Monday, 22 July 2024

आज रात्रीपासून *म्हातारा पाऊस* चालू होत आहे, त्यानिमित्ताने स्वतःला माहीत व्हावे व पुढील पिढीला कळावे म्हणून नक्षत्रांची माहिती :

 आज रात्रीपासून *म्हातारा पाऊस* चालू होत आहे, त्यानिमित्ताने स्वतःला माहीत व्हावे व पुढील पिढीला कळावे म्हणून नक्षत्रांची माहिती :


मित्रांनो तुम्ही विविध नक्षत्रांचे नावे ऐकले असतील जसे की रेवती नक्षत्र,रोहिणी नक्षत्र,भरणी नक्षत्र तर चला जाणून घेऊया हे नक्षत्र आहेत तरी काय ! आणि ते कसे तयार होतात …


*शास्त्रीय हिंदू धर्मग्रंथामध्ये उदा . महाभारत , हरिवंश यामध्ये नक्षत्रांच्या निर्मितीचे श्रेय दक्ष राजाला दिले जाते.*

*ब्रह्मांडामध्ये अगणित तारे ,ग्रह असतात या ताऱ्यांचा अभ्यास केल्यावर आपल्या ऋषीमुनींना या ताऱ्याचे समूह दिसले आणि याच ताऱ्याच्या समूहाला आपण नक्षत्र असे म्हणतो.*

   *चंद्र पृथ्वीभोवती ज्या मार्गाने भ्रमण करतो त्या मार्गाला 'क्रांतिवृत्त' असे म्हणतात.*

   *या क्रांतिवृत्ताचे २७ समान भाग केलेले आहेत आणि याच भागांना नक्षत्र असे म्हणतात.तर आकाश मंडल मध्ये २७ नक्षत्र आहेत आणि या २७ नक्षत्रांना १२ भागांमध्ये विभाजित केले गेले आहे, ज्याला आपण १२ राशी म्हणतो.*

    *राशीचक्र म्हणजेच २७ नक्षत्राचे वर्तुळ आहे .भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये राशी ठरवण्यासाठी ब्रह्मांडाला ३६० अंशामध्ये विभाजन केले आहे.*

       *३६० अंशला २७ ने भागले असता ३६० /२७ =१३.३३ म्हणजेच प्रत्येक नक्षत्र १३.३३ डिग्री एवढे क्षेत्र व्यापते.*

      *ज्योतिष शास्त्रामध्ये डिग्री म्हणजे=अंश, मिनिटाला = कला , सेकंदला=विकला म्हटले जाते.*

   १३.३३ अंश = १३ अंश + .३३ म्हणजे १/३ .

*१ अंश = ६० मिनिटे असतात.*

१/३ अंश = ६० मिनिटे /३ = २० मिनिटे = मिनिटाला कला म्हटले जाते म्हणून  = २० कला  म्हणजेच प्रत्येक नक्षत्र १३.३३ अंश = १३ अंश २० कला , एवढे असते .

राशी ३० अंश च्या असल्यामुळे काही नक्षत्रे दोन राशीमध्ये विभागले जातात . साधारणत : एक नक्षत्राचे चार भाग असून प्रत्येक भाग ३ अंश २० कलाचा असून त्या प्रत्येक भागाला चरण असे म्हणतात . म्हणजेच प्रत्येक नक्षत्रा मध्ये ४ चरण असतात . एकून २७ नक्षत्रे आहेत म्हणजेच २७ × ४ = १०८ चरण असतात.एक राशीत ९ चरण असतात . 


*२७ नक्षत्रांची नावे-*

१] अश्विनी

२] भरणी

३] कृतीका

४] रोहिणी

५] मृगशीर्ष

६] आर्द्रा

७] पुनर्वसु

८] पुष्य

९]अश्लेषा

१०] मघा

११] पूर्व फाल्गुनी

१२] उत्तरा फाल्गुनी

१३] हस्त

१४] चित्रा

१५] स्वाती

१६] विशाखा

१७] अनुराधा

१८] जेष्टा

१९] मूळ

२०] पूर्वाषाढ

२१] उत्तराषाढ

२२] श्रवण

२३] धनिष्ठा

२४] शततारका

२५] पूर्वाभाद्रपदा

२६] उत्तरभाद्रपदा

२७ ] रेवती


तसेच तैतरिय संहितेत आणि अथर्ववेदात २८ नक्षत्रांचा उल्लेख आढळतो . त्यातील २८ व्या नक्षत्राचे नाव आहे ‘अभिजीत ‘ परंतु कालांतराने हे क्रांतिवृत्तावरून बाजूला सरकले म्हणून आज केवळ २७ नक्षत्रे मानली जातात . 


*सूर्याच्या नक्षत्रात असण्याबद्दल व चांद्रमासाबद्दल काही सामाजिक व सांस्कृतिक संकल्पना/तथ्ये/म्हणी-*


सत्तावीस वजा नऊ = शून्य... मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा आणि हस्त ही महाराष्ट्रातल्या *पावसासाठीची नऊ नक्षत्रे* आहेत.

       

       सूर्य मृग नक्षत्रात आला की, पावसाळा सुरू होतो आणि तो हस्त नक्षत्रात गेला की,पावसाळा संपतो. म्हणून मृग ते हस्त ही सारी पावसाची नक्षत्रे मानली जातात. एकूण नक्षत्रे सत्तावीस असली तरी यांच नऊ नक्षत्रांत पाऊस पडला नाही तर परिणाम शून्य. त्यामुळे, सत्तावीस वजा नऊ = शून्य!


जेव्हा सूर्य मृग नक्षत्रात असतो, तेव्हा गडगडाटासह माॅन्सूनपूर्व पाऊस पडतो. नैर्ऋत्य दिशेकडून माॅन्सून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करीत असतो,पण देशावरची परिस्थिती त्याला अडथळा करते.या संघर्षातून ढगांचा गडगडाट होतो.काही दिवसातच माॅन्सूनचा जोर वाढतो आणि सर्व अडथळे दूर करून माॅन्सून भारतभर पसरतो.

जेव्हा सूर्य हस्त नक्षत्रात असतो, तेव्हा महाराष्ट्रात हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार गडगडाटी पाऊस पडतो.(परतीचा मान्सून /वळीव)त्या काळात हत्तीचे चित्र काढलेल्या बसायच्या लाकडी पाटाभोवती फेर धरून स्त्रिया व मुली भोंडला खेळतात. परतीच्या वाटेवरचा नैर्ऋत्य माॅन्सून आणि येऊ पाहणारा ईशान्य माॅन्सून यांच्या संघर्षामुळे हा गडगडाट होतो.

     २५ मे रोजी सूर्य रोहिणी नक्षत्रात येतो.तो दिवस धरून पुढचे एकूण नऊ दिवस मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या राज्यांत हवेचे तापमान खूप जास्त असते आणि उन्हाळ्याची सर्वाधिक तीव्रता जाणवते. या घटनेला *नौतपा* म्हणतात.


वैशाख वणवा :- वैशाखात जंगलांना आगी लागण्याचे प्रमाण जास्त असते. अश्या आगीला वैशाख वणवा म्हणतात. एखाद्याच्या आयुष्यात रखरखाट असेल, तर त्यालाही वैशाख वणव्याची उपमा देतात.


काल वैसाखी : बंगालमध्ये वैशाख महिन्यात ज्या स्थानिक वावटळी आणि धुळीची वादळे हॊतात त्यांना काल वैसाखी म्हणतात.


श्रावणधारा : महाराष्ट्रात श्रावण महिन्यात सौम्य ऊन व झिमझिम पाऊस पडतो, अशा पावसाला श्रावणधारा म्हणतात.


चैत्रपालवी : चैत्र महिन्यात झाडांनी जी नवी पालवी फुटते तिला चैत्रपालवी म्हणतात.


पानगळ : समशीतोष्ण प्रदेशांत नैसर्गिकरीत्या झाडांची पाने गळण्याचा कालावधी शरद ऋतूचा असतो तर उष्ण कटिबंधात हवामान शुष्क होण्याआधी पानगळ होते.


आधीच उल्हास त्यातून फाल्गुन मास - मराठी म्हण.

दुष्काळात तेरावा महिना. - मराठी वाक्प्रचार

चतुर्मास (चातुर्मास) : आषाढी एकादशीला (शयनी एकादशीला) भगवान विष्णू झोपायला जातात, ते कार्तिकी एकादशीला (देवउठणी/प्रबोधिनी एकादशीला) उठतात. या चार महिन्यांच्या काळाला *'चातुर्मास'* म्हणतात. या काळात हिंदूची व्रतवैकल्ये असतात, आणि जैन साधू 'स्थानकवासी" होतात.

सूर्याच्या धनुराशीत प्रवेश केल्यानंतर, म्हणजे १६ डिसेंबरच्या आसपास खरमास सुरू होतो आणि १४ जानेवारीच्या आसपास संपतो. या महिन्यात सू्र्याचा रथ गाढवे (खर) ओढतात व रथाच्या घोड्यांना विश्रांती मिळते.

      सूर्याच्या मकर राशीतील प्रवेशाच्या दिवशी भारतात मकरसंक्रांत हा सण असतो. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस २०व्या-२१व्या शतकात बहुतेक वेळा १४ किंवा १५ जानेवारीला आला आहे/येईल.


आसाळकाचा पाऊस : आश्लेषा नक्षत्रातला पाऊस


तरणा पाऊस : पुनर्वसू नक्षत्रातला पाऊस


नागडा पाऊस : ऊन असताना पडणारा पाऊस


म्हातारा पाऊस : पुष्य नक्षत्रातला पाऊस


सासूचा पाऊस : मघा नक्षत्रातला पाऊस


सुनेचा पाऊस : पूर्वा फाल्गुन नक्षत्रातला पाऊस


रब्बीचा पाऊस : उत्तरा फाल्गुन नक्षत्रातला पाऊस


हत्तीचा पाऊस : हस्त नक्षत्रातला पाऊस

*पडतील स्वाती तर पिकतील माणिक मोती :* स्वाती नक्षत्रातल्या पावसाचा थेंब शिंपल्यात पडला, की त्याचा मोती होतो, अशी कल्पना आहे. स्वाती नक्षत्रात पाऊस पडला की चांगले पीक येते.


*पडतील चित्रा तर भात खाईल कुत्रा :* चित्रा नक्षत्रातला पाऊन बिन भरवशाचा असतो. पडला तर इतका पडतो की, तो काहीच शिल्लक ठेवत नाही. अगदी वाडग्यात काढून ठेवलेले उष्टावण असो की ताजे जेवण असो, ते एकतर सादळून तरी जाते किंवा बेचव होते. मग त्याचे वर्णन भात खाईना कुत्रा अशा बोलक्या शब्दांत आले आहे.


*आला आर्दोडा झाला गर्दोडा-* आर्द्रा नक्षत्रात पडणारा पाऊस गर्दोडा (चिखल) करतो.(एक ग्रामीण म्हण)


*पडता हत्ती कोसळतील भिंती.*


*पडतील आद्रा तर झडतील गडदरा-* आर्द्रा नक्षत्रात पाऊस बरसला तर, गडकोटांच्या तटबंदी ढासळतील. मथितार्थ असा की आर्द्रा नक्षत्रातला पाऊस पडझड करून जातो.


*पडतील मघा तर चुलीपुढे हगा:* मघा नक्षत्रातला पाऊस इतका सातत्याने पडतो की, माणूस घराबाहेर पडू शकत नाही, उबेसाठी तो चुलीपाशी बसतो. .


*पडल्या मिरगा (मृग) तर टिरीकडे बघा.*

मृगात पेरणी होत नाही, मात्र पेरणीपू्र्व मशागतीची कामे होतात. ही कामे महत्त्वाची असतात. जर का मृगाचा पाऊस पडला तर ही कामे खोळंबतात. परिणामी पुढच्या सर्व कामांचा विचका होतो. मग पावसाच्या मोसमाअखेरीस पोटावरून हात फिरविण्याची अनुभूती येत नाही. जुन्या मागच्या गोष्टींतच समाधान मानावे लागते. त्या अर्थाने टिरीकडे पहा असे शब्दप्रयोजन आहे.


*आश्लेषा नक्षत्र : मी येते सळासळा, मामाजी तुम्ही पुढे पळा.* आश्लेषाचा पाऊस असा असतो, आता होता आता नाही. तुम्ही पुढे पाऊस मागे, नाहीतर पाऊस पुढे तुम्ही मागे, असे याचे कोसळणे. हा सूर-ताल लावून पडत नाही, आली लहर केला कहर आणि गेला सरसर अशी याची तऱ्हा असते.


*पुष्य नक्षत्र(म्हातारा पाऊस):* पडतील पुक (प़ुष्य) तर चाकरीच्या गड्याला सुख!  (पुष्य नक्षत्राचा पाऊस दिवसा ढवळ्या धो धो कोसळतो. आता थांबला म्हणेपर्यंत पुन्हा संततधार सुरू होते. औताला बैल जुंपेपावेतो आभाळ पुन्हा गळू लागते. मग अश्या वेळेला गड्याला कामाला लावता येत नाही. त्याच्यासाठी हा आरामच असतो. हे सुख त्याला क्वचित लाभते.)


*संकलन:- आंतरजाल*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi