Wednesday, 15 November 2023

बहीण भाऊ* नाते म्हणजे पाणीपुरी

 *बहीण भाऊ*

   बहीण भाऊ हे नमुने जन्मालाच यावे लागतात. पोतंभर पैसे घेऊन बाजारात गेलात तरी दुकानात हे नग... नगाने मिळायचे नाहीत.

   प्रेम, जिव्हाळा, हेवा, स्पर्धा, आस्था, काळजी असे सगळे भाव ह्या एका नात्यात सामावलेले असतात. 

     थोडक्यात हे नातं अगदी पाणीपुरी सारखं असतं. भांडणाचा तिखटपणा, चेष्टेचा अंबटपणा, प्रेमाचा गोडवा, काळजीचं मीठ, कुरकुरीत खिलाडुपणा असं सगळं ह्यात असतं, पण ह्यात नं कडवटपणाला मात्र जागा नाही.

   एकाने पूर्व म्हटलं की दुस-याने पश्चिम म्हटलेच म्हणून समजा. पण दुस-या कोणाशी भांडण्याची वेळ आली की, मात्र ह्यांची एकी मजबूत. दोघांपैकी एकाला झाप पडत असली की दुस-याच्या  वर्तनात अचानक सदाचार आणि सन्मती दिसु लागते. ते कसे काय, हा दीर्घ संशोधनाचाच विषय आहे. चाॅकलेट वाटून घेताना सुतभर कमी जास्त होऊ नये म्हणून स्केलपट्टीने मोजणारे हे, कधी अचानक स्वतःच्या वाटणीचा आवडीचा उकडीचा मोदक भावंडाला आवडतो म्हणून त्याला किंवा तिला देतील हे सांगता येत नाही. 

एकमेकांवर सतत नजर ठेवून असणारे बहीण-भाऊ एकमेकांचं गुपित मात्र कुणालाही कळू देत नाहीत.  

   शिक्षकांनी दिलेला मार, लपून छपून पाहीलेले सिनेमे, शिकवणीला मारलेली चाट, ही असली गुपित स्वतःच्या वयाची चाळीशी उलटली की, हे बहीण भाऊ आई समोर अलगद उलगडत जातात, अर्थात तेव्हा देखील आईच्या मूडचा अंदाज घेऊन मगच. 

    अगदी तारीख वार किंमती सहीत आई बाबांनी पहिल्यासाठी काय घेतलं होतं हे दुस-याच्या  आणि दुस-यासाठी काय घेतलं होतं हे पहिल्याच्या इत्यंभूत लक्षात असतं. 

    भावंडाच्या मारामा-या सोडवताना अरे काय, वैरी आहात का एकमेकांचे?' म्हणणारी आई जेव्हा भावाला बहिणीच्या काळजीने कासावीस होताना बघते किंवा बहिणीला निजलेल्या भावाच्या डोक्यावरून हात फिरवताना पाहते तेव्हा तिचे डोळे भरून येतात. 

    विनाकारण तासन् तास हसणारी काही भावंड मोठी झाल्यावर विनाकारण एकमेकांना साधा फोन देखील करत नाहीत. 

     न भांडता मोठे झालेले बहीण भाऊ मी तरी कधी पाहीले नाहीत.  पोहणं कसं एकदा शिकलं की विसरत नाही, तसं बहीण भावांच्या स्वतःच भांडण सोडवण्याच्या कलेचं देखील  आहे. जसं पाण्यात पडल्यावर जिवाचा आटापिटा करत आपण  हातपाय मारतो नं तशी तळमळ हवी भांडण सोडवायला.

    जसं पोतं भर पैशात भाऊ बहीण विकत मिळत नसतात तसे ते तीळभर अभिमानानं मात्र  कायमचे दूर होऊ शकतात.


लहानपणी आईने कान पिळला की, आपोआप शहाणपण यायचं आणि भांडण मिटायच. पण *आई  बाप* काही जन्मभर पुरत नाहीत आणि *भाऊ बहीण* विकत काही मिळत नाहीत.


*भाऊबीज निमित्ताने सर्व भाऊ बहिणींना हार्दिक शुभेच्छा.*


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi