एक भिकारी असतो. तो एका शांत दुपारी, देवळाबाहेर बसून आरामात नुकत्याच कोणीतरी दिलेल्या भाजीभाकरीचा आस्वाद घेत असतो. त्याक्षणी त्याच्या मनात कोणतेही विचार नसतात. तो अतिशय न्युट्रल असतो. इतक्यात एक मनुष्य बाईकवरून येतो. तो भिकाऱ्याला बघून जवळ येतो आणि म्हणतो, “बरं झालं तुम्ही दिसलात. आज माझ्या आजोबांचं श्राद्ध होतं. मला अन्नदान करायचं होतं. गावात कोणी दिसतंय का ते आधी बघावं म्हणलं. तासभर झाला कोणीच दिसलं नाही. बरं झालं तुम्ही सापडलात. आलोच दहा मिनिटांत... श्रीखंडपुरी घेऊन आलो” इतकं बोलून निघून जातो. भिकाऱ्याचं समोर असलेलं जेवण आपोआपच मंदावतं. बाईकस्वार गेलाय त्या दिशेकडे नजर ठेवून तो बसतो. भाजीभाकरी बाजूला ठेवून वाट बघू लागतो. दहा मिनिटे, पंधरा मिनिटे.... तासभर झाला तरी तो बाईकस्वार काही येत नाही. श्रीखंडपुरी खायला मिळेल ही आशा तीव्र असते. भिकारी वाट बघतो. पोटात कावळे ओरडत असतात. तो पक्वान्नाच्या आशेने क्षुब्ध होतो..मगाचची शांत अवस्था संपते, डोकं फिरतं. तो गेलेला मनुष्य काही परत येत नाही. आता भिकारी कंटाळून समोरची भाजीभाकरी खाऊ लागतो. पण आता त्याची चव आवडेनाशी होते. भाजी बेचव तर भाकरी कडक वाटते....मनुष्य काही येत नाही, श्रीखंडपुरी मिळत नाही...
आपलंही असंच होतं बरेचदा...आपल्या हाती काहीतरी असतं. त्यापेक्षा भव्यदिव्य काही मिळावं अशी आशा असते (आशा, महत्वाकांक्षा नक्की असायला हवीच) पण ती आशा जेव्हा हतबलतेचं रुप घेते आणि प्रत्यक्षात काही मिळत नाही तेव्हा त्याक्षणी आपल्याकडे जे हाती आहे तेही नकोसं वाटू लागतं. त्याचीही किंमत क्षुल्लक होते. त्याचा आनंद आपण घेऊ शकत नाही ही फॅक्ट आहे. माझ्या मते आशेचा किरण दिसला तरी आनंद मानावा आणि विझला तर जे याक्षणी आपल्या नशिबी आहे त्या वर्तमानाचा आनंद घ्यावा....
No comments:
Post a Comment