Friday, 1 September 2023

मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी

 मुंबईतील प्रमुख रस्त्यांसोबतच गल्ल्यांमध्येही स्वच्छता मोहीम राबवावी


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाईचेही निर्देश


          मुंबई, दि. १ : ‘मुंबईतील केवळ प्रमुख रस्तेच नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरित स्वच्छता मोहीम राबवावी. तसेच स्वच्छतेबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय.एस. चहल यांना दिले.


          ‘मुंबईतील स्वच्छतेबाबत कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. ही बाब मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने गांभिर्याने घ्यावी, असेही मुख्यमंत्र्यांनी आयुक्त श्री. चहल यांना सांगितले आहे.


          माझगाव डॉक येथील कार्यक्रमाहून परतत असताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना या परिसरात काही ठिकाणी राडारोडा, अस्वच्छता, कचरा आढळला. त्याची दखल घेत, तेथूनच मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आयुक्त डॉ. चहल यांना दूरध्वनीद्वारे संपर्क केला. तसेच या परिसरातीलच नव्हे, तर मुंबईतील सर्व रस्ते, गल्लीबोळ, छोटे रस्ते स्वच्छ करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘मुंबईत कुठेही रस्त्यावर कचरा दिसता कामा नये, याची काळजी घ्या. राडारोडा आणि कचरा त्वरित हटवा. यासाठी पालिकेचे सर्व सहायक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, स्वच्छता निरीक्षक- स्वच्छता कर्मचारी अशा सर्व यंत्रणांना कामाला लावा. शहरातील ज्या-ज्या ठिकाणी भिंतींचे सुशोभीकरण करण्याचे काम अपूर्ण आहे, ते त्वरित पूर्ण करा,’ अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या.


          माझगाव डॉक परिसरातील अस्वच्छता प्रकरणी तेथील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, तसेच येत्या सात दिवसांमध्ये मुंबईतील सर्व वॉर्ड आणि त्यांचा परिसर, सर्व समुद्रकिनारे यांची स्वच्छता युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल, असे आयुक्त डॉ. चहल यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.

उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबई दौऱ्यावर

 उपराष्ट्रपती जगदीप धनखड मुंबई दौऱ्यावर

            मुंबई, दि. १ : उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वागत केले.   


            उपराष्ट्रपती श्री. धनखड आज सपत्नीक एकदिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी आमदार ॲड.आशिष शेलार, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी तथा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, पोलीस महासंचालक रजनीश सेठ, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्यासह लष्कर, नौदल, वायुसेनेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार

 गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार


- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


प्रो गोविंदाचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून अभिषेक बच्चन यांच्या नावाची घोषणा


          मुंबई, दि. ३१ : दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य खेळांच्या खेळाडूंना लागू असलेल्या नियमानुसार शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.


          वरळी येथील एनएससीआय डोम येथे देशातील पहिली प्रो गोविंदा लीग २०२३ या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते. यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, बाळा नांदगावकर, नितीन देसाई, अभिनेते अभिषेक बच्चन, पूर्वेश सरनाईक, दहीहंडी समन्वय समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.


          मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, राज्य शासनाने 50 हजार गोविंदांना विमा कवच दिले होते. 50 हजार नोंदणी पूर्ण झाली आणि अनेक गोविंदांना नोंदणी करता आली नाही. त्यामुळे आणखी 25 हजार गोविंदांना विमा कवचाला तत्काळ मंजुरी दिली. आता ७५ हजार गोविंदांना विमा संरक्षण दिले आहे. दहीहंडी उत्सव स्व.आनंद दिघे यांनी ठाणे शहरात प्रथम मोठ्या उत्साहात साजरा करण्यास सुरुवात केली. थरांचे विक्रमही ठाण्यातील गोविंदांनी केले. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आली आहे.


          राज्यातील सर्व नागरिकांनी आता गणेशोत्सव, नवरात्री असे सन उत्साहात साजरा करावेत. पूर्वीचे सर्व निर्बंध आता काढून टाकले आहेत. राज्यातील परंपरा सण, उत्सव, एकता, बंधूभाव निर्माण करण्यासाठी महत्त्वाचे असतात. प्रो कबड्डीसारखे प्रो गोविंदासाठी अभिनेते अभिषेक बच्चन यांनी काम करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.


          उद्योग मंत्री श्री. सामंत म्हणाले की, देशात पहिल्यांदा गोविंदाचा विमा उतरविण्यात आला आहे. इतर राज्यातील गोविंदा पथकांनी आपल्या राज्यात विमा घेण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. त्यांनाही सहकार्य करण्यात आले आहे.यापुढे ही स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.


          क्रीडा मंत्री श्री. बनसोडे म्हणाले की, मुख्यमंत्री महोदयांचे प्रो गोविंदा लीगचे स्वप्न होते ते आज साकार होत आहे. हा खेळ जागतिक पातळीवर घेवून जाण्यासाठी शासन प्रयत्न करील. पारंपरिक खेळांना जागतिकस्तरावर नेण्यासाठी आयपीएल, प्रो कबड्डी यासारख्या लोकप्रियता या स्पर्धेच्या निमित्ताने वाढणार आहे. या स्पर्धेसाठी एमआयडीसी आणि दहीहंडी समन्वय समितीचे सहकार्य केले असल्याचे त्यांनी सांगितले.


          या स्पर्धेचे थीम 'घेवून टाक' ही आहे. तीन फेऱ्यांमध्ये स्पर्धा होणार आहे. प्रो गोविंदा स्पर्धेमध्ये एकूण १६ संघ सहभागी झाले आहेत. पहिले बक्षीस ११ लाख रुपये, दुसरे बक्षीस ७ लाख रुपये, तिसरे बक्षीस ५ लाख रुपये आणि चौथे बक्षीस ३ लाख रुपये ठेवण्यात आले आहे. याचबरोबर महिला संघ आणि अंध गोविंदा पथकांनाही सहभागाबद्दल एक लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.


0000


राजू धोत्रे/विसंअ/

परदेश अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळ लंडनमध्ये दाखलअभ्यास भेटीत विविध विषयांवर चर्चा

 परदेश अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळ लंडनमध्ये दाखलअभ्यास भेटीत विविध विषयांवर चर्चा      

            लंडन / मुंबई दि. ३१ :- महाराष्ट्र विधानमंडळाच्या २२ सदस्यांचे शिष्टमंडळ जर्मनी, नेदरलँड्स, लंडन (यु.के.) या तीन देशांच्या अभ्यास दौऱ्यावर असून त्याचे नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे या करीत आहेत.


            आजपासून विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर या अभ्यास दौऱ्यात सहभागी झाले आहेत. लंडन येथील भारताचे उच्चायुक्त विक्रम दोरायस्वामी यांची शिष्टमंडळाने अभ्यास भेट घेतली. यावेळी या शिष्टमंडळातील विधिमंडळ सदस्य, विधानमंडळाचे अधिकारी उपस्थित होते. उच्चायुक्त श्री. दोरायस्वामी यांनी ब्रिटनमधील शिक्षण व्यवस्था, कृषी प्रक्रिया उद्योग, प्रगत तंत्रज्ञान, पर्यावरण संरक्षणासंदर्भातील कायदे, ग्रीन एनर्जी, पवनचक्की प्रकल्प, उद्योग, महिला सबलीकरण, महिला अत्याचारालाप्रतिबंध होण्यासाठीचे कायदे इत्यादीबाबत सादरीकरणाव्दारे विस्ताराने माहिती दिली.


                   विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर आणि विधानपरिषद उप सभापती डॉ. गोऱ्हे यांनी अनुक्रमे उद्योगवाढीसंदर्भातील ब्रिटनमधील ध्येयधोरणे, महिलाहक्क आणि संरक्षणासंदर्भातील कायदे, उपाययोजना याबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी झालेल्या चर्चेत शिष्टमंडळातील सदस्यांनी भाग घेतला. उच्चायुक्त श्री. दोरायस्वामी आणि मान्यवरांचा उभयतांच्या हस्ते शाल आणि गौरवचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.


                   अभ्यास दौऱ्यावरील शिष्टमंडळ उद्या शुक्रवार, १ सप्टेंबर, २०२३ रोजी राष्ट्रकुल संसदीय मंडळ, मुख्यालय, लंडन येथे (Commonwealth Parliamentary Association) महासचिवांची (Secretary General) अभ्यासभेट घेणार आहे. शनिवार, २ सप्टेंबर, २०२३ रोजी सकाळी ११ वाजता लंडनमधील महाराष्ट्र मंडळाबरोबर भेट आयोजित करण्यात आली आहे. सोमवार, ४ सप्टेंबर, २०२३ रोजी अभ्यासदौऱ्यावरील शिष्टमंडळ मुंबईत परत येईल.


***

राज्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा

 राज्यातील दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ द्यावा


- मंत्री छगन भुजबळ


          मुंबई, दि. ३१ : राज्यभरातील दिव्यांग नागरिकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले. अंत्योदय योजनेचा इष्टांक संपला, तर प्राधान्य कुटुंब योजनेतून दिव्यांग बांधवांना अन्न धान्य देण्यात यावेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीमध्ये अन्न धान्यापासून दिव्यांग वंचित राहणार नाही, असे नियोजन करण्याचे निर्देश देखील मंत्री छगन भुजबळ यांनी दिले.


          मंत्रालयात आज आयोजित अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री श्री.भुजबळ बोलत होते.


          अन्न नागरी पुरवठा विभागाच्या गोदामांची दुरुस्ती करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून आवश्यकतेनुसार अर्थसहाय्य मिळण्यासाठी विभागाने तातडीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.


          मंत्री श्री.भुजबळ म्हणाले की, जनतेला रास्त भाव दुकानांमधून वेळेत शिधा उपलब्ध करुन देण्याची दक्षता विभागाने घ्यावी. शिवभोजन केंद्राच्या माध्मयातून गरजूंना सहाय्य होत असून सर्व शिवभोजन केंद्र सुरळीतरित्या सुरु असण्याची दक्षता संबंधितांनी घ्यावी. जे शिवभोजन केंद्र मुदतीत सुरु झाले नाहीत, याबाबत कालमर्यादेत माहिती मागवून अद्याप सुरु झालेले नाहीत, अशी केंद्रे रद्द करावीत. शिवभोजन केंद्रांची देय असलेली देयके वेळेत द्यावीत. राज्यातील जनतेला अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून अधिक तत्परतेने गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने विभागाचे संगणकीकरण करून अधिक पारदर्शकता आणावी, अशा सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.


          वैधमापन विभागाचा आढावा घेऊन सर्व ठिकाणी आवश्यक मनुष्यबळ, पूरक साधनसामग्री, वाहन व्यवस्था ठेवण्याचे सूचीत केले. वाहन काट्यांप्रमाणे (वे ब्रीज) प्रमाणे पेट्रोल पंप तपासणीसाठी सुध्दा SOP (प्रमाणित संचालन कार्यप्रणाली) बनवून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या.


          बैठकीस सर्व संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सुरगाणा, कळवण तालुक्यातीलसिंचन योजनांना निधी देऊन गती देणार

 सुरगाणा, कळवण तालुक्यातीलसिंचन योजनांना निधी देऊन गती देणार


- उपमुख्यमंत्री अजित पवार


     मुंबई, दि. ३१ : नाशिक जिल्ह्यातील आदिवासीबहुल सुरगाणा व कळवण तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची आणि सिंचनाची समस्या सोडविण्यासाठी वांगण, श्रीभुवन, जामशेत या लघुपाटबंधारे योजनांसह सतखांब साठवण तलाव योजनांना निधी उपलब्ध करून देऊन गती देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.


          उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह येथे नाशिक जिल्ह्याच्या सुरगाणा, कळवण तालुक्यातील जलसंधारणाच्या विविध प्रलंबित योजनांबाबत बैठक झाली. या बैठकीस आमदार नितीन पवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, आदिवासी विकास विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव आशिष शर्मा, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, मृद व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, जलसंधारण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक सुनील कुशिरे, नाशिकचे जिल्हाधिकारी जलज शर्मा (दूरदृश्यप्रणालीद्वारे), नाशिकचे अधीक्षक अभियंता हरिभाऊ गीते आदी उपस्थित होते.


          उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले की, सुरगाणा हा आदिवासी दुर्गम तालुका आहे. केंद्र सरकारच्या नीति आयोगाच्या आकांक्षित (मागास) तालुका कार्यक्रमांतर्गत सुरगाणा तालुक्याची निवड झाली आहे. या तालुक्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करून तालुका, जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक वाढवावा लागेल. येथील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्याची व शेतीसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणावे लागेल.


          जलसंधारण विभाग, आदिवासी विकास विभाग, जलसंपदा विभाग, वन विभाग आणि जिल्हा नियोजन समिती यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून सुरगाणा, कळवण तालुक्यातील विविध लघु पाटबंधारे योजना तातडीने पूर्ण कराव्यात. काही सिंचन योजनांवरील स्थगिती उठवण्यात आली आहे, तर बऱ्याच योजनांना पाणी वापर प्रमाणपत्र मिळाले आहे. या योजना प्राधान्याने पूर्ण कराव्यात, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.


          आदिवासी तालुक्यांतील अपर पुनद, सोनगीर, मालगोंदा, बाळओझर, वाघधोंड, उंबर विहीर, सालभोये, सिंगलचोंढ या लघु पाटबंधारे योजना तसेच विविध पाझर तलाव लवकरात लवकर मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी दिले.

सन आयलाय गो,शिवलकर नाका अलिबाग

 


Featured post

Lakshvedhi