Sunday, 8 August 2021

 *🌸ताटी उघडा ज्ञानेश्वरा...........१🌸*


                      *🙏आज मला संत मुक्तबाईंची, खरे पाहता त्यांच्या त्या 'ताटी उघडा ज्ञानेश्वरा' ह्या अभंगाची खूपच  आठवण येत होती. त्यांचा दादा, म्हणजे आमचे श्रीज्ञानेश्वर जेव्हा रागावून दार बंद करून बसले, तेव्हा त्यांनी त्यांना समजवण्यासाठी उत्स्फूर्तपणे एका पाठोपाठ एक असे बारा अभंग रचून म्हंटले, जे ताटीचे अभंग म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्यापैकी पहिल्या अभंगाचे आज रसग्रहण करूया. पाठची बहीण असूनही जगावर रुसुन बसलेल्या आपल्या ज्ञानदादाला तिने अधिकारवाणीने समजावले. संत कोणाला म्हणावे, संताची वागणूक कशी असावी हे आपल्या ज्ञानदादाच्या मनावर बिंबवले. ताटीच्या अभंगात ज्ञानोबांच्या ह्या मुक्तेचे हळुवार, समंजस, प्रसंगावधानी, उच्च पातळीवरचे व्यक्तिमत्व साकार झाले आहे. त्यात मुक्ताईने जी संतत्वाची लक्षणे आपल्या दादाला सांगितली आहेत ती मूर्तिमंत तिच्या व्यक्तित्वात दिसून येतात.*


*-- १ --*

*संत जेणें व्हावें । जग बोलणे साहावें ॥*

*तरीच अंगी थोरपण । जया नाही अभिमान ॥*

*थोरपण जेथे वसें । तेथे भूतदया असें ॥*

*रागें भरावे कवणाशी । आपण ब्रम्ह सर्वदेशी ॥*

*ऐशी समदृष्टी करा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥*


         *मुक्ताबाई म्हणतात की संतांना जगाची बोलणी सहन करावीच लागतात. ज्याला संत बनायचे आहे, त्यांना जगाचे कटू बोल हे सहन करावेच लागतात, कारण संतांची विचारधारा आणि सामान्य जनांची विचारक्षमता ह्यामध्ये जमीन-अस्मानाचे अंतर असते. जगाच्या पाठीवर असा एकही संत झाला नसेल की ज्याला तत्कालीन समाजाने छळला नसेल. मग ते एकनाथ महाराज असोत वा तुकोबा. संतांचे महत्व समाजाला नेहमीच त्यांच्या पश्चात का जाणवते हे एक न सुटणारे कोडेच आहे. कदाचित ती त्यांची परमेश्वराने घेतलेली परीक्षा असावी.....जे ते सहजी पार करतात.*


         *हे बोलणे सहन करायचे तर त्यासाठी अहंकार त्यजावा लागतो आणि अहंकार त्यागल्याशिवाय थोरपण कसे येईल? संतांचे जीवन हे अज्ञ जनांच्या उद्धारासाठीच असते ना? अज्ञानी समाजाकडून अजून कसली वेगळी अपेक्षा ठेवावी? पण म्हणून त्या समाजाला सोडून, त्यांच्या वागणुकीने रुसून जर संत समाजापासून दूर निघून गेला, तर त्या समाजाचा उद्धार कसा होईल? अजाण समाजाचे हे पोरपण जाणून अभिमान गळून पडताच हृदयात भूतदया जागृत होते आणि आपोआप थोरपण येते....त्यासाठी अजून वेगळे असे काही करावे नाही लागत.*


         *त्या भूतदयेने त्यांची दृष्टी इतकी विशाल झालेली असते की त्यांना आपल्या ब्रह्मस्वरूपाची पूर्ण जाणीव होते आणि हेच ब्रह्म जर साऱ्या चराचराला व्यापून राहिले आहे, तर मी कुणाहूनही आणि कुणीही माझ्याहून वेगळा नाहीच ही सर्वश्रेष्ठ अनुभूती होते.....म्हणून तर तीर्थक्षेत्री जाऊन आणलेले गंगाजल आमचे एकनाथ महाराज तहानलेल्या गाढवाच्या मुखी रिते करू शकतात. मुक्ताबाई म्हणतात की ब्रह्मस्वरूपात जर सर्वत्र मीच आहे, तर आपण कुणावर आणि कसे रागवावे?*


        *ह्या भावंडांच्या आयुष्यातील ही घटना ही एक ईश्वरी लीला आहे. ज्ञानस्वरूप ज्ञानेश्वर महाराज काय हे सर्व जाणत नव्हते? पण असे काही नाट्यपूर्ण घडल्याशिवाय आम्हा सामान्य जनांसाठी ज्ञानगंगा प्रवाहित कशी होईल? म्हणून हे त्या ईश्वराने घडविलेले एक नाटक आहे. वेळप्रसंगी आपल्याहून लहान असलेलाही जर आपल्याला काही योग्य असे समजावीत असेल, तर आमच्यासारखा सामान्य माणूस म्हणेल की, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे मी पाहिले आहेत, मला नको शिकवूस...... पण आमची माऊली असे नाही म्हणत. खरा थोर कसा असतो हे आम्हाला समजविण्यासाठी हे सगळे नाट्य आहे. हे जर निवृत्तीनाथांनी सांगितले असते तर.....तर वेळप्रसंगी योग्य असल्यास लहानाचेही ऐकावे ही शिकवणूक आम्हाला नसती मिळाली ना?*


           *अभंगाच्या अखेरीस ही धाकटी बहीण आपल्या दादाला सांगते की, 'ऐशी समदृष्टी करा। ताटी उघड ज्ञानेश्वरा।।' ही ओळ साधीसुधी नाही, ती 'ताटी उघडा दादा' असे नाही म्हणत. का? कारण हा संवाद आता बहीण-भावाचा उरलेला नाही. आता एक ज्ञानी आत्मा अधिकारवाणीने एक तुल्यबळ अशा, पण क्रुद्ध झालेल्या आत्म्याला पुनःजागृत करीत आहे....समत्वबुद्धि धारण करण्यास सांगत आहे....क्रोधविकाराने अल्पकाळासाठी का होईना, पण बंद झालेले बुद्धीचे कवाड उघडण्याचे आदेश दिला जात आहेत असे जाणवते. हे जे ज्ञानियांच्या बाबतीत घडू शकते, ते माझ्यासारख्या सामान्यांच्या बाबतीत घडले तर नवल ते काय?.. पण तेव्हा मुक्ताईचा हाच आदेश माझ्यासाठी असणार............ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हरि🕉️*

No comments:

Post a Comment

Featured post

Lakshvedhi