एआय’ तंत्रज्ञानामुळे शेतीत प्रगतीचा नवा मार्ग
-कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे
मुंबई, दि. 21 : राज्यातील कृषी क्षेत्राचा विकास दर सन 2024-25 मध्ये 8.7 टक्क्यांवर पोहोचला आहे. पीक नियोजन, उत्पादन वाढविण्यासाठी आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन दिले जाणार आहे. मेहनती शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारच्या पाठिंब्यामुळे शाश्वत शेतीची दिशा मिळत असल्याचे कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेत सांगितले..
विधानसभेत 293 अंतर्गत च्या चर्चेला उत्तर देताना कृषी मंत्री कोकाटे म्हणाले की, राज्यातील कृषी क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत पाणी व्यवस्थापन, जमिनीच्या आरोग्याचे संवर्धन, आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब आणि कृषिपूरक उद्योगांना प्रोत्साहन यावर भर देण्यात येत आहे.
कोकण विभागात स्मार्ट प्रकल्पांतर्गत 63 प्रकल्पांना प्राथमिक मंजुरी देण्यात आली आहे, तर 52 प्रकल्पांना अंतिम मंजुरी मिळाली आहे. याशिवाय, खतांवरील जीएसटी कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडे राज्य सरकारने विनंती केली आहे. कृषी व ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी 2,100 कोटी रुपयांचा बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प राबविला जात आहे. शेतमालाच्या मूल्यसाखळीच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून कृषी नवउद्योजकांसाठी नवे मार्ग खुले केले जात असल्याचेही कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितले.
००००
No comments:
Post a Comment