Tuesday, 18 June 2024

देवळा बाहेरचा विठ्ठल!!*

 *!!देवळा बाहेरचा विठ्ठल!!*

🙏🌹🙏

काल सकाळी सहज फेरफटका मारायला खाली उतरलो..एक चक्कर संपूर्ण कॉलनी ला मारून ,सकाळची हसरी आणि प्रसन्न शांतता अनुभवून,मध्येच सुरेल किलबिल पक्षांची एकुन आणि डोंगराच्या आड निवांत निद्रा घेणाऱ्या पण अवनी मातेला आपल्या तेजाने कृत्य कृत्य करण्यास आतुर असलेल्या सूर्याचे प्रथम दर्शन घेणे हा तसा तर माझा नित्य दिनक्रम..


प्रभात ऊर्जेचा हा श्वास संपूर्ण दिवसासाठी मला drive करणारा एक फॅक्टर आहे.आणि हा कार्यक्रम गेली पंधरा वर्षे अखंड सुरू आहे..


आज ही ऊर्जा फेरी सकाळी सुरू झाली..अगदी एखाद किलोमीटर वर असलेल्या विठ्ठलाच्या मंदिरापाशी मला थोडीशी गर्दी दिसली म्हणून मी ही घुटमळलो तेथे..


पाहिले तर सात वर्षाची एक चिमुरडी आपल्या दीड वर्षाच्या भावाला बाजूला घेऊन लता दिदींचे "ज्योती कलश छलके ..." गात होती..


कपडे बेताचेच..घरची गरिबी प्रचंड असावी..पण सुरांची सरस्वती मात्र तिच्यावर प्रसन्न होती..तिच्या तेजस्वी रुपात आणि प्रतिभासंपन्न गळ्यात लक्ष्मी साक्षात उतरली होती..तिचा तो दीड वर्षाचा भाऊ सुद्धा त्याच्या वयापेक्षा कितीतरी पटीची स्वभावातील परिपक्वता दाखवत होता..शांतपणे आपल्या बहिणीची प्रतिभा तो ही कौतुकाने पाहत होता..


मला कळेना..किती सुखद अनुभव..माझी सकाळ सार्थकी लागली या आनंदात मी तिथेच रेंगाळू लागलो..एका मागे एक सुरेल गीतांची ती मैफिल मला सोडायची च नव्हती.. मंत्रमुग्ध होऊन मी तिथेच थांबलो..हळू हळू गर्दी ओसरली..आणि आता मी एकटाच होतो.. काही वेळाने त्या गान सरस्वती ने गाणे थांबवले.मला अत्यंत आदराने नमस्कार करून आपल्या भावाला सोबत घेऊन निघायच्या तयारीत ती उठली खरी आणि मला काहीतरी दिसले.. तिच्या बाजूलाच तिने एका छोट्याश्या पाटीवर काही अक्षरे लिहिली होती.. ती पाटी वाचली आणि मी ही थबकलो..


*"मला शिकायचंय...."*


दोनच शब्द..पण माझे कुतूहल शिगेला पोचले.. आस्थेने तिची चौकशी केल्यावर मला कळले तीचे नाव कस्तुरी होते..आणि तिच्या भावाचे प्रसन्न.. कस्तुरी चे बाबा संगीत विशारद होते आणि एका अपघातात त्यांना त्यांचे पाय गमवावे लागले होते.. तेव्हा पासून म्हणजे साधारण वर्ष भरापासून ते घरीच असायचे.. घरची गरिबी सुरवातीपासूनच होती पण बाबांच्या अपघाताने ती दरिद्र्याकडे वळली.. आई घरकाम करून काहीतरी मिळवायची आणि जेमतेम खाता येईल इतकच हे कुटुंब कमवत होते. संस्कारा शिवाय हे दांपत्य आपल्या मुलांना अतिरिक्त काहीही देऊ शकत नव्हते.. त्यात कस्तुरी ला वर्षभरापूर्वी नाईलाजाने शाळा सोडावी लागली.. आणि याचे दुःख कस्तुरी च्या बोलण्यातून जाणवत होते. मला समजलच नाही बोलता बोलता एक तास कसा संपला..



काका मला निघायला हवे.. आई ला मदत करायची आहे..असे म्हणून कस्तुरी, प्रसन्न ला अंगावर घेऊन लगबगीने निघाली..


ती पाटी मात्र माझ्या डोक्यातून काही निघत नव्हती..


*"मला शिकायचंय..."*


विचारांच्या चक्रातून मी बाहेर येतच नव्हतो..माझ्या मुलीचे demands मला आठवू लागले.अमुक एक प्रकारची च बॅग हवी म्हणून असलेला तिचा हट्ट,आणि तो पुरवण्यासाठी आम्हा उभयतां चा चाललेला आटापिटा..सगळे डोळ्यासमोरून हटतच नव्हते..मला शिकायचंय..


शिकण्यासाठी केव्हढी तपश्चर्या करावी लागतेय..सकाळी उठून आपल्या दीड वर्षाच्या भावाला घेऊन गळ्यातल्या सरस्वतीचा आविष्कार इतरांना देऊन त्यात ही भीक ना मागता फक्त एकच अपेक्षा, मला शिकायचंय..


खरंच मला जड होते का तिला शिकवणे?? असे किती पैसे लागतील??? महिना दोन ते तीन हजार ..जास्तीत जास्त..मला खरंच फार नव्हती ही रक्कम..पण द्यावे की नाही हा संभ्रम मात्र नक्कीच होता.कुटुंबाला घेऊन एकदा हॉटेलिंग करताना अतिशय मामुली वाटणारी रक्कम अचानक मला खूप मोठी वाटायला लागली..कसे असते ना..


समाजासाठी आपण काही तरी करायला हवे हे स्वतःसह इतरांना मी आज पर्यंत हजारो वेळा सांगितलंय.पण मग आज जी गोष्ट मला शक्य आहे ते करताना मात्र माझा हात आणि मेंदू दोन्ही आखडले आहे.. लाज वाटली स्वतःची..आणि एक निर्णय झाला..


दिवसभर मी कस्तुरी च्या admission साठी माझे सो कॉल्ड सगळे resources वापरले.तिच्या वडिलांना भेटलो..कागदपत्रे घेतली.आणि तिचे admission आमच्या विभागातील एका अत्यंत प्रतिष्ठित अशा शाळेत केले..कस्तुरी आणि प्रसन्न यांच्या शिक्षणाची जबाबदारी मी घेतली ती पुढे किती तरी वर्षे..ते कुटुंब आमचे कधी झाले ते कळलच नाही..साधारण आठ एक वर्षांनी कस्तुरी ला तिच्या कुटुंबीयांसमवेत आपल्या गावी जावे लागले ते कायमचे....


हळू हळू संपर्क तुटला..आणि कस्तुरी विस्मृतीत गेली..


परवा सहज टीव्ही लावला..आणि एका सुरेल आवाजाने अक्षरशः डोळ्यात पाणी आणलं..reality show मध्ये एक तरुणी गाऊन झाली होती..आणि अंतिम निकाल तिच्या बाजूने लागला..संगीत क्षेत्रातले दिग्गज तीचे कौतुक करताना थकत नव्हते..एका कॉर्पोरेट मध्ये अतिशय मोठ्या हुद्द्यावर काम करत असलेल्या या मुलीला जेव्हा विचारण्यात आले की या यशाचे श्रेय कुणाला..तर ती लगेच म्हणाली विठ्ठला ला..


म्हणजे..???


*होय त्या विठ्ठला ला ..त्या परमेश्वराला जो मला त्या मंदिरात नाही तर मंदिरा बाहेर भेटला..*


मला योग्य दिशेला जायचे होते पण काकांनी ती हिम्मत केली आणि मला शाळेत घातलं..कदाचित त्यांनी केलेली ही मदत त्यांच्या साठी खूप छोटी असेल आज ही ..पण माझे आणि प्रसन्न चे आयुष्याचं सोनं झाले..


काका आज जर तुम्ही मला ऐकत असाल तर हा पुरस्कार तुमचा आहे काका..


माझ्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते..कस्तुरी ने आज मला खूप मोठे केले..पण मी खरंच काय केलेलं..एक छोटीशी मदत ..आणि एक आयुष्य घडले.. स्वतचा अभिमान नव्हे पण बरे वाटले..एव्हढे समाधान मी कधीच अनुभवले नव्हते..हे मला आयुष्यभर पुरणार होते..


*देवळाबाहेर चा विठ्ठल...*


माझ्या कायम लक्षात राहिला आणि माझ्या या नंतरच्या पंढरी चा शोध घेण्याचा निश्चय करून मी एका वेगळ्या अनुभूतीने झोपायला गेलो..


सकाळी मला सर्वात आधी देवळातल्या विठ्ठला चे आभार मानायचे होते..आणि प्रार्थना करायची होती.., 

*"तुझा छोटासा अंश माणुसकीचा सर्वांना दे..मला दिलास काही वर्षांपूर्वी ..आणि जीवन काय हे मला कळले.."*


*"..आणि देवळाबाहेर चे असे विठ्ठल बरेच होऊ देत.."*


कारण अशा बऱ्याच कस्तुरी ज्यांच्यात लक्ष्मी,सरस्वती आणि प्रतिभा उपजतच आहेत..त्यांना या विठ्ठलाची गरज आहे...


🙏🙏🌹🙏

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi