*“कालाडूंगर किंवा काला डोंगर आणि दत्तात्रेय मंदिर”*
कालाडूंगर म्हणजेच काळा डोंगर ही कच्छ-गुजरात मधील सर्वोच्च म्हणजेच समुद्र सपाटीपासून १४०० फुट उंच टेकडी आहे.
विशेष म्हणजे ह्या टेकडीवरून जगप्रसिद्ध कच्छच्या रणाचे अतिशय विहंगम दृश्य बघायला मिळतं, अगदी १८० अंशापर्यंत देखावा असलेल्या ह्या रणाच्या टोकाशी भारत-पाक सीमादेखील दिसते.
या ठिकाणी ब्रह्मा-विष्णू-महेश स्वरूपातील दत्ताचं अतिशय मनमोहक, शांत आणि छोटंसं देऊळ आहे, जे समाधीस्थान म्हणून देखील प्रचलित आहे.
भुज पासून ९० किलोमीटर अंतरावर कालाडूंगर वसलेला आहे, परंतु इथे पोचण्यासाठी सार्वजनिक वाहतूक नाही. आपल्याला वाहतुकीची व्यवस्था स्वतःच करावी लागते.
ह्या परिसरात एकच निवासस्थान आहे आणि ते देखील अगदी माफक व्यवस्था असलेलं! त्यामुळे आगाऊ आरक्षण वगैरे इथे चालत नाही, ‘जो हाजीर तो वजीर’ अश्या प्रकारेच इथे राहण्याची व्यवस्था होते.
आता ह्या मंदिराचा आणि टेकडीचा थोडा अद्भुत इतिहास जाणून घेऊया.
येथील स्थानिक लोकांच्या मतानुसार फार पूर्वी त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्ताचे तब्बल १२ वर्षे येथे वास्तव्य होते. दरम्यानच्या काळात त्यांनी तिथे एक कुटी-सदृश आश्रम बांधला आणि त्यांच्या शिष्यांसोबत ते तिथे राहू लागले.
दत्तात्रेय स्वतः दरोरोज अगदी नित्यनेमाने प्रसाद बनवायचे आणि हा प्रसाद देवाला नैवेद्य दाखविल्यानंतर भक्तगणांत वाटला जायचा.
ह्या टेकडीवर मोठ्या प्रमाणात कोल्हे होते, आजही आहेत.
अशी आख्यायिका आहे की एक दिवस दत्तात्रेय ध्यानधारणा करून आपल्या कुटीत परतत असताना काही कोल्ह्यांनी त्यांची वाट अडवली,
पण हल्ला केला नाही कारण दत्तात्रेयांच्या डोळ्यांतील अद्भुत तेज त्यांना दिसले.
पशूंना देव आणि मानव ह्यातील फरक ओळखण्याचं सामर्थ्य परमेश्वरानेच दिलेलं असतं असं म्हणतात.
मग दत्तात्रेयांनी आपल्या जवळील प्रसाद म्हणजेच भात आणि गुळात शिजवलेलं गोडं वरण असं ह्या कोल्ह्यांसमोर ठेवलं आणि आश्चर्य म्हणजे कोल्ह्यांनी प्रसाद स्वाहा करून पळ काढला.
परंतु एक दिवस वेळेत शिधा न आल्याने दत्तात्रेयांकडे प्रसाद नव्हता म्हणून त्यांनी आपले हात प्रसाद म्हणून त्या कोल्ह्यांना देऊ केले. परंतु दैवी सामर्थ्य अंगी असलेल्या ह्या त्रेमूर्तींना कोल्ह्यांनी काहीही केले नाही. त्या दिवसापासून रोज कोल्ह्यांना नैवेद्य अर्पण करण्याच्या प्रथेस प्रारंभ झाला व दत्तात्रेयांनी आपल्या शिष्य वर्गाला देखील हा नियम घालून दिला.
नवल म्हणजे आज ४०० वर्षानंतरही गावकर्यांनी ही प्रथा सुरु ठेवली आहे. ह्या कोल्ह्यांना रोज सकाळी ९ वाजता आणि सायंकाळी ६ वाजता हा गोड भाताचा नैवेद्य वाटला जातो.
विशेष म्हणजे आजपर्यंत एकही माणसाला इजा न करता अगदी योग्य वेळेला हे कोल्हे टेकडीवर जमा होतात आणि ह्या प्रसादाचा लाभ घेतात. आता तर कोल्ह्यांसोबत, मैना, पोपट, आणि इतर पक्षीही ह्या भोजनाचा आस्वाद घ्यायला इथे येतात.
अश्या ह्या निसर्गरम्य आणि पावन वातावरणात मनःशांतीसाठी कित्येक भक्तजन कालाडूंगर किंवा काला डोंगरच्या वाटेने निघतात.
पशु आणि मानव ह्यांचे अतिशय निर्मळ नातं येथे पहावयास मिळते व मन थक्क होऊन जाते.
तर मित्रांनो गुजरातची सहल जेव्हा कराल, तेव्हा त्या सहलीत
कालाडूंगर पाहायला विसरू नका ! 🙏🙏
No comments:
Post a Comment