भारतातील पहिलं माहेरघर
लेखक: निरेन आपटे
माहेरी जाऊन राहावसं वाटतंय? तिथे आपले लाड व्हावेत असंही वाटतंय? आणि सोबत मैत्रिणींना नेता आलं तर?...स्वतःच्या माहेरी हे सगळं कदाचित होणार नाही, पण असं एक माहेरघर आहे जिथे सगळं होईल. असं महेरघर उभं केलं आहे प्रभाताई शिर्के ह्यांनी. बदलापूरमध्ये. ह्या घराबद्दल आणि प्रभाताईंच्या प्रेरक प्रवासाबद्दल सांगत आहेत निरेन आपटे.
बदलापूरमध्ये प्रभाताईंनी बंगला घेतला आहे तो महिलांना आणि पुरुषांनाही माहेरचा आनंद घेता यावा ह्यासाठी. बंगल्याच्या दारात महिला आल्या की त्यांना ओवाळले जाते. भाकर तुकड्याने नजर काढली जाते, गरम पाण्याने पाय धुतले जातात आणि प्रभाताई हसतमुखाने ह्या महिलांना माहेरवाशीण असल्याचा आनंद देतात. जेवायला पुरणपोळी, श्रीखंड, बासुंदी, पुरी भाजी असे जे मागाल ते मिळते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकार आहेत. शिवाय इथे राहायची, भरपूर गप्पा मारायची, गाणी गायची आणि नाचायचीही सोय आहे. हे सगळं करताना प्रभाताईंचा सहभाग असतो. प्रत्येक महिलेला काय हवं ते त्या स्वतः पाहतात. चहा, नाश्ता असे सगळे लाड पुरवतात. डोहाळजेवण, व्याहीजेवण, केळवण, वाढदिवस असे कार्यक्रम करतात. पुरुषांचं माहेर नसतं, पण प्रभाताईंनी तीही सोय केली आहे. माहेरवाशिणींचे लाड करणं हा प्रभाताईंचा व्यवसाय आहे आणि नव्या जीवनशैलीमुळे अनेक ग्रुप त्यांच्याकडे येत आहेत. त्यासाठी त्या अत्यंत माफक दर आकारतात.
माहेरवाशिणींचे लाड करण्याचा हा व्यवसाय भारतातला बहुदा पहिलाच व्यवसाय आहे. ह्या अनोख्या संकल्पनेमुळे अनेक महिलांना आनंद मिळत आहे. हा आनंद देणाऱ्या प्रभाताईंचा प्रवासही खूप काही शिकवणारा, प्रेरणा देणारा आहे. विशेषतः ज्या महिलांसमोर संकट उभं राहतं. ऐन उमेदीत दुःखाचं आभाळ कोसळतं त्यांना त्यातून मार्ग काढण्यासाठी प्रभाताईंचा जीवनप्रवास नक्कीच मार्गदर्शक ठरू शकतो.
प्रभाताईंचे यजमान आकाशवाणीवर बासरी वाजवण्याचे, संगीत देण्याचे काम करत असत. दोघांचा प्रेमविवाह झाल्यामुळे संसार चांगला सुरु झाला होता. पण दैवाने उलटे फासे टाकले. यजमान रियाज करत असताना त्यांना हार्ट ऍटॅकचा झटका आला. त्यांची तडफड पाहून प्रभाताई क्षणभर हवालदिल झाल्या. पण लगेच खंबीर होऊन हालचाल केली आणि यजमानांना हॉस्पिटलमध्ये नेऊन त्यांचा कसाबसा जीव वाचवला. त्यांचा जीव वाचला खरा, पण अपंगत्व आले. ते अंथरुणाला खिळून राहिले. त्यांची सेवा करण्यात प्रभाताईंचा दिवस जाऊ लागला. आर्थिक परिस्थिती खराब होत गेली. चार पैसे मिळावेत म्हणून त्या काही घरांमधून पोळी-भाजी बनवण्याचं काम करू लागल्या. एकीकडे डॉक्टरांकडे चकरा चालू होत्या. यजमानांवर उपचार होत होते. तो खर्च वाढत होता. त्यात डॉक्टरांनी सल्ला दिला की मुलबाळ होऊ देऊ नका. कारण पित्याच्या अशा स्थितीमुळे मुलामध्ये व्यंग येण्याची शक्यता होती. त्यामुळे प्रभाताईंसमोर काहीही भविष्य उरलं नाही. तरीही त्यांनी हार मानली नाही. यजमानांना जगवण्यासाठी धावपळ सुरु केली. आपण काहीतरी व्यवसाय केला पाहिजे हे लक्षात आल्यावर त्यांनी जिममध्ये इंस्ट्रक्टर होण्यासाठी तळवलकर जिममध्ये प्रशिक्षण घेतले आणि त्या इंस्ट्रक्टर झाल्या. एकीकडे पोळी भाजीचे डबे पोहचवत होत्या. यजमानांकडे पाहत होत्या आणि आता स्वतःचं जिम सुरु केलं. वॉकर आणि सायकल घेऊन महिलांसाठी जिम सुरु केलं. सगळ्यांशी त्या प्रेमाने वागत होत्या. त्यामुळे ६ महिन्यात गर्दी वाढली आणि आणखी मोठी जागा घ्यावी लागली.
पहाटे लवकर उठून रात्री उशिरापर्यंत राबायला सुरुवात झाली. प्रभाताईंच्या हाताला अनोखी चव होती. त्यांचे डबे सगळ्यांना आवडू लागले. एकदा एकावेळी ५०० पुराणपोळ्यांची ऑर्डर आली. प्रभाताईंनी ठरवलं होतं की कोणत्याही कामाला नाही म्हणायचं नाही. कमी वेळात इतक्या पुरणपोळ्या बनवण्याचं आवाहन त्यांनी स्वीकारलं. त्या पुरणपोळ्या इतक्या रुचकर बनल्या की प्रभाताईंना सगळे सुगरण मानू लागले. त्या कामात बुडून गेल्या. सकाळी घरातून निघताना यजमान म्हणायचे की लवकर ये! त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून प्रभाताईंना वाईट वाटे. ते सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहेत हे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्या मुलुंडला राहतं होत्या. घर छोटं होतं. आपला एक बंगला असावा असं स्वप्न होतं आणि स्वप्न साकार करण्यासाठी वाटेल ते कष्ट करायची तयारी होती.
अशात बदलापूरला जागा मिळत होती. पण ती विकत घेता येईल इतके पैसे नव्हते. तेव्हा प्रतिभाताई पिळगावकर ह्यांनी मोठी रक्कम देऊ केली. शिवाय बँकेकडे कर्जासाठी अर्ज केला होता. बँकेच्या मॅनेजरने त्यांचा जिम आणि खानावळीचा व्यवसाय पाहिला. आपल्या समोर आलेला ग्राहक शून्यातून सगळं निर्माण करत आहे हे पाहून मॅनेजर भारावला आणि त्यांनी कर्ज मंजूर केलं.
यजमानांची सेवा केल्यामुळे बदलापूरच्या जागेत आपण वृद्धाश्रम सुरु करावा आणि वृद्धांची सेवा करावी असा विचार मनात आला. पण तोवर स्वतःच वय वाढलं होतं. शिवाय यजमानांकडे पाहायची जबाबदारी होतीच. त्या जागेत जिम चांगलं चालू लागलं. तिथे डायटेशियन आणि डॉक्टर नेमला. पण जितक्या प्रभाताई कणखर, तितकीच नियती कठोर होती. २००५ साली पूर आला आणि पुराचं पाणी घरात शिरलं. सगळे कष्ट पाण्यात बुडाले. पुन्हा शून्यापासून उभं करायची वेळ आली. त्यावेळी विजूताईनी खूप मदत केली. दरवेळी कोणी ना कोणी महिला मदतीसाठी उभी राहायची. संकट इथेच थांबलं नाही. यजमानांना पुन्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं. डॉक्टरांनी सल्ला दिला की ते वाचणार नाहीत. त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेऊन आणखी खर्च करू नका! अखेरीस जे विधिलिखित होतं तेच घडलं. यजमानांनी प्रभाताईंसमोर प्राण सोडला. हा घात इतका मोठा होता की आत्महत्येचे विचार मनात यायला लागले.आसपासचे लोक धीर द्यायला येत होते. शेवटी जे घडेल ते स्वीकारायचं हे मनाशी ठरवून पुन्हा उभं राहायचं ठरवलं. जिवलग मैत्रीण सुवर्ण जोशी हिने सल्ला दिला की तुझ्या जागेत महिलांसाठी माहेर सुरु कर. ही अभिनव संकल्पना होती. प्रभाताईंनी सुरुवात केली. पहिल्यांदा १५ महिलांचा ग्रुप आला. त्यांना दारात ओवाळून आत घेतलं. गरम पाण्याने पाय धुतले. सायंकाळी शुभंकरोती म्हणून घेतलं आणि त्यांना पुलाव-कढी बनवून खायला घातली. त्या महिलांना स्वतःच्या आईकडे आल्यासारखे वाटले. त्यांना इतकं प्रेम मिळालं की त्यांनी आणखी काही जणांना सांगितलं. अशाप्रकारे ह्या माहेरचा प्रचार होत गेला आणि एकामागून एक ग्रुप येऊ लागले आणि प्रभाताईंना एक नवीन काम मिळालं. हे काम करताना मनाशी एक निर्णय घेतला की ज्या महिला परिस्थितीने पिचून गेल्या आहेत त्यांना मदत करायची. म्हणून त्यांनी स्वतःच्या माहेर घरात अनेक गरजू महिलांना स्वयंपाक, साफ सफाई अशी कामे दिली. रोजगार मिळवून दिला. ह्यापुढे आणखी गरजू महिलांना काम द्यायचं त्यांचं ध्येय आहे. अनेक पीडित महिलांचे संसार उभे करावे असं स्वप्न आहे. त्यांनी सामाजिक बांधिलकी इतकी जपली की २०१९ साली आलेल्या पुरात पन्नास लोकांना स्वतःच्या घरात आश्रय दिला. त्यांच्या खाण्या-पिण्याची, राहण्याची व्यवस्था केली. बदलापूर शहर अध्यक्ष वामनदादा म्हात्रे ह्यांना ही गोष्ट कळली. त्यांनी येणारी मदत प्रभाताईंकडे फिरवली आणि तिथून ती अनेक बदलापूरकरांना मिळत गेली. म्हणजे स्वतः संकटे झेलुनही प्रभाताई इतरांना संकटात मदत करू लागल्या. कष्ट, जिद्द, चिकाटीने फक्त त्यांचं नाही तर अनेकांचं भलं केलं.
दरम्यान माहेरवाशीण म्हणून येणाऱ्या महिलांची संख्या पुन्हा वाढू लागली. आनंदी झालेल्या महिलांनी ह्या माहेरघराचे विडिओ बनवून समाज माध्यमांवर टाकले. ते विडिओ अमेरिकेतही गेले. आपोआप ह्या माहेरघरात येणाऱ्यांची संख्या वाढू लागली. त्यांचे लाड पुरवताना चकल्या, पुरणपोळ्या, मोदक, आम्रखंड अशा पदार्थांची ऑर्डर घेणे चालू होते. एकदा एकावेळी ७०० पुराणपोळ्यांची ऑर्डर आली. कोणतीही ऑर्डर आली तर नाकारायची नाही हे ठरवलेच होते. त्यामुळे आसपासच्या महिलांना सोबत घेऊन ऑर्डर पूर्ण केली. ग्राहक समाधानी होत गेले आणि त्यांची मागणीही वाढत गेली. नियती जणू प्रभाताईंची परीक्षा घेत होती. लॉक डाउनचही संकट येऊन गेलं. पण प्रभाताईंनी हार मानली नाही. दोन्ही लॉक डाउननंतर पुन्हा अनेक महिला माहेरवाशिणीचं सुख घ्यायला येत आहेत. एका ७० वर्षाच्या आजोबांनी तर फोन करून कळवलं की फक्त महिलांचे लाड करू नका, पुरुषांनाही माहेरपणाचं सुख द्या. तिथून पुरुषांचही स्वागत सुरु झालं आहे. सगळंच अनोखं आहे.
संकटे येतात. अक्षरशः आयुष्य उध्वस्त करून जातात. जीवलगांचा मृत्यू, पूर-दुष्काळ, आर्थिक अडचणी, बेरोजगारी पाचवीलाच पुजलेली असते. पण त्यातून यशाचा मार्ग काढता येतो. प्रभाताई शिर्के ह्यांचा जीवनप्रवास हाच संदेश देत आहे. कष्ट, जिद्द, चिकाटी ह्या बळावर मोठी संकटही दूर करता येतात.
प्रभा शिर्के ह्यांचा संपर्क क्रमांक: + 91 9923564125
हे अनोखं माहेरघर तुमच्या मित्र-मैत्रिणींना कळवण्यासाठी हा लेख इथून कॉपी-पेस्ट करून whatsapp किंवा फेसबुकवर पोस्ट करू शकता.
No comments:
Post a Comment