*धरणीमातेची दीन बालके*
लेखिका - सुधा मूर्ती
कुष्ठरोग, नुसतं हे नाव काढले की बरेच लोक घाबरतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर कुष्ठरोगी व्यक्तीस लेपर म्हणून कधीही संबोधू नये अशी प्रथा आहे. कारण लेपर या शब्दाच्या मागे जो एक अभिप्रेत भाव आहे तो फार वाईट आहे. कुष्ठरोगाची शिकार झालेल्या व्यक्तीचा विचार आला की लगेच आपल्याला हातापायाची बोटे झडलेला भिकारीच आठवतो. कुष्ठरोगाने पीडित असलेल्या व्यक्तींना समाज सुद्धा वाळीत टाकतो.
पण इथे एक गोष्ट आपण सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे की वेळच्या वेळी योग्य उपचार घेतले तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो, तोही काहीही शारीरिक व्यंग मागे न सोडता. अर्थात हे उपचार दीर्घकाळ चालतात. रुग्णाला खूप संयम बाळगावा लागतो, धीराने घ्यावे लागतं. कुटुंबीयांच्या आधाराची गरज असते. या भयावह रोगाविषयी कितीतरी गैरसमज आढळून येतात. तो संसर्गजन्य आहे, आनुवंशिक आहे इत्यादी. पण हे गैरसमजच आहेत. कुष्ठरोगाचे सर्वच प्रकार काही संसर्गजन्य नसतात.
या रोगाविषयीच्या अज्ञानामुळे त्याची लक्षणे लोकांच्या लवकर लक्षात येत नाहीत. खरंतर ही लक्षणे लवकर कशी ओळखावी याविषयी प्रसार माध्यमे अनेकदा जनजागरणाचं काम करत असतात. पण तरीही हे घडत नाही. अनेकदा लोक फिकीरच करत नाहीत. आपण नेहमी असाच विचार करत असतो की हा प्रश्न इतरांचा आहे, आपला नव्हे. आपण एक गोष्ट विसरतो या रोगाच्या जगात गरीब-श्रीमंत स्त्री-पुरुष असा भेदभाव नाही आणि कुष्ठरोग तर मानवजातीच्या अगदी प्रारंभीच्या काळापासूनच या पृथ्वीतलावर अस्तित्वात आहे. अगदी येशू ख्रिस्ताच्या काळापासून.
आमच्या संस्थेचे जे अनेक उपक्रम आहेत त्यातील एक उपक्रम कुष्ठरोग्यांना मदत करणे हाही आहे. या क्षेत्रात वेगवेगळे सिद्धांत मांडले गेले आहेत. काही लोकांच्या मते कुष्ठपीडित रूग्णानी आपल्या कुटुंबातच राहायला हवे, तर काही लोक म्हणतात की त्यांनी वेगळ्या वस्तीत जाऊन राहिले पाहिजे.
मी एकदा एका ओसाड प्रदेशात कामासाठी गेले होते. तेथे कुष्ठरोग्यांची वेगळी वसाहत होती. उन्हाळ्याचा ताप असह्य होत होता. त्या वसाहत मधील दृश्य अत्यंत निराशाजनक होते. वसाहतीत राहणाऱ्या लोकांना त्या रोगाची घृणा वाटत होती. त्यांना यातना सुद्धा सहन होत नव्हत्या.
आम्ही तिथे त्यांना दया दाखवण्यासाठी किंवा आर्थिक मदत करण्यासाठी गेलो नव्हतो. त्या लोकांना आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी करावं हाच आमचा हेतू होता. ते अगदी लहानसाहान काम जरी करू शकले व पोटा पाण्यापुरतं मिळवू शकले तरी त्यासाठी लागेल ती आर्थिक मदत करायला आम्ही तयार होतो. त्यांचा आत्मविश्वास परत यावा म्हणून आम्ही असं करायचं ठरवलं होतं. कारण माणसाला जेव्हा स्वतःविषयी आत्मविश्वास वाटतो तेव्हाच तो उजळ माथ्याने समाजापुढे तोंड वर काढू शकतो.
त्या वसाहतीतील सर्वात लोक गरीब व असहाय होते. त्यांना मानसिक आणि वस्तूरूपाने अशी दोन्ही प्रकारची मदत हवी होती. काळजी करू नका, आम्ही आहोत ना. असे छोटेसे शब्दसुद्धा त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. समाजाकडून स्वीकार आणि काही मर्यादित स्वरूपात का होईना पण आर्थिक स्वातंत्र्य या दोन गोष्टींनी या लोकांचे आयुष्य बदलून गेले असते.
वसाहतीत बऱ्याच झोपल्या होत्या. प्रत्येक झोपडीत एक एक कुटुंब राहत होते. प्रत्येक कुटुंबातील निदान एक तरी व्यक्ती या रोगाने पीडित होती. हवा फार त्रासदायक होती. पण मला माझं कर्तव्य पार पाडणं भागच होतं. या झोपडीतून त्या झोपडीत भेटीसाठी जाणं गरजेचं होतं. झोपडीतील स्त्रिया त्यांच्या अडचणी मला सांगत होत्या. सर्वात दुःखाची गोष्ट अशी ती त्यांना झालेल्या या दुखण्यामुळे साधी धुणंभांड्याची कामेही त्यांना कोणी देत नव्हते. त्यांच्यातील काहींनी नशिबापुढे हार मानली होती. सकाळची वेळ असूनही तरुण मुले झोपून होती. लहान मुले मातीत खेळत होती.
वृद्धांची अवस्था तर अत्यंत दारूण होती. मुळात कुष्ठरोगासारखा दूर्धर रोग, त्यात वृद्धापकाळमुळे कमजोर झालेले शरीर, शिवाय या रोगामुळे समाजाकडून मिळणारी हेटाळणीची वागणूक… कधी कधी अशा परिस्थितीने गांजलेली व्यक्ती आत्महत्येला सुद्धा प्रवृत्त होऊ शकते.
तिथे एक लहानशी, गवताने शाकारलेली झोपडी होती. चिकणमातीच्या भिंती व बांबूचे दार होते. एक स्त्री तिथे राहत होती. ती त्या वसाहतीतील सर्वात वयोवृद्ध स्त्री होती. तिचे नाव वीराम्मा. मी तिला हाका मारून बाहेर बोलावलं. पण ती आली नाही. तिला कदाचित जरा कमी ऐकू येत असेल त्यामुळे आपणच आत जाऊन तिच्याशी बोलावं असं मला वाटलं. मी त्या दारावर अगदी हलकेच टकटक केली, न जाणो दारच मोडायचं. तरीही तिने ओ दिली नाही की बाहेर आली नाही. मग मीच दार ढकलून आत गेले.
झोपडीत काही सामानसुमान नव्हतं. छताला थोडे झरोके होते. त्यातून थोडी हवा व उजेड आत येत होता. दोन-तीन गाडगी-मडकी व एक मातीची थाळी होती. तीन दगडांची चूल मांडलेली होती. एक फाटकी चटई जमीनीवर अंथरलेली होती. जवळच दोन-तीन कांदे पडले होते व पाण्याने भरलेला माठ होता.
मला झोपडीत वीरम्मा चटकन दिसेना, पण तिच्या श्वासोच्छवासाची चाहूल तर लागली. बाहेरच्या लख्ख प्रकाशातून एकदम आत शिरले होते त्यामुळे डोळे दिपले होते. काळोखाची डोळ्यांना सवय होण्यास वेळ लागला.
मी परत एकदा हलकेच हाक मारली, वीरम्मा मला तुमच्याशी बोलायचंय, कुठे आहात तुम्ही ?
ती म्हणाली, अम्मा मी इथे आहे. पण माझ्याजवळ नका येऊ.
आता मला अंधारात, खोलीच्या कोपऱ्यात बसलेली ती कृश स्त्री दिसली. शरीर सुरकुतलेलं, अंगावर मांसाचा कण नाही. नुसतं कातडं आणि हाडांचा सापळा. ती हाताची घडी करून कोपऱ्यात पाय पण पोटाशी ओढून अंगाचे मुटकुळं करून बसली होती.
अम्मा, ती पुटपुटली, तुम्ही बाहेरून खूप हाका मारत होता ना ? पण मी तुमच्याशी बोलायला बाहेर कशी येणार ? मी एक स्त्री आहे. म्हातारी असले म्हणून काय झालं, अंगात कपडा नसताना इतक्या लोकांसमोर कशी येणार मी ?
तेव्हा मला कुठे जाणवलं की, तिच्या अंगावर जवळपास वस्त्रच नव्हतं.
मी माझ्या कार्याच्या निमित्याने अनेक गरीब वस्त्यांमधून हिंडले आहे. अठरा विश्वे दारिद्र्य मी पाहिलंय. पण आजवर कधी अशी स्त्री पाहिली नव्हती. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून पन्नास वर्षे झाल्यानंतर गरिबीची ही दारुण अवस्था खरोखर मानवतेला काळीमा फासणारी होती. एका वृद्ध स्त्री जवळ अंग झाकण्यापुरता कपडा नसावा ? आणि तरीही ती तक्रार करत नव्हती. सहा वार साडी नेसल्याबद्दल मलाच अपराधी वाटलं.
काही क्षण मला माझी स्वतःची लाज वाटली. मी काहीच बोलले नाही. खरं तर थेट वस्तूरूपाने देणगी किंवा रोख रक्कम हातात द्यायची नाही, असं आमच्या संस्थेचे धोरण आहे. पण ते मी क्षणभर विसरले. ही परिस्थितीतच अशी होती की तातडीने काहीतरी उपाययोजना करणं अत्यावश्यक होतं. मी माझ्या ड्रायव्हरला पाठवून त्या वस्तीतील स्त्रियांना देण्यासाठी शंभर साड्या मागवल्या. त्या स्वावलंबी होतील की नाही, स्वतःच्या पायावर उभ्या राहतील की नाही ही दुरची बाब होती. स्त्रीला लज्जा रक्षणापुरतं वस्त्र तरी किमान असणं ही निकड होती. तेवढं पुरवून सुद्धा त्याने त्या स्त्रीयांच्या आयुष्यात फार मोठा फरक पडणार नव्हता. पण इतकी गरिबी, इतकी दारूण अवस्था मी पाहिली की काही वेळा आपण तातडीने काहीतरी कृती करून जातो, त्यातलीच एक गोष्ट. ही गरीब माणसे त्यांचा स्वतःचा काही अपराध नसताना अशी दुःखाच्या खाईत खितपत पडलेली दिसतात तेव्हा आपल्यासारख्या लोकांनी त्यांना जमेल तेवढी मदत केली पाहिजे. कारण ईश्वराने मुक्त हस्ताने आपल्यावर कृपेची उधळण केलेली आहे.
भारत म्हणजे काही नुसतं तंत्रज्ञान, आधुनिकता, फॅशन, सिनेमे किंवा सौंदर्यस्पर्धा नव्हे. खरा भारत तर आपल्या देशाच्या अंधाऱ्या कानाकोपऱ्यात वसलेला आहे. कोणत्याही सरकारी यंत्रणेचे हात देखील पोचू शकणार नाहीत, अशा कानाकोपऱ्यात आपण देश सेवा करणं म्हणजे या अशा लोकांची सेवा करणं.
त्या दिवशी त्या कुष्ठरोगांच्या वसाहतीत जाऊन आल्यापासून आता मी नेहमी एक गोष्ट करत असते कधीही अशा वस्तीत भेटीसाठी गेले तर किमान दहा तरी साड्या बरोबर घेऊन जाते.
*समाप्त*
No comments:
Post a Comment