंडेशन’ या संस्थेचे सुरू असलेले कार्य कौतुकास्पद आणि अनुकरणीय आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.

समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेलतो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा

 आशिया खंडातील सर्वात मोठ्या समूह विकास (क्लस्टर) योजनेच्या कामाचा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारभ

समूह पुनर्विकास योजनेतून घरांची चावी मिळेलतो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


• क्लस्टर योजनेतून पहिल्या टप्प्यात 10 हजार घरे मिळणार


• 1500 हेक्टर जागेवर टप्प्याटप्प्यात राबविणार योजना


            ठाणे, दि. 5 (जिमाका) : ठाण्यातील समूह पुनर्विकास योजनेचे काम सुरू करणे हे माझे स्वप्न आहे. सुमारे 1500 हेक्टर जमिनीवर वेगवेगळ्या टप्प्यात हा प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात सुमारे 10 हजार घरांची निर्मिती होणार आहे. हा एक ऐतिहासिक प्रकल्प होणार आहे. ज्या दिवशी या योजनेतील घराची चावी नागरिकांना मिळेल तो दिवस माझ्यासाठी परमोच्च आनंदाचा दिवस असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.


            अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्यासाठी आखलेल्या ठाण्यातील समूह विकास योजनेच्या (क्लस्टर) कामाचा शुभारंभ आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी मुख्यमंत्री यांच्या पत्नी श्रीमती लता शिंदे, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) व अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री रविंद्र चव्हाण, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, खासदार कुमार केतकर, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार संजय केळकर, माजी आमदार रविंद्र फाटक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर आदी उपस्थित होते. किसन नगर येथील समूह विकास योजनेच्या कामांची सुरुवात 1997मध्ये पडलेल्या साईराज इमारतींतील रहिवासी दाम्पत्यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आली. यावेळी क्लस्टर योजनेच्या लोगोचे अनावरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.


            मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, 1997 मध्ये ठाण्यातील साईराज इमारत पडल्यानंतर अनधिकृत धोकादायक इमारतीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अनधिकृत इमारती या गरजेपोटी बांधल्या होत्या. या घरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तेव्हापासून अनेक आंदोलने, संघर्ष केले. आज कित्येक वर्षानंतर या योजनेचे काम सुरू होत आहे. ही योजना मार्गी लागण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. ठाण्यातील या क्लस्टर योजनेचे काम आता सुरू झाले असून इमारती पूर्ण होईपर्यंत ते काम सुरू राहिल. या योजनेत नुसतेच इमारती उभ्या राहणार नाहीत, तर येथे मोकळी मैदाने, उद्याने, आरोग्याच्या सुविधाही असतील. एक सुनियोजित शहर उभारण्याचे आमचे स्वप्न आहे. सिडकोद्वारे बांधण्यात येणाऱ्या घरांच्या दर्जा पेक्षाही चांगल्या गुणवत्तेची घरे येथे उभारण्यात येतील. अधिकृत इमारती व सध्या सुरु असलेल्या पुनर्विकास योजनेतील इमारतींना या क्लस्टर योजनेत समावेश हा ऐच्छिक ठेवला असून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


            ठाण्याप्रमाणेच मुंबईसह मुंबई महानगर प्रदेशातील मीरा भाईंदर, कल्याण, भिवंडी आदी क्षेत्रातील अनधिकृत धोकादायक इमारतींच्या क्लस्टर योजनेचा मार्ग मोकळा केला आहे. मीरा भाईंदरमधील क्लस्टर योजना दिवाळीनंतर सुरू होईल, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी सांगितले.


            मुंबईतील रखडलेल्या पुनर्विकास प्रकल्पासाठी आवश्यक तेथे नियमात बदल करून आता असे प्रकल्प शासनामार्फत राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, महाप्रित, एसआरए आणि अन्य सर्व गृहनिर्माण संस्थांची मदत घेऊन हे प्रकल्प पूर्ण करण्यात येतील, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.


            यावेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांना जमिनीचे ताबा पत्रे देण्यात आली तर महाप्रितचे बिपीन श्रीमाळी यांना करारनामा पत्र देऊन गौरविण्यात आले. याशिवाय या योजनेसाठी सहकार्य करणाऱ्या महापालिका आयुक्त श्री. बांगर, वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रँक्टर, संजय देशमुख, विशेष सल्लागार मंगेश देसाई यांच्यासह जमिन मालकांचा मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


             अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुनर्विकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात अंतिम भूखंड क्र. 186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ - 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढ्या जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडकोमार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्री श्री. शिंदे हस्ते झाले.



0000


पक्षाघात आजार माहिती (Paralysis)*

 *पक्षाघात आजार माहिती (Paralysis)* 


मेंदूचे कार्य सुरळीतणे चालण्यासाठी मेंदूला रक्तपुरवठा व्यवस्थित होणे गरजेचे असते. मेंदूला योग्यप्रकारे रक्तपुरवठा न झाल्यास पक्षाघात (पॅरालिसीस) होतो त्यामुळे रुग्णाच्या हाता-पायातील ताकद कमी होते. याठिकाणी पक्षाघात म्हणजे काय, पक्षाघाताची कारणे, पक्षाघात का व कशामुळे होतो, पक्षाघात लक्षणे आणि उपचार याविषयी माहिती ह्या लेखामध्ये दिली आहे.


पक्षाघात हा मेंदूसंबंधी एक गंभीर असा न्यूरोमस्क्युलर आजार आहे. यावर वेळीच उपचार न केल्यास रुग्णांमध्ये कायमचं अपंगत्वही येऊ शकते. उजव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा डाव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो आणि डाव्या बाजूच्या मेंदूमध्ये जेंव्हा बिघाड होतो तेंव्हा उजव्या बाजूच्या हात-पाय आणि चेहऱ्यावर परिणाम होतो व शरीर लुळे पडते.


*पक्षाघाताचे प्रकार :* 

पक्षाघाताचे दोन प्रमुख प्रकार असतात.


*1) Ischemic पक्षाघात –* 

या प्रकारात मेंदुतील रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ तयार होते त्यामुळे मेंदूच्या विशिष्ट भागास रक्ताचा पुरवठा बंद झाल्यामुळे पक्षाघात होतो.


*2) ‎Hemorrhagic पक्षाघात –* 

या प्रकारात मेंदुमधील रक्तवाहिन्या फुटून मेंदूत रक्तस्त्राव होऊन पक्षाघात होतो. पक्षाघाताचा झटका आल्यावर सीटी स्कॅन किंवा एमआरआय स्कॅनद्वारे कोणता प्रकार आहे ते उपचार करण्यापूर्वी तपासले जाते.


 *3) Transient Ischemic Attack-* म्हणजे TIA नावाचा एक तिसरा प्रकारही असतो. यामध्ये पक्षाघाताची लक्षणे 24 तासाच्या आत निघून जातात आणि रुग्ण पूर्ववत बरा होतो. मात्र TIA ही Warning असते. एकदा TIA येऊन गेल्यास योग्य उपचार न केल्यास आपणास पुढे पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता अधिक असते. तेंव्हा TIA येऊन गेल्याससुध्दा डॉक्टरांकडून निदान आणि उपचार करून घ्यावेत. त्यामुळे पक्षाघाताचा धोका टळण्यास मदत होईल.


*पक्षाघाताची लक्षणे :* 

मेंदूचा रक्त पुरवठा बंद झाल्यामुळे किंवा मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यामुळे मेंदूला योग्यरित्या रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होऊन खालील पक्षाघाताची लक्षणे दिसून येतात.

◼️ एका बाजूच्या हाता-पायाची ताकद कमी होते.

◼️ हातापायात लुळेपणा जाणवतो, मुंग्या येतात.

◼️ ‎तोंड वाकडं होते, बोलण्यास त्रास होतो.

◼️ अन्न गिळण्यास आणि श्वास घेण्यास त्रास होतो.

◼️ ‎एका डोळ्याने अंधुक दिसू लागणे.

◼️ ‎चक्कर येणे, तोल जाणे,

◼️ चेतना कमी होणे

◼️ तीव्र डोकेदूखी

ही लक्षणे पक्षाघातात असतात. अशी लक्षणे जाणवल्यास त्वरीत वैद्यकीय उपचार होणे आवश्यक असते.


*लक्षात ठेवा ‘FAST’* 


पक्षाघाताची लक्षणे ओळखण्यासाठी ‘FAST’ लक्षात ठेवा..

*F – Face (Facial Weakness) :* रुग्णास हसण्यास सांगा. हसताना एका बाजूचा चेहरा, ओठ आणि डोळे लटकलेले दिसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.


*A – Arms (Arm Weakness) :* रुग्णाला त्याचे दोन्ही हात पुढे व वर उचलण्यास सांगा. जर रुग्णाचा एक हात वर व समोर उचलता येत नसल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.

*S – Speech Difficulty) :* रुग्णास प्रश्न विचारून तो व्यवस्थित बोलतो का ते पहा. जर त्याला बोलताना त्रास होत असल्यास ते पक्षाघाताचे लक्षण असते.


*T – Time (Time to Act) :*

कोणतीही कृती करताना किंवा प्रतिक्रिया देताना सामान्य प्रतिक्रिया न आढळता त्यामध्ये विसंगती आढळते


वरील लक्षणे रुग्णामध्ये जास्त प्रमाणात दिसून आल्यास वेळ न दवडता रुग्णाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जावे. जवळ वाहतुकीचे साधन नसल्यास 108 या नंबरवर फोन करून रुग्णवाहिका बोलावून घ्या. पक्षाघाताचा झटका आल्यानंतरची पहिले 3 तास हे Golden Period असतात ह्या काळामध्ये रुग्णावर उपचार केल्यास रुग्ण लवकरात लवकर बरा होतो तसेच पक्षाघाताच्या झटक्यामुळे मेंदूमध्ये होणारा बिघाड थांबवता येऊ शकतो. रुग्णास वेळीच उपचार मिळाल्यास पुढील मोठा धोका टळू शकतो.


वरील लक्षणे जर कमी प्रमाणात जाणवत असतील तर मेंदूचे रक्ताभिसरण सुरळीत होण्यासाठी नॅचरल ट्रीटमेंट घेणे उत्तम ज्यायोगे मेंदूचे रक्ताभिसरण (Brain Circulation) सुरळीत होऊ शकेल व संभाव्य धोका टळू शकेल.

तसेच पक्षाघात हेऊच नये म्हणून नियमितपणे हायड्रोजनयुक्त पाणी पित राहणे उत्तम.


*संकलन-* 

*निसर्ग उपचार तज्ञ* 

*डॉ. प्रमोद ढेरे,



बिपरजॉय चक्रीवादळ

 बिपरजॉय चक्रीवादळ

08-10 जून: महाराष्ट्र, पुणे, मुंबई येथे मुसळधार पाऊस पडेल.

11-12 जून: मुंबई आणि कोकणात जोरदार पाऊस होईल. कोकणात महापूर येण्याची शक्यता.✍🏻🦁🙏🏻


औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सत्र 2023 साठी1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार

 औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश सत्र 2023 साठी1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार


               मुंबई, दि. 5 : शालांत प्रमाणपत्र परिक्षेचा निकाल ऑनलाईन पद्धतीने जाहीर झालेला असून राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्प कारागीर प्रशिक्षण योजनेतंर्गत (Craftsman Training Scheme) ऑगस्ट 2023 सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया (Centralized Online Admission Process) पध्दतीने करण्यांत येत आहे. दहावी उत्तीर्ण झालेला विद्यार्थ्यांचा एक मोठा वर्ग औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रवेशाची आतुरतेने वाट पाहत असतो. यावर्षी एकूण 418 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था व 574 अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधुन अनुक्रमे 95,380 व 59,012 अशा एकूण 1,54,392 जागांवर प्रवेश दिले जाणार आहेत.


            यावर्षी प्रवेशासाठी उपलब्ध व्यवसायांची संख्या 83 असून त्यामध्ये पारंपरिक इलेक्ट्रिशियन, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेईकल, डिझेल मेकॅनिक, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन, कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, वेल्डर यासारख्या लोकप्रिय व्यवसायांबरोबरच नव्याने सुरू होणाऱ्या एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर तसेच ड्रोन टेक्निशियन यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या व्यवसायांचा समावेश करण्यात आलेला आहे.


            उपलब्ध जागांपैकी 53600 जागा मुलींसाठी राखीव असून इतर प्रवर्गनिहाय आरक्षणानुसार अनुसूचित जातींसाठी 20072, अनुसूचित जमातीसाठी 10808, इतर मागासवर्ग 29335, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक 15439, विमुक्त जाती 4631, भटक्या जमाती (ब) (क) व (ड) यासाठी अनुक्रमे 3859, 5404 व 3088 एवढ्या जागा उपलब्ध आहेत. याचबरोबर अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी 2548, दिव्यांग उमेदवारांसाठी 7719 व खुल्या गटातील उमेदवारांसाठी 61756 जागा उपलब्ध आहेत.


            2023 या वर्षापासून नव्याने 257 तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त झालेली असून या व्यवसायांमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. यामुळे महाराष्ट्र राज्याच्या प्रवेश क्षमतेमध्ये 5140 एवढ्या भरघोस जागांची वाढ झालेली आहे. या वर्षभरात ड्युअल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग अंतर्गत नव्याने 30 तुकड्यांना मान्यता प्राप्त झालेली असून या माध्यमातून प्रशिक्षणार्थ्यांना थेट औद्योगिक आस्थापनांमध्ये जाऊन सुमारे सहा महिने एवढ्या कालावधीपर्यंतच्या प्रशिक्षणाचा लाभ मिळणार आहे. यामुळे या प्रशिक्षणार्थ्यांच्या गुणवत्तेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल.


            वर्ष 2023 मध्ये शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नाशिक व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पुणे येथे एरोनॉटिकल स्ट्रक्चर अँड इक्विपमेंट फिटर या व्यवसायाच्या प्रत्येकी दोन तुकड्यांना डीजीटी, नवी दिल्ली यांचेकडून संलग्नता प्राप्त होणे अपेक्षित असून यातील प्रत्येकी एका तुकडी मध्ये प्रवेश दिले जाणार आहेत. याचबरोबर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला (मुलींची), धुळे, पुणे (मुलींची), सांगली, नाशिक, जालना, अमरावती, नागपूर, मुलुंड, अंबरनाथ, गडचिरोली, घनसावंगी अशा एकूण 12 संस्थांमधून ड्रोन टेक्निशियन या व्यवसायामध्ये नव्याने प्रवेशाला सुरुवात होणार आहे या व्यवसायाच्या माध्यमातून भारत ड्रोन टेक्नॉलॉजी या तंत्रज्ञानात आत्मनिर्भर होण्यास मदत होणार आहे अशी माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ.दिगांबर दळवी यांनी दिली आहे.


****

आरोग्यदायी चिंचेच्या पानांचा चहा !!*

 *आरोग्यदायी चिंचेच्या पानांचा चहा !!* 

चिंचेचं साधं नाव जरी काढलं तरी तोंडाल पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. चिंच चवीला खूप आंबट असली तरी ती आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. चिंचेची पाने देखील आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात.


चिंचेचा पानांचा चहा खूप आरोग्यदायी असतो. चिंचेचा चहा प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि या चहाच्या साह्याने तुम्ही वजन देखील कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला चिंचेचा चहा कसा तयार करायचा आणि त्यांचे काय फायदे आहेत याची सविस्तर माहिती सांगणार आहोत.


*साहित्य :* 


1) पाणी दोन कप


2) एक मूठभर चिंचेची पाने


3) आले


4) अर्धा चमचा हळद


5) दोन चमचे मध


6) चार ते पाच पुदिन्याची पाने


*कृती :* 


सर्व प्रथम चिंचेची पाने नीट स्वच्छ धुवून घ्यावी. यानंतर एका पातेल्यात पाणी घेऊन त्यात किसलेले आले, चिंचेची पाने, हळद, पुदिन्याची पाने घालून 7 ते 8 मिनिटे उकळू द्यावे. यानंतर ते गाळून एका कपमध्ये काढा आणि थोडे थंड झाल्यावर त्यात मध मिसळून प्या.


आता बघू या चिंचेचा चहा पिण्याचे फायदे :


1) चिंचेच्या पानांचा चहा प्यायल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोकाही कमी होतो.


2) शरीरात गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्ट्रॉल असे दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात. यातील बॅड कोलेस्ट्रॉलची शरीरातील पातळी वाढली तर हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे अशावेळी चिंचेच्या पानांचा चहा तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो.


3) शुगरचा त्रास असलेल्या लोकांसाठी चिंचेचा चहा अतिशय उपयुक्त ठरू शकतो. चिंचेच्या पानांमध्ये पॉलिफेनॉल आणि फ्लेव्होनॉइड्स हे घटक आढळतात. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. तसेच चिंचेच्या अर्कामध्ये मधुमेहविरोधी गुणधर्म आढळतात.


4) लठ्ठपणाचा सामना करत असलेल्या लोकांसाठी चिंचेचा चहा वरदान ठरू शकतो. बहुतांश लोक वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि धावण्यासारखे मेहनतीचे पर्याय अवलंबतात. परंतु त्यासोबत तुम्ही तुमच्या आहारात काही बदल केले तर वजन वेगाने कमी करण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. अशा स्थितीत तुमच्यासाठी चिंचेचा चहा खूप फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असलेल्या लोकांनी चिंचेचा चहा नियमित प्यावा.


5) अपचनाच्या समस्येचा सामना करत असलेल्या लोकांसाठी देखील चिंचेचा चहा खूप उपयुक्त ठरू शकतो. चिंचेच्या पानांमध्ये अनेक पोषक तत्त्व असतात जे शरीरातील पाचक रसाला उत्तेजित करण्याचे काम करतात. त्यामुळे पचन प्रक्रिया सुधारते. चिंचेच्या चहाचे सेवन केल्याने पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.


*संकलन-* 


Featured post

Lakshvedhi