Monday, 2 October 2023

शाळा सुटली पाटी फुटली!

 शाळा सुटली पाटी फुटली!

  काही दिवसांपूर्वी माझ्या बालवयातील हे गाणे एका ग्रुपवर ऐकले आणि दगडी पाटीची आठवण मनात घर करून राहिली. मध्यंतरी लास्या,माझी नात वय वर्षे पावणेदोन हिच्यासाठी तिच्या आजोबांनी एक पाटी आणली पण दगडी पाटी मात्र मिळाली नाही. पत्र्याची मिळाली जी काही दिवसांतच खराब झाली. नातीनेही समजून शीss(खराब) झाली म्हणून बाजूला टाकून दिली.तिच्या बोबड्या बोलानी पाटी पेशील (पेन्सिल) हा हट्ट धरल्याने दुसरी पाटी आणणे क्रमप्राप्तच होते. पण आता मात्र दगडीच पाटी हवी असा म्हातारा हट्ट मी धरला.आणि यजमानांची पंचाईत झाली. सुदैवाने पेणला आमच्या गावी फेरी झाली आणि ह्यांना मी सांगितले की पेणला नक्की पाटी मिळेल व ती मिळाली ही! 

 पाटी हातात घेताच मी १-४च्या इयत्तेत फिरुन आले.

दगडी पाटी शी किती आठवणी निगडीत होत्या. दसऱ्याच्या दिवशी केले जाणारे पाटी पूजन त्यासाठी कोळश्याने पाटी घासून काळीकुळकुळीत करणे त्यासाठी दिवसांचा अर्धा वेळ वापरणे, (वाया घालवणे असे मी म्हणणार नाही), दगडी पाटीवरचा न केलेला अभ्यास पुसला बाई असे केविलवाणा चेहरा करून सांगणे.कारण बरेचदा माझा अभ्यास खेळण्याच्या नादात झालेलाच नसे शाळेतून घरी आल्यावर बाजूला टाकलेले  दप्तर दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना हातात येई. ज्या दिवशी अभ्यास झाला असेल त्या दिवशी दिमाखात पाटी ची कडी हातात धरून शाळेत जात असे व वर्गात बाई आल्याबरोबर बाई अभ्यास तपासता ना असा आगाऊपणा ही चौथीत असताना मी बरेच वेळा केला होता. अर्थात त्या बाई होत्या माझी चापलुसी  त्यांच्या लक्षात यायची व त्या गालातल्या गालात हसत माझी पाटी सोडून बाकी सर्वांच्या पाट्या पहात असत.

   पाटीवरचा अभ्यास पुसू नये म्हणून दप्तरात दोन पुठ्ठे असायचे त्यांच्यामध्ये पाटी ठेवली की ती पुसत नसे. दप्तर तपासल्यावर माझी थाप बाईंच्या लक्षात यायची आणि हातावर एक  हलकीशी पट्टी मारून माझी शिक्षा पूर्ण होत असे. विशेषतः पाढे लिहायचा अभ्यास असला की तो हमखास पुसला जाई. त्यावेळी भरपूर अभ्यास करण्यासाठी डबल पाटी सुध्दा मिळायची. मी भरपूर अभ्यास करावा म्हणून आई ने ती पाटीसुध्दा माझ्यासाठी आणली होती.पण अभ्यास करायचाच नाही, पाढे लिहायचे नाही असा पण जिने केला होता तिला डबल पाटी काय उपयोगाची! पण ती सर्वांकडे नसे त्यामुळे ती पाटी अप्रूपाची होती.

   पाटी फुटणे हे एक कार्यक्रम असायचा.वर्षातून किमान ४-५ पाट्या तरी मला लागत असत. 

पाटी फुटली की किमान महिनाभर तरी ती आईपासून लपून राहायची कधी आई अभ्यासाला घेऊन बसली की तिच्या लक्षात येत असे मग तिचा एक धपाटा पाठीवर पडायचा आणि रडारडीत  अभ्यास पुन्हा बाजूला! 

 पाटीवरची पेन्सिल हा पण मजेचा विषय, रोज एक रुळ( पेन्सिल )लागायचा. साधा रुळ व चांदी लावलेला रुळ असे दोन प्रकार तेव्हा उपलब्ध होते. अभ्यासाला बसण्यापूर्वी त्याला घासून टोक काढणे ,पाटी पुसण्यासाठी स्पंज भिजवणे किती कामे करावी लागत.

  आज हे सर्व दगडी पाटी पाहिल्यावर आठवले. आजच्या शाळेत पाटी हा प्रकारच नाही. शिशुवर्गापासूनच वही पेन्सिल!

पाटीची ही मजा त्यांना मिळत नाही. अर्थात त्यांचे मस्तीचे फंडे वेगळे  आहेत.

  लास्याला तिच्या आजोबां बरोबर पाटीवर रेघोट्या मारताना पाहून आनंद झाला. तीही खूप आवडीने पाटी घेऊन बसते. तिची तिची रेघोट्या मारून हे फिशु (फिश) चंदामामा, फूल  पान ,पाटीवर हात ठेवून हाताचा छाप काढण्याची हुबेहूब नक्कल करणे व स्वतःचा जीव रमवणे हे चालू असते. आम्ही तिला सांगतो पाटी हळू ठेव ,फुटेल ,हेच वाक्य आमच्या हातात पाटी असल्यावर आम्हांला ऐकवते .

 निरागसता ती हीच!

असो पाटीपुराण खूप झाले.

शाळा सुटली ,पाटी ही सुटली,पण

नातीच्या योगे पुन्हा हाती आली!

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi