Wednesday, 16 October 2024

येथे कर माझे जुळती

 *"काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे,*. 

 *(मेजर जनरल विजय जगताप)*


त्याचे असे झाले,

२००२ सालातील हि गोष्ट आहे, आज त्या घटनेला बावीस वर्षे होऊन गेली. 

माझी मुंबईत नियुक्ती झाली होती आणि एक दिवस माझ्या हातात माझी खास नेमणूक झाल्याची ‘ऑर्डर’ पडली.

मी उघडून वाचली मात्र, मी आश्चर्याने थक्क आणि आनंदाने वेडा झालो. 


त्यामध्ये लिहिले होते, कि,

‘मला भारताच्या सर्वोच्च अशा महान फील्ड मार्शल माणेकशॉ यांच्या मुंबई भेटी दरम्यान सुरक्षा अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.’


माझ्या वरिष्ठांनी किती मोठा विश्वास टाकला आहे, ह्या कल्पनेनेच भारावून गेलो होतो. पण थोड्या वेळातच मला माझ्यावरील जबाबदारीची जाणीव झाली आणि मी भानावर आलो! 


मी फिल्डमार्शल माणेकशा यांच्या कार्यालयात दूरध्वनी करून त्यांच्या पुढील कार्यक्रमांची माहिती घेतली.

लवकरच ते मुंबईमध्ये येणार होते. पारशी कुटुंबीयांनी त्यांचा सत्कार कार्यक्रम योजला होता.

त्या दोन दिवसांच्या त्यांच्या दौर्यामध्ये महान अशा सॅम बहादूर सरांना सतत दोन दिवस कारमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये एस्कॉर्ट करणे हा माझ्यासाठी आयुष्यभराचा अनुभव होता. अगदी एक स्वप्न प्रत्यक्षात येणार होते.    

त्या काळात त्याचा करिष्मा जबरदस्त होता. एखाद्या चुम्बकासारखे त्यांचे व्यक्तिमत्व हे आकर्षक होते.


माझ्यासाठी त्यांचा ओझरता सहवास ह्या पूर्वी झाला होता, त्यांच्याशी संवाद WWII, 1971 पासून माझ्या राजपुताना रायफल्सच्या शौर्यापर्यंत, गोरखा सैन्यापर्यंत होता.


आता मुंबईमध्ये मी त्यांच्या आगमनाची वाट बघत होतो, आणि तो दिवस उजाडला. 

मुंबई विमानतळावर ते उतरले आणि मी त्यांना एक जोरदार सलाम ठोकून त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझ्या खांद्यावर घेतली.


त्यांच्या बरोबर गाडीमध्ये बसणे हा देखील एक विलक्षण अनुभव होता. 

माझे लक्ष सतत सर्वत्र होतेच, एक हात खिशातील होल्स्टर मधील पिस्तुलावर होता. 


पारशी समुदायाकडून एनसीपीए नरिमन पॉइंट येथे संध्याकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यात भारताचे फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ उपस्थित राहणार होते. 


आम्ही तिथे पोहोचलो. बाहेरील आवारात गर्दी होतीच, मी त्या गर्दीतून वाट काढत त्यांना सभागृहात घेऊन गेलो. आतमध्ये देखील मोठा जमाव जमला होता आणि जोरजोरात जल्लोष आणि पारशी गाणी गायली जात होती. अगोदरच स्टेजवर कोणीतरी निवेदन करत होते. 


आम्ही आत शिरताच त्या निवेदकाने थांबून सॅमच्या आगमनाची घोषणा केली.

 

संपूर्ण सभागृह क्षणभर शांत झाले आणि नंतर टाळ्यांच्या कडकडाटात सर्व श्रोते उभे राहिले, ‘सॅम सॅम’ असा जयघोष करत सभागृह डोक्यावर घेतले.


सर्व एका सुरामध्ये पारशी स्वागत गाणे म्हणू लागले. 

त्यांना मध्यभागी असलेल्या खुर्चीवर नेऊन बसवण्यात आले. 


लोक त्याच्याभोवती गर्दी करू लागले, त्यांना ओझरता का होईना पण स्पर्श करू लागले, 

त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी झटपटू लागले, 

काही जण त्याच्याशी अत्यंत आदराने आणि प्रेमाने बोलू लागले. त्यामध्ये भारतातील अत्यंत महान अशी पारशी घराणी होती. 


माझ्यावरील जबादारीची जाणीव सतत मला होतीच.

मी, माझ्या कर्तव्यानुसार सर्वांना दूर हलवण्याचा प्रयत्न करत होतो.


सर्वाना विनंती करून बाजूला करून त्याच्याभोवती जागा बनवण्याचा प्रयत्न करत होतो.


तितक्यात मी एक विलक्षण दृश्य बघितले. एक सहा फुट उंच, रुबाबदार अशी व्यक्ती तिथे आली, पटकन जमिनीवर खाली एक गुडघा टेकवून बसली, सॅमचा हात आपल्या दोन्ही हातांनी प्रेमाने धरून त्यांनी तो हात स्वतःच्या डोक्याला आणि ओठाना लावला, अतिशय मृदू आवाजात नम्रपणे ती व्यक्ती सॅम सरांबरोबर बोलत होती. 

खाली जमिनीवर अगदी सॅम सरांच्या पायाशी बसून त्यांचा संवाद चालू होता. 


मी या व्यक्तीला नम्रपणे हलण्यास सांगितले. पण त्या व्यक्तीने तितक्याच विनयाने हलण्यास नकार दिला, 

जमिनीवर बसलेल्या अवस्थेमध्येच त्या व्यक्तीने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, 

"*काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ*". 


त्याचे डोळे करुणा, आदर आणि प्रेम आणि आत्मविश्वासाने भरलेले होते.

त्यांची नजर हि माझ्या अंगावरील गणवेशाचा देखील सन्मान करणारी होती.

आणि

मी देखील त्या व्यक्तिमत्वाकडे बघून भारावून गेलो होतो,

पटकन मी थोडा मागे झालो, म्हणालो ‘होय सर.’ 


समोर खचाखच भरलेल्या सभागृहामध्ये नजर टाकली. समोर प्रेक्षकांच्या रांगांमध्ये खुर्च्यांवर गोदरेज, वाडीया, पूनावाला, भाभा, मिस्त्री अशी एकसे एक महान कुटुंबीय मंडळी बसली होती.


माझ्या लक्षात आले कि, ‘हा मेळावा कोणाचा आहे, कोणता समुदाय आहे. आपले राष्ट्र महान होण्यासाठी ह्या समाजाने काय योगदान दिले आहे. अल्पसंख्याकांमधील पुन्हा अल्पसंख्याक, सूक्ष्मातील अतिसूक्ष्म, परंतु व्यवसायापासून ते सशस्त्र दलापर्यंत, सामाजिक संस्था पासून ते वैज्ञानिकांपर्यंत, सर्वच क्षेत्रात भारताला बलवान करण्यात ह्यां समाजाचे अमूल्य योगदान आहे!’. आरक्षण नसताना आणि सरकारकडून कोणतीही अपेक्षा नसतानाही या लोकांनी भारतासाठी इतकं काही केलं, त्याला तोड नाही!


आणि आणि, ह्या सर्व पारशी समुदायाचे मेरुमणी असणारे टाटा कुटुंबीय कुठे आहे?

त्यांचा कुटुंब प्रमुख कुठे आहे? माझी नजर हुडकत होती,  

होय, त्याच वेळी माझ्या डोक्यातील ट्यूब क्षणार्धात पेटली,  माझे डोळे भरून आले!  माझी मान पुढे वाकली, माझे दोन्ही पाय जुळले, पाठीचा कणा ताठ झाला, छाती पुढे झाली, 

मी मनातूनच काडकन सलाम केला!


भारताचे सर्वोच्च सेनाधिकारी फिल्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या समोर एक गुडघा टेकून खाली बसलेली ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून ते तर साक्षात रतन टाटा होते!

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती.


होय, तेच होते महान रतन  टाटा !


त्यांच्या नजरेत भारताच्या सर्वोच्च सेनाधिकारी असणाऱ्या ‘सॅम’ प्रती असणारा आदर भरून ओसंडून वाहत होता.


एका उद्योगाच्या बादशहा ने भारतीय सैन्याच्या बादशाहाला दिलेला तो आदर युक्त सन्मान होता! एक मानवंदना होती.


माझा आयुष्यातील तो सर्वात प्रेरणादायी क्षण राहिला आहे.

महान रतन टाटा आणि सॅम बहादूर यांना पुन्हा कधीही भेटले नाही, परंतु ते माझ्या आयुष्यातील सर्वोच्च शिखरावर आहेत.


आजही माझ्या डोळ्यामध्ये तीच आश्वासक नजर दिसते आहे, कानामध्ये तोच आवाज घुमतो आहे, 

"*काळजी करू नकोस बेटा, सॅम आमचा आहे, आम्ही त्याची काळजी घेऊ"*. 


*अलविदा रतन टाटा!*


 ----- *मेजर जनरल विजय जगताप*.

 *(शब्दांकन - डॉ संदीप गजानन श्रोत्री, सातारा)*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi